अफगाणिस्तानमध्ये तालिबानला पुन्हा सत्तेत येऊन पाच वर्षे झाली. तिथे महिला आणि सामान्य माणसांवर होणार्‍या अत्याचारांच्या आणि मानव अधिकार उल्लंघनाच्या बातम्या आपण रोज वाचतो. मात्र, अफगाण संस्कृती अशी नव्हती. १९६०-७०च्या दशकात काबूलसारख्या शहरात महिला इतर अनेक देशांपेक्षा अधिक स्वतंत्र होत्या. तेव्हा तिथे मिनी स्कर्ट घालणार्‍या मुलींची संख्या मोठी होती. आज मात्र त्यांना बुरखा घातल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. सहावीच्या पुढे शिकता येत नाही. आधी राजधानी काबूलला ‘पूर्वेचे पॅरिस’ म्हटले जात असे. अनेक कवी, गायकांनी पुश्तू, दरीसारख्या भाषेला आणि अफगाण संस्कृतीला समृद्ध केले. अफगाण समाज अतिशय धार्मिक असूनदेखील तिथे अनेक महत्त्वाचे कम्युनिस्ट नेते झाले.

गेल्या ५०-५५ वर्षांत अफगाणिस्तानने अनेक स्थित्यंतरे पाहिली. अफगाणिस्तानात पत्रकारिता केलेल्या काही पत्रकारांनी त्यांच्या अनुभवावर आणि तिथल्या परिस्थितीबद्दल पुस्तके लिहिली आहेत. लीस डाउसेल नावाच्या पत्रकार महिलेने ‘द फायनेस्ट हॉटेल इन काबूल: अ पीपल्स हिस्ट्री ऑफ अफगाणिस्तान’ नावाचं अतिशय महत्त्वाचं, अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलं आहे. त्या बीबीसीच्या प्रतिनिधी होत्या आणि १९८८ पासून तिथल्या बातम्या देत होत्या. १९८९ च्या फेब्रुवारीत सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानातून घेतलेल्या संपूर्ण माघारीच्या बातम्या त्यांनी दिल्या होत्या. २०२१ मध्ये अमेरिका आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तिथून घेतलेल्या माघारीच्या बातम्यादेखील त्यांनी दिल्या होत्या. इतर देशांतून बातम्यांसाठी अफगाणिस्तानात आलेल्या पत्रकारांसाठी तुलनेने सर्वात चांगले हॉटेल होते- ‘हॉटेल इंटर-कॉन्टिनेन्टल’. इतर हॉटेलांपेक्षा येथे बर्‍यापैकी सवलती होत्या. या हॉटेलच्या कर्मचार्‍यांशी साधलेल्या संवादातून आणि अनुभवांतून अफगाणिस्तानचा अलीकडचा इतिहास अतिशय प्रभावीपणे लेखिकेने मांडला आहे.

सुरुवातीला त्या म्हणतात १९८८ चा ख्रिसमस होता. एक दिवस आधी त्यांचा ३० वा वाढदिवस झाला होता. हॉटेलच्या काउंटरवरच्या कर्मचार्‍यांनी त्यांना विचारले की, तुम्ही किती दिवस राहणार आहात? या प्रश्नाचे लेखिकेकडे काहीही उत्तर नव्हते. तो त्यांचा अफगाणिस्तानचा पहिला दौरा होता. त्यानंतर त्या अनेक वर्षे तिथे राहिल्या.

काबूलमध्ये १९६९ च्या सप्टेंबरमध्ये ‘इंटर-कॉन्टिनेन्टल’ची स्थापना झाली. त्याचे उद्घाटन अफगाणिस्तानचे शेवटचे राजे झहीर शाह यांनी केले होते. इंटर-कॉन्टिनेन्टलने अनेक चढउतार पाहिले. हे हॉटेल अनेक घटनांचा साक्षीदार आहे. राजांपासून कम्युनिस्ट नेते, राजनैतिक अधिकारी, पत्रकार, तालिबान, व्यापारी, मुजाहिदीन नेते तिथे येत असत. मुजाहिदीन काळात ‘वॉर लॉर्ड’ गुलबुद्दीन हेकमत्यार यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी २६ जून १९९६ ला येथे पार पडला. तेव्हा बुर्‍हानुद्दीन रब्बानी राष्ट्राध्यक्ष होते. अफगाणिस्तानला आधुनिक करण्याचे स्वप्न पाहणारे राजे झहीर शाह इटलीत गेले असताना लष्कराच्या मदतीने त्यांचेच जवळचे नातेवाईक आणि १९५३-१९६३ पर्यंत पंतप्रधान असलेले मोहम्मद दाऊद खान यांनी १९७३ मध्ये सत्ता काबीज केली. १७ जुलै १९७३ रोजी सकाळी सात वाजता रेडिओ काबूलवर दाऊद खान यांनी राष्ट्राला संबोधित करताना म्हटले, ‘‘राजाचे राज्य भ्रष्ट व हतबल होते. इस्लामवर आधारित खर्‍या लोकशाहीची आज सुरुवात होत आहे. लष्कराच्या पाठिंबा असलेले हे सरकार कुठल्याही एका देशाच्या जवळचे असणार नाही.’’ १९६४ ची राज्यघटना, संसद, न्यायव्यवस्था सारे काही स्थगित करण्यात आले. दाऊद खान प्रजासत्ताक अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले. हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी सांगितले की झहीर शाह उदार आणि चांगला माणूस होता. त्यांच्याकडे अफगाणिस्तानला आधुनिकतेकडे नेण्याची योजना होती. तालिबान १.० ची सत्ता गेल्यानंतर एप्रिल २००२ मध्ये परंपरा लक्षात घेऊन झहीर शाह यांना लोया जिरगाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले. २९ वर्षांनंतर ते काबूलला परत आले होते. त्यांनी आता राष्ट्राचे नेतृत्व करणार्‍या हमिद करझाई यांना आपला पाठिंबा जाहीर केला. करझाई यांनी झहीर शाह यांचा उल्लेख ‘राष्ट्रपिता’ म्हणून केला होता. वयाच्या ९२व्या वर्षी २००७च्या जुलै महिन्यात झहीर शाह यांचे काबूल येथे निधन झाले.
नंतर दाऊद खानच्या विरोधात बंड झाले. २८ फेब्रुवारी १९७८ ला त्यांची हत्या करण्यात आली आणि नूर मोहम्मद तराकी सत्तेत आले. ते साम्यवादी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तानचे नेते होते. प्रजासत्ताक अफगाणिस्तान आता लोकतांत्रिक प्रजासत्ताक अफगाणिस्तान झाला. आपण साम्यवादी नाही आणि सोव्हिएत रशियाच्या मदतीने आपण सत्तेत आलो नाही, असे ते सांगत होते. पण, लोकांचा त्यावर विश्वास नव्हता. नंतर बातम्या येऊ लागल्या की रशियालादेखील बंडाची माहिती रेडिओवरून मिळाली होती. हफिझुल्ला अमीन उपराष्ट्राध्यक्ष होते. ऑक्टोबरमध्ये तराकी यांची अमीनच्या समर्थकांनी हत्या केली. काही लोकांना अमीन अमेरिकेचा हेर असल्याचा संशय होता. सोव्हिएत रशियाच्या हल्ल्यात अमीनचा मृत्यू झाला. लेखिका म्हणतात अमीनच्या मृत्यूची घोषणा बाबरक करमाल यांनी केली. पण तेव्हा ते देशात नव्हते. त्याच दिवशी त्यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले. दोन वर्षांत तीन अफगाण राष्ट्राध्यक्षांची हत्या झाली. ४ मे १९८६ ला बाबरक करमाल यांच्या जागी नजिबुल्ला राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांना सोव्हिएत रशियाची मदत होती.

१९८९ च्या १५ फेब्रुवारीपर्यंत सोव्हिएत रशियाचे सर्व जवान अफगाणिस्तानातून परत जातील, अशी घोषणा सोव्हिएत रशियाने केली होती. त्या ऐतिहासिक घडामोडींच्या बातम्या देण्यासाठी जगभरातून पत्रकार अफगाणिस्तान येऊ पाहत होते. काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांचे पत्रकारही तिथे पोहोचले होते. बाहेरून २०० हून अधिक पत्रकार अफगाणिस्तानात आले होते. इंटर-कॉन्टिनेन्टल सर्वांचा आधार होता. १९ जानेवारीला लेखिकेला हॉटेलच्या फ्रंट डेस्कने ब्रिटिश दूतावासाकडून आलेले एक पत्र दिले. त्यात म्हटले होते, ‘विमानसेवा सुरू आहे तोपर्यंत विनाविलंब अफगाणिस्तान सोडा.’ जानेवारी १९८९ च्या शेवटी अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकार्‍यांनी आपण दूतावास बंद करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर डिसेंबर २००१ मध्ये अमेरिकी दूतावास परत सुरू करण्यात आला. त्या काळात टेलिफोन नेटवर्क अतिशय वाईट होते. बातम्या पाठवणे सोपे नव्हते. लेखिका म्हणतात पत्रकारांसाठी काबूल येथे टेलिफोन जोडून मिळणे ही सर्वांत मोठी चिंतेची बाब होती. १५ फेब्रुवारी १९८९ ला जनरल ग्रोमोव अफगाणिस्तान सोडणारा शेवटचा सोव्हिएत लष्करी अधिकारी होता.

अफगाण राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नजिबुल्ला यांनी काबूलहून पळून जाण्याचा प्रयत्न केला होते. १७ एप्रिल १९९२च्या रात्री ते, त्यांचा भाऊ आणि संयुक्त राष्ट्रांचे काही अधिकारी तीन कारमधून विमानतळाकडे निघाले. संयुक्त राष्ट्रांचे विमान त्यांची वाट पाहत होते. मात्र, शेवटच्या चेक पॉइंटवर त्यांना अल्पसंख्याक उझबेक समाजाचे जनरल अब्दुल रशीद दोस्तुमच्या लोकांनी अडवले. आश्चर्य म्हणजे दोस्तुम यांनी अहमद शाह मसूद यांच्याशी हातमिळवणी केली होती. शेवटी नजिबुल्ला यांना परत शहरात जावे लागले. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात त्यांनी आश्रय घेतला. २७ सप्टेंबर १९९६ ला तालिबानने संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात घुसून त्यांना बाहेर आणले आणि त्यांची हत्या केली.

मुजाहिदीनच्या काळात परस्पर मतभेद होते आणि एकूण गोंधळाची परिस्थिती होती. १९९४ला पाकिस्तान आणि अमेरिकेच्या मदतीने स्थापन झालेल्या तालिबानने २७ सप्टेंबर १९९६ला काबूलवर ताबा मिळवला. १९९६-९७ मध्ये ओसामा बिन लादेनदेखील इंटर-कॉन्टिनेन्टल मध्ये राहत असे. लेखिका म्हणतात तो कधी मुख्य दरवाजातून येत नसे. दुसर्‍या मजल्यावर राहत असे. अल कायदाने अमेरिकेवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यावर ओसामा आणि अल कायदाचे दहशतवादी आधी पळून गेले. अमेरिकेने त्याला १ आणि २ मे २०११च्या रात्री पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे ठार केले.

तालिबानची सत्ता जाणार हे स्पष्ट झालं होतं. जगभरातून पत्रकार अफगाणिस्तानात येत होते. बीबीसी आणि ‘असोसिएटेड प्रेस’चे पत्रकार शहरातून काम करत, पण, अमेरिकेने सुरू केलेल्या हल्ल्याच्या ३७ व्या रात्री तुलनेने अधिक सुरक्षित इंटर-कॉन्टिनेन्टल येथे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अनेक पत्रकार उत्तरेतून येत होते. हा भाग नॉर्दर्न अलान्यन्सच्या ताब्यात होता. तालिबानला तो परिसर कधीही ताब्यात घेता आला नव्हता. लेखिका म्हणतात १९ नोव्हेंबरला दोन इटालियन, एक स्पॅनिश आणि एक अफगाण पत्रकार काबूलच्या दिशेने येत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्या गाड्या थांबवल्या आणि त्यांना ठार मारले.

तालिबान गेल्यानंतर अफगाणिस्तानात उत्साहाचे वातावरण होते. इंटर-कॉन्टिनेन्टलच्या कर्मचार्‍यांमध्ये नवीन आशा निर्माण झालेली. मोहम्मद अका नावाचा कर्मचारी, आता आपल्या दोन्ही मुलींना शाळेत पाठवता येईल, म्हणून खूश होता. आनंदाने आपल्या मुलींना त्याने मिठी मारली, असे एकंदर वातावरण होते. त्या काळात लोक खूश होते याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. महिला कर्मचारी परत कामावर येऊ लागल्या होत्या.

फेब्रुवारी २०२०मध्ये तालिबानने अमेरिकेशी शांतता करार केला. अफगाण सरकारशीदेखील चर्चा करण्यात येईल, असे म्हटले जात होते. शांततेसाठी प्रयत्न करणारे आणि परदेशी नागरिकांचे इंटर-कॉन्टिनेन्टल हे अवडते हॉटेल होते. ऑगस्टमध्ये लोया जिरगाची बैठक झाली. ४०० अतिरेक्यांना मुक्त करण्याचा त्यात निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर हत्या, सरकारी कार्यालयावर व इतर ठिकाणी बॉम्बने हल्ले करणे, मोठ्या प्रमाणात कत्तल करणे, दूतावासांवर हल्ले इत्यादी गुन्हे नोंदवलेले होते. पण, त्या सगळ्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या मोबदल्यात तालिबानने अफगाण सरकारशी मात्र चर्चा करण्याचे मान्य केले. तेव्हा अश्रफ घनी राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी सगळ्यांना सोडण्याचा आदेश दिला. एका हॉटेलने आणि तिथे राहणार्‍या पाहुण्यांनी अनुभवलेल्या या ऐतिहासिक घटनांच्या नोंदी अफगानिस्तान समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील, हे निश्चित.

द फायनेस्ट हॉटेल इन काबूल : अ पीपल्स हिस्ट्री ऑफ अफगाणिस्तान

लेखिका : लीस डाउसेल

प्रकाशक : हचिनसन हेईनमन

पृष्ठे : ४२३, किंमत : ९९९ रु.

(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार व शांततावादी कार्यकर्ते)