प्रा. डॉ. शुद्धोधन पांडुरंग कांबळे
अमेरिकेच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर ९ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. जगभरातील संवेदनशील मनांवर सखोल परिणाम करणार्या या घटनेचे चित्रण साहित्यात कसे झाले आणि ‘९/११ साहित्य’ आज २५ वर्षांनंतरही का आवश्यक आहे, याविषयी… आधुनिक जगाच्या सामूहिक स्मृतीत ११ सप्टेंबर २००१ हा दिवस कायमचा कोरला गेला आहे. न्यूयॉर्कमधील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर विमाने आदळली. एका राष्ट्राच्या सुरक्षिततेविषयीच्या संकल्पनेला तडा गेला आणि जगाच्या राजकीय नकाशावर ‘दहशतवादाविरुद्धचे युद्ध’ या नव्या पर्वाची सुरुवात झाली. तथापि ९/११ची कथा एवढ्यावर संपत नाही.
त्या दिवशी कोसळलेल्या इमारतींच्या ढिगार्याखाली केवळ माणसेच गाडली गेली नाहीत; आधुनिक जगाच्या सुरक्षिततेविषयीचे अनेक भ्रमही गाडले गेले. म्हणूनच ती घटना साहित्यिक आणि सांस्कृतिक स्मृतीचा अविभाज्य भाग झाली. काल (शुक्रवार) या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यानंतरच्या जगाचा साहित्याने कसा अर्थ लावला आणि आजच्या जगासाठी त्या साहित्याचे महत्त्व काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल…
‘९/११ लिटरेचर’ या संज्ञेत केवळ ११ सप्टेंबरच्या हल्ल्याचे वर्णन करणार्या साहित्यकृतींचा समावेश होत नाही. त्या घटनेमुळे व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि जागतिक मानसिकतेत जे बदल झाले, त्यांचे साहित्यिक प्रतिबिंबही या संकल्पनेत समाविष्ट होते. आघात, दु:ख, स्मृती, विस्मरण, भीती, स्थलांतर, धार्मिक अस्मिता, इस्लामोफोबिया, राष्ट्रवाद, युद्ध, जागतिकीकरण, माध्यमे, सुरक्षा आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांसारखे अनेक प्रश्न ९/११ साहित्याच्या केंद्रस्थानी आले. त्यामुळे हे साहित्य एका घटनेचे दस्तऐवजीकरण नसून त्या घटनेनंतर बदललेल्या मानवी जगाचे अर्थलक्षण आहे.
९/११च्या साहित्यिक प्रतिसादासमोर सुरुवातीपासूनच एक मूलभूत नैतिक प्रश्न होता- इतक्या मोठ्या मानवी शोकांतिकेवर साहित्य लिहिणे योग्य आहे का? भयाण दृश्ये अजूनही डोळ्यांसमोर असताना त्या घटनेचे काल्पनिक रूपांतर करणे म्हणजे दु:खाचे सौंदर्यीकरण तर होणार नाही ना? या संकोचाची नोंद Martí n Espada यांनी स्वत: केली आहे. ९/११वरील त्यांच्या Alabanza: In Praise of Local 100 या कवितेबद्दल लिहिताना त्यांनी नमूद केले की त्या काळात ९/११वरील कविता, कथा किंवा कला ‘अकाली’, ‘अयोग्य’ किंवा ‘शोषक’ ठरू शकते, अशी भीती होती. तथापि, दु:खाला आवाज देण्याची गरज अधिक मोठी होती.
या हल्ल्यानंतर कविता सार्वजनिक शोकाची भाषा झाली. लोकांनी कविता सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केल्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांपर्यंत पोहोचवल्या. त्या काळातील साहित्यिक प्रतिसादावर भाष्य करताना ‘पोएट्री फाउंडेशन’ने ९/११नंतर कवितेचा झालेला हा अभूतपूर्व प्रसार नोंदवला आहे. त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते- जेव्हा एखाद्या समाजाला आपल्या दु:खाला सामूहिक स्वर द्यायचा असतो, तेव्हा कविता केवळ साहित्यप्रकार राहत नाही; ती सामाजिक कृतीचे रूप धारण करते. ९/११ बाबत समस्या ही की रागातून सूडाचे समर्थन होण्याची शक्यता होती. ‘दु:ख’ आणि ‘राजकीय प्रचार’ यांच्यातील सीमा जपणे आवश्यक होते.
Espada ¹FFa¨Fe Alabanza: In Praise of Local 100 ही कविता Alabanza: New and Selected Poems या संग्रहात २००३मध्ये प्रकाशित झाली. ती वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील ‘विंडोज ऑन द वर्ल्ड’ या रेस्टॉरंटमध्ये काम करणार्या ४३ कामगारांच्या स्मृतीला समर्पित आहे. या कामगारांमध्ये अनेक स्थलांतरित होते. Espada यांनी मृत्यूच्या क्षणाचे वर्णन करण्याऐवजी त्यांच्या मृत्यूपूर्वीच्या जीवनाचे स्मरण केले. स्वयंपाकघरातील रेडिओ, अन्न, कामगारांचे हात, त्यांच्या भाषा आणि त्यांच्या देशांच्या आठवणी या सर्व घटकांतून त्यांनी मृतांना पुन्हा ‘माणूस’ म्हणून समोर आणले. ‘पोएट्री फाउंडेशन’च्या मते या कवितेने अदृश्य राहिलेल्या स्थलांतरित कामगारांना केंद्रस्थानी आणले.
कवितेचा शेवट ९/११ साहित्याच्या जागतिक स्वरूपाचे प्रतीक मानावा असा आहे. मॅनहॅटन आणि काबूलच्या आकाशात उठणार्या धुराला Espada एकमेकांशी संवाद साधताना कल्पितात. एका बाजूने आवाज येतो- ‘टीच मी टु डान्स. वुई हॅव नो म्युझिक हिअर’ आणि दुसर्या बाजूने उत्तर येते- ‘आय विल टीच यू. म्युझिक इज ऑल वुई हॅव’. कविता सांगते, की मानवी वेदनेला राष्ट्रीय सीमा नसतात. एका मृत्यूचे दु:ख दुसर्या मृत्यूच्या दु:खाला सौम्य करू शकत नाही.
आजच्या गाझा असो, युक्रेन वा अफगाणिस्तान जगातील कोणत्याही युद्धक्षेत्राची दृश्ये अल्पवाधीत आपल्यापर्यंत पोहोचतात. परंतु दृश्यांच्या सततच्या मार्याने माणूस कधी कधी संवेदनाशून्यही होतो. अशा वेळी साहित्य विचारते- स्क्रीनवर दिसणार्या त्या आकड्यांच्या मागे कोणाचे जीवन आहे?
याच विषयावरीव Don DeLill यांची ‘फॉलिंग मॅन’ (२००७) मैलाचा दगड मानली जाते. DeLillo यांनी त्या घटनेतून वाचलेल्या व्यक्तीच्या अंतर्मनाकडे लक्ष वेधले आहे. Keith Neudecker हे पात्र हल्ल्यातून वाचते. त्याच्या शरीरावरील जखमा बर्या होऊ शकतात; परंतु मनातील आघात कायम राहतो. त्याचे कुटुंबाशी असलेले नाते आणि स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव या सर्यावर त्या हल्ल्याची सावली पडते. ‘फॉलिंग मॅन’ ही प्रतिमा त्यामुळे केवळ इमारतीतून खाली पडणार्या माणसाची प्रतिमा राहत नाही; ती आधुनिक मानवाच्या मानसिक अस्थिरतेचे प्रतीक ठरते.
Jonathan Safran Foer यांची ‘एक्स्ट्रीमली लाउड अँड इन्क्रेडिबली क्लोज’ (२००५) ही कादंबरी ९/११च्या अनुभवाला वेगळ्या पातळीवर घेऊन जाते. Oskar Schell या मुलाच्या नजरेतून वडिलांच्या मृत्यूच्या अर्थाचा शोध घेतला जातो. वडिलांच्या वस्तूंमध्ये सापडलेली एक किल्ली Oskar ला शोधयात्रेवर घेऊन जाते. मुलाच्या वैयक्तिक दु:खातून राष्ट्रीय शोकांतिकेकडे पाहण्याचा प्रयत्न परिणामकारक आहे. या कादंबरीचे महत्त्व आज आणखी एका कारणाने वाढते. ९/११च्या वेळी लहान असलेली पिढी आता प्रौढ झाली आहे. ही कादंबरी आपल्याला स्मृती ही केवळ भूतकाळाची गोष्ट नसून पुढील पिढ्यांच्या भावनिक जगाचीही निर्मिती करते, हे जाणवून देते.
या वर्गातील साहित्याच्या पुढील महत्त्वाच्या टप्प्यात ‘परकेपणा’ हा प्रश्न समोर येतो. हल्ल्यानंतर मुस्लीम, अरब आणि दक्षिण आशियाई समुदायांकडे पाहण्याची सामाजिक दृष्टी अनेक ठिकाणी बदलली. दहशतवादा-विरुद्धची लढाई आणि विशिष्ट धर्म किंवा समुदायाविषयीचा संशय यांच्यातील सीमारेषा धूसर होण्याचा धोका निर्माण झाला. साहित्याने या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहिले. ‘दहशतवादी’ ही ओळख कोण ठरवते? धर्माच्या आधारावर एखाद्याला संशयित ठरवता येते का? राष्ट्रीय सुरक्षा व वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संतुलन कसे साधावे? या प्रश्नांना ९/११नंतरच्या कादंबर्यांनी मध्यवर्ती स्थान दिले.
मोहसिन हमिद यांची ‘द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट’ (२००७) यासाठी विशेष उल्लेखनीय आहे. चंगेज हा पाकिस्तानातून अमेरिकेत आलेला तरुण आहे. अमेरिकन शिक्षण, कॉर्पोरेट संस्कृती आणि वैयक्तिक यशाचा अनुभव घेत असताना ९/११नंतर अमेरिकेकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो. ही कादंबरी ‘अमेरिका विरुद्ध मुस्लीम जग’ अशा सोप्या द्वंद्वात अडकत नाही. ती विचारते- एका व्यक्तीची राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख जागतिक राजकारणामुळे कशी बदलते? चंगेजच्या मनातील अस्वस्थता एका व्यक्तीची कथा असली तरी ती असंख्य लोकांच्या ओळखीच्या संकटाचे रूपक बनते.
John Updike यांची टेररिस्ट (२००६) आणि Amy Waldman यांची ‘द सबमिशन’ (२०११) याही महत्त्वाच्या आहेत. विशेषत: ‘द सबमिशन’मध्ये ९/११ स्मारकाची रचना आणि त्या स्मारकाभोवती निर्माण होणारा सामाजिक-राजकीय संघर्ष यांमधून स्मृतीच्या राजकारणाचा प्रश्न उभा राहतो. राष्ट्रीय दु:खावर कोणाचा अधिकार असणार? बहुसांस्कृतिक समाजात स्मारक कोणाचे प्रतिनिधित्व करणार? या प्रश्नांमुळे ९/११ साहित्य एका दहशतवादी हल्ल्याच्या पलीकडे जाऊन लोकशाही, विविधता आणि सार्वजनिक स्मृती यांचा विचार करू लागते. यातून एक बदल दिसतो. सुरुवातीला प्रश्न होता- ‘आपल्यावर हा हल्ला का झाला?’ पुढे तो बदलला- ‘या हल्ल्यानंतर आपण काय केले?’ आणि आज, २५ वर्षांनी प्रश्न आणखी व्यापक झाला आहे- ‘त्या प्रतिसादाने आपले जग कसे बदलले?’
या बदलाचा विचार करताना ९/११ आणि आजच्या डिजिटल जगातील संबंधही महत्त्वाचा आहे. २००१मध्ये इंटरनेट प्राथमिक अवस्थेत होते. आज प्रत्येक मोठी हिंसक घटना काही क्षणांत लाखो लोकांपर्यंत पोहोचते. अशा जगात सत्य, स्मृती आणि कल्पित यांच्यातील सीमारेषा अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. ९/११ साहित्य आपल्याला महत्त्वाची शिकवण देते- दृश्य पाहणे म्हणजे अनुभव समजणे नव्हे. त्यामुळे ९/११ साहित्याचा अभ्यास हिंसेकडे केवळ दृश्य म्हणून नव्हे, तर मानवी अनुभव म्हणून पाहण्याची क्षमता देतो.
या संदर्भात भारताचा अनुभवही विचारात घेता येतो. ९/११नंतरच्या साहित्याचा अभ्यास करताना भारतीय वाचकाला मुंबईवरील २६/११चा अनुभव सहज आठवतो. राजकीय संदर्भ आणि ऐतिहासिक परिस्थिती वेगवेगळी; मात्र दहशतवादानंतर शहराच्या सामूहिक स्मृतीत निर्माण होणारी भीती, माध्यमांद्वारे हिंसेचे थेट दर्शन, मृतांचे स्मरण, सुरक्षा आणि संशय यांसारखे मानवी अनुभव तुलनात्मक साहित्य अभ्यासासाठी महत्त्वाचे ठरतात. ९/११ साहित्याचा भारतीय संदर्भातील अभ्यास म्हणूनच केवळ अमेरिकी साहित्याचा अभ्यास राहत नाही; तो आधुनिक भारतीय समाजातील दहशतवाद, स्मृती आणि असुरक्षिततेचे आकलन करण्याचीही एक पद्धत ठरू शकतो.
हे साहित्य स्मृतींच्या राजकारणाबद्दलही सावध करते. स्मरण आवश्यक आहे; परंतु स्मरणाचा वापर द्वेष निर्माण करण्यासाठी होऊ शकतो. इतिहास विसरणे धोकादायक आहे; परंतु इतिहासाचा एकतर्फी वापरही तितकाच धोकादायक आहे. म्हणून साहित्य स्मृतीला प्रश्न विचारते. कोणाचे दु:ख आठवले जाते? कोणाचे दु:ख विसरले जाते? कोणाचे नाव स्मारकावर लिहिले जाते? आणि कोणाचे जीवन इतिहासाच्या तळटीपेतही येत नाही?
९/११ साहित्याचा आजच्या काळातील आणखी एक महत्त्वाचा धडा म्हणजे सहानुभूतीचे राजकारण. Martí n Espada यांनी एका लेखात Wilfred Owen चा संदर्भ देताना दु:खाच्या कवितेचे उद्दिष्ट केवळ सांत्वन नसून मानवी समुदायाशी जोडणे आहे, असा विचार मांडला आहे. त्याच लेखात त्यांनी t Whitmanच्या ‘साँग ऑफ मायसेल्फ’ मधील ‘हूएव्हर वॉक्स अ फरलाँग विदाउट सिम्पथी’ या ओळीचा संदर्भ घेतला आहे. ध्रुवीकरणाच्या जगात साहित्याचे महत्त्वाचे कार्य म्हणजे दुसर्याच्या दु:खाची कल्पना करण्याची क्षमता जिवंत ठेवणे.
आज ९/११च्या हल्ल्याकडे केवळ इतिहास म्हणून पाहणे पुरेसे नाही. इतिहासाची स्मृती बदलते. प्रत्यक्ष अनुभव घेतलेली पिढी हळूहळू मागे जाते आणि नवीन पिढीला पुस्तकांमधून, चित्रफितींमधून आणि डिजिटल माध्यमांतून माहिती मिळते. अशा वेळी साहित्याची भूमिका महत्त्वाची होते. कारण साहित्य घटना ‘काय होती’ एवढे सांगत नाही; ते घटना ‘कशी वाटली’ हे सांगते. मोठ्या शोकांतिकेनंतर समाजाला एकच अधिकृत कथा सांगण्याचा मोह होतो. साहित्य मात्र त्या कथेबाहेर राहिलेल्या आवाजांना जागा देते. साहित्य स्मृतीचे लोकशाहीकरण करते. इतिहासाची एक आवृत्ती असू शकते; साहित्य अनेक अनुभवांना सहअस्तित्वाची जागा देते.
या साहित्याचे आजचे महत्त्व म्हणूनच नैतिकही आहे. दहशतवादाचा निषेध करणे जितके आवश्यक आहे, तितकेच दहशतवादाच्या नावाखाली निर्माण होणार्या सामूहिक द्वेषाला विरोध करणेही आवश्यक आहे. राष्ट्रीय सुरक्षा महत्त्वाची आहे; परंतु तिच्या नावाखाली मानवी स्वातंत्र्य आणि विविधतेचे नुकसान होऊ नये. राष्ट्रप्रेम महत्त्वाचे आहे; पण ते इतरांचे माणूसपण नाकारण्याइतके आंधळे होऊ नये.
हे साहित्य आपल्याला एका सत्याकडे घेऊन जाते- दहशतवाद माणसाला ‘लक्ष्य’ करतो; साहित्य त्याला पुन्हा ‘माणूस’ बनवते. साहित्य सीमारेषेवर उभे राहून विचारते- ‘तो’ही शेवटी आपल्यासारखाच दु:ख अनुभवणारा मनुष्य नाही का? म्हणूनच ९/११ साहित्याचा आजचा अर्थ २००१पेक्षा वेगळा आहे. २००१मध्ये ते शोकाची भाषा होते. पुढील दशकात ते आघात आणि स्मृतींची भाषा झाले. त्यानंतर ते युद्ध, स्थलांतर, धार्मिक ओळख, राष्ट्रवाद आणि जागतिक राजकारणावर प्रश्न विचारू लागले. आणि आज ते मानवी सहानुभूती, बहुसांस्कृतिकता, डिजिटल स्मृती आणि हिंसेच्या जागतिक राजकारणाचा पुनर्विचार करण्याचे माध्यम ठरले आहे.
९/११च्या राखेवर काळाचे अनेक थर जमा झाले आहेत. परंतु साहित्य त्यात अजूनही मानवी पावलांचे ठसे शोधत आहे. ट्विन टॉवर्स आता उभे नाहीत; पण त्यांची प्रतिमा साहित्याच्या पानांवर, कवितांच्या ओळींमध्ये आणि जगाच्या सामूहिक स्मृतीत जिवंत आहे. आणि त्या स्मृतींचा सर्वांत मोठा धडा कदाचित हाच- विध्वंसाची स्मृती अधिक हिंसक होण्यासाठी नव्हे, तर अधिक मानवी होण्यासाठी जपली पाहिजे.
साहित्य वर्तमानाचा आरसा आहे. ते विचारते, आपण इतिहासातून नेमके काय शिकलो? या प्रश्नाचे उत्तर कदाचित कोणत्याही राजकीय घोषणेत नाही. ते साहित्याच्या शांत, पण खोल आवाजात आहे. Martí n Espada च्या Alabanza मधील शेवटच्या संवादाप्रमाणे- संगीत नसेल तर ते निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे. कारण हिंसेच्या जगात माणूसपणाची भाषा टिकवून ठेवणे हीच साहित्याची सर्वांत मोठी सामाजिक जबाबदारी आहे.
kamblesp13@gmail.com
