पुसा बासमती-१’ ही तांदळाची जात बहुतेकांना माहीत असते. मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त अशी सुधारित सांबा मसुरी हा तांदळाचा वाण उपलब्ध आहे, हेही काही जणांना माहीत असेल… पण या दोन्ही वाणांचे उत्पादन ज्या डॉ. इब्राहीमअली अबूबकर (ई.ए.) सिद्दीक यांच्या संशोधनामुळे साध्य झाले, त्यांचे नाव आणि कर्तृत्व मात्र फार कमी जणांना ठाऊक असते. भारतमातेच्या या सुपुत्राचे निधन २२ जानेवारी रोजी झाले.

कृषी संशोधनासाठी त्यांना पद्माश्री (२०११) आणि नॉर्मन बोरलॉग पुरस्कार (१९९५) यांसह अनेक पुरस्कार मिळाले होते. ते मूळचे तमिळनाडूचे. तिरुचिरापल्लीतून वनस्पतिशास्त्राची पदवी घेऊन दिल्लीतील राष्ट्रीय कृषी संशोधन संस्था अर्थात पुसा इन्स्टिट्यूटमध्ये १९६४ साली पुढील शिक्षणासाठी आले. इथेच भारतरत्न कृषिज्ञ एम. एस स्वामिनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पेशीजननशास्त्राचा ( सायटोजेनेटिक्स) अभ्यास करून पीएच.डी. मिळवली.

पुढे हरित क्रांती घडवण्यात त्यांचाही वाटा होताच पण पुसा बासमती हा आखूड रोपाचा वाण तयार होण्याचे श्रेय त्यांना मिळण्यासाठी १९८९ उजाडले. मधल्या काळात फिलिपाइन्सची आंतरराष्ट्रीय तांदूळ संस्था आणि हैदराबादच्या संस्थेत त्यांनी अनेक तरुण कृषी संशोधक घडवले. ‘पुसा बासमती’च्याच अन्य सुधारित वाणांच्या संशोधनाचे ते मार्गदर्शक ठरले. या कामाचे कौतुक खुद्द स्वामिनाथन यांनीही केले होते- ‘भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात बासमतीसह अन्य सुधारित वाण रुजवून तेथील तांदूळ उत्पादन वाढवण्याचे श्रेय सिद्दीक यांचे’ असे ते म्हणाले होते.

पण सिद्दीक यांचे कार्य अर्थातच व्यापक होते. त्यांनी संशोधित केलेले वाण इजिप्तमध्येही लाभदायक ठरल्याने त्या देशाचा सर्वोच्च कृषी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तांदळाचे रोप उंच असल्यास तग धरण्याची त्याची क्षमता कमी असते आणि विशेषत: बंगालच्या उपसागरालगतच्या राज्यांना वादळवाऱ्यांचा फटका १९७० च्या दशकातही वेळीअवेळी बसत असे. आखूड उंचीचे वाण संकरित करून या संकटावर सिद्दीक यांनी मात केली. दिल्लीच्या कृषी संशोधन संस्थेचे उप महासंचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते हैदराबादेत राहू लागले.

‘राइस रीसर्च इंडिया’ या उपक्रमाचे प्रमुख म्हणून् २००० ते २००५ पर्यंत ते कार्यरत होते, शिवाय कृषी विषयाचे ‘राष्ट्रीय प्राध्यापक’ ही जबाबदारी त्यानंतरही त्यांच्याकडे होती. सरकारदरबारी समित्यांवर वर्णी लावून घेण्यापेक्षा कृषी संशोधनाच्या क्षेत्रातच डॉ. सिद्दीक नेहमी अधिक रमत. सिद्दीक यांच्या पत्नी फातिमुथु या लेखिका. या दाम्पत्याने स्वकमाईतून विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती न्यास स्थापतानाच, ‘कोणत्याही जातीच्या, धर्माच्या गरजू व हुषार विद्यार्थ्यांसाठी’ हे ध्येय ठेवले. त्यांचे पुत्र आणि आता फिलिपाइन्सच्या आंतराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेत उच्चपदी असलेले डॉ. जौहर अली यांनी त्यापुढले पाऊल उचलून, हैदरबादच्या कृषी विद्यापीठातील उत्कृष्ट संशोधकासाठी दर दोन वर्षांनी ५० हजार रुपये रोख व मानपत्र अशा स्वरूपाचा ‘डॉ. ई. ए. सिद्दीक संशोधन पुरस्कार’ काही वर्षांपूर्वीच सुरू केला.