डॉ. सागर कारखानीस ,साहाय्यक प्राध्यापक, इतिहास विभाग, रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, मुंबई
इतिहासलेखनात अनेकदा मोठ्या घटना आणि प्रसिद्ध व्यक्तींनाच केंद्रस्थानी ठेवून मांडणी केली जाते; परंतु समाजाचं खरं भावविश्व ज्या सामान्यांच्या आयुष्यात दडलेलं असतं, त्यांची नोंद क्वचितच घेतली जाते. घर-संसारासाठी संपूर्ण आयुष्य वेचणार्या असंख्य ्त्रिरया इतिहासाच्या परिघावरच राहून जातात. ‘अ वुमन ऑफ नो कॉन्सिक्वेन्स: मेमरी, लेटर्स अँड रेसिस्टन्स इन मद्रास’ हे पुस्तक अशाच एका ‘सामान्य’ स्त्रीचं ‘असामान्य’ आयुष्य संवेदनशीलपणे आपल्यासमोर उभं करतं.
ही कथा आहे एका तमिळ ब्राह्मण स्त्रीच्या- पंकजम (इ.स. १९११- २००७) यांच्या जीवनप्रवासाची. वसाहतकालीन आणि उत्तर-वसाहतकालीन मद्रासच्या पार्श्वभूमीवर उलगडणार्या या कथनातून विसाव्या शतकातील स्त्रीजीवन, घरगुती वास्तव, बौद्धिक आकांक्षा आणि पितृसत्ताक व्यवस्थेविरुद्धचा तिचा मूक संघर्ष समोर येतो. पंकजम यांनी इ.स. १९४९ मध्ये लिहिण्यास सुरुवात केलेलं आत्मचरित्र इ.स. १९९५ पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण केलं आणि तेच या पुस्तकाचा मुख्य आधार आहे. त्यांची पत्रं, कविता, तमिळ व इंग्रजी कथा, प्रवासवर्णनं यांच्या साहाय्याने कल्पना करुणाकरन यांनी आपल्या आजीचा जीवनप्रवास उलगडला आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ स्मरणरंजन किंवा चरित्र न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि स्त्रीवादी अभ्यासाचा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरतं. पंकजम स्वत:ला वारंवार ‘महत्त्वहीन स्त्री’ वा ‘साधारण मध्यमवर्गीय गृहिणी’ म्हणून संबोधतात; मात्र त्यांचं व्यक्तिमत्त्व या चौकटीत कधीच मर्यादित राहत नाही. उलट पुरुषप्रधान संस्कृतीत दुर्लक्षित राहिलेल्या स्त्रीच्या ‘दैनंदिन’ आयुष्याला हे पुस्तक गंभीरतेने समोर आणतं. पारंपरिक इतिहासलेखनाला करुणाकरन यांचं लेखन छेद देतं. विवाहसंस्थेतली बंधनं, अस्वस्थता, भावनिक ताण, स्त्रीच्या मनातले अव्यक्त प्रश्न आणि स्वत:च्या अस्तित्वाचा शोध या सर्व गोष्टी पुस्तकातून प्रभावीपणे पुढे येतात. शिक्षणाची ओढ असूनही शिक्षण अपूर्ण राहणं, बुद्धिमत्तेला योग्य व्यासपीठ न मिळणं आणि संसाराच्या जबाबदार्यांमध्ये स्वत:ला हरवून बसणं- या अनुभवांतून पितृसत्ताक व्यवस्थेतली अदृश्य बंधनं स्पष्टपणे दिसून येतात. स्वत:ला ‘महत्त्वहीन’ मानणार्या स्त्रीचं आयुष्य इतक्या गंभीर आणि ऐतिहासिक स्वरूपात समोर येणं, हाच या शीर्षकातला खरा उपरोध आहे.
या संघर्षात आक्रोश किंवा नाट्यमय बंड नाही; तरीही वाचन, लेखन, प्रवास, स्वत:चं बौद्धिक विश्व निर्माण करण्याची धडपड आणि मुलांचं संगोपन यांच्याद्वारे पंकजम पितृसत्ताक व्यवस्थेला शांत पण ठामपणे आव्हान देतात. शिक्षणाची जिद्द आणि मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो. यातूनच दैनंदिन जीवनातला त्यांचा मूक प्रतिकार स्पष्ट होतो.
या दृष्टिकोनातून Knowledge made me a woman हे विधान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. स्त्रीत्वाची जाणीव येथे ऋतूप्राप्ती किंवा सामाजिक चौकटीशी संबंधित न राहता ज्ञानाशी जोडलेली आहे. जेन ऑस्टेन, शार्लट ब्राँटे, जॉर्ज इलियट आणि लिओ टॉलस्टॉय यांच्या लेखनाबरोबरच विज्ञान, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, इतिहास, खगोलशास्त्र या क्षेत्रांतील पंकजम यांचा वाचनप्रवास उल्लेखनीय आहे. त्यांच्या टिपणवह्यांमध्ये वर्नर हायझेनबर्ग, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, सिग्मंड फ्रॉईड, कार्ल युंग, जेराल्ड हर्ड या विचारवंतांवरील सखोल नोंदी आढळतात. स्वत: पंकजम म्हणतात: I have never been inside the portals of a college… But the daring spirit in me says I should write about what I have gleaned from books.पंकजम यांचे विचार केवळ वैयक्तिक किंवा घरगुती अनुभवांपुरते मर्यादित नाहीत; त्या बदलत्या समाजातील ्त्रिरयांच्या स्थानाकडेही जागरूकपणे पाहतात. सिंगापूरमध्ये केलेल्या एका भाषणात त्या नमूद करतात की, पूर्वी मुलींना शिक्षण मुख्यत: विवाहासाठी दिलं जात असे; मात्र आता ्त्रिरया आर्थिक स्वावलंबनासाठी शिकू लागल्या आहेत. या बदलामुळे ्त्रिरयांमध्ये ‘आत्मविश्वास, धैर्य आणि स्वतंत्र विचारशक्ती’ निर्माण होत असल्याचंही त्या अधोरेखित करतात. विशेष म्हणजे, पंकजम स्त्रीशिक्षणाकडे केवळ ‘चांगली आई’ घडवण्याचं साधन म्हणून पाहत नाहीत; ते स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या विकासाशी जोडतात. स्वत:च्या आयुष्यात अनेक मर्यादा अनुभवूनही त्या नव्या पिढीतील ्त्रिरयांच्या प्रगतीकडे अभिमानाने पाहतात.
पुस्तकातलं मातृत्वाचं चित्रणही तितकंच महत्त्वपूर्ण आहे. पंकजम मातृत्वाकडे केवळ भावनिक दृष्टिकोनातून पाहत नाहीत; तर एक जबाबदार आई आणि सजग भारतीय स्त्री या दोन्ही भूमिका त्या पार पाडतात. स्वदेशी चळवळीच्या पार्श्वभूमीवर त्या आपल्या मुलाला तमिळ माध्यमाच्या शाळेत पाठवतात. सी. राजगोपालाचारी यांनी विदेशी ओव्हल्टीन ऐवजी रागी माल्ट वापरण्याचं आवाहन केल्यानंतर पंकजम तत्काळ त्याचा स्वीकार करतात. घरात संवाद आणि जिज्ञासेला प्रोत्साहन देणारं वातावरण निर्माण करून त्या मुलांमध्ये स्वतंत्र विचारशक्ती विकसित करतात. त्यांच्या मुलांनी त्यांना ‘अम्मा कॉलेज’, ‘शिक्षक, मार्गदर्शक, सवंगडी, आई आणि सर्व काही’ असं संबोधलं आहे. त्यामुळे मातृत्व हे इथे बौद्धिक आणि भावनिक घडणीचे केंद्र ठरतं.
या पुस्तकाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तीन पिढ्यांतील ्त्रिरयांचा प्रवास- पंकजमची आई सुब्बलक्ष्मी, स्वत: पंकजम आणि त्यांची मुलगी मिथिली शिवरामन. सुब्बलक्ष्मी यांचं जीवन परंपरागत चौकटीत घडलेलं दिसतं; पंकजम त्या चौकटीत स्वत:साठी बौद्धिक अवकाश निर्माण करतात; तर मिथिली पुढे डाव्या आणि स्त्रीवादी चळवळींमध्ये सक्रिय भूमिका बजावते. या तिन्ही पिढ्यांच्या अनुभवांतून भारतीय स्त्रीच्या बदलत्या सामाजिक आणि वैचारिक प्रवासाचं व्यापक चित्र उभं राहतं. या प्रवासाचा अर्थ स्पष्ट करताना कल्पना करुणाकरन म्हणतात, ‘परिस्थितीसमोर हार न मानता, त्यापलीकडे जाऊन अधिक चांगलं जगण्याचा आणि स्वत:ला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार्या मानवी जिद्दीची ही गोष्ट आहे.’ पंकजम यांचं साहित्य, विज्ञान, प्रवास आणि निसर्गाशी असलेलं नातं त्यांच्या मानसिक जगाचा महत्त्वाचा भाग आहे. अमेरिकेतील प्रवासानंतर मिळालेला अल्पकालीन स्वातंत्र्याचा अनुभव आणि नंतर पुन्हा जुन्या चौकटीत परतणं हा अनुभव त्यांची घुसमट अधिक तीव्र करतो.
साधी, सोपी आणि ओघवती भाषा हे या पुस्तकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. नाट्यमयता किंवा कृत्रिम भावनिकतेचा अभाव असूनही घटनांचा प्रभाव ठळकपणे जाणवतो. शांत शैलीतून स्त्रीमनाचे सूक्ष्म स्तर उलगडत जातात. वाचक पंकजम यांना केवळ व्यक्ती म्हणून न पाहता त्यांच्या काळातील प्रतिनिधी म्हणून पाहू लागतो. पुस्तकात अनेक तमिळ शब्द आणि वाक्प्रचार उदा. ‘कल्याण पडिप्पू’, ‘पगुथरिवु’ किंवा ‘मधियै कोंडु विधियै वेल्वथु’, त्यांच्या अर्थांसहित नमूद केले आहेत. हे शब्द केवळ भाषिक वैशिष्ट्य म्हणून न येता सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात येतात. त्याद्वारे तमिळ संस्कृती आणि परंपराही समजून घेता येतात.
एकूणच, हे पुस्तक स्त्रीवादी, समाजशास्त्रीय आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. ते केवळ एका व्यक्तीचं जीवनचरित्र नसून, स्त्री, कुटुंब, समाज आणि सत्ता यांच्या गुंतागुंतीचं विश्लेषण आहे. ‘द पर्सनल इज पोलिटिकल’ या स्त्रीवादी तत्त्वाची जाणीव हे पुस्तक प्रभावीपणे करून देते. इतिहासाच्या व्यापक पटावर दुर्लक्षित राहिलेल्या स्त्रीजीवनाला हे कथन केंद्रस्थानी आणतं. तसंच ब्रिटिशकालीन मद्रास, दुसरं महायुद्ध, जपानी बॉम्बहल्ले, स्वातंत्र्यलढा आणि बदलती शहरी संस्कृती याबद्दलचे प्रासंगिक स्वरूपात येणारे संदर्भ विसाव्या शतकातले सामाजिक आणि ऐतिहासिक बदल समजून घेण्यासाठी मदत करतात. याहीपलीकडे जाऊन हे पुस्तक वाचकाला अंतर्मुख करतं. केवळ पंकजमकडे नव्हे, तर आपल्या आजूबाजूच्या स्त्रीअनुभवांकडेही संवेदनशीलतेने पाहण्याची दृष्टी ते निर्माण करतं. आजी, आई, बहीण किंवा मुलगी या नात्यांतलं स्त्रीजीवन अधिक
जाणिवेने समजून घेण्याची प्रक्रिया वाचकाच्या मनात सुरू होते. त्यामुळे पंकजम यांचा जीवनप्रवास व्यापक सामाजिक अर्थाने अत्यंत ‘महत्त्वपूर्ण’ ठरतो.
अ वुमन ऑफ नो कॉन्सिक्वेन्स:
मेमरी, लेटर्स अँड रेसिस्टन्स इन मद्रास
लेखक : कल्पना करुणाकरन
प्रकाशक : कॉन्टेक्स्ट
पृष्ठसंख्या : ३२८ किंमत : ५९९ रु.
karkhanissagar@yahoo.in
