अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनोबांचा, दर्शनांच्याप्रमाणे साहित्याच्या क्षेत्रातही मोठा अधिकार होता. संपूर्ण छंदशास्त्र त्यांनी गीताईमध्ये किती बेमालूमपणे वापरले आहे हे शिवाजीराव भावे यांच्या ‘गीताई छंदोमंजरी’ या पुस्तकातून जाणवते.

कृष्णाने मी छंदांमध्ये गायत्री आहे, असे म्हटले आहे. गायत्रीला ‘त्रिपदा गायत्री’ असेही म्हणतात. त्रिपदा म्हणजे तीन चरण असणारा छंद. परंपरेत गायत्री मंत्राचा मोठा दबदबा आहे. त्याचे उच्चारण करण्याचा अधिकार सर्वाना नव्हता. ॐकाराच्या तोडीचा हा मंत्र विनोबांनी अनुवादला आणि सर्वासाठी खुला केला. उपनिषदांच्या अभ्यासामुळे त्यांचे ॐकारावरील चिंतनही उपलब्ध आहे. विनोबांनी ॐकाराचे एक रेखाचित्र काढले होते. तेही उपलब्ध आहे. सत्य, प्रेम, करुणा आणि चंद्रिबदीमध्ये ब्रह्म असे त्यांचे ॐकाराचे चित्र आहे. हे चित्र म्हणजे साम्ययोग.

ॐची परंपरा त्यांनी क्रांतीच्या व्यक्तिगत, सामूहिक आणि सामाजिक अशा तीन टप्प्यांत सांगितल्याचे आढळते. विविध प्रयोगांच्या माध्यमातून ही क्रांती साकारेल अशी त्यांची कल्पना होती. त्यांच्या मोक्षसाधनेला सामाजिक संदर्भ होता. या साधनेचे तीन टप्पे असल्याने तिला ‘सामाजिक मोक्षाची त्रिपदा’ म्हणता येईल. विनोबांचे हे चिंतन भूदान यज्ञाच्या पहिल्याच पडावात समोर आले. सर्वोदय समाजाची स्थापना, नियोजन मंडळाची बैठक, आदी उपक्रमांच्या निमित्ताने विनोबा पायी प्रवास करत होते. पैसा नावाच्या अंधश्रद्धेतून समाजाने मुक्त व्हावे आणि शेतीसाठी आपली संपूर्ण शक्ती वेचावी ही त्यांची इच्छा होती. ऋषी शेती आणि कांचनमुक्ती हे दोन प्रयोग आहेत आणि ज्यांना त्याविषयी आत्मीयता आहे त्यांनी ते अमलात आणावेत ही त्यांची कल्पना होती.

या सुमारास तालिमी संघाचे एक अधिवेशन होते आणि त्याला जोडून सर्व सेवा संघाची एक बैठकही झाली. त्या बैठकीत सर्वोदय समाजाचे पुढील अधिवेशन शिवरामपल्ली येथे घेण्याचे निश्चित झाले. या अधिवेशनाला विनोबांनी उपस्थित राहावे आणि मार्गदर्शन करावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. तथापि विनोबांनी ती अमान्य केली. तुम्ही येणार नसाल तर यापुढे अधिवेशन होणार नाही अशी निर्वाणीची भूमिका घेतल्यावर विनोबा अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी तयार झाले. आपण अधिवेशनाला पदयात्रा करत येऊ अशी अट घालायला ते विसरले नाहीत. वित्तछेदाचे अनेक पैलू त्यांना दिसत होते आणि त्यांचे दर्शन जनतेला घडवावे ही त्यांची इच्छा होती. जनतेची परिस्थिती जाणून घ्यावी या हेतूने पदयात्रेस आरंभ झाला. या पदयात्रेला एक वैचारिक अधिष्ठान होते. ज्ञानप्राप्तीसाठी चालण्याला पर्याय नाही असे ते म्हणत. आपण आचार, विचार, संचार आदी शब्द वापरतो. यात ‘चर’ धातू आहे आणि चरचा अर्थ चालणे असा आहे. चालल्याशिवाय ज्ञान पूर्ण होत नाही. एखादा विषय आपल्याला येत नसेल तर त्यात मला गती नाही असे चटकन म्हटले जाते. इतके चालण्याचे महत्त्व आहे.

भारतीय परंपरेत यात्रेला अपार महत्त्व आहे. पुण्यक्षेत्रांची यात्रा केली नाही तर भारतीय, जीवन अपूर्ण मानतात. राजारामशास्त्री भागवत म्हणत, ‘वारी हा महाराष्ट्राचा एकमेव सार्वजनिक उत्सव आहे आणि तो ज्ञानोबा-तुकोबांच्या भक्कम खांद्यांवर उभा आहे.’ भूदान पदयात्रेबद्दलही हेच म्हणावे लागेल. सर्वोदय विचार व गांधी-विनोबांचे खांदे यावर ही मोक्षाचे सामाजिक रूप उभे होते.

jayjagat24@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acharya vinoba bhave gita according to vinoba bhave gita influence in acharya vinoba s life zws
First published on: 31-10-2022 at 02:05 IST