खासगी संपत्तीला खरा गुन्हेगार घोषित करून समतेच्या समर्थनार्थ ऐतिहासिक युक्तिवाद मांडणाऱ्या रूसोला कांट तर, ‘नैतिक जगाचा न्यूटन’ ठरवतो; तो का?
No citizen shall ever be wealthy enough to buy another, and none poor enough to be forced to sell himself. – Rousseau
फ्रेंच अभिजातवाद आणि बुद्धिवादामुळे १८ व्या शतकातलं पॅरिस म्हणजे पाश्चात्त्य सभ्यतेनं साधलेल्या प्रगतीचा परमोच्चबिंदूच ठरलं होतं. प्रगत, समाजशील, सभ्य, वैश्विक माणूस कसा असावा, याविषयी धडे घेण्यासाठी पाश्चात्त्य उमराव वर्ग जिथे यायचा, असं ते त्या वेळचं पॅरिस ही प्रबोधनपर्वाची राजधानीच. अशा काळात रूसो मात्र दहा वर्षं पॅरिसमध्ये हलाखीत राहून, प्रबोधनपर्वाच्या राजधानीकडेच पाठ फिरवण्याचा निर्णय घेतो. पाश्चात्त्य जगानं साधलेला भौतिक विकास म्हणजेच मानवतेची उत्कर्षाकडे आगेकूच, या प्रबोधनपर्वाच्या समीकरणालाच रूसो लक्ष्य करतो.
जिनेव्हाच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेलं लहानपण रूसोच्या लिखाणातला महत्त्वाचा संदर्भबिंदू ठरला आहे. लहानपणी अनुभवलेली अंतरंग आणि बाह्यरंग यांतली एकमयता त्याच्यासाठी आठवणींचा समृद्ध खजिना होता. मात्र सुसंस्कृत, सभ्य आणि प्रगत पॅरिसमध्ये आल्यावर त्याच्या अंतरंगाची बाह्य जगाशी नाळ तुटून त्याला आतलं आणि बाहेरचं जग यात असह्य विसंवाद जाणवू लागला. त्यामुळे फ्रेंच कार्टेशियन वर्तुळात त्याची घुसमट होऊन त्याला दुभंगलेपण आणि परात्मता जाणवली. या भावनिक पार्श्वभूमीवर व्हॅन्सेन तुरुंगाच्या वाटेवर झालेला साक्षात्कार रूसोच्या जीवनात आणि लिखाणात निर्णायक वळण ठरला.
याआधी आपण पाहिलं की दिजोंच्या अकादमीसाठी १७५० साली लिहिलेल्या ‘डिस्कोर्स ऑन द आर्ट्स अॅन्ड सायन्सेस’ निबंधात ‘मानवतेची ऐतिहासिक वाटचाल प्रगतीची नसून अधोगतीची राहिली आहे,’ असा धक्कादायक निष्कर्ष रूसोनं मांडला. त्यामुळे पाश्चात्त्य प्रगतीचा मानदंड ठरवणारी फ्रेंच अभिरुची रूसोच्या नजरेत अकारण क्लिष्ट, कृत्रमि, अनैसर्गिक ठरते. Letter on French Music या १७५३ मधल्या लेखात रूसो अभिजात चौकटीत अडकलेल्या अभिजात फ्रेंच संगीतावर प्रखर टीका करतो. फ्रेंच संगीतातली अतिरेकी सूत्रबद्धता रूसोच्या मते नैसर्गिक गोडव्याला जागा देत नाही. तिच्यात नैसर्गिकतेचं दमन असल्यानं ती प्रत्येक मनुष्याच्या हृदयाला स्पर्श करत नाही. त्याउलट, मानवी भावनांना प्रभावीपणे अभिव्यक्त करणाऱ्या प्रवाही इटालियन संगीताचा रूसो गौरव करतो. त्यामुळे पॅरिसचे अभिजातवादी चिडून रूसोची प्रतिमा (एफिजी) जाळतात.
खरंतर, रूसोचं १७५० ते १७७८ दरम्यानचं लिखाण म्हणजे पहिल्या निबंधात मांडलेल्या विचारांना खोली आणि व्याप्ती देण्याचा आणि त्या अनुषंगानं जगण्याचा प्रयत्न. त्यामुळेच रूसोनं पंधराव्या लुईचं निमंत्रण नाकारलं होतं. रूसोच्या समग्र विचारविश्वात प्रामुख्यानं तीन तात्त्विक पैलूंचा विस्तार आढळतो : निसर्गावस्थेतली मानवी प्रकृती, इतिहासातलं मानवी प्रकृतीचं पतन आणि इतिहासातच दडलेल्या मानवी उत्कर्षाच्या शक्यता.
प्रबोधनपर्वाचा निर्देश करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या Lumiè res, Enlightenment, Aufklä rung, Illuminismo सारख्या शब्दांत प्रकाशाचं रूपक आढळून येतं. त्या अर्थी प्रबोधनपर्व म्हणजे प्रकाशपर्व – मध्ययुगीन अंधकाराचा नाश करून समग्र मानवतेसाठी नव्या युगाचं क्षितिज दाखवणारी प्रकाशमय ऐतिहासिक प्रक्रिया- असं सूचित होतं. त्यामुळे समग्र मानवतेच्या कल्याण वा उत्कर्षाच्या दिशेनं होणारी ही प्रगतिशील वाटचाल मानवी बुद्धीच्या ज्ञानप्रकाशानंच प्रकाशित होईल, ही आधुनिक धारणा प्रबोधनपर्वाच्या प्रकल्पात अनुस्यूत आहे. मात्र धर्मशास्त्रांनुसार मानवतावादाचं सारभूत मूल्यच – स्वातंत्र्य – पापाचं द्याोतक ठरायचं; त्यामुळे मानवी बुद्धीच्या ज्ञानप्रकाशात, स्वातंत्र्याच्या दिशेनं होणारी वाटचाल विनाशकारी समजली जायची. आधुनिक मानवतावाद आणि प्रगतशील बुद्धिवादाला (progressive rationalism) परंपरावाद्यांचा विरोध असल्यामुळे, अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत परंपरावादी आणि आधुनिकतावादी यांच्यात साहजिकच द्वंद्व होतं.
या वैचारिक संघर्षाला १८व्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र तिसरा कोन आला. प्रबोधनपर्वाच्या छावणीतूनच येणाऱ्या रूसोनं एकीकडे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या आधुनिकतेच्या मूल्यत्रयीचा पुरस्कार केला; पण दुसऱ्या बाजूला प्रबोधनपर्वाचं मुख्य हत्यार समजल्या जाणाऱ्या कार्टेशियन कोजितोची अर्थात ‘मानवी बुद्धीच्या प्रकाशा’ची गडद पडछायाही निदर्शनास आणून देऊन त्यानं सुखवादी आणि उपयुक्ततावादी प्रयोजन नाकारलं. त्यामुळे बुद्धिवाद, प्रगतीवाद, उपयुक्ततावाद सुखवाद, सारख्या आधुनिकतेच्या मूलभूत संकल्पना संशयास्पद वाटून प्रबोधनपर्वाचा प्रकल्पच संकटग्रस्त झाला. रूसोनं व्यक्तीच्या मानवी प्रतिष्ठेला मध्यवर्ती मूल्य मानलं. प्रस्थापित समाजात (Gesellschaft) सुखवाद आणि उपयुक्ततावाद असला तरी व्यक्तिप्रतिष्ठा नसल्यानं न्याय्य, एकमय समाज (Gemeinschaft) निर्माण होऊ शकला नाही ही बाब अधोरेखित केली.
अशा प्रकारे कार्टेशियन कोजितोवर आरूढ होऊन आत्मविश्वासाने घोडदौड करणाऱ्या आधुनिकतेच्या प्रकल्पाला आतूनच सुरूंग लावणारा रूसो कुणी धर्मांध प्रतिक्रियावादी नसून १७५० पर्यंत आधुनिकतेच्या वातावरणाशी अनुरूप होण्याचा प्रयत्न करणारा मनस्वी तत्त्वज्ञ होता. त्याला त्याच्या अनुरूप होण्याच्या प्रयत्नातूनच कृत्रिमता, उपरेपण आणि परात्मतेची भावना जाणवली होती. एकीकडे प्रबोधनपर्वाचं बुद्धिवादी शक्तिशाली वर्तुळ तर दुसरीकडे परंपरावाद्यांची धर्माधिष्ठित विषम समाजरचना या दोन्ही छावण्या टाळून रूसोनं एकाकीपणा पत्करला. त्याच्या हृदयाच्या हाकेला साद देऊन त्यानं प्रबोधनपर्वाला नवीन दिशा आणि क्षितिज प्रदान करण्याचा प्रयत्न केला.
समतावादाचा जाहीरनामा
दिजोंच्या अकादमीनंच १७५४ मध्ये ‘विषमतेचा उगम कशात आहे? विषमतेला नैसर्गिक अधिष्ठान आहे का?’ या विषयावर निबंध स्पर्धेचं आयोजन केलं. धर्माधिष्ठित निरंकुश फ्रेंच राजेशाही कायम असलेल्या त्या काळात विषमतेचा प्रश्न उपस्थित करणं धाडसाचंच होतं. पण प्रश्नाचं स्वरूप संदिग्ध असल्यामुळे, ‘विषमता निसर्गदत्त किंवा ईश्वरदत्त असल्याने विषमतेला अनिष्ट मानून समतेचा आग्रह धरणं अनैसर्गिकच नव्हे तर ईश्वरी इच्छेच्या विरोधात जाणं ठरेल,’ अशा युक्तिवादाचीही मुभा प्रस्थापितांना होती. या विषयावर रूसो ‘डिस्कोर्स ऑन द ऑरिजिन्स ऑफ इनइक्वॅलिटी’ हा धाडसी निबंध लिहितो. त्यात, खासगी संपत्तीला खरा गुन्हेगार घोषित करून समतेच्या समर्थनार्थ ऐतिहासिक युक्तिवाद मांडतो. त्याला या निबंधासाठी कुठलंही पारितोषिक मिळत नाही… मात्र हा निबंध फ्रेंच राज्यक्रांतीची ठिणगी समजला जातो.
‘डिस्कोर्स ऑन द ऑरिजिन्स ऑफ इनइक्वॅलिटी’ या निबंधात रूसो ‘मानवी प्रकृतीतला मूलभूत चांगुलपणा’ ( Bonté originelle), ही संकल्पना मांडून एकाच वेळी ख्रिास्ती धर्मश्रद्धा आणि प्रबोधनपर्वाच्या कार्टेशियन बुद्धिवाद्यांच्या विरोधात जातो. ख्रिास्ती धर्मशास्त्रानुसार मनुष्य मुळातच पापी ठरतो तर प्रबोधनपर्वाच्या बुद्धिवादानुसार निसर्गावस्थेतला रानटी, हिंसक मनुष्य आता सुसंस्कृत, प्रगत अवस्थेकडे संक्रमण करत आहे अशी धारणा आहे. रूसो या धर्ममान्य, विद्वन्मान्य सिद्धान्तांच्या विरोधात लिहितो की मुळात मानवी प्रकृती पापी, विषमतावादी, क्रूर, हिंसक नसून निष्पाप, निर्मळ, प्रेमळ आणि चांगली आहे.
तत्कालीन वैचारिक अवकाशात ईश्वरीय न्यायशी ( Thé odicé e) संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते : जगातल्या अन्याय, अत्याचार, विषमतेची ईश्वराच्या अस्तित्वाशी संगती कशी काय लावता येईल? ईश्वराचं आणि अन्यायाचं सहअस्तित्व विसंगतीचं द्याोतक नाही का? या वादात कुणी ईश्वराची बाजू घेऊन मनुष्याला दोष देत होतं, तर कुणी मनुष्याची बाजू घेऊन ईश्वराला. रूसो मात्र ईश्वर आणि मनुष्य दोघांना निर्दोष ठरवून ‘समाज’ नावाच्या नवीन गुन्हेगाराला जन्म देतो. निसर्गावस्थेबाहेर पडताना खासगी संपत्तीमुळे ज्याप्रकारची सामाजिक व्यवस्था जन्माला आली तीच गुन्हेगार, असं रूसो ंमानतो.
रूसोच्या ‘मनुष्याची निसर्गावस्था’ या संकल्पनेविषयी बराच संभ्रम आढळतो. यासंदर्भात रूसो स्वत: नमूद करतो की निसर्गावस्था अस्तित्वात नाही, नव्हती, नसणारच. पण वर्तमान अवस्थेची चिकित्सा करण्यासाठी अशी काल्पनिक अवस्था पद्धतीशास्त्राचा भाग म्हणून गृहीत धरावी लागते. कारण त्याशिवाय व्यक्तीची प्रतिष्ठा आणि सामाजिक समतेचा विचार शक्य नाही.
नैसर्गिक माणूस / कृत्रिम माणूस यांतला भेद ओळखण्यासाठी इतिहासात जाण्याची गरज नाही. त्यासाठी प्रामाणिक स्वभान पुरेसं आहे, कारण प्रत्येकाच्या अंतरंगात मानवतेची आदिम निशाणी जिवंत असते. पण इतिहासदत्त बेगडी आणि कृत्रिम आवरणांखाली आपली मानवता पुरली गेल्यामुळे आपण आपला मूळ चांगुलपणा ओळखण्यासाठी अपात्र ठरतो.
रूसोच्या लिखाणात, जीवनात पावलोपावली अंतर्विरोध आढळतात. रूसो स्वत: म्हणतो की पूर्वग्रहदूषित कर्मठ जीवन जगण्यापेक्षा मला अंतर्विरोधात्मक पण खरं जगणं कधीही श्रेयस्कर वाटतं. रूसोच्या काही अंतर्विरोधांचा उल्लेख करायचा झाला तर La Nouvelle Hé loise आणि Confessions सारख्या अजरामर साहित्यकृतींतून हृदयाचं धर्मशास्त्र अभिव्यक्त करणाऱ्या भावनाप्रधान आणि व्यक्तिवादी लेखकानंच Social Contract हा रुक्ष ग्रंथ लिहिला असावा यावर विश्वास बसत नाही.
कारण व्यक्तिवादी रोमॅण्टिसिझमचा हा जनकच Social Contract मध्ये व्यक्तिवादाचा बळी देऊन प्रखर समाजवादाचा पुरस्कार करतो. रूसोमध्ये काहींना सतत रडगाणं करणारा, आत्मकेंद्री, संशयी, भ्रमिष्ट, वेडा, तापट, दांभिक, आत्ममुग्ध, मानसिक रोगी दिसतो. मात्र दुसरीकडे, प्रबोधनपर्वाचा महामेरू इमॅन्युएल कांटच्या नजरेत भावनांच्या ऊर्जेनं पेटून उठलेल्या या फ्रेंच भाषेच्या किमयागारात प्रबोधनपर्वाची कोंडी फोडण्याची क्षमता दिसते. त्यामुळे कांट रूसोचं वर्णन ‘नैतिक जगाचा न्यूटन’ असं करतो.
कांटच्या चष्म्यातून पाहिल्यास, रूसो कार्टेशियन बुद्धिवादावर प्रखर टीका करत असला तरी तो ‘रीझन’ या संकल्पनेचा शत्रू ठरत नाही. रीझन या संकल्पनेच्या कांटनं केलेल्या विस्तृत विश्लेषणाचं आधारभूत आशयद्रव्य रूसोच्या लिखाणात सापडतं. त्याअर्थी रूसोचा भावनावाद म्हणजे कांटनं अधोरेखित केलेलं प्रॅक्टिकल रीझनचं महत्त्व (primacy of practical reason); ज्यातून मानवी स्वातंत्र्याची संकल्पना शक्य होते. प्रसिद्ध जर्मन विचारवंत अर्न्स्ट कासिरे नमूद करतो की, रूसोनं बुद्धिवादाला भावनावादाची जोड देऊन; त्यामुळे consciousness ची conscience शी सांगड घालून एका प्रकारे विवेकवादाला पुढल्या टप्प्यावर नेण्याचं ऐतिहासिक काम केलं आहे.
फ्रेंच साहित्य-तत्त्वज्ञानाचे अभ्यासक
sharadcrosshuma@gmail.com
