भगवंत आणि भक्तातलं ऐक्य कशानं साधतं? तर भगवंत गीतेच्या सहाव्या अध्यायातील ३०व्या श्लोकात सांगतात की, ‘‘जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो, त्याला मी कधी दुरावत नाही, तसंच तोही मला कधी दुरावत नाही!’’ ज्ञानेश्वर माउली या श्लोकाचा भावानुवाद करताना म्हणतात, ‘‘दीपा आणि प्रकाशा। एकवंचीचा पाडु जैसा। तो माझां ठायीं तैसा। मी तयामाजीं।। जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु। कां गगनाचेनि मानें अवकाशु। तैसा माझेनि रूपें रूपसु। पुरुष तो गा।।’’ दिवा आणि दिव्याचा प्रकाश अभिन्न आहेत. दिवा म्हटला की त्याचा प्रकाश आलाच. त्याप्रमाणे हा माझा भक्त माझ्या ठायी एकरूप आहे. जसं पाण्याचा प्रवाह जिथवर आहे तिथवर जीवनरस आणि अर्थातच चैतन्याचं दृश्यरूप पसरलं आहे आणि जितकं अवकाश आहे तितकं आकाश त्यात व्याप्त आहे. तर पाणी आणि जीवनरस तसंच पोकळी आणि आकाश हे जसे एकमेकांशी एकरूपतेनं नांदत आहेत, तसा भक्त आणि मी नांदत आहोत! आता गीतेचा जो श्लोक आपण पाहिला तो सांगतो की, ‘‘जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो, त्याला मी कधी दुरावत नाही..’’ म्हणजेच मी सर्वत्र भरून आहे, असंच सूचित करतो. त्याच गीतेतला एक श्लोक या श्लोकाला धक्का देतो, असं वरकरणी वाटतं. हा श्लोक असा :

मया ततमिदं र्सव जगद् अव्यक्त मूर्तिना।

मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेषु अवस्थित:।।

(अध्याय ९, श्लोक ४)

या श्लोकाचा अर्थ असा की, ‘‘मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही!’’ सर्वत्र मीच भरून आहे, असं एका श्लोकात भगवंतानं सांगितलं. आता तोच सर्व जीव माझ्या ठायी आहेत, पण मी त्यांच्या ठायी नाही, असं सांगतो! याचा अर्थ काय? तर, आधीचा श्लोक हा साधकानं ध्यानात काय ठेवायचं, हे सांगणारा होता. म्हणजे सर्वत्र आत्मबुद्धीनं वावरण्यासाठी सर्वत्र परमात्म्याला पाहता आलं पाहिजे. आता ‘राजगुह्य़’ सांगितलं जात आहे की, बाबा रे मी हे सर्व जगत व्यापलं आहे आणि सर्व जीवमात्रही माझ्याच ठायी आहेत, पण मी त्यांच्या ठायी नाही. अर्थात आत्मबुद्धीला विन्मुख होऊन ते देहबुद्धीला भुलले आहेत. त्यामुळे त्यांचं विषयोन्मुख चित्त जिथं एकाग्र आहे, तिथं माझं चित्त नाही! त्याचं विकारवश मन जिथं जडलं आहे तिथं माझं मन नाही. त्यांची देहशरण बुद्धी जो बोध करत आहे त्या बुद्धीत मी नाही. त्यांच्या संकुचित अहंमध्ये माझा सोहंभाव नाही! ते माझ्यात आहेत, मी त्यांच्यासकट समस्त जगताला व्यापून आहे तरीही ते मला विन्मुख असल्याने त्यांच्या हृदयात मला स्थान नाही!  सर्व जीव माझ्या ठायी आहेत, पण मी त्यांच्या ठायी नाही! सर्वाची मला चिंता आहे, पण केवळ माझं  विशुद्ध चिंतन कुणालाच नाही! माझ्याकडून काहीतरी हवं आहे आणि त्या हवेपणाच्या चिंतनाची भेसळ माझ्या चिंतनात आहे. मग कुणाला तुच्छ अशी संपत्ती हवी आहे तर कुणाला परमोच्च असा मोक्ष हवा आहे! दोन्हीही मागणंच. विसंबणं नाही! मागणं सामान्य असो की दिव्य, तिथं जे मागावंसं वाटतं त्याला माझ्यापेक्षा महत्त्व आहे. त्यामुळे मी त्यांच्या ठायी नाही. त्यांच्या ठायी मला जागा मिळावी, म्हणून मी ताटकळत वाट पहात आहे. त्यांनी ‘ठायीच बैसोनि’ चित्त एक करून आवडीनं मला अनंताला आळवून तर पहावं, मी धावत येईन!

चैतन्य प्रेम