उत्तम आरोग्य रातोरात साध्य होत नाही. एखादे ‘फॅड डाएट’ केले, ‘सुपरफूड खाल्ले’ वा ‘प्रोटीन शेक’चे ग्लास रिते केले आणि काम झाले, असे काही होत नाही. हे ‘मिन्टो में’ धाटणीचे उपाय केवळ मिनिटभरच प्रभावी ठरतात. दीर्घकाळ ठणठणीत राहायचं असेल, तर आरोग्याचे भान हा दिनचर्येचा भाग व्हावा लागतो. आजच्या- समाजमाध्यम प्रभावकांकडून आरोग्याचे धडे गिरवण्याच्या- काळात डॉ. फराह मुकादम यांचे ‘द प्राकृतिक डाएट- ट्रॅडिशनल विस्डम फॉर अ बायोबॅलन्स्ड लाइफ’ हे पुस्तक सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व सांगते.

जुने ते सोने आहेच, पण त्याची नव्या प्रश्नांशी आणि आधुनिक शोधांशी सांगड घालणेही महत्त्वाचे आहे, असा समतोल दृष्टिकोन डॉ. फराह यांनी स्वीकारला आहे. त्या मूळच्या ॲलोपॅथिक डॉक्टर, पण या पुस्तकात त्यांनी आयुर्वेदाच्या काही तत्त्वांचेही विश्लेषण केले आहे. अलीकडे खाणे हा गुन्हाच मानण्याची किंवा अन्नपदार्थांना त्यांच्या नावांऐवजी ‘प्रोटीन्स’, ‘कार्ब्ज’, ‘फायबर’, ‘व्हायटॅमिन्स’ वगैरे नावांनी संबोधत जेवण्याची प्रथा रुळताना दिसते. डॉ. फराह केवळ कमी खाणे किंवा काही विशिष्ट घटकांवर कायमची फुली मारण्याऐवजी समतोल आहारावर भर देतात. कोणत्या ऋतूत काय खावे, वात-पित्त-कफ अशा विभिन्न प्रवृत्तींच्या व्यक्तींना कोणते आजार होण्याची शक्यता अधिक असते आणि आहारात केवळ काही तात्पुरते बदल करून त्यांच्यापासून कसे दूर राहता येऊ शकते, याची माहिती हे पुस्तक देते. शरीरातील विविध संप्रेरकांच्या असमतोलामुळे उद्भवणारे आजार आहार-व्यायाम-झोपेची सांगड घालून कसे टाळता येऊ शकतात, याचे मार्गदर्शन पुस्तकात करण्यात आले आहे.

अलीकडे जगभर काही आरोग्यविषयक समस्यांनी गंभीर रूप धारण केले आहे. त्यात प्रमुख असलेल्या स्थूलता, मधुमेह आणि हृदयरोग या समस्या कशा परस्परावलंबी आहेत याचे गणित डॉ. फराह सोपे करून वाचकांसमोर मांडतात. तेलाने कोलेस्टेरॉल वाढते म्हणून भाज्या उकडून कशाबशा घशाखाली ढकलणार्‍यांनी नक्की वाचावे असे एक प्रकरण या पुस्तकात आहे. आपल्या पूर्वजांच्या आहारात जे तेल होते, तेच योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने आपल्याही आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला त्या देतात. त्याच वेळी पूर्वज नेमके काय खात होते याविषयी गोंधळलेल्या आणि दर महिन्याला
नवनवीन ब्रँडचे व तेलबियांचे तेल मागवणार्‍या पिढीला त्या कोणत्या पदार्थात आणि कोणत्या ऋतूत कोणते तेल वापरावे, याची माहिती देतात.

‘माझी थायरॉइड ग्रंथी कधीच नीट काम का करत नाही?’ या प्रश्नाचे नेमके उत्तर कोणतेच डॉक्टर का देऊ शकत नाहीत, अगदी त्यातल्या विशेषज्ञांनासुद्धा याचे निश्चित उत्तर का देता येत नाही आणि कितीही तपासण्या केल्या तरी शेवटी सर्वजण तुमची जीवनशैलीच फारशी चांगली नाही किंवा ही ‘ऑटोइम्युन’ समस्या आहे, इथपर्यंतच का पोहोचतात, याची कारणमीमांसा या पुस्तकात करण्यात आली आहे. मीठ आणि थायरॉइडचे नातेही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

फॅटी लिव्हर हीसुद्धा एक वेगाने वाढत चाललेली समस्या. ‘मी दारू पीत नाही, त्यामुळे मला फॅटी लिव्हरचा त्रास होऊच शकत नाही,’ असा अनेकांचा समज असतो. पण कधीही मद्यपान न करणार्‍यांनाही ही समस्या सतावू शकते आणि ती अनेकदा गरजेपेक्षा जास्त आहार घेणे आणि त्या आहारात भाज्या-फळे कमी असणे वा अजिबात नसणे यामुळे उद्भवलेली असू शकते, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.

पुस्तकाच्या अखेरीस लेखिका ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा’ या मूळ नियमापाशी पोहोचतात. औषधे लक्षणांवर उपचार करू शकतात, ती समस्या निर्माण झाल्यानंतर घ्यायची असतात. पण योग्य आहार मुळातच विविध व्याधींपासून दूर ठेवू शकतो. औषधे घेण्याची वेळ शक्यतो येऊच नये, असे वाटत असेल, तर त्याची सुरुवात या क्षणापासून केली पाहिजे. आरोग्याची आराधना रोज करावी लागते, ते एका दिवसात प्रसन्न होत नाही, या तशा सर्वांनाच माहीत असलेल्या पण वेगवान जीवनशैलीत कुठेतरी हरवलेल्या मुद्द्याचे स्मरण हे पुस्तक करून देते. आरोग्य हा ‘क्रॅश कोर्स’ नाही, याचे भान देते.