भ्रष्टाचारात अडकलेला आणि त्यामुळे कारवाईला सामोरं जावं लागत असलेला एक अधिकारी स्वामी शिवानंदांकडे आला आणि त्याचं बोलणं ऐकताना स्वामींबरोबर उपस्थित असलेले त्यांचे चरित्रकार आगाशे यांचा संताप अनावर होत होता. त्यांना असं वाटलं की, स्वामी त्यांना कोणताही दिलासा देणार नाहीत. स्वामींनी मात्र सर्व शांतपणे ऐकून घेतलं मग त्यांना गुरूमंदिरात नेलं, त्यांच्या चुकीच्या कृत्यांचा पाढा त्यांच्याकडून वदवून घेतला. मग पुन्हा अशी कृत्यं न करण्याचं वचन घेऊन त्यांना प्रसाद आणि आशीर्वाद दिला. ते गृहस्थ आनंदात निघून गेले, पण आगाशे यांच्या मनातला राग अधिकच वाढला होता. श्रीस्वामींनीही, कसला विचार करतोयस, असं मुद्दाम विचारलं आणि मग आगाशेंच्या मनाचा स्फोट झाला. ते म्हणाले, ‘‘यांच्यासारख्या बेईमान, दुष्ट माणूस समाजाशी द्रोह करतो, अनीतीने वागतो आणि त्याला परमेश्वर क्षमा करतो, संकटमुक्त करतो, हा काय न्याय झाला? वास्तविक याची धिंड काढून भर चौकात फटके मारले पाहिजेत. त्याचा देव पाठीराखा कसा झाला, हाच विचार करतोय.’’ यावर स्वामी शांतपणे म्हणाले, ‘‘तुला काय वाटते, याच्यावर देवानं दया दाखवणं, क्षमा करणं योग्य नाही, असंच ना? ठीक आहे. तुला वाटतं, हा सामाजिक गुन्हेगार आहे. अपराधी आहे. याला शिक्षा झालीच पाहिजे, असंच ना? मग देवानं दया करायला, पाठीशी घालायला, कृपा करायला योग्य कोण हे तू सांगू शकशील का? माझ्याकडे येणारे, भक्त म्हणवणारे किंवा तू स्वत: हे सर्व देवानं कृपा करण्यास योग्य आहेत, असं तुझं म्हणणं आहे का? असं असेल, तर सांग की तू किंवा तुम्ही सर्वसाक्षी परमेश्वराला माहीत नाही असा कोणताही सामाजिक गुन्हा कधीही केलेला नाही, असं म्हणू शकाल का? किंवा तुम्ही केलेले अपराध अजून समाजात जाहीर झालेले नाहीत, इतरांना ते माहीत नाहीत, म्हणूनच तुम्ही साव ना? सांग की तू किंवा तुम्ही काया-वाचा-मनोभावे करून कोणतंही अनैतिक, गैरकृत्य केलं नाही म्हणून? नाही ना? सर्वसाक्षी परमेश्वराच्या दरबारात तू, तुम्ही आणि आताचा तो अधिकारी सर्व सारखेच! तुझे, तुमचे अपराध त्या सर्वसाक्षी परमेश्वराला माहीत आहेत, तसंच याचेही आहेत. तू आणि तुम्ही स्वत:ला कृपेला पात्र समजता तसाच तोही दयेला पात्र आहे. यात अयोग्य किंवा राग येण्यासारखं काही नाही. अरे, अधोगती हा निसर्गधर्म आहे. त्यातून काही चांगलं निर्माण करायचे झाल्यास त्याला शक्तीसंचय, सत्प्रवृत्तीची जोड देऊन, पश्चात्तापाने पावित्र्य आणून त्याची आत्मिक उंची वाढवणे, वरच्या स्तरावर नेणे हाच त्यावर उपाय नाही का? नाही तर वाल्याचा वाल्मिकी कधी होऊच शकला नसता. अधोगतीकडे जाणाऱ्याला आणखी एक धक्का देऊन त्याला अधिक खाली ढकलण्यासाठी तुमची गरज नाही. जरुरी आहे ती वर येऊ इच्छिणाऱ्यांना मदत करणाऱ्यांची. जरुरी आहे ती चांगले घडावे, व्हावे असे वाटते अशांची. आणि अशांना परमेश्वराने दया दाखवायची नाही, कृपा करून पाठिशी घालायचे नाही, राक्षसाचा माणूस, दुष्टाचा सुष्ट बनवायचा प्रयत्न करायचा नाही, तर मदत कुणी कुणाला करायची? ज्या क्षणी या संकटातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वरी कृपेशिवाय मार्ग नाही अशी खात्री पटून, पश्चात्तापाने याचना करण्यासाठी तो प्रवृत्त झाला त्याचक्षणी तो देवाच्या दयेस पात्र झाला, खरं ना?’’ स्वामींच्या या बोलण्यानं आपल्या मनातही विचारांची वावटळ उडाली असेलच, होय ना?

– चैतन्य प्रेम