डॉ. जयदेव पंचवाघ brainandspinesurgery60@gmail.com

प्राचीन काळापासून माणसाच्या डोक्यावर बसलेल्या डोकेदुखी या आजाराचे स्वरूप अलीकडच्या काळात बऱ्यापैकी स्पष्ट होऊ लागले आहे.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

मनुष्य जातीच्या अगदी जन्मापासून त्याला डोकेदुखीच्या त्रासाचा सामना करायला लागला आहे. प्राण्यांनासुद्धा विशिष्ट डोकेदुखीचा त्रास होतो हे सिद्ध झालं आहे. डोकेदुखी ही इतकी सर्वसामान्य समस्या आहे की ९५ टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींना आयुष्यात तिचा कधी ना कधी त्रास सहन करावा लागतो, असा वैद्यकीय संख्याशास्त्राचा अंदाज आहे. साहजिकच अतिपुरातन काळापासूनच्या लिखाणांमध्ये याबद्दलचे संदर्भ सापडतात.

बऱ्याच वेळेला डोकेदुखी ही सौम्य किंवा सहन करण्याइतपत असली तरी सहन करण्यापलीकडची डोकेदुखीसुद्धा कधी कधी दिसते. म्हणूनच जगाच्या वेगवेगळय़ा भागांत गेली अनेक वर्ष ती थांबवण्यासाठी प्रयत्न होत आले आहेत. जगात अनेक भागांत उत्खननांमध्ये विविध आकारांची भगदाडं पाडलेल्या प्राचीन कवटय़ा मिळाल्या आहेत. (याबद्दल मी लेखमालेच्या सुरुवातीला लिहिलं होतं) तीव्र डोकेदुखी कमी व्हावी आणि ‘दुखण्याला कारणीभूत असणारी भुतं’ कवटीतून बाहेर पडायला जागा मिळावी हा त्यामागचा उद्देश असायचा. डोक्याच्या त्वचेला तप्त लोखंडने चटके देणं, या त्वचेला जळवा लावणं अशासारखे उपायसुद्धा एकेकाळी केले जायचे.

इ.स. पूर्व ४०० साली हिपोक्रेटसने डोक्याचा अर्धा भाग दुखण्याच्या आजाराबद्दल लिहिलं आहे. (ज्याला आज आपण मायग्रेन म्हणून ओळखतो ) यात एका डोळय़ासमोर अचानक वीज चमकावी तसा प्रकाश दिसतो आणि नंतर काही काळ प्रकाशकिरणं चमकत राहिल्यासारखा भास होतो असं त्यानं नमूद करून ठेवलं आहे. इ.स. पश्चात साधारण ६०० वर्षांनंतर आचार्य वाग्भट्टांच्या लिखाणात अर्ध्या डोक्याच्या दुखण्याला ‘अर्धवभेदक’ आणि पूर्ण डोकं दुखण्याला ‘शिरस्ताप’ असा उल्लेख आलेला आहे. मध्ययुगात युरोपमध्ये डोकेदुखीसाठी डोक्याच्या त्वचेला छेद घेऊन त्यात ठेचलेला लसूण भरणे, तेथून रक्त वाहून जाऊ देणे असे उपचार होत असल्याची नोंद आहे.

माझ्या वाचण्यात आलेल्या डोकेदुखीसाठीच्या जुन्या उपचारांपैकी सर्वात गमतशीर उपचार म्हणजे व्यक्तीला मान व डोक्याच्या भागात धरून जोरात गोल फिरवणे! यात ‘सेंट्रिफ्युज’ परिणामामुळे डोक्यातलं रक्त पायाकडे जाऊन डोकेदुखी जाते असा समज होता. एकदोनदा जोरात फिरवल्यावर ‘भीक नको पण कुत्रं आवर’ या तत्त्वावर रुग्ण डोकेदुखी गेल्याचं कबूल करत असावा! यातला मजेचा भाग सोडला तरी या सर्व अघोरी उपचारांच्या गरजेवरून वेदनेच्या तीव्रतेची कल्पना यावी!

गेल्या १०० वर्षांत डोकेदुखी व तिच्या कारणांविषयी संशोधन आणि अभ्यास झाला असला तरी काही कारणांचं स्वरूप आणि त्यांचे उपाय अजूनही अस्पष्ट आहेत. डोकेदुखीचे अनेक प्रकार असले तरी मुख्य दोन गटांमध्ये तिची विभागणी करता येते. पहिला गट म्हणजे, मेंदूचा सीटी स्कॅन किंवा एमआरआय यांच्यात कुठलाही विशेष असा दाखवण्यासारखा आजार नसताना होणारी डोकेदुखी. (प्रायमरी ) या गटातल्या डोकेदुखीचं निदान तिच्या विशिष्ट ‘पॅटर्न’वरून करण्यात येतं. बहुतेक लोकांना होणारी डोकेदुखी या प्रकारात मोडते. मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखी (टेन्शन हेडेक) किंवा मायग्रेनची डोकेदुखी (अर्धवभेदक) यात मोडतात. हे दोनही अत्यंत कॉमन आहेत.

दुसरा महत्त्वाचा गट म्हणजे मेंदूतील आजाराचं ‘लक्षण’ म्हणून होणारी डोकेदुखी. उदाहरणार्थ मेंदूतील गाठी किंवा रक्तस्राव अशा कारणांमुळे होणारी. अशी डोकेदुखी वेगळय़ा अर्थाने गांभीर्याने घ्यावी लागते. आता सहाजिकच पडणारा प्रश्न म्हणजे हे दोन डोकेदुखीचे गट एकमेकांपासून वेगळे कसे समजतील? म्हणजे एखाद्या व्यक्तीला डोकेदुखी होत असेल तर ती पहिल्या प्रकारची आहे का दुसऱ्या गंभीर प्रकारची हे कळण्याचा काही मार्ग आहे का, याचं उत्तर सोप्या शब्दात देणं अवघड आहे. आपल्याला एखाद्या प्रकारच्या डोकेदुखीची निश्चित दिसणारी लक्षणं माहीत असली तरी कधी कधी निरनिराळय़ा कारणांमुळे होणाऱ्या डोकेदुखीमधील बारकावे सारखे दिसू शकतात.

मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखी म्हणजेच ‘टेन्शन हेडेक’ हा डोकेदुखीचा सर्वात कॉमन प्रकार आहे. यात डोक्याच्या दोनही बाजू कपाळ आणि मागचा भाग दुखतो आणि ‘कुणीतरी जोरात दाबून धरल्याप्रमाणे’, ‘गच्च आवळल्याप्रमाणे’ या दुखण्याचा अनुभव असतो. ही डोकेदुखी दिवसाच्या उत्तरार्धात सुरू होते आणि वाढते. काही लोकांना टेन्शन हेडेक कमी-जास्त प्रमाणात जवळजवळ रोजच होतं. बहुतेक वेळा साध्या उपचारांनी व वेदनाशामक गोळय़ांनी हे दुखणं थांबतं.

डोकेदुखीचा दुसरा आणि कॉमन प्रकार म्हणजे मायग्रेन. याला मराठीत अर्धशिशी आणि संस्कृतमध्ये अर्धावभेदक म्हणतात. मायग्रेन हा शब्दसुद्धा मराठी वाटावा इतका रोजच्या वापरात आहे. मायग्रेनचा त्रास सहसा धोकादायक ठरत नसला तरी त्या व्यक्तीचं आयुष्य आत्यंतिक त्रासदायक करू शकतो. जगातल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यात या दुखण्यानं गंभीर त्रास निर्माण केल्याची उदाहरणे आहेत. सेरेना विल्यम्स, अब्दुल करिम जब्बार (बास्केटबॉल) नेपोलियन बोनापार्ट, सिग्मंड फ्रॉइड यांच्यासारख्या असंख्य लोकांना या डोकेदुखीनं अक्षरश: रडवलं आहे! ऐन सामन्याच्या वेळीच मायग्रेन सुरू झाल्याने लक्ष विचलित होऊन वेडेवाकडे फटके मारले गेल्याच्या घटना सेरेना विल्यम्सच्या बाबतीत घडल्या आहेत.

‘हेमि-क्रेनिया’ .. हेमी – र्अध, क्रेनिया- डोक्याचं (दुखणं) हा शब्द गॅलनने प्रथम वापरला. या शब्दाचे हेमिग्रेनिया, मिग्रेनिया, मायग्रेनिया आणि ‘मायग्रेन’ असे नंतरच्या बोलीभाषांमध्ये अपभ्रंश होत गेले.

मायग्रेनविषयी थोडक्यात सांगायचं तर बहुतांशी वेळा ही डोकेदुखी डोक्याच्या निम्म्या भागात सुरू होते. कधी कधी ती तशीच राहते किंवा संपूर्ण डोक्यामध्ये पसरते. या डोकेदुखीबरोबरच मान दुखणं व अवघडणंसुद्धा खूपदा होतं.

काही व्यक्तींमध्ये डोकेदुखी सुरू होण्याआधीचे काही तास काही विशिष्ट लक्षणे दिसतात. उदाहरणार्थ प्रखर दिव्याचा त्रास होणं, गळून गेल्यासारखं वाटणं, वारंवार जांभया येणं, निराश वाटणं, डोकं जड होणं, उग्र वासांचा त्रास होणं इत्यादी. याला मायग्रेनचा ‘ऑरा’ म्हणतात. याचं वर्णन ‘पूर्वसूचनायुक्त चाहूल’ असही करता येईल. त्यानंतर डोकेदुखीला सुरुवात होते. मात्र अनेक व्यक्तींना ही पूर्वसूचना देणारी लक्षणं न दिसताच डोकेदुखी सुरू होते. त्यामुळे मायग्रेनचे, पूर्वसूचना देणारा आणि न देणारा असे दोन ढोबळ प्रकार आहेत. मायग्रेन डोकेदुखीला उद्युक्त करणाऱ्या (ट्रिगर्स) काही गोष्टी आहेत. खूप वेळ प्रखर प्रकाशाकडे बघणे, शारीरिक किंवा मानसिक क्षमतेबाहेर काम केल्यामुळे थकवा येणे, झोप पूर्ण न होणे, मानसिक ताण वगैरे. विशिष्ट अन्नपदार्थ किंवा पेयांचे सेवन हेसुद्धा अनेक लोकांमध्ये करणीभूत ठरतं. उदाहरणार्थ चीज, चायनीज पदार्थ, चॉकलेट, रेड वाइन, आंबवलेल्या पिठाचे पदार्थ, आंबवलेल्या किंवा नासवलेल्या दुधाचे पदार्थ (चीज, पनीर वगैरे), काही फळं.. विशेष करून संत्र्यांसारखी आंबट फळं, कॉफी, प्रिझर्वेटिव असलेलं अन्न.. विशेषत: मोनोसोडियम ग्लुटामेट ( टरॅ) असलेले पदार्थ, प्रक्रिया करून टिकवलेलं मांस. उदा. बेकन, हॉट डॉग, सॉसेज. (यात अन्न टिकवण्यासाठी नायट्रेट्स वापरतात. रक्तात यामुळे नायट्रिक ऑक्साइड तयार होतं. हे मायग्रेनचा अ‍ॅटॅक सुरू करू शकतं) अतिरिक्त कॅफीन सेवन अथवा रोजची सवय असताना अचानक कॉफी बंद करणे या दोनही गोष्टींनी मायग्रेन येऊ शकतो.

दुसऱ्या बाजूला काही व्यक्तींमध्ये कॅफीनमुळे  डोकं दुखणं थांबतं. त्यामुळे आपल्यावर कॉफीचा नेमका परिणाम काय होतो हे प्रत्येकाने अनुभवांती ठरवलं पाहिजे. आंबवलेले व लोणची घातलेले आंबट पदार्थ. उदा. किमची, चायनीज व कोरियन अन्नातली लोणची इत्यादी. विविध प्रकारच्या मद्यांचं सेवन. रेड वाईन, इतर अति-आंबट मद्य, व्हिस्की या मद्यांचा त्रास व्हायची शक्यता जास्त असते. पण खरं तर कुठलंही मद्य कारणीभूत ठरू शकतं.

शरीरातील संप्रेरकांच्या पातळीत झपाटय़ाने होणारे बदल. काही स्त्रियांना मासिक पाळीच्या आधी किंवा सुरू झाल्यावर नियमित मायग्रेनचा अ‍ॅटॅक येतो. विश्रांती किंवा झोपेचा अभाव, झोपेच्या वेळेतील अनियमितता, अपुरी किंवा अति झोप, अनेक तास मान व डोक्याच्या मागच्या बाजूचे स्नायू अवघडलेल्या अवस्थेत केलेलं काम, हवामानातील बदल, अति थंडी किंवा कडकडीत ऊन. वर प्रामुख्याने दिसणारे ट्रिगर दिले असले तरी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हे ट्रिगर इतरही असू शकतात. व्यवस्थित लक्ष ठेवून ते शोधून काढणे हे मायग्रेन -विरुद्धची ७५ टक्के लढाई जिंकल्यासारखे आहे.

अनेक रुग्णांशी बोलल्यावर माझा अनुभव असा आहे की मायग्रेन येण्यासाठी अनेक वेळा दोन गोष्टी लागतात. पहिली म्हणजे व्यक्ती त्या काळात काही ना काही कारणाने मायग्रेन येण्यास संवेदनशील असली पाहिजे आणि बरोबर त्या काळातच मायग्रेन अ‍ॅटॅक येणारी गोष्ट घडली पाहिजे.

मायग्रेनची डोकेदुखी सुरू झाल्यावर काही व्यक्तींमध्ये जीभ जड होणे, दृष्टीकक्षेच्या विशिष्ट भागातल्या गोष्टी न दिसणे, शरीराच्या निम्म्या भागातली शक्ती कमी होणे अशी गंभीर लक्षणे दिसू शकतात. तीव्र मायग्रेन झालेली व्यक्ती अंधाऱ्या खोलीत जिथे प्रकाश, आवाज आणि कुठलाही उग्र वास येणार नाही अशा भागात जाऊन झोपणे पसंत करतात. काम करणं किंवा किंबहुना कुठलीच हालचाल करणं, इतरांशी बोलणं अशा साध्या गोष्टीसुद्धा करणं यावेळी अशक्य होतं.

डोकेदुखी या विषयाच्या पार्श्वभूमीवर लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट काय ?.. तर डोकेदुखी ही अत्यंत सर्वसाधारणपणे दिसणारी समस्या असल्यामुळे नेमकी कुठली डोकेदुखी गंभीरपणे घेतली पाहिजे हे सर्वाना माहीत असावं! याबद्दल अगदी थोडक्यात काही ठोकताळे असे आहेत. दहा वर्षांआतल्या किंवा ५० वर्षे वयाच्या पुढील व्यक्तींमध्ये डोकेदुखी नवीनच सुरू झाल्यास, अचानक अत्यंत तीव्र आणि ‘आधी कधीही न अनुभवलेल्या तीव्रतेची’, काही दिवसांमध्ये झपाटय़ाने तीव्रता वाढत जाणारी, पूर्वी कॅन्सर किंवा एचआयव्ही होऊन गेलेल्या लोकांना झालेली, झपाटय़ाने वाढत जाताजाता चेतासंस्थेच्या कार्यात बिघाड घडवणारी.. उदाहरणार्थ लकवा  येणे, बोलणे बंद होणे इत्यादी .. अशी काही लक्षणे डोकेदुखीबरोबर असतील तर ही डोकेदुखी गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर वैद्यकीय मदत आणि तपासण्या करणे गरजेचे आहे.

डोकेदुखी हा इतका मोठा विषय आहे की त्यातल्या अगदी थोडय़ा भागावर प्रकाश टाकण्याचा अवघड प्रयत्न या लेखात केला आहे. लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.