डॉ. जयदेव पंचवाघ

एक-दोन मिनिटांत अतितीव्र वेदना देणारा ‘ट्रायजेमिनल न्युराल्जिया’ पुन्हा कधी उद्भवेल, या भीतीनंच रुग्ण पछाडला जातो..

mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

मानवी वैद्यकशास्त्राचा इतिहास हा खरंतर वेदना निवारणाचा इतिहास आहे आजारामुळे निर्माण होणारी व्यथा आणि वेदना.. मग ती शारीरिक असो वा मानसिक, योग्य निदान आणि उपचार करून दूर करणं हा कोणत्याही उपचार पद्धतीचा मूळ हेतू.

आज मी ज्या वेदनेबद्दल लिहितो आहे, तिला ‘सर्व प्रकारच्या दुखण्यांपेक्षा तीव्र अशी वेदना’ असं संबोधलं गेलं आहे.

सर्वात प्रथम १७७३ साली लंडनमधल्या वैद्यकीय परिषदेमध्ये डॉ. जॉन फॉदरगिलनं या वेदनेचं अचूक वर्णन करून ठेवलं आहे. ‘विशेषत: मध्यवयीन व्यक्तींमध्ये प्रामुख्यानं दिसून येणारी, पुरुषांच्या तुलनेनं स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसणारी, ही भयानक तीव्रतेची वेदना असते. चेहऱ्याच्या एका बाजूला गालावर, हिरडीपासून, हनुवटीवर, डोळा व कपाळावर, अगदी अचानक सुरू होते. पाव ते अर्धा मिनिट ती राहते आणि नाहीशी होते. दिवसातून ती वारंवार पण अनिश्चित अंतराने येत राहते. बोलणं, अन्न चावणं, चेहऱ्याला किंवा हिरडीला स्पर्श होणं अशा गोष्टींनी ती सुरू होते.’ अत्यंत अचूक व चपखल शब्दातलं हे वर्णन आहे. असं असलं तरी ही वेदना ‘ट्रायजेमिनल’ या चेहऱ्याच्या संवेदना वाहून नेणाऱ्या नसेवरील दाबामुळे वा तिच्या आजारामुळे होते हे मात्र पुढची अनेक वर्ष समजलं नव्हतं.

या वेदनेचं नाव ‘ट्रायजेमिनल न्युराल्जिया’! डॉ. फॉदरगिल यांनी १७७३ साली म्हणजेच हा आजार, अथवा वेदना, नेमकी का सुरू होते हे माहीत नसलेल्या काळात करून ठेवलेलं हे वर्णन आहे. पूर्वीच्या एका लेखात ही वेदना कायमची दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया शोधणाऱ्या डॉ. पीटर जॅनेटांबद्दल मी लिहिलं होतं.

१९६८ साली ही शस्त्रक्रिया प्रथम झाली पण आजही हा आजार वेळेत ओळखणं, त्याचं कारण जाणून त्यावर योग्य उपचार करून या मरणप्राय वेदनेतून रुग्णाला मुक्त करणं या गोष्टी व्हाव्या तितक्या वेगाने होत नाहीत. ‘एमव्हीडी’ शस्त्रक्रिया करून वेदनामुक्त झाल्यावर जेव्हा या व्यक्ती म्हणतात ‘डॉक्टर, शस्त्रक्रियेनं हा आजार कायमचा बरा होऊ शकतो हे आठ वर्षांपूर्वी कळालं असतं तर ही वर्ष एका बाजूला दुखणं आणि दुसऱ्या बाजूला औषधांनी येणारी ग्लानी यांच्या कचाटय़ात वाया गेली नसती..’ तेव्हा हा विषय लोकांपर्यंत अजूनही आपण पोहोचवू शकलो नाही आहोत ही भावना प्रकर्षांने होते. गेल्या १८ वर्षांपासून पुण्यात कार्यरत असलेल्या आणि या वेदनानिवारणासाठी वाहून घेतलेल्या केंद्रातल्या अशा वारंवार येणाऱ्या अनुभवांनी ही जाणीव अधिक बोचरी होते म्हणूनच या विषयाच्या (तपशिलांच्या नव्हे) पुनर्लेखनाचा दोष पत्करून, इथं या वेदनेच्या खोलात जाऊन लिहिणार आहे.

पहिला प्रश्न म्हणजे ट्रायजेमिनल न्युराल्जिया हा शब्द कुठून आला? आपल्या चेहऱ्याच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवणारी नस ही ‘ट्रायजेमिनल नस’ म्हणून ओळखली जाते. ( या नसेला तीन शाखा असतात म्हणून ट्राय किंवा तीन). कपाळ, डोळे, नाक, गाल, हनुवटी, ओठ, दात आणि हिरडय़ा यांच्या संवेदना ही वाहून नेते. चेहऱ्याच्या डाव्या व उजव्या भागासाठी प्रत्येकी एक स्वतंत्र नस असते. ‘न्युराल्जिया’ म्हणजे नसेचं दुखणं. अर्थात ट्रायजेमिनल न्युराल्जिया म्हणजेच ट्रायजेमिनल नसेचं दुखणं (कळ, वेदना).

या आजाराचं निदान मुख्यत्वेकरून रुग्णाच्या लक्षणांवरूनच केलं जातं.

या वेदनेची काही निश्चित वैशिष्टय़ं आहेत. पहिलं म्हणजे ही कळ अचानक सुरू होते. काही सेकंद ते मिनिट- दीड मिनिटापर्यंत ती टिकते. एका बाजूच्या ट्रायजेमिनल नसेच्या भागात म्हणजे चेहऱ्याच्या एका बाजूलाच ती असते. वरची किंवा खालची हिरडी, दात, नाक, गाल-नाकपुडीमधला भाग, हनुवटी, कानाच्या पुढचा गालाचा भाग, कपाळ, डोळा यापैकी एका ठिकाणाहून ही सुरू होते. ही वेदना अत्यंत तीव्र असते. ज्या व्यक्ती या आजाराने ग्रासल्या जातात त्या या वेदनेचं वर्णन ज्या प्रकारे करतात ते वाचून कदाचित, अगदी कदाचित याची कल्पना येऊ शकेल. याचं वर्णन करताना ‘अचानक इलेक्ट्रिक करंटप्रमाणे’, ‘असंख्य सुया एकदम टोचल्याप्रमाणे’, ‘अत्यंत धारदार व अणकुचीदार सुरी चेहऱ्यात खुपसली गेल्याप्रमाणे’, ‘चेहऱ्यात अचानक फटाक्याचा स्फोट व्हावा त्याप्रमाणे’, ‘चेहऱ्याच्या एका भागात तांबडी पूड टाकल्याप्रमाणे’, ‘गालावर वीज चमकल्याप्रमाणे’,  अशा प्रकारच्या वाक्यरचना हे लोक वापरतात.

या वाक्यरचना काल्पनिक नसून ट्रायजेमिनल न्युराल्जिया कायमचा दूर करण्यासाठीच्या शस्त्रक्रिया – विभागामध्ये मी ही वाक्यं अगदी अशीच्या अशी ऐकलेली आहेत. यात यित्कचितही अतिशयोक्ती नाही. या दुखण्याचं वर्णन करताना वापरले जाणारे इतर वाक्यप्रचार म्हणजे ‘शत्रूलासुद्धा होऊ नये अशी वेदना’, ‘मानवाला ज्ञात असणारी सर्वात अस वेदना’, ‘सहन करण्यापेक्षा मरण बरं असं वाटायला लावणारी वेदना’.. या वेदनेचा अटॅक काही सेकंद ते काही मिनिटं टिकतो. या वेदनेदरम्यान रुग्ण बोलू शकत नाही आणि तोंड हलवू शकत नाही आजाराच्या सुरुवातीच्या काळात दोन तीव्र काळांच्या दरम्यान काही काळ रुग्ण वेदनामुक्त असतो फक्त ‘परत हा झटका कधी येईल’ या विचारानं कायमच धास्तावलेला राहतो. ही धास्ती प्रत्यक्ष कळीपेक्षा अधिक भयानक, असं आजवर जवळपास सर्व रुग्णांनी मला सांगितलं आहे. आजार जसा वाढेल तशी वेदनेची तीव्रता वाढत जाते, दोन अटॅकमधलं अंतर कमी होतं आणि नंतर तर या मधल्या काळातसुद्धा काही प्रमाणात दुखणं सुरू राहतं.

या वेदनेची सुरुवात चेहऱ्याच्या दुखऱ्या भागात स्पर्श झाल्यानं होते. दात घासताना, अन्न चावताना, दाढी करताना, चेहरा धुताना, टॉवेलने चेहरा पुसताना, गार वाऱ्याचा स्पर्श चेहऱ्याच्या विशिष्ट भागात झाल्यावर ही तीव्र कळ सुरू होते. यांना ‘ट्रिगर फॅक्टर्स’ म्हणतात. बऱ्याच  वेळा,  चेहऱ्याच्या काही विशिष्ट जागेला ओझरता स्पर्श जरी झाला तरी ही वेदना एखाद्या करंटसारखी उद्भवते. त्यानंतर काही काळ उलटल्यावर तर बोलण्यासाठी साधं तोंड उघडलं तरी तीव्र वेदना सुरू होते.

चेहऱ्याच्या एका भागातल्या कुठल्याही बिंदूला स्पर्श झाल्यावर ही तीव्र कळ सुरू होत असली तरी काही विशिष्ट भाग याबाबतीत अधिक संवेदनशील असतात. उदाहरणार्थ वरचा ओठ, नाकपुडी, भुवईवरची कपाळाची जागा, डोळय़ाच्या पापणीच्या खालची जागा, कानासमोरचा गाल, वरची किंवा खालची हिरडी वगैरे!

हा आजार झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांच्या काय प्रतिक्रिया होत असतील? खरंतर या रुग्णांचे नातेवाईक सुरुवातीला भांबावून गेलेले असतात. जी व्यक्ती हसतखेळत खात-पीत असते ती वेदना सुरू झाल्यावर अचानक बोलण्याचं थांबवून गप्प होते. वेदनेचा झटका ओसरल्यावर परत अगदी व्यवस्थित होते हा सगळाच प्रकार सुरुवातीला अतक्र्य आणि अविश्वसनीय वाटतो. तीव्र कळ अचानक उद्भवणं आणि तेवढय़ाच अचानक .. अगदी क्षणार्धात कमी होणं या गोष्टींचा अर्थ लागत नाही. आपल्याला माहीत असलेल्या इतर दुखण्यांपेक्षा हे वेगळं दुखणं असतं. त्याचा प्रकार आणि तीव्रता अत्यंत वेगळय़ा प्रकारची असते. घरातल्या अगदी जवळच्या व्यक्तीला अशी वेदना होताना ‘बघवत नाही’ असं सर्वच नातेवाईक सांगतात.

या संदर्भात एक गोष्ट मला आठवते. अत्यंत तीव्र ट्रायजेमिनल न्युराल्जियाचा त्रास असलेल्या आणि व्यवसायानं प्राथमिक शाळेत शिक्षिका असलेल्या एका महिलेनं मला ही सांगितली होती. ‘डॉक्टर, मी वर्गात शिकवत असताना अशी कळ जर मला आली तर मी चेहरा धरून मटकन खाली बसते. मिनिट- दोन मिनिट माझ्या विव्हळण्याचा आवाज सोडून वर्गात शांतता असते. कळ कमी झाल्यावर मी विद्यार्थ्यांकडे बघते तेव्हा तेसुद्धा रडत असतात! तिसरी – चौथीतील निरागस मुलांवर ही वेदना आणि तिचे प्रत्यक्ष परिणाम बघताना हा परिणाम होतो. ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. सहवेदना (एम्पथी) ही विशेष मानवी देणगी आहे! ‘परदु:खाने रडला प्राणी.. देव प्रकटला त्याच ठिकाणी’ या विंदांच्या ओळीचं स्मरण मला ही घटना आठवून होतं.

असा हा आत्महत्याप्रेरक आजार बरा करण्याची क्षमता असलेली शस्त्रक्रिया आणि त्यातलं निश्चित असं नैपुण्य आज उपलब्ध आहे. विज्ञानानं वेदनेवर मिळवलेला हा विजय आहे. ‘मायक्रोव्हॅस्क्युलर डीकॉम्प्रेशन’-‘एमव्हीडी’ या नावाने ती शस्त्रक्रिया ओळखली जाते.

या वेदनेच्या लक्षणांचे, तपासण्यांचे आणि योग्य निदान आणि उपचारांचे इतर कंगोरे मी जागेअभावी पुढच्या लेखात उलगडेन.

या आजारासंदर्भात घडलेली आणि मला व्यक्तिश: या आजारासंदर्भातल्या सामाजिक आणि वैद्यकीय गोष्टींशी निकटतेने जोडणारी एक थोडी नाटय़मय घटनासुद्धा पुढच्या लेखात तुमच्यासमोर मांडेन. हा आजार आणि त्याचं खूप उशिरा झालेलं निदान गेली अनेक वर्ष वारंवार बघितल्यामुळे या आजारावरच्या प्रत्येकच लेखाची सांगता करताना सर्व वाचकांना करतो-‘या विषयीच्या लोकप्रबोधनात शक्य तितकं सहभागी व्हा’. तसंच आजही करतो आणि इथं थांबतो.

(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.

brainandspinesurgery60@gmail.com