वा आदितीताई वा! तुम्ही तर कमालच केली. थेट षटकारच! तसा तुमचा पक्ष हमखास निवडून येणार्या दिग्गजांचा. त्यातले सारेच राजकीय डावपेच खेळण्यात पटाईत. त्यापैकी एकालाही जे सुचले नाही ते तुम्हाला सुचले. दादांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, आता काकींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरी त्यांना निवडून द्या हे तुमचे प्रचार सभेतले वाक्य म्हणजे राजकीय परिपक्वतेचा उत्तम नमुनाच. आता काही विरोधक म्हणतील हे तर स्वप्नांचे हस्तांतरण; किंवा एकाचे अपूर्ण स्वप्न दुसर्याच्या गळी उतरवणे. म्हणू द्यात त्यांना. तुम्ही मात्र ही स्वप्नांची धरलेली वाट अजिबात सोडू नका. त्यातच तुमचे हित. सुनेत्राकाकी पोटनिवडणुकीत जिंकून आल्यावरही ठरावीक काळाने, तेही जाहीरपणे याची आठवण करून देत जा. या एकाच वाक्याने तुम्ही काकीच्या अंत:स्थ गोटातले स्वत:चे स्थान पक्के करून टाकले. शिवाय तुमच्या वडिलांविषयी मध्यंतरी जो नाहक संशय निर्माण झाला होता तोही दूर झाला. तिकडे शिंदेंच्या सेनेत आग लागली ती वेगळीच. अहो, ताई एका दगडात किती पक्षी माराल हो! ते शिंदे उगीच उठता बसता लाडकी बहीण करत असतात. ते खाते तुमच्या पक्षाकडे. निधी त्या खात्याचा. वितरण तुम्ही करता आणि श्रेय त्यांनी घ्यायचे हे योग्य नव्हतेच. महिलांच्या मदतीला महिलाच धावून येते हे साधे गणित त्यांना कळत नव्हते. आता तुम्ही बरोबर उतारा काढला. तसेही दोन्ही मित्रपक्षांत तुमचाच पक्ष भाजपच्या जवळचा. तो शिंदे सेनेसारखा त्रास देत नाही. त्यामुळे संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार देवाभाऊ दिल्लीत गेले की शिंदेऐवजी काकींचे स्थान पक्के. एकदा त्यांना बढती मिळाली की तुमचीही ठरलेली. राज्याच्या दुसर्या महिला उपमुख्यमंत्री! म्हणजे अजूनही थोरल्या साहेबांचे बोट धरून असलेल्या सुप्रियाताईंचा पुन्हा एकदा स्वप्नभंग.
ताई, तुमच्या राजकीय कौशल्याला भल्याभल्यांनीही दाद द्यायलाच हवी. काकींच्या मनातले स्वप्न उजागर करण्यात पहिला हक्क तुम्ही मिळवलाच पण या वक्तव्यातून राजकीय चातुर्य दाखवून तुम्ही तुमच्या वडिलांवरही मात केलीय. गेले काही दिवस ते संशयाच्या वादळात अडकले होते. त्यातून बाहेर पडताना त्यांची सतत चिडचिड होतेय हेही उभ्या राज्याने बघितले. त्या गोंदियावाल्या भाईंच्या नादाला लागल्यावर असेच होणार. मात्र तुम्ही त्यांना अलगदपणे त्यातून बाहेर काढले. शेवटी लेकच वडिलांच्या मदतीला धावून आली. आता एकच करा. काकींमध्ये मुख्यमंत्री होण्याची गुणवत्ता कशी आहे हे सतत जनतेच्या मनावर बिंबवत राहा. सोबतच मोठ्या भावाने मन मोठे करावे असा धोषाही सतत लावत राहा. मध्येमध्ये काकींच्या प्रशासकीय कौशल्याची उदाहरणे जनतेसमोर आणत राहा. अशा वक्तव्यांचा मारा सतत होत राहिला की अनुकूल वातावरण तयार होत जाते. त्याच्या पुढची पायरी म्हणजे कृती. ती केव्हा करायची हे तुम्हाला चांगले ठाऊक आहेच. आता शिल्लक उरतो तो एकच प्रश्न. तुमच्या या मोहिमेवर भाजपनेच डोळे वटारले तर काय? यामुळे गडबडून जाऊ नका. तुमचा पक्ष भाजपच चालवतो असा जो (अप) प्रचार चोहोबाजूंनी सुरू झालाय, त्यातून बाहेर पडण्यासाठी हा मुद्दा पुढे रेटणे हेच योग्य उत्तर. तेव्हा ताई लागा आता कामाला!
