दहशतवादी हल्ले झालेल्या स्थळांची पर्यटन क्षेत्रे होतात हे आपण सर्वांनी पाहिले आणि अनुभवलेले आहे. अपोलो बंदर, लिओपोल्ड कॅफे, बोरीबंदर या सर्व ठिकाणी आता बाहेरील राज्यातून आलेल्या उत्सुक प्रवाशांना प्रवासी गाइड्स मोठ्या उत्साहात कुठे आणि कसा हल्ला झाला? कोण कुठे उभे होते? किती माणसे मेली? कोणत्या भिंतींवर रक्ताचे फवारे उडाले हे मोठ्या उत्साहात दररोज सांगत असतात. अनेक पर्यटन मार्गदर्शक अपोलो बंदराजवळ, बोरीबंदराजवळ किंवा धोबीतलावाजवळ उभे राहून चित्रपटाचा सीन सादर करून दाखवावा तसे पूर्ण दहशतवादी हल्ल्याची घटना मीठमसाला लावून आरडाओरडा करीत साभिनय सादर करून प्रवाशांना चकित करीत असतात. हा कार्यक्रम मी अनेक वेळा पाहिला आहे. दहशतवादी हल्ला झाला त्या स्थळांची पर्यटन क्षेत्रे होतात त्याचप्रमाणे जी कुटुंबे दहशतवादी हल्ल्याने समूळ उद्ध्वस्त झाली त्या कुटुंबांचे मानवी म्युझिअम्समध्ये आपण रूपांतर करतो. अशी कुटुंबे एकाच वेळी आपल्यावर झालेल्या दुर्दैवी आघाताला सामोरी जाताना काचेच्या घरात राहिल्यासारखी पुढील अनेक दशके सर्व समाजाच्या उत्सुकतेचा विषय बनून राहतात. दहशतवादी हल्ल्याच्या आणि त्यामुळे झालेल्या भयंकर अशा पोकळीच्या जखमा कालांतराने भरून येतात, पण समाज तुमच्या त्या जखमा सहजासहजी कोरड्या होऊ देत नाही. करमणूक होण्यासाठी समाजाला तुमच्या जखमा आवश्यक असतात. समाज करुणेचा तसेच विविध प्रकारच्या सामाजिक जबाबदारीचा आव आणून तुमच्या कोरड्या जखमा भोसकत त्यातून येणारे रक्त वाहतच ठेवतो. या अनुभवातून गेलेल्या आणि आपल्या आयुष्याला समाजाच्या करुणेच्या आणि उत्सुकतेच्या भीषण पाशातून मोकळे करून आपले स्वत:चे आयुष्य जोमाने नव्याने उभे करणार्या एका तरुण, संवेदनशील आणि बुद्धिमान मराठी युवकाची कहाणी म्हणजे ‘आफ्टरमॅथ’ हे आत्मवृत्त..
आकाश करकरे या बारावीत शिकणार्या मुलाला मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात आपले वडील गमवावे लागले तेव्हापासून समाजातील समाजसेवा उत्सुक व्यक्ती आणि संस्था यांनी बहाल केलेल्या दयेशी आणि अनेक माणसांच्या तापदायक उत्सुकतेशी सातत्याने लढावे लागले. वयाच्या सतराव्या वर्षापासून झालेल्या आघातांची फार नेटकेपणे आणि त्रयस्थपणे मांडणी ते आपल्या आत्मवृत्तात करतात. एका तरुण मुलाने असे दाहक आणि अस्वस्थ करणारे आत्मवृत्त लिहावे ही त्या माणसाच्या आयुष्याला मिळालेली फार दुर्दैवी संधी. त्या संधीचा नेटका आविष्कार आकाश यांनी या प्रवाही तसेच परिणामकारक ग्रंथात केला आहे. लिहिणे आणि लिहिता येणे या दोन स्वतंत्र गोष्टी. आकाश करकरे यांना त्या दोन्ही फार उत्तम जमतात हे या ग्रंथाने सिद्ध केले आहे. आकाश आपल्या खासगी आयुष्याविषयी लिहितात यात त्यांचे धाडस, त्यांचा आपल्या खासगी आयुष्याकडे पाहायचा आधुनिक दृष्टिकोन वाचकाला जाणवतो आणि अस्वस्थ करीत राहतो. त्यांना लिहिता येते या वाचकाला होणार्या अनुभूतीत त्यांची भयंकर अनुभवांना त्रयस्थपणे शब्दात मांडून अतिशय शिस्तीने आणि परिश्रमपूर्वक उत्तम साहित्याचा घाट देण्याची क्षमता दिसते. आकाश हे त्यांच्या सभोवताली एकामागून एक घडणार्या भयंकर अशा बाह्य घटनांकडे पाहतात तसेच ते एका जोडप्याचा मुलगा, एका कुटुंबाचा घटक आणि आडनावाचा वारसदार या भूमिकेतून संपूर्ण नष्ट होऊन पुन्हा फिरून नव्याने जन्म घेणार्या आपल्या शरीर आणि मनाकडे पाश्चात्त्य लेखकांच्या अस्तित्ववादी दृष्टीने पाहतात. दुर्दैवी घटनांच्या जाणिवेने आणि प्रगल्भ समजुतीने आकाश यांना प्राप्त झालेला हा शांत, समंजस पण अतिशय कणखर असा त्रयस्थपणा त्यांचे आत्मवृत्त वाचताना आपल्याला सतत जाणवतो.
आपण सगळेच आपल्या प्रथम नामापेक्षा कुटुंबनामाला महत्त्व देणार्या कृषीसंस्कृतीच्या परंपरेचे पाईक आहोत. आडनावाचा अभिमान बाळगणे, आडनावावर झालेल्या अन्यायाचा सूड घेणे, आपल्या आडनावाच्या इतर माणसांपेक्षा आपण प्रगती केली की आपण प्रगती केली असे मानून आनंदी होणे, आपल्या आडनावाची संख्या वाढावी म्हणून योग्य असे पारंपरिक आणि जीवशास्त्रीय उपक्रम करीत राहणे, आपल्या आडनावी पूर्वजांचे आत्मभान म्हणजेच आपले आत्मभान आणि तीच आपली ओळख या जाणिवेला प्रश्न न विचारणे हे आपण फार गांभीर्याने करतो.
नवीन सहस्रकाच्या उंबरठ्यावर जन्माला आलेली शहरी जाणिवेची भारतीय पिढी आता आपले यशापयश, आत्मभान प्रथमनामाच्या खाती जमा करू लागली आहे हे आपल्याला जाणवू देणे हे ‘आफ्टरमॅथ’ या ग्रंथाचे फार महत्त्वाचे असे काम ठरणार आहे. या तरुण पिढीच्या विचारचक्राचा आणि निर्णयप्रक्रियेचा ठाव त्यांच्या पालकांना लागत नाही. आडनावापेक्षा आपले नाव महत्त्वाचे वाटणे म्हणजेच आपल्या कुटुंबाच्या इतिहासापेक्षा आपला व्यक्ती म्हणून पुढील प्रवास आता भारतीय शहरी तरुण पिढीला महत्त्वाचा वाटू लागला आहे. भारतातील सर्व शहरांमध्ये अशी पिढी पहिल्यांदा आकार घेऊ लागली आहे. आकाश यांचे हे आत्मवृत्त हे या नव्या पिढीच्या बदलत्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. आपल्या वडिलांच्या मृत्युपूर्वीच्या फार आधीच्या काळापासून, आपण जन्मलो तेव्हापासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे काय नाते होते? आपले वडील आणि आपली आई यांना आपले पालक म्हणून मिळालेल्या मखरातून बाहेर काढून तपासले तर ती माणसे म्हणून कशी होती? याचा विचार अतिशय संवेदनशीलपणे आकाश आपल्या आत्मवृत्तात करतात. खासगी घटनांना आणि नातेसंबंधांना हाताळून तपासताना ते कोणत्याही नात्याचे हानिकारक जाहीर मूल्यमापन न करता अतिशय संयमाने आणि आणि शांतपणे आपल्या कुटुंबापासून वेगळा असा स्वत:चा शोध घेत राहतात. असा शोध घेणे हेच या आत्मवृत्ताचे कारण आहे हे आपल्याला वाचताना लक्षात येते. छापले गेले नसते तरीही आकाश यांनी हे आत्मवृत्त लिहिले असते इतकी त्याची अपरिहार्यता आपल्याला वाचताना जाणवते हे या ग्रंथाचे यश आहे.
आपल्या कुटुंबाचा प्रमुख असलेल्या पुरुषाला म्हणजेच आपल्या वडिलांना आपला पिता किंवा एक कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून न पाहता एक व्यक्ती म्हणून त्यांच्या गुणदोषांसकट आकाश आपल्या जाणत्या वयात पाहू लागले. आपले या कुटुंबातील स्थान काय? आपल्या आईवडिलांचे एकमेकांशी कसे नाते आहे ? त्याचा आपल्या जगण्यावरती कसा परिणाम होतो आहे? हे लहान मुलांना आजच्या काळात फार लवकर उमजू लागते तसेच ते आकाश यांना करकरे कुटुंबात सर्वात लहान असा दोन बहिणींनतर झालेला तिसरा पुत्र म्हणून उमजले. वडिलांच्या मृत्यूने त्यांच्या आपण कोण आहोत आणि आपले आणि आपल्या कुटुंबाचे नाते काय? या जाणिवेला आकार यायला सुरुवात झाली. संपूर्ण कुटुंबावर ओढवलेल्या भयंकर अशा घटनाक्रमानंतर अनाथ होण्याच्या अनुभवाने त्यांचा विचारांना आणि माणूस म्हणून आपल्या ओळखीला एक अपार असा प्रामाणिकपणा दिला. तो प्रामाणिकपणा हे आकाश यांच्या लिखाणाचे ऊर्जाकेंद्र आहे.
हे आत्मवृत्त आपल्या वडिलांच्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या मृत्यूला केंद्रस्थानी ठेवून सहानुभूती आणि सूड मागत नाही. ते लेखकाच्या अनुभवाचा केंद्रबिंदू त्याच्या आतमध्ये नेते आणि एक व्यक्ती म्हणून आपल्याला आयुष्याला आकार देण्यासाठी काय लढाई लढावी लागली यावर लक्ष्य केंद्रित करते. दहशतवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालेल्या श्री. हेमंत करकरे यांच्या मुलाची ती गोष्ट उरत नाही. ती नव्या शहरी पिढीचा भाग असणार्या आकाशच्या आत्मभानाचा दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवते. पत्रकार, विविध सामाजिक आणि राजकीय संघटना, कामाच्या ठिकाणी भेटणारी माणसे यांनी आपल्याला भोसकून आपले रक्त कसे वाहते ठेवले आणि आपल्याला आपले विस्कळीत झालेलं मन आणि उद्ध्वस्त झालेले आयुष्य पुन्हा उभे करायला कोणत्या अनुभवातून जावे लागले हे या पुस्तकातून आकाश आपल्याला मोकळेपणाने सांगतात. आपल्या कुटुंबाची विचारव्यवस्था आणि निर्णयप्रक्रिया आपल्यातून संपूर्ण नष्ट करून आकाश आपली स्वतंत्र विचारधारा, निर्णयप्रक्रिया आणि जीवनशैली पुन्हा नव्याने उभी करतात या गंभीर आणि अवघड अशा आत्मशोधाची ही कहाणी आहे. ती कहाणी कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी घटना घडून गेल्यावरती पुढील अनेक वर्षे चालू राहते. विविध शहरात राहून शिकताना, आपल्या भग्न मनाची डागडुजी करायचा आटोकाट प्रयत्न करताना, वारंवार अनेक प्रयत्न फसून, कोलमडून एकट्याने पुन्हा आपल्या पायांवर उभे राहताना या आत्मवृत्तात आकाश आपल्याला दिसतात. ते आपला प्रवास संकोच आणि भीती सोडून आपल्यासमोरच्या कागदाला सांगतात.
भारतीय इंग्रजी साहित्याच्या प्रकाशन व्यवहारात लेखक निर्माण करीत ठेवावे लागतात. चांगल्या सकस लेखकांच्या ग्रंथनिर्मितीच्या वेगावर आणि साहित्य निर्मितीच्या संथ नैसर्गिक चक्रावर दिल्लीमधील मोठी ऑफिसे, मानव कल्याणाच्या सर्व अमेरिकन आणि युरोपकेंद्री कसोट्या पूर्ण करण्यासाठी भरलेला भरपूर कर्मचारीवर्ग आणि अफाट वितरण व्यवस्था पोसणे बहुराष्ट्रीय इंग्रजी प्रकाशन संस्थेला परवडणारे नसते. इतकी महत्त्वाची देशाला हादरवून टाकणारी भयंकर दहशतवादी हल्ल्याची घटना घडली आणि त्यात होरपळले गेलेलं कुटुंब कुणाला सापडले तर त्या कुटुंबातील मागे उरलेल्या आडनीड वयाच्या मुलामागे आधी पत्रकार आणि त्यांना जुमानले नाही तर मग प्राध्यापक लावून भारतीय इंग्रजी प्रकाशन संस्था त्या मुलाला सहजपणे लेखक लामा बनवून टाकू शकतात. संपूर्ण हिवाळाभर त्या बालकाला विविध विमानांमध्ये कोंबून देशभरात इकडून तिकडे भरणार्या साहित्य मेळाव्यांमध्ये नेऊन त्याचे तोंड फाटेस्तोवर कौतुक करून एकपुस्तकी करियरनंतर लगेच त्याचे विसर्जनसुद्धा करू शकतात. लेखननिर्मितीपेक्षा लेखकनिर्मिती करण्याचा व्यवसाय असलेल्या या बहुराष्ट्रीय इंग्रजी प्रकाशन कंपन्यांनी आकाश यांना शांतपणे इतकी वर्षे जगू दिले हेच सुदैव.
लिहायचे की नाही हा निर्णय घेणे, लिखित साहित्याकडे शांतपणे पाहणे आणि त्याला त्रयस्थभाव देऊन त्या लिखाणातून आणि भूतकाळातून आपली सुटका करून घेणे हा नैसर्गिक कालप्रवास आकाश यांनी केला. अनेक वर्षे गेल्यावर स्वत:ला हवे तसे लिहून, हवे तेव्हा आपले पुस्तक त्यांना प्रकाशित करता आले हे भारतीय इंग्रजी प्रकाशन व्यवहाराला आलेल्या नव्या जाणिवेचे सुचिन्ह आहे असे आपण मानू. या साहित्य व्यवहारात आता काही संवेदनशील नवीन संपूर्ण भारतीय अशा प्रकाशन संस्था आणि नव्या जाणिवेचे संपादक सावकाश उदयाला येत आहेत. नव्या पिढीचे आकाश करकरे यांच्यासारखे अनेक भारतीय प्रदेशांमधील विविध जाणिवेचे तरुण लेखक आणि त्यांच्या निर्मितीच्या ऊर्मीकडे हे संपादक आणि या नवीन संस्था जाणीवपूर्वक लक्ष ठेवून असतात.
आकाश करकरे यांचे ‘आफ्टरमॅथ’ हे पुस्तक, ‘मराठी लेखक’ ही व्याख्या काळानुसार बदलते आहे काय? या जाणिवेकडे आपले लक्ष्य वेधू शकेल. लेखकाचे अस्तित्व आणि त्याची लिहायची भाषा यांचा सांधा जोडलेला नसेल तर आपण त्या साहित्याला कोणत्या कप्प्यात टाकणार? मराठी कुटुंबातील अनेक तरुण लेखक आता नैसर्गिकपणे इंग्रजी भाषेत दमदार साहित्यनिर्मिती करू लागले आहेत. ते भारतात अनेक शहरांमध्ये राहतात. त्यांच्यापैकी अनेकजण भारताबाहेर जन्मलेले असतात. आकाश करकरे यांचे ‘आफ्टरमॅथ’ हे इंग्रजी भाषेतील लिहिले गेलेले आत्मवृत्त ह्या तरुण मराठी पिढीच्या साहित्य व्यवहाराचे पहिले दर्शन आहे. हा मराठी साहित्याचा प्रवाह आता सातत्याने कुणाचीही परवानगी न घेता आणि कोणताही संकोच न बाळगता भारतात तसेच भारताबाहेर वाढत राहणार आहे. तामिळ, बंगाली आणि केरळी प्रदेशातील साहित्य व्यवहार त्यांच्या मातृभाषेप्रमाणेच इंग्रजीत लिहिणार्या त्यांच्या प्रांतातील लेखकांना फार सहजतेने आपलेसे करीत आला आहे. त्याचा विलक्षण असा परिणाम त्या प्रदेशांची साहित्यविषयक आत्मप्रतिमा विस्तारण्यात आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रतलावर त्या प्रदेशातील साहित्यिकांना समजून घेतले जाण्यात झाला आहे. महाराष्ट्रातील मराठी साहित्यप्रेमी समाज आणि साहित्यव्यवस्था आपल्या लेखकांच्या या नवीन लेखनप्रवाहाकडे फार जागरूकपणे आणि प्रोत्साहनपर दृष्टीने पाहील तर मराठी साहित्याचे वर्तुळ वर उल्लेख केलेल्या राज्यांप्रमाणेच व्यापक होईल.
आफ्टरमॅथ : लाइफ इन द शॅडो ऑफ हेडलाइन्स अँड हिस्ट्री
लेखक – आकाश करकरे
प्रकाशक – रूपा प्रकाशन
पृष्ठे – २४८, किंमत – ३९५ रु.
