चैतन्य प्रेम

आपल्या या ‘चिंतनधारा’ सत्संगाचा हा अगदी अखेरचा आणि त्यामुळेच समारोपाचा टप्पा आहे. या सदराला निश्चित असा कोणताही आकृतिबंध नव्हता. पण हळूहळू सद्गुरू आणि साधक यांच्याभोवतीच बरंचसं चिंतन घडलं. त्यामुळे समारोपाचे हे आठ भागही साधक आणि साधनेलाच स्पर्श करणारे व्हावेत, अशी इच्छा आहे. आपण नेमके अध्यात्माच्या मार्गावर का आलो, असा प्रश्न या सदरातही उपस्थित झाला होता. खरं म्हणजे, माणूसच कशाला चैतन्याचा अंश ज्याच्यात सामावलेला आहे, अशा प्रत्येक जीवमात्राचा जन्म हा आध्यात्मिक हेतूनंच झाला असतो आणि प्रत्येक जीवमात्र त्या परम तत्त्वाकडेच अग्रेसर होत आहे, यात शंका नाही. जर या चराचरात एका पूर्णाशिवाय काही नाही, तर अपूर्ण असं काही असूच शकत नाही. जे काही आहे ते सगळं पूर्णाचंच अंशरूप आहे आणि म्हणूनच तेदेखील पूर्णच आहे. पण पूर्ण असूनही अंश जर आपल्याला अपूर्ण मानू लागला, तर काय करावं? तेव्हा आपण अपूर्ण नाही, ही शाब्दिक जाणीव स्थिर करणं आणि मग अनुभवानं तिची सत्यता जाणून त्या पूर्णत्वात लय पावणं, या दरम्यानची प्रक्रिया म्हणजे साधना आहे! आपली साधना म्हणजे आपल्यातली अपूर्णता घालविण्याचा अभ्यास आहे. जे काही संकुचित आहे ते काढून टाकण्याचा अभ्यास आहे. गावी लहानपणी क्वचित जायचो तेव्हा डोंगरावरून अगदी छोटय़ा चणीच्या पाटातून घरापाशी येणाऱ्या पाण्याची गंमत वाटायची. पण हा पाण्याचा प्रवाह कमी होत गेला की मग त्या पाटाची ‘पाहणी’ करीत वर जायचं काम लहान मुलांवर यायचं आणि ते काम मुलं अगदी आनंदानं करायची. तर ही पाटपाहणी करताना कुठेतरी पाचोळा साचून पाणी अडलेलं दिसत असे. मग तो पाचोळा दूर करून पाण्याला वाट करून दिली की मग वेगानं पाणी वाहायला लागायचं. अगदी तसंच आपणही एखाद्या वरकरणी सामान्य भासणाऱ्या, क्षुल्लक भासणाऱ्या इच्छेत, अपेक्षेत, वासनेत अडकून असतो. वासनेच्या त्या कचऱ्यामुळे आंतरिक भावप्रवाह अडला गेला असतो. तो वासनेचा पाचोळा दूर करणं आणि आंतरिक भावप्रवाह पुन्हा खुला करणं, म्हणजे साधना! पूर्ण असूनही आपण अनेक तऱ्हेची अपूर्णता अनुभवत आणि भोगत असतो.. आणि बरेचदा ती सूक्ष्म भावनिक अपूर्णताच असते! जडभरताप्रमाणे आपण जगात कुठेतरी अडकून असतो. त्या अडकण्यामागे लोकेषणा, वित्तेषणा, दारेषणा अशी कोणती ना कोणती इषणा असतेच. आपण कुठं नाहक अडकून आहोत, गुंतून आहोत, याची जाण आपल्याला असतेच असते, पण मन ते मान्य करीत नसतं. त्या अडकण्याला ‘कर्तव्या’चा मुलामा आपण देत असतो आणि कर्तव्य संपलं तरी ते अडकणं सोडवत नाही! ते सुटलं तर भावनिक आधारच खचेल, अशी सुप्त भीती आपल्या मनाला भेडसावत असते. तेव्हा ज्यात आपण अडकून आहोत त्या अडकण्यातला फोलपणा जाणून घेणं आणि आपणच बांधून घेतलेल्या मोहाच्या रेशमदोऱ्यातून आपल्याला सोडवून घेणं म्हणजे साधना! ही सारी प्रक्रिया आपली आपल्याला आपल्या बळावर पार पाडता येत नाही. त्यासाठी जो या गुंत्यात अडकलेला नाही त्याचा आधार अनिवार्य असतो. त्याच्या सांगण्याप्रमाणे सुटकेसाठीचे प्रयत्न सुरू करणं सोपं आणि शक्य असतं. हे प्रयत्न म्हणजेच साधना!