डॉ. जयदेव पंचवाघ brainandspinesurgery60@gmail.com

उपचार वा शस्त्रक्रिया अधिकाधिक सुकर आणि निधरेक करणं हेच वैद्यकशास्त्राच्या प्रगतीचं लक्षण, तरीही धोके कसे काय उरतात?

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करणं म्हणजे एका अर्थाने निसर्गाच्या नियमानुसार घडत जाणाऱ्या गोष्टी शरीराच्या रचनेत फेरफार करून बदलणं. अतिप्राचीन काळापासून त्या त्या काळाला अनुरूप अशा शस्त्रक्रिया मनुष्यप्राणी करत आलेला आहे. अर्थातच निसर्गाच्या आणि विशिष्ट रोगाच्या घडणाऱ्या घटनांमध्ये शरीर उघडून हस्तक्षेप करण्यामध्ये धोके हे नेहमीच संभवतात. ज्याप्रमाणे आखूडशिंगी व बहुदुभती गाय नसते म्हणतात, त्याचप्रमाणे धोका नसलेली शस्त्रक्रिया जगात अजून जन्माला यायची आहे. तसं म्हटलं तर प्रत्येक मानवी कार्यामध्ये धोका असतोच. रस्त्यावरून चालणं यासारख्या अगदी सर्वसाधारण गोष्टीमध्येसुद्धा धोका असतोच नाही का?

शस्त्रक्रियेत संभाव्य असलेले धोके प्रत्यक्ष घडण्याची शक्यता नेमकी किती हे समजून घेणं सर्वसामान्य जनतेलाच नव्हे तर अगदी उच्चशिक्षित लोकांनासुद्धा अवघड असतं.

अनेक वर्षांपासून विशिष्ट शस्त्रक्रियेमध्ये एखादी अघटित घटना घडण्याची शक्यता किती याची संभाव्यता बदलत आली आहे. मी मागच्या एका लेखात लिहिल्याप्रमाणे मागच्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांत मेंदूतील गाठी काढण्याच्या शस्त्रक्रियेत पन्नास टक्क्यांहून जास्त धोका होता. ती परिस्थिती आज बदलली असली तरी ‘शून्य धोका असलेली’ शस्त्रक्रिया निर्माण होण्याची शक्यता जवळपास नाहीच म्हटलं तरी चालेल.

यासंदर्भात घडलेली एक घटना मला आठवते. एका संध्याकाळी ओपीडीमध्ये एक मध्यमवयीन गृहस्थ त्यांच्या पत्नीचा एमआरआय घेऊन आले. त्यात त्यांना मेंदूच्या अगदी आतल्या भागात एक गाठ असल्याचं स्पष्ट दिसत होतं. या गाठीला शास्त्रीय भाषेत ‘कॉलॉइड सिस्ट’ असं नाव आहे. ही गाठ मेंदूच्या जवळजवळ मध्यभागी असते आणि जरी कॅन्सरची नसली तरी बरीच महत्त्वाची केंद्रं त्या गाठीला चिकटली असल्यामुळे ती सुखरूप काढणं हे जिकिरीचं काम असतं. शस्त्रक्रिया केली नाही तर मात्र या गाठीमुळे मेंदूतला दाब अचानक वाढून जिवाला धोका संभवतो. म्हणजे शस्त्रक्रिया अनिवार्य तर आहे; पण अवघड अशा प्रकारची आहे असा काहीसा प्रसंग. या शस्त्रक्रियेतले धोके कमी करण्याच्या दृष्टीनं न्यूरोसर्जरी या शास्त्रात गेल्या दहा-पंधरा वर्षांत अनेक बदल झपाटय़ाने झाले आहेत. उदा.- अशा अनेक केसेसमध्ये या गाठी एन्डोस्कोप म्हणजे दुर्बीण मेंदूमध्ये घालून काढता येतात. गरज पडली तर कॉम्प्युटरचं साहाय्य दिशानिर्देशासाठी घेता येतं.

हे सर्व खरं असलं तरी अशा अवघड शस्त्रक्रियेत जिवाला शून्य टक्के धोका आहे, असं कधीच असू शकत नाही. ज्या गृहस्थांच्या पत्नीला हा आजार झाला होता ते म्हणाले, ‘डॉक्टर या शस्त्रक्रियेत काही धोका तर नाही ना? खरं सांगायचं तर आम्हाला १०० टक्के गॅरंटी असल्याशिवाय हे ऑपरेशन करायचं नाही !’

बऱ्याच वेळेला अगदी असंच नसलं तरी साधारणपणे या अर्थाच्या जवळपास जाणारं विधान न्यूरोसर्जरीच्या ओपीडीत ऐकावं लागतं.  अशा आग्रही विधानांमुळे कधीकधी ‘हा आजार आपणच निर्माण केलेला असून तो बरा करण्याची मानसिक, शारीरिक आणि भावनिक जबाबदारी आपलीच आहे की काय’ अशी एक भावना  मनात निर्माण होते. यातला मजेचा भाग सोडला तरी एक प्रश्न शिल्लक राहतोच तो म्हणजे ‘मेंदूची शस्त्रक्रिया खरोखरीच किती सुलभ आणि धोकारहित आहे?’

कुठल्याही शस्त्रक्रियेतील धोका, हा टक्केवारीत सांगण्यात येतो. उदाहरणार्थ, ‘या शस्त्रक्रियेत पाच टक्के धोका आहे’- या विधानाला एका मर्यादेपलीकडे फारसा अर्थ नाही. धोका आहे, म्हणजे कोणता धोका आहे? जिवाला धोका आहे, का एखाद्या अवयवाला धोका आहे? असे अनेक प्रश्न यात येतात. त्यामुळे विधानाचा अर्थ,  ‘आंतरराष्ट्रीय अनुभवाप्रमाणे ९५ टक्के रुग्णांना हा धोका संभवत नाही’ एवढाच होतो. २५ टक्के धोका असेल तर ती कठीण व एक टक्का धोका असेल तर ती सुलभ असा ढोबळ अर्थ यात असतो.

ज्या रुग्णांच्या बाबतीत हा धोका प्रत्यक्षात येतो, त्यांच्या बाबतीत हा एक किंवा पाच टक्के नसून १०० टक्के  असतो हे समजणं महत्त्वाचं. हे नीट समजावून घेतलं तर ‘डॉक्टर, तुम्ही फक्त एक टक्का धोका म्हणाला होतात, आता बघा काय झालं!’ अशी वाक्यं ऐकू येणार नाहीत. संख्याशास्त्र जेव्हा एक टक्का धोका असल्याचं सांगतं, तेव्हा ‘तुम्ही या एक टक्क्यात बसत नाही’ अशी हमी थोडीच देतं? ही हमी आपल्याच मनाने स्वत:ला दिलेली असते. असो. मेंदूच्या शस्त्रक्रियेत येणारे धोके, हे इतर अवयवांपेक्षा अधिक व तीव्रतेचे असतात. याची कारणं अनेक आहेत. पहिलं कारण म्हणजे मेंदू हा अत्यंत नाजूक अवयव आहे. नेहमीच्या शरीर-तापमानाला तो साधारणपणे लोण्याच्या घनतेचा असतो. त्यामुळे त्याला इजा सहज होऊ शकते. दुसरं कारण मेंदूच्या पेशी एकदा नष्ट झाल्यावर परत नवीन तयार होत नाहीत. आतडय़ांच्या, त्वचेच्या, हाडाच्या व स्नायूंच्या पेशी परत तयार होऊ शकतात. तसंच विचार, भावना, भाषा, तर्क इत्यादी प्रगल्भ क्षमतांपासून हालचाल, श्वासोच्छ्वास, हृदयाचं कार्य व इतर संप्रेरकं यांच्यावरल्या नियंत्रणापर्यंत, अत्यंत महत्त्वाची करय छोटय़ा जागेत एकमेकांजवळ एकवटलेली असतात. महत्त्वाच्या केंद्रांना अपाय होण्याची शक्यता असते. चौथं म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीच्या (पांढऱ्या)  पेशी रक्तप्रवाहातून सर्व शरीरात पोहोचतात. मेंदूच्या रक्तवाहिन्या व मेंदू यांच्यामध्ये मात्र एक अडसर निसर्गानं घालून ठेवलेला आहे. याला ब्लड- ब्रेन बॅरियर म्हणतात. या नाजूक अवयवांवर विषारी रक्त घटकांचा परिणाम होऊ नये यासाठी निसर्गानं ही योजना केलेली आहे. पण त्यामुळेच मेंदू किंवा मज्जारज्जूतून जंतूंचा प्रादुर्भाव झाला, तरी रोगप्रतिकारक शक्ती वेगानं तिथं पोहोचत नाही. उदाहरणार्थ पोटाचं ऑपरेशन चालू असताना जर जंतुसंसर्ग झाला, तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती तातडीनं त्याचा मुकाबला करते; हे जंतू वाढण्याच्या आतच ते नष्ट करते. मेंदूत किंवा मणक्यात जंतुसंसर्ग झाल्यावर मात्र, एवढय़ा वेगानं रोगप्रतिकारक शक्ती तेथे पोहोचू शकत नाही. त्यामुळेच मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेत जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियांमध्ये अथवा नंतर अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. जसं की मेंदूच्या महत्त्वाच्या भागाला धक्का लागणं आणि त्यामुळे त्या भागाचे कार्य थांबून कमजोरी येणं. किंवा ऑपरेशन चालू असताना मेंदूतला दाब अचानक वाढणं. तिसरा धोका म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर मेंदूतील सूज किंवा दाब वाढणं. चौथा, ऑपरेशन चालू असताना, मेंदूच्या रक्तवाहिनीतून प्रचंड प्रमाणात रक्तस्राव होणं, ऑपरेशन चालू असताना किंवा नंतर मेंदू सोडून इतर अवयवांच्या कार्यात समस्या येणं. उदाहरणार्थ हृदय, मूत्रिपड, यकृत इत्यादी. रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार असल्यास याची शक्यता अधिक असते. तसंच जंतू प्रादुर्भाव. ऑपरेशन चालू असताना हवेतले जंतू, रुग्णाच्या शरीरातले जंतू,  त्वचेवरच्या  ग्रंथी रक्तात फिरणं इत्यादी. यांच्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो, तसंच ऑपरेशनला लागणारी उपकरणं योग्य प्रकारे र्निजतुक केली नसल्यास त्यातूनही होऊ शकतो. आपण आधीच बघितल्याप्रमाणे, मेंदू व मणक्यात रोगप्रतिकारक शक्ती इतर अवयवांपेक्षा कमी असते. शिवाय बाहेरून दिलेली जंतुनाशकं तिथं पोहोचणं अवघड असतं. थोडक्यात या जंतू प्रादुर्भावावर इलाज करणं कठीण असतं. मेंदू सोडून इतर अवयवांत (उदा. फुप्फुस, मूत्रसंस्था, रक्तवाहिनी इ.) जंतूंचा प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता असते. ऑपरेशननंतर काही तासांत वा दिवसांत मेंदूत रक्तस्राव होणं. मेंदू आणि मज्जारज्जूभोवती सेरेब्रो – स्पायनल – फ्लुइड (cerebro- spinal- fluid-  csf) नावाचं पाणी असतं. दररोज मेंदूत साधारण अर्धा लिटर सीएसएफ तयार होतं आणि त्याचा परत रक्तवाहिनीत निचरा होतो. ऑपरेशननंतर क्वचित प्रसंगी हे पाणी त्वचेच्या छिद्रांतून,  नाकातून किंवा कानातून बाहेर येऊ शकतं (csf leak). या सर्व समस्या डोके वर काढू नयेत, म्हणून डॉक्टर व  हॉस्पिटल्स शक्य ती सर्व काळजी घेत असतात. किंबहुना त्यांनी ती घ्यावी ही अपेक्षा असते. हॉस्पिटल जितकं जास्त सुसज्ज असतं, त्या प्रमाणात या सुविधा अधिक असतात. पण सर्व काळजी घेऊनसुद्धा जगातल्या सर्वोत्कृष्ट ठिकाणी या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जगभरच्या अनुभवावरून, ऑपरेशनमध्ये किती धोका आहे, कुठल्या प्रकारचा धोका किती प्रमाणात आहे वगैरे गोष्टींचं अनुमान बांधण्यात येतं.

 एखाद्या ऑपरेशनमध्ये एक ते तीन टक्के धोका आहे याचा अर्थ शंभर व्यक्तींवर ही शस्त्रक्रिया केली असता, जगातल्या विविध केंद्रांच्या अनुभवावरून, त्यातील एक ते तीन व्यक्तींच्या बाबतीत समस्या निर्माण होऊ शकतात असा आहे.

सारांश म्हणजे, कोणत्याही शस्त्रक्रियेत काही प्रमाणात धोका असतोच. मेंदू व मणक्याच्या बाबतीत हा धोका जास्त असतो. कोणत्याही शस्त्रक्रियेच्या आधी त्यातील संभाव्य धोके कोणते, हे रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी समजून घेणं इष्ट असतं. या धोक्यातील टक्केवारी हे जगभरच्या अनुभवावर आधारित विधान असतं, ते विशिष्ट रुग्णाच्या बाबतीत वर्तवलेलं भविष्य नसतं; हे समजणं महत्त्वाचं!

लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.