• डॉ. निरंजन राजाध्यक्ष, कार्यकारी संचालक, अर्थ ग्लोबल

ॲडम स्मिथ यांनी ‘अर्थशास्त्र’ नव्हे, तर ‘आर्थिक जीवन’ ही संज्ञा वापरून या विषयाचा माणसाच्या रोजच्या जगण्याशी, त्याच्या आशा-आकांक्षांशी असलेला संबंध ज्या पुस्तकातून स्पष्ट केला, त्या ‘ॲन एन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉझेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स’च्या प्रकाशनाला येत्या ९ मार्च रोजी २५० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने…

या वर्षी ॲडम स्मिथच्या ‘ॲन एन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉझेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनाला २५० वर्षे पूर्ण होत आहेत. हा आधुनिक अर्थशास्त्रातील पहिला पायाभूत ग्रंथ मानला जातो. एम्मा रोथस्चाइल्ड आणि अमर्त्य सेन यांनी याला आर्थिक जीवनावर लिहिलेले सर्वात महान पुस्तक म्हटले आहे. लक्षात घेण्यासारखी बाब ही, की त्यांनी ‘अर्थशास्त्र’ नव्हे, तर ‘आर्थिक जीवन’ ही संज्ञा वापरली. हा एक अर्थपूर्ण फरक आहे. अर्थशास्त्र म्हणजे केवळ आकडे, सूत्रे आणि आलेख नाहीत. ते माणसाच्या रोजच्या जगण्याशी, त्याच्या आशा-आकांक्षांशी आणि त्याच्या समाजाशी निगडित आहे. हीच भूमिका स्मिथने आपल्या पुस्तकात मांडली.

ॲडम स्मिथ आपल्या आर्थिक जीवनातील सत्ये स्पष्ट करण्यासाठी रोजच्या जीवनातील उदाहरणे वापरतात. ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ या पुस्तकाच्या सुरुवातीच्या पानांवर ते एका मजुराने घातलेल्या साध्या लोकरीच्या कोटाचे उदाहरण देतात. हा कोट लोकर स्वच्छ करणारा, रंग देणारा, कताई करणारा, विणकर, व्यापारी अशा अनेक लोकांच्या कष्टांचे फळ आहे. लोकरीच्या कोटाचे उदाहरण देऊन ते आपल्याला सांगतात की आपले आर्थिक जीवन एकमेकांवर कसे अवलंबून आहे. एखादी साधी वस्तू विकत घेताना आपण कळत-नकळत शेकडो अनोळखी माणसांच्या कष्टांचे ऋणी असतो – हे स्मिथने अगदी सोप्या भाषेत दाखवून दिले आहे.

पुस्तकात ते लिनन शर्टाचा उल्लेख करतात. इंग्लंडमध्ये ज्याच्याकडे लिननचा शर्ट नाही तो माणूस अत्यंत गरीब समजला जात असे. लिननचा शर्ट ही मूलभूत जैविक गरज नाही, पण ज्या समाजात तो न परवडणे हे गरिबीचे लक्षण मानले जाते, त्या समाजात तो शर्ट ही एक सामाजिक गरज ठरते. म्हणूनच गरीब शेतकरीसुद्धा रविवारी चर्चला जाताना लिननचा शर्ट घालण्याची काळजी घेत असे. वाचकांना परिचित असलेल्या वस्तूंच्या माध्यमातून स्मिथ यांनी आपले विचार जगण्यातील साक्षात्कारांसारखे मांडले.

ॲडम स्मिथ पुस्तकाच्या सुरुवातीलाच श्रमविभाजनाची शक्ती दाखवण्यासाठी टाचणी कारखान्याचे प्रसिद्ध उदाहरण देतात. त्यांनी निरीक्षण केले की एकटा कामगार एकट्याने काम करताना दिवसभरात एकही टाचणी बनवू शकणार नाही. पण जर प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागली- तार ओढणे, सरळ करणे, कापणे, टोक करणे, डोके बसवणे वगैरे आणि प्रत्येक काम वेगळ्या कामगाराला दिले, तर दहा माणसांचा एक छोटा गट एका दिवसात हजारो टाचण्या तयार करू शकतो. उत्पादकतेतील हा फरक अचंबित करणारा होता. स्मिथ यांचा मुद्दा केवळ तांत्रिक नव्हता- टाचणी कारखान्याने हे दाखवून दिले की सामान्य कामगारांमधील सहकार्य आणि तज्ज्ञता, एकट्या माणसाच्या कष्टापेक्षा कितीतरी अधिक उत्पादन निर्माण करू शकते.

या पुस्तकातील चार महत्त्वाच्या गोष्टी आजही लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, समृद्धी जमिनीच्या नैसर्गिक देणग्यांतून किंवा खजिन्यातील सोन्या-चांदीतून नाही, तर माणसांच्या कष्टांतून येते. माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. त्याच्यात एकमेकांशी व्यापार करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. स्मिथ यांनी कसाई, मद्य बनवणारा आणि भाकरी करणारा – द बुचर, द ब्रुअर, द बेकर – अशा सामान्य माणसांची उदाहरणे दिली, राजे-सरदारांची दिली नाहीत. यातून त्यांनी हे सांगितले की राष्ट्राची खरी संपत्ती सामान्य माणसाच्या उद्यमशीलतेत आणि परिश्रमांत असते.
दुसरी गोष्ट म्हणजे, माणूस जेव्हा विशिष्ट कामात तज्ज्ञ होतो – म्हणजेच श्रमविभाजन होते – तेव्हा उत्पादकता वाढते, पण श्रमविभाजन बाजाराच्या व्याप्तीवर अवलंबून असते. बाजार मोठा असेल तर तज्ज्ञतेला अधिक वाव मिळतो. म्हणूनच स्मिथ मुक्त व्यापाराचे समर्थक होते- माणसांमध्ये, प्रदेशांमध्ये आणि देशांमध्ये. व्यापार म्हणजे एकाचा फायदा दुसर्‍याचा तोटा असे नाही. दोन्ही बाजूंना फायदा होतो- हा स्मिथ यांचा मूलभूत युक्तिवाद होता. हा युक्तिवाद हे त्या काळच्या व्यापारवादी विचारसरणीला थेट आव्हान होते.

तिसरी गोष्ट म्हणजे, सरकारी नियंत्रणाऐवजी माणसाच्या कष्टांवर आधारित व्यापारी समाज केवळ आर्थिक विकासच नाही तर बरेच काही देतो. स्मिथ यांनी लिहिले की व्यापार आणि उद्योगामुळे हळूहळू सुव्यवस्था, चांगले शासन निर्माण होते आणि व्यक्ती अधिक स्वतंत्र व सुरक्षित होते. त्यांच्या मते हे सर्वांत महत्त्वाचे परिणाम आहेत.

चौथी गोष्ट म्हणजे, वैयक्तिक प्रयत्न आणि श्रमविभाजन एकट्याने फुलत नाहीत. त्यांना योग्य संस्थात्मक आधाराची गरज असते. सुरक्षित मालमत्ता हक्क, नि:पक्षपाती न्याय, करारांची अंमलबजावणी आणि मक्तेदारीपासून मुक्तता या गोष्टी आवश्यक आहेत. या पायाशिवाय कष्टाला प्रोत्साहन मिळत नाही. स्मिथ केवळ स्वार्थाचे पुरस्कर्ते नव्हते- ते एक सखोल संस्थात्मक विचारवंत होते.

तत्त्वज्ञ एलिझाबेथ अँडर्सन यांनी २०१५ मध्ये दिलेल्या व्याख्यानांमध्ये नमूद केले की मुक्त बाजाराची कल्पना एकेकाळी समानतावाद्यांची होती. याच दृष्टिकोनातून स्मिथने रस्त्यावरचा हमाल आणि तत्त्वज्ञ यांच्यातील समान मानवता मांडली, गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला आणि ईस्ट इंडिया कंपनी बंगालमध्ये जे करत होती त्यावर कठोर टीका केली. व्यापारी आणि राज्यकर्ता या दुहेरी भूमिकेला त्यांनी ‘अ स्ट्रेंज ॲब्सर्डिटी’ म्हटले – कारण एकाच वेळी नफा मिळवणे आणि न्यायाने राज्य करणे या दोन्ही गोष्टी एकत्र साधता येत नाहीत.

केनेथ ॲरो आणि जेरार्ड दब्रू या जोडीने गणितीयदृष्ट्या सिद्ध केले आहे की स्पर्धात्मक बाजार संसाधनांचे सर्वांत कार्यक्षम वाटप करतात. मात्र हे केवळ संपूर्ण माहिती, बाह्य परिणाम नसणे, बाजारशक्ती नसणे अशा कठोर अटींवर खरे ठरते. प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेत यासंदर्भातील अडचणी सर्रास आढळतात. त्यामुळे बाजार ही सर्वस्वी परिपूर्ण यंत्रणा नाही – पण सरकारी हस्तक्षेपाच्या पर्यायापेक्षा अनेकदा ते अधिक कार्यक्षम ठरतात, असे स्मिथ यांचे मत होते. स्मिथ औद्योगिक क्रांतीच्या पहाटेला लिहीत होते. उदयास येणार्‍या नव्या समाजाबद्दल त्यांचा आशावाद समजण्यासारखा होता. तरीही ते आंधळे नव्हते – त्यांनी कंपन्यांची मिलीभगत असण्याचे, अरुंद श्रमविभाजनाच्या माणसावरील दुष्परिणामांचे आणि व्यापारी समाजाच्या इतर उणिवांचेही वर्णन केले. त्यांचा मुद्दा हा नव्हता की व्यापारी समाज परिपूर्ण आहे, तर हा होता की तो ज्ञात पर्यायांपेक्षा कितीतरी चांगला आहे.

कोणत्याही महान विचारवंताप्रमाणेच स्मिथ यांच्या लेखनाचाही अर्थ अनेक प्रकारे लावता येतो. त्यांना समजून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांचे मूळ भाष्य वाचणे. ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ हे पुस्तक एखाद्या विविधरंगी कोलाजसारखे आहे- तीक्ष्ण, भरकटणारे, विनोदी, व्यंगात्मक, गंभीर, आधुनिक, जुनाट- सगळे एकामागून एक- पण नेहमीच अंतर्दृष्टीपूर्ण. २५० वर्षांनंतरही हे पुस्तक आपल्याला आपल्या आर्थिक जीवनाबद्दल नव्याने विचार करायला लावते, हीच त्याची खरी महानता आहे.