जाहीरपणे, सार्वजनिकरीत्या इतिहासातल्या चुका कुणीतरी कबूल करतंय किंवा किमान तसा आग्रह धरतंय, हे अनुभवतानासुद्धा ‘सौंदर्या’ची जाणीव होऊ शकते…

रोड शो’ हा शब्द अजिबात प्रचलित नव्हता, तेव्हाचा तो काळ. दिनांक २३ जून १९४० रोजी हिटलर पॅरिसमध्ये आला. या कलासक्त शहरातली विजयकमान, आयफेल टॉवर आदी ठिकाणांना हिटलरनं भेटी दिल्या. त्या वेळच्या जर्मन ‘मीडिया’नं हिटलरच्या या भेटीची बातमी दिलीच, शिवाय ‘‘फ्रान्स ताब्यात आल्यानंतर हिटलर यांची ही पहिलीवहिली पॅरिस भेट’’ असल्याचंही नमूद केलं. ते खरंच होतं. १४ जून १९४० रोजी नाझींनी पॅरिसवर कब्जा केला. तो काळ पिकासो, मातीस अशा चित्रकारांना पॅरिसच आवडू लागलं होतं, तेव्हाचा. नाझी फौजा आल्या, तेव्हा पिकासोसकट अनेक चित्रकारांनी पॅरिसबाहेर तात्पुरती पांगापांग केली होती. हळूहळू एकेकजण शहरात परतले. कसेबसे तग धरून, चित्रं काढू लागले किंवा काहीजण पॅरिस सोडून अमेरिकेत जाण्याची संधी शोधू लागले. हिटलरला पिकोसाच्या ‘क्युबिझम’ शैलीसह सगळ्याच नव-कलेचा मनापासून तिरस्कार! खुद्द हिटलरही चित्रकार होता आणि शुंदलशुंदल छानछान निसर्गचित्रं काढायचा. त्यानं आधुनिक कलेला ‘डीजनरेट आर्ट’ अर्थात ‘कर्तव्यच्युत कला’ ठरवलं. हिटलर किंवा अनेकांच्या मते, कलेचं कर्तव्य फक्त आणि फक्त सौंदर्यनिर्मिती करणं!

हुकूमशाहीत ‘शीर्षस्थ नेत्या’च्या आवडीनिवडींना भारी महत्त्व असतं. नेता बांधेल ते तोरण आणि म्हणेल ते धोरण! म्हणून तर, नाझीकाळात जर्मनीतल्या कासेल या गावात ‘डीजनरेट आर्ट’ हे प्रदर्शन भरवून तिथली सारी चित्रं जाळून नष्ट करण्याचा घाट घातला गेला होता. हिटलरपर्यंत या चित्र-जाळपोळीची वार्ता पोहोचून बढतीसुद्धा मिळाली असेल एकदोघा नाझी अधिकाऱ्यांना. पण पुढे याच कासेल गावामध्ये त्या जळितकांडाचं जणू परिमार्जन म्हणून, १९५१ पासून ‘डॉक्युमेण्टा’ हे पंचवार्षिक कला-प्रदर्शन भरू लागलं. सामाजिक आणि राजकीय आशयाची नव-कला हे ‘डॉक्युमेण्टा’चं वैशिष्ट्य ठरलं, त्याचा पसाराही वाढला आणि या महाप्रदर्शनाला जगभरचे लोक हजेरी लावू लागले. ‘डॉक्युमेण्टा’च्या २०१७ सालच्या १४ व्या खेपेचा पसारा कासेल आणि ग्रीसची राजधानी अथेन्स इथंही होता. तिथं पाहिलेल्या दोन कलाकृती केवळ हिटलरबद्दल होत्या म्हणून नाही, तर ‘चुकांची कबुली हवी आहे’ हा आग्रह त्या कलाकृतींमधून दिसत होता म्हणून आठवाव्यात अशा! अर्थातच, तो आग्रह मांडण्याची दोन्ही कलाकृतींची पद्धत निरनिराळी होती.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : ‘काफला’ ते भस्म

एका कलाकृतीत फोटोच फोटो होते. या फोटोंची एकंदर संख्या २०३. प्रत्येक आडव्या ओळीत २९ फोटो. अशा सात ओळी. हे सारे हिटलरचे पाईक. कुणी ऑफिसर, कुणी साधे शिपाई, कुणी स्वयंस्फूर्तीनं राष्ट्रउभारणीसाठी लढणारे तरुण… ही सारी माणसं हिटलरचे हातपाय होती! या माणसांनाही बायकामुलं असतील, तरुणांना आईवडील असतील- कदाचित प्रेयसीही… पण या २०३ जणांसह आणखी हजारो छोटेमोठे सेवक हे नाझी यंत्रणेच्या अजस्रा, संहारक बुलडोझरचे सुटे भाग होते. ज्या द्वेषाचा, ज्या तिरस्काराचा फैलाव हिटलरला हवा होता तो द्वेष आपण मान्य करतो आहोत, याची जाणीव यातल्या काहींना नक्की असेल, काहींना नसेल…

उदाहरणार्थ जोसेफ बॉइस.

होय तोच तो. याच कासेल शहरात ‘७००० ओक-वृक्ष’ ही ‘कलाकृती’ साकारणारा! अगदी पोरसवदा असताना बॉइस हिटलरी बाण्यानं प्रभावित झाला होता म्हणतात. पुढल्या काळात बॉइसनं ‘टेलिंग स्टोरीज टु डेड हेअर’ (मेलेल्या सशाला गोष्टी सांगणे) किंवा ‘आय लव्ह अमेरिका अॅण्ड अमेरिका लव्ह्ज मी’ (कोयोटे जातीच्या लांडगासदृश हिंसक प्राण्यासह फक्त घोंगडं आणि काठी घेऊन, सात दिवस एका खोलीत राहणे) अशा प्रकारच्या कित्येक कलाकृतींमधून कदाचित स्वत:च्याच हिंसक प्रवृत्तींचं दमन केलं असेल. पण जोसेफ बॉइसनं स्वत: कधीही, नाझींकडे आकृष्ट झाल्याची कबुली दिली नव्हती.

ती द्यायला हवी, हा आग्रह पिओत्र उक्लान्स्की नावाच्या मूळच्या पोलंडच्या, पण आता अमेरिकन चित्रकाराचा. या पिओत्रचं सध्या वय पंचावन्न वगैरे. म्हणजे त्यानं हिटलरकाळ पाहिलेला नाही. पोलंडचाच घास नाझींनी प्रथम घेतला, तेही पिओत्रला ऐकूनच माहीत असेल. पण २०१७ सालातल्या या कलाकृतीतून त्याचा प्रश्न अगदी रास्त आहे- ‘साध्यासुध्या माणसांनीही हिटलरला साथ दिली, तशी जोसेफ बॉइसनंही दिली असेल… आपण या इतिहासाकडे कसं पाहणार आहोत?’

दुसऱ्या कलाकृतीत हिटलरचंच व्यक्तिचित्र दिसतंय आणि त्यावर काहीतरी खरडल्यासारखं लिहिलं आहे. ते काय लिहिलंय, हे चटकन कळणार नाही पण हिटलरच्या उपलब्ध प्रतिमांपेक्षा हे चित्र निराळं आहे. इथं हिटलर काहीसा बायकीपणानं उभा दिसतोय… मराठी वाचणाऱ्यांनी अस्सल तमाशा पाहिला नसला तरीही तमाशापट पाहिलेले असतात; तर त्या तमाशापटांतल्या ‘मावशी’सारखी- नाच्यासारखी आहे की नाही हिटलरची उभं राहण्याची ढब इथं?

असं का केलंय ते? यासाठी आता चित्रावरची अक्षरं आणि आकडे पाहायला हवे. हिटलरच्या सत्ताकाळात जर्मनीतल्या अनेक समलिंगी पुरुषांना कोठडीत डांबून, त्यांना मारून टाकण्यात आलं. यापैकी काही समलिंगींची नावं आणि फाशीची/ देहदंडाची तारीख यांच्या नोंदी या एकाच चित्रावर नाही तर अशी दहापंधरा हिटलर-चित्रं – त्या सर्व चित्रांमधला हिटलर पुरुषीपणा सोडून बायकी दिसणारा आणि त्या सर्वांवर अशा नोंदी, हे या कलाकृतीचं पूर्ण स्वरूप होतं.

अमेरिकेत राहणाऱ्या ‘मॅकडरमॉट आणि मॅकगॉ’ यांची ही कलाकृती. हे दोघे पुरुष, ‘समलिंगी जोडपं’ अशी स्वत:ची ओळख जाहीरपणे सांगतात. ब्रिटनच्या गिल्बर्ट आणि जॉर्जनंतरचं दृ़श्यकला-प्रांतात ठसा उमटवणारं हे दुसरं समलिंगी दाम्पत्य. नाझीकाळात बळी गेलेल्या स्व-पंथीयांची नावं लिहिणं एवढाच त्यांचा या कलाकृतीमागचा हेतू नव्हता, हे उघड आहे. हिटलरच्या देहातच, त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांतही ‘समलिंगीपणा’ म्हणून जे काही ढोबळपणे ओळखलं जातं ते भिनवण्याचा प्रयत्न या कलाकृतीनं केला होता. या कलाकृतीचं नावही ‘हिटलर अॅण्ड अदर होमोसेक्शुअल्स’ असं मोघम होतं… कोणीही समलिंगी असू किंवा नसू शकेल… तुम्हाला काय करायचंय? हिटलरनं समलिंगींचा द्वेष केला, पण तुम्ही काय करताय, हे त्या कलाकृतीनं विचारलेले प्रश्न सरळ- थेट होते.

या दोन्ही कलाकृती ‘महान’ वगैरे नाहीत ठरणार. पण २०१७ मध्ये पाहिलेल्या असूनही त्या लक्षात राहिल्या होत्या. असं कुणीही, कुठेही जाऊन काही पाहिलं तरी त्यातलं काहीतरी लक्षात राहू शकतंच म्हणा! पण मग, हिटलरच्या पॅरिस-भेटीतून त्याच्या काय लक्षात राहिलं असेल? पिकासो, मातीस, मार्क शागाल, साल्वादोर दाली, मार्सेल द्याुशाँ… यापैकी कुणाच्याही कलाकृती हिटलरनं पाहिल्या असत्या, तर एखादी लक्षात राहिली असती का? की ‘सौंदर्यनिर्मितीच्या कर्तव्यापासून ढळलेल्या’ म्हणून त्याही आगीत पडल्या असत्या?

सौंदर्य म्हणजे काय? ‘छान दिसणं’? ‘सत्यं शिवं सुंदरं’चा अर्थ ‘आर्यन’ हिटलरला माहीत नसेल, पण भाषांच्या, विधानांच्या पलीकडची काहीतरी जाणीव असते ना… खरेपणातही सौंदर्य असतं, द्वेषाविना, तिरस्काराविना कलावंताच्या प्रयत्नाकडे पाहणं- तो प्रयत्न कुठल्या दिशेचा आहे, त्या दिशेनं हा कलावंत का गेला असेल याचा विचार करणं, तोही नसेल करायचा तर कलाकृतीच्या नवेपणाचा निर्लेप- मनमोकळा अनुभव घेणं हे सारं सौंदर्याच्या प्रत्ययाकडे नेणारं नसतं का? तसं असेल तर, खरेपणाला भिडणाऱ्या प्रत्येक क्षणात सौंदर्य दिसू शकतं. खासगी अनुभवांतला सच्चेपणा सोडून द्या- जाहीरपणे, सार्वजनिकरीत्या इतिहासातल्या चुका कुणीतरी कबूल करतंय हे पाहतानासुद्धा ‘सौंदर्या’ची जाणीव होऊ शकते.

हे सगळं उमगण्याची ताकद देणाऱ्या कलाकृती म्हणून, या दोन कलाकृतींचा अनुभव महत्त्वाचा ठरला. इतिहास घडत असतो, जखमा होतच असतात… त्यांकडे आपण कसं पाहायचं या प्रश्नाचं भान त्या अनुभवातून येऊ शकतं.

चुकांची कबुली हवी आहेहा आग्रह २०१७ सालच्या डॉक्युमेण्टामधील या दोन कलाकृतींमधून दिसत होता!

abhijit.tamhane@expressindia.com