एखाद्यानं गैरकृत्य करावं आणि मग कुणा सत्पुरुषाकडे क्षमायाचना करून देवाला प्रार्थना करून अभयदान मिळवावं, हे आपल्याला पटणारं नाहीच, पण ज्याला खरा पश्चात्ताप झाला आहे त्याला सुधारण्याची एक संधी देताना जो खरा सत्पुरुष आहे त्याला अदृष्टातलंही बरंच काही दिसत असतं. म्हणजेच त्याचं पूर्वायुष्य, त्याचं भावी आयुष्य, त्या आयुष्याचा तो करणार असलेला उपयोग; हे सारं लक्षात घेऊन ते संधी देतात. पण याचा अर्थ त्याला पूर्ण सूट मिळते असा नव्हे. या घटनेतही त्या माणसाला जेवढय़ा पैशाचा अपहार झाल्याचे सिद्ध झाले तेवढी रक्कम भरावी लागली. त्याची नोकरी गेली. पण या धडय़ानं आणि स्वामींच्या बोधानं तो गैरमार्गाला कधी गेला नाही. स्वकष्टांच्या बळावर त्यानं दुसरा व्यवसाय सुरू केला आणि त्याआधारे त्याचा उदरनिर्वाह सुरू झाला. त्याचं घर म्हणजेच त्याची मुलंदेखील याच मार्गावर नंतर आली. तेव्हा सरसकट क्षमा केली गेलेली नाही. शिक्षाही भोगायला लागली, पण योग्य मार्गही मिळाला. एखाद्या वाईट माणसालाही थारा देऊन त्याच्यात सुधारणा घडविण्यामागे सत्पुरुषाची दृष्टी काय असते, हे स्वामी शिवानंद यांनीच आणखी एका घटनेत सांगितलं. ते म्हणाले की, ‘‘पर्वत शिखरावर उगम पावलेली नदी खालीच वाहणार. त्याच नदीच्या पाण्याचा काही चांगला उपयोग करून घ्यायचा असेल, तर आपण काय करतो? नदीला धरण बांधतो, बांध घालतो, पाण्याचा संचय करून त्याची उंची वाढवतो. मग त्या वाढलेल्या शक्तीचा उपयोग वीजनिर्मितीसाठी किंवा कालवे काढून विविध प्रकारे करून घेतो. तसंच माणसाचं आहे. त्यांना अधोगतीपासून वाचवणं हा माझा धर्म आहे. त्यानुसार आवश्यक ते यम-नियमांचे बांध घालणं, त्यांच्याकडून जास्तीत जास्त उपासना करवून घेणं, त्यांना प्रेरणा देणं, हे माझं काम आहे.’’ बघा माउलींनीही ‘खळांची व्यंकटी सांडो,’ म्हटलं आहे, खळ सांडो, असं नाही! म्हणजेच दुष्टांचा वाकडेपणा संपो, दुष्टावा संपो, अशी प्रार्थना आहे. दुष्टच संपून जावा, ही इच्छा नाही. कारण जो तो आपल्या मनाच्याच ओढीनं वागत आहे. काहींना मनाच्या ओढीवर संयम ठेवता येतो आणि मनात कुविचारांचं थैमान सुरू असूनही ते सज्जनपणाचा बुरखा पांघरतात. काहीजण मनामागे फरपटत जातात आणि अज्ञानाच्या गर्तेत आणखी खोलवर कोसळतात. पण या दोघांना सत्पुरुष समान दृष्टीनं आत्मीयतेनं वागवतात आणि योग्य मार्गावर कळकळीनं नेतात. आपण स्वत:च्या आत डोकावून पाहिलं तरी जाणवतं की आजवर आपणही कित्येकदा वागू नये तसं वागलो आहोत, बोलू नये ते बोललो आहोत आणि करू नये ते करून चुकलो आहोत. तरीही जर भगवंताच्या वाटेवर आपल्याला पाऊल टाकण्याचा जन्मसिद्ध अधिकार असेल, तर तो प्रत्येकाला आहे. सकळांसी येथे आहे अधिकार! रवींद्रनाथांच्या एका कवितेत म्हटलं होतं की, जन्मणाऱ्या प्रत्येक मुलाबरोबर, माणसावरचा देवाचा विश्वास अजून कायम आहे, याचाच प्रत्यय येतो! तेव्हा जन्मणाऱ्या प्रत्येकाला जीवन अधिक समृद्ध करण्याचा अधिकार मिळाला आहे. त्याबाबत आपण जितक्या लवकर जागृत होऊ तितक्या लवकर आत्मलाभ साध्य होईल! ती प्रेरणा या भूमीच्या कणाकणात अखंड व्याप्त आहे.

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com