डिजिटल अवकाशामध्ये १६ मे २०२६ रोजी स्थापन झालेल्या ‘सीजेपी’ने अर्थात (कॉक्रोच जनता पार्टीने) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेले दहा दिवस हा धुमाकुळ सुरू आहे. तो आभासी आहे, पण तो आपल्या दिशेने बाण सोडून हैराण करत आहे असा भास काहींना होतो आहे. अर्थात ‘ये डर भी अच्छा डर है’. वास्तविक भारतीय राजकारणात भाजपचा गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बोलबाला आहे. अलीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजप भारताच्या ७० टक्के भूभागावर आपली सत्ता राखून आहे हे दिसून आले. असे असतानाही समाजमाध्यमांवर सर्वांत जास्त फॉलोअर्स असणाऱ्या भाजपची जागा सीजेपीने घेतली आहे. तीही अवघ्या पाच दिवसांत. हा वेग अचंबित करणारा आहे.
सीजेपीच्या ‘स्थापने’मागची कहाणी आणि त्यांच्या मागण्या एव्हाना सर्वश्रुत आहेत. त्यामुळे थेट मुद्द्यावर येऊया…
कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म सरन्यायाधीशांच्या विधानाने झालेला असला तरी तो सत्ताधारी, विरोधी पक्ष, रोम जळत असताना फिडेल वाजवणाऱ्या विकृती, सत्तेचे लोणी खायला मिळावे म्हणून सत्ताधारी पक्षात गेलेले सत्तालंपट अशा सर्वांच्या विरोधातील असंतोष आहे. प्रत्येक दांपत्याने चार मुले जन्माला घाला पासून हे संविधान बदलून आम्हाला मनुस्मृती आणायची आहे अशी विधाने करणाऱ्यांवर काहीच कारवाई होत नाही त्यावरचीही ही प्रतिक्रिया आहे.
हा डिजिटल उद्रेक कदाचित तात्पुरता दडपलाही जाईलही. पण तो आणि त्यामागची कारणे फार काळ दुर्लक्षित ठेवता येणार नाहीत. हा पक्ष नोंदणीकृत नाही त्यामुळे त्याला घटना वगैरे नाही. मात्र त्यांनी हाती घेतलेले मुद्दे आपल्या घटनेला धरून आहेत हेही नाकारता येत नाही. अच्छे दिनसह दिलेल्या शेकडो आश्वासनांच्या खैरातीचे आजचे वास्तव काय ? हा प्रश्न ही झुरळ म्हणून संबोधली गेलेली माणसे विचारत आहेत. देश प्रथम, राष्ट्र प्रथम वगैरे भाषा करताना देशातील १४५ कोटी जनतेच्या उज्वल भवितव्याचा विचार केंद्रस्थानी असला पाहिजे. त्यांच्या जाती, पाती, पंथ, धर्माचा विचार नव्हे. तसेच राष्ट्रप्रथमचा जयघोष करणाऱ्यांची भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी, राष्ट्र स्वतंत्र करतांना भूमिका काय होती याचाही विचार करावा लागतो.
इतिहास दडवला म्हणजे इतिहास पुसला जात नसतो. देशांतर्गत धोरणे, परराष्ट्र नीती, आर्थिक धोरणे, सामाजिक, सांस्कृतिक धोरणे ही सारी राष्ट्रप्रथम या भूमिकेला न्याय देणारी असावी लागतात. जनतेची हेळसांड होत असेल तर जनता गप्प बसू शकत नाही. हा राजेशाही काळातीलही इतिहास आहे. आत्ता तर आपण लोकशाही व्यवस्थेत आहोत हे लक्षात घेतले पाहिजे.
संसदीय लोकशाहीचे चारही स्तंभ आपापली जबाबदारी टाळतात, ती दुसऱ्यावर ढकलू पाहतात किंवा सत्ताशरण होतात तेव्हा असंतोषाची, उद्रेकाची परिस्थिती निर्माण होते. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विरोधी कायदे होत असतील, त्या कायद्यांची हडेलहप्पीने अंमलबजावणी होत असेल, न्यायालये मूलभूत न्याय देण्यात वेळकाढूपणा करत असतील आणि यावर माध्यमे कोणतीही न्याय्य भूमिका घेणार नसतील तर जनता स्वयंस्फूर्तीने जागृत होते हाही जगाचा इतिहास आहे.
कॉक्रोच जनता पार्टीला मिळणारा पाठिंबा या चारही स्तंभांच्या अकार्यक्षमतेकडे बोट दाखवणारा आहे. एखादा पक्ष काही वर्षात जेव्हा देशातीलच नव्हे तर जगातील मोठा पक्ष असल्याचा दावा करतो तेव्हा त्या पक्षात आज मूळ विचारधारेचे लोक किती आहेत आणि अन्य विचारधारांचे आयात किती केले आहेत याचाही विचार सुज्ञ जनता करत असते. तसेच ही शुद्धीकरण प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते हेही आता उघड गुपित आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांना ‘तुकडे तुकडे गँग’, ‘अर्बन नक्षल’ अशी शेलकी विशेषणे लावता येणार नाहीत. तसेच केवळ स्प्रे मारून त्यांना मारता येईल या भ्रमात कोणीही राहू नये. वेगळ्या अर्थाने झुरळांचा इतिहास आणि त्यांची तगून राहण्याची क्षमता ध्यानात घ्यावी लागेल. गेल्या आठ-दहा दिवसात त्यांच्या या क्षमतेवर कधी नव्हे एवढे मंथन या नव्या समाजमाध्यमी पक्षाच्या निमित्ताने झाले आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची मुलाखत प्रकाशित झालेली आहे. त्यामध्ये त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना ही ‘कल्पना’ नव्हे, ती ‘रागा’ची अभिव्यक्ती होती, असे ते म्हणतात. सरन्यायाधीशांनी घटनेचे रक्षण करणे अपेक्षित असताना घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावणाऱ्यांच्या विरोधात ते कसे बोलतात? हा प्राश्न मला पडला. त्यातून व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणारे सगळे कॉक्रोच एकत्र आले तर काय होईल? अशा विचारांतून ही चळवळ सुरू झाली, असे त्यांनी त्यात सांगितले.
धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाही ही मूल्ये मानणारी माणसे संख्येने प्रचंड आहेत, मात्र या मूल्यांवर हल्ले होत असताना ती मूग गिळून गप्प आहेत. कारण ती आळशी आहेत, म्हणून संविधान विरोधी शक्ती वाढत आहेत, असे त्यांचे मत आहे. तरुणांच्या हातांना काम नाही. एकीकडे रोजगारवृद्धी करणारी धोरणे नाहीत आणि दुसरीकडे करदात्यांच्या पैशातून विकास करण्याऐवजी रेवडी वाटप करणाऱ्या मोफत योजना आणि तिसरीकडे परधर्मद्वेषावर आधारित धर्मांधतेची पेरणी अशातून पिढीच्या पिढी आळशी होणार नाही तर काय होणार?
या पार्टीच्या मुख्य अकाउंटला २१ मे रोजी दुपारी १२ वाजता ब्रेक लावला गेला. इन्स्टाग्राम अकाउंट २२ मे रोजी सकाळी नऊ वाजता हॅक केले गेले. पण त्यानंतर लगेचच ‘कॉक्रोचेस नेव्हर डाय’ म्हणजे ‘झुरळे कधीच मरत नसतात’ या घोषवाक्यासह पुनरागमन करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची मागणी सीजेपीने केली. त्या नंतरही द कॉक्रोच युथ, कॉक्रोच इज बॅक, कॉक्रोच न्यूज, आय एम कॉक्रोच, कॉक्रोच पार्टी ऑफ इंडिया, कॉक्रोच जनता पार्टी (जेन झी) अशा विविध नावांनी ते सक्रिय राहिले. या पार्टीला मिळणारा पाठिंबा पाहून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी, या पाठिराख्यांत बहुसंख्य समर्थक पाकिस्तानमधील आहेत. पाकिस्तानमधील फॉलोअर्स मिळवणाऱ्यांची कीव वाटते असे ट्विट केले होते. त्यावर २३ मे रोजी अभिजीत दीपके यांनी एक स्क्रीन रेकॉर्डिंग शेअर केले त्यामध्ये त्यांनी दावा केला की, पक्षाचे अकाउंट हॅक होण्यापूर्वी ९४.१ टक्के फॉलोअर्स भारतीय आहेत. १ टक्के अमेरिकेचे, ०.७ टक्के ब्रिटनचे, तर कॅनडा व यूएई मधील प्रत्येकी ०.६ टक्के फॉलोअर्स आहेत. आणि उर्वरित ३.७ टक्के जगातील अन्य देशांतील आहेत.
गेल्या दोन वर्षात बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलन, नेपाळमधील जेन झी क्रांती, केनियामधील फायनान्स बिल आंदोलन हे तरुणांनी घडवून आणले होते याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तसेच जर्मनीतून ध्रुव राठी, ऑस्ट्रेलियातून आर्पित शर्मा आणि अमेरिकेतून अभिजीत दिपके जेव्हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडून सरकारकडे उत्तरे मागतात तेव्हा हे सर्वजण आपल्याच ‘धर्मा’चे असतात हे लक्षात घेतले पाहिजे. फक्त ते मानव धर्माला प्राधान्य देतात.
सरकार ही आंदोलने दडपण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी अनेक पावले उचलू शकेल. मात्र सरकारला तरुणांना न्याय देणारी धोरणेच आखावी लागतील. केवळ मुस्कटदाबीच्या आधारे हे दडपता येणार नाही. तसेच जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आधारित धोरणे आखून ती अंमलात आणावी लागतील. जातीय – धार्मिक तेढ निर्माण करून आणि रेवडी वाटप करून फार काळ सत्ताकारण करता येत नसते हे लक्षात घ्यावे लागेल.
कॉक्रोच जनता पार्टी हा तरुणांचा उद्रेक आहे. एखाद्या गोष्टीचा अचानक होणारा भडका, स्फोट किंवा अतिवेगवान प्रसार याला उद्रेक म्हणतात. त्याच प्रकारचा हा भावनांचा उद्रेक आहे. हा दमन आणि शोषणविरोधाचा उद्रेक आहे. हा उद्रेक नव्या माध्यमातून व्यक्त झालेला आहे. तो डिजिटल आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण सध्या मानवी जीवनामध्ये सर्व प्रकारची डिजिटल अपरिहार्यता आपण स्वीकारलेली आहे. आपले बहुतांश व्यवहार डिजिटल झाले आहे. आपण जन्माच्या अभिनंदनापासून भावपूर्ण श्रद्धांजलीपर्यंत सर्वत्र डिजिटलच झालो आहोत. अशावेळी डिजिटल माध्यमातून तयार झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सीजेपीवर टीका करताना खऱ्याखुऱ्या राजकीय पक्षांच्या अनैसर्गिक वाढीत त्या पक्षांच्या आयटीसी सेलचे, सोशल मीडियाचे योगदान मोठे आहे हे नाकारून चालणार नाही.
कॉक्रोच जनता पार्टीचे भविष्य काय असेल, हा भाग वेगळा आहे. मात्र या देशातील तरुणाई आपली अस्वस्थता, आपले प्रश्न, आपला आक्रोश लोकशाही मार्गाने व्यक्त करत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचा गांभीर्याने विचार न करता भारताला त्रास देण्यासाठी हे टूल किट वापरले जात आहे, यामागे विरोधी राजकीय शक्ती आहेत अथवा सत्ताधाऱ्यातीलच असंतुष्ट गट आहे असे म्हणणे म्हणजे मुख्य मुद्द्यापासून पलायन करणे आहे. परिस्थितीचे गांभीर्य नाकारण्यासारखे आहे. ‘गिरने का डर उन्हे होता है उडान से डरते है, हम तो वो है जो तुफानो मे भी सफर करते है’ हे आभासी जगातील का होईना पण आजचे वास्तव आहे.
सध्या निवडणुकांना जे अत्यंत भ्रष्ट स्वरूप आलेले आहे त्यामुळे बहुसंख्य प्रामाणिक जनता दुखावली आहे. लोकशाहीत लोक हे महत्त्वाचे असतात. मात्र आज लोक एकीकडे आणि शाही दुसरीकडे असे स्पष्टपणे विभाजन झाले आहे. लोकांनाच गृहीत धरून अथवा त्यापैकी काहींना खरेदी करून ज्यावेळी सत्ता प्राप्त केली जाते तेव्हा बहुतांश सर्वसामान्य जनतेत सुप्त असंतोष आकाराला येत असतो. गैरमार्गाचा अवलंब करून विजयी झालेले सत्ताधारीही आपल्या विजयाचा आनंद प्रामाणिकपणे साजरा करू शकत नाहीत. कारण त्यांना हा विजय खोटा आहे, फसवा आहे हे माहीत असते हेही अलीकडे अनेकदा स्पष्ट झाले आहे.
जेव्हा सत्तेवर असलेला प्रस्थापित राजकीय पक्ष जनतेचे म्हणणे काय आहे, जनतेचे प्रश्न काय आहेत, जनतेचा अग्रक्रम कशाला आहे याचा विचार न करता आपली सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विचारधारा पुढे रेटत राहतो तेव्हा सुरुवातीला निषेध केला जातो. मग विरोध केला जातो. या निषेधाची व विरोधाची जेव्हा दखल घेतली जात नाही तेव्हा जनता पर्याय शोधते. जनता सदैव आणीबाणीच्या कालखंडात राहू शकत नाही. मग ती आणीबाणी घोषित असो अथवा अघोषित, ती उठवावी लागते. अन्यथा जनता ती उठवतेच हे दुर्लक्षून चालणार नाही.
जनतेला राज्यघटनेची मूल्ये धोरणकर्त्यांच्या धोरणातून दिसावी लागतात. तो जनतेचा अधिकार आहे. किंबहुना जनतेने त्यासाठी सत्तेवर बसवलेले असते. लोकशाहीत ‘मन की बात’ नाही ‘जन की बात’ म्हत्वाची असते. देश भाषणबाजीवर नाही तर योग्य निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीवर पुढे जात असतो. काही काळ आपण काही लोकांना फसवू शकतो, काही काळ आपण सर्वांना फसवू शकतो पण सर्वकाळ सर्वांना फसवू शकत नाही हे कॉक्रोच जनता पार्टीच्या निर्मितीतून व तिला मिळणाऱ्या आभासी पाठिंब्यातून सिद्ध झाले आहे. हा प्रवास पुढे काय व कसे वळण येईल हे आज सांगता येत नाही. पण प्रवास सुरू का झाला या कारणांचा विचार केला पाहिजे. मुद्दा कॉक्रोच जनता पार्टीच्या पाठिंब्याचा किंवा समर्थनाचा नाही. वास्तवात शेकडो पक्ष असताना हा आभासी पक्ष का तयार झाला व त्याला सर्वांपेक्षा आभासी पाठिंबा का मिळाला हा आहे. सामूहिक विवेकाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. म्हणूनच त्याकडे विवेकाने पाहणे योग्य ठरेल.
हे सगळे होत असताना या विरोधात शनिवार ता.२३ मे रोजी राजा चौधरी या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी केलेल्या तोंडी निरीक्षणांचा गैरवापर करून त्याचा व्यवसायिक फायदा करून घेतला जात असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेनुसार न्यायालयात मांडलेल्या मुद्द्यांचा वापर ब्रँडिंग आणि प्रसिद्धीसाठी करणे चुकीचे आहे. या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची यावी आणि बनावट पदव्या वापरून प्रॅक्टिस करणाऱ्या बनावट वकिलांचा शोध घ्यावा अशी मागणीही या याचिकेत केली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची तातडीने सुनावणीची गरज नाही असे स्पष्ट केले आहे.
एकूणच गेले दहा दिवस हे जे काही चालू आहे त्याला अल्पजीवी, हास्यास्पद, बालिश प्रकार म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. आभासी आंदोलने रस्त्यावर खिळे ठोकून, पाण्याचा मारा करून, लाठीचार्ज करून संपवता येत नसतात. लोकाभिमुख निर्णय घेऊन आणि त्यांची योग्य अंमलबजावणी करूनच ही आंदोलने शांत करावी लागतील हे लक्षात घेतले पाहिजे.
prasad.kulkarni65@gmail.com
(लेखक समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.)
