गेल्या काही महिन्यांपासून साहित्य क्षेत्रात एआयच्या वापरामुळे वारंवार वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे पुस्तके मागे घेण्यापासून ते प्रकाशन करार मोडण्यापर्यंत वेळ आली आहे. साहित्यविश्वाला एआयने हादरवून सोडले असतानाच यासंदर्भातल्या एका नव्या अभ्यासाचा अहवाल पुढे आला आहे आणि त्याचे निष्कर्ष चिंताजनक आहेत.

‘जजमेंट अँड डिसिजन मेकिंग’ या ‘केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस’च्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जोपर्यंत वाचकांना हे माहीत नसतं की एखादी कथा एआय वापरून तयार केली आहे, तोपर्यंत त्यांना माणसांनी लिहिलेल्या कथांपेक्षा एआयच्या कथा अधिक आवडतात, मात्र एखादी कथा एआयने तयार केली आहे, हे कळलं की त्यांचं त्यातलं स्वारस्य संपतं. ‘बॉट ऑर नॉट : कॅन पीपल टेल द डिफरन्स बिट्वीन स्टोरीज रिटन बाय अ ह्युमन ऑर बाय ॲन एआय सिस्टम?’ असं त्या शोधनिबंधांचं शीर्षक आहे. व्हिलानोव्हा युनिव्हर्सिटीचे सिडनी सिअर्स आणि डॉ. दीना स्कोल्निक वेसबर्ग यांनी हा अभ्यास केला आहे. हा प्रयोग अमेरिकेतील तब्बल २,५८७ वाचकांवर केला गेला.

प्रसिद्ध नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या तीन लघुकथांची तुलना ओपन एआयच्या, चॅटजीपीटी ४.०च्या मदतीने तयार केलेल्या तीन साधारण तशाच स्वरूपाच्या कथांशी करण्यात आली. संशोधकांच्या मते, वाचकांना एआयनिर्मित कथा आवडतात, मात्र त्यांचा एआयवर अद्याप विश्वास बसलेला नाही. अशा प्रकारे लिहिलेल्या कथा निकृष्ट असतात, अशी त्यांची मनोधारणा आहे. संशोधकांच्या असंही लक्षात आलं की प्रयोगात सहभागी झालेल्यांपैकी ज्यांनी भाषा आणि वैयक्तिक आवड यांसारख्या निकषांवर अवलंबून राहून अंदाज लावले, त्यांचे अंदाज चुकीचे ठरले. साहजिकच या अभ्यासातले निष्कर्ष आधीच एआयने ग्रासलेल्या साहित्यविश्वाच्या चिंतेत भर घालणारे ठरले आहेत.