‘तुझं चरित्र प्रसिद्ध झालं आणि तू मला कळवण्याचीही तसदी घेतली नाहीस?’ अमेरिकेतल्या तंत्रज्ञानविषयक पत्रकार कश्मीर हिल यांना त्यांच्या परिचितांपैकी कोणाचा तरी मेसेज आला आणि त्या चपापल्याच. त्यांच्यासाठी सुद्धा ही बातमीच होती. त्यांनी इंटरनेटवर सर्च करून पाहिलं तर खरोखरंच ‘द बायोग्राफी ऑफ काश्मीर हिल’ हे पुस्तक तिथे उपलब्ध होतं आणि ते प्रसिद्ध होऊन साधारण वर्ष होत आलं होतं. ९० पानांचं हे चरित्र ऑगस्ट २०२५मध्ये ते प्रसिद्ध झालं आणि त्याच्या छापील प्रतीची किंमत लिहिली होती तब्बल २६.९९ डॉलर्स. हिल यांच्याबद्दल इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेली माहितीच पुस्तकात होती आणि त्यातलेही काही तपशील चुकीचे होते. पुस्तक वाचताना त्यातल्या लेखनाची शैली आणि विरामचिन्हं पाहून हिल यांच्या लक्षात आलं की हा संपूर्ण मजकूर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साहाय्याने निर्माण करण्यात आला आहे.

हा अनुभव आणि त्यासंदर्भात मतं व्यक्त करणारा हिल यांचा लेख नुकताच ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये प्रकाशित झाला. एआयची साहित्यक्षेत्रातली ढवळाढवळ हा सध्या वादाचा विषय ठरत असताना एआयला हाताशी धरून करण्यात आलेला हा नवा ‘पराक्रम’ उजेडात आला आहे. 

आपलं चरित्र प्रसिद्ध झाल्याच्या धक्क्यातून सावरल्यावर हिल यांनी पुस्तकाविषयीच्या अभिप्रायांचा रकाना पाहिला तर तो रिकामा होता. मग त्यांनीच त्या रकान्यात लेखकाशी संपर्क साधण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी लेखकाच्या नावावर क्लिक केलं. नाव होतं जॉन क्रेन मिलर आणि परिचयात म्हटलं होतं- अनुभवी चरित्रकार आणि सांस्कृतिक विश्लेषक. कोणत्या तरी परिषदेत भाषण करणार्‍या श्वेतवर्णीय माणसाचं छायाचित्र त्यावर होतं. या मिलर यांनी एका आठवड्यात तब्बल १० चरित्रं प्रकाशित केल्याचं हिल यांच्या निदर्शनास आलं. ही सर्व चरित्रं पत्रकारांचीच होती. त्यात हिल यांच्या काही सहकारी आणि परिचितांचाही समावेश होता.

या सार्‍या ऑनलाइन संशोधनावरून या व्यक्तीला पत्रकारांच्या चरित्रांत स्वारस्य आहे, असं अल्गोरिदमला वाटलं असावं. त्यामुळे त्यांच्यापुढे डायन डब्ल्यू. ग्रे यांचं ‘डॅन रादर: ट्रुथ अँड टेनासिटी’ हे पुस्तक आलं. ग्रे यांनी गेल्या उन्हाळ्यात विविध क्षेत्रांतल्या प्रसिद्ध व्यक्तींवर ६० चरित्रं प्रकाशित केली होती. त्यातल्या केवळ एकाच पुस्तकावर अभिप्राय होता आणि त्यातही अभिप्राय देणार्‍याने हा निव्वळ एआयद्वारे निर्माण केलेला कचरा असल्याची टीका केली होती. रादर यांनी मात्र ग्रे यांच्या या प्रयोगाचं स्वागत करत त्यासंदर्भात समाजमाध्यमांत पोस्ट केली होती. ती पोस्ट २० हजारांहून अधिक लोकांनी लाइक केली होती. हिल यांच्या मते त्यापैकी काहींनी जरी ते पुस्तक खरेदी केलं असेल, तरी त्यातून अशाप्रकारे पुस्तकं प्रकाशित करणार्‍यांना प्रोत्साहनच मिळत असणार. हिल यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. गेल्या काही काळापासून साहित्यनिर्मितीतील एआयचा वापर वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. वाङ्मयचौर्य, कॉपीराइट्स कायद्यांचं उल्लंघन अशा समस्यांना प्रकाशन व्यवसाय तोंड देत आहे. पुरस्कारप्राप्त साहित्यकृती एआयचा वापर करून निर्माण केल्याचे आरोप होत आहेत. अशा स्थितीत एखाद्याचं चरित्रच त्याच्या परवानगीशिवाय – आणि तेदेखील वरवरच्या किंवा चुकीच्या माहितीवर आधारित- प्रसिद्ध केलं जाण्याची नवीच समस्या यानिमित्ताने पुढे आली आहे.