रोजगार हिरावून घेण्यापेक्षा, लोकांच्या कार्यक्षमता वाढीस पूरक तंत्रज्ञान हवे. अशा तंत्रज्ञानासाठी तळागाळात कौशल्य विकासावर भर हवा. भारताने, भारतासाठी विकसित करावयाच्या कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआयवर शोधले गेलेले हे ‘बॉटम-अप’ धाटणीचे उत्तर आहे. यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात यावरील उतारे स्पष्ट आहेत. तीच स्पष्टता देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंता नागेश्वरन यांच्या सोमवारच्या दिल्लीतील भाषणातही दिसून आली. राजधानीत आयोजित ‘एआय प्रभाव परिषदे’चे यजमानपद भारताकडे नव्हे तर विकसनशील देशाकडे (आजकाल ‘उभरती अर्थव्यवस्था’ वगैरे म्हणण्याची पद्धत असली तरी आशय बदलत नाहीच!) पहिल्यांदाच आले. एआयच्या परिणामांबाबत चर्चेसाठी असलेल्या परिषदेत भारतासारख्या लोकसंख्याबहुल देशाचा एआय संबंधाने सत्वर दृष्टिकोन, काटेकोर धोरण आणि  आवश्यक विवेकाचे सार नागेश्वरन यांच्या भाषणात होते. 

एआय तंत्रज्ञानाचे जागतिक समीकरण आणि विकसनशील देशांचे समीकरण हे वेगळेच असायला हवे. त्याचेच प्रतिनिधित्व म्हणून नागेश्वरन यांच्या भाषणाकडे पाहता येईल. या परिषदेने निर्माण केलेले महोत्सवी उधाण वास्तवाच्या कसोटीवर आणण्याचे काम या भाषणाने केले. एआयचा अवलंब हा आपल्याकडे पूर्ण समजुतीने, निगुतीनेच व्हायला हवा, हे भूमिका-सातत्य त्यांच्या ठायी दिसले. ‘भारत एआय क्षेत्राचा उद्याचा नेता’ असा प्रचारकी, अत्यंत बावळट भासणारा अतिउत्साह एकीकडे, तर दुसरीकडे अज्ञान, अपसमजातून आलेली टोकाची भीती या दोहोंशी ही भूमिका फारकत घेणारी आणि म्हणूनच ती कौतुकपात्रही ठरते.

एआयमुळे उत्पादकता वाढेल, पण ती रोजगारहीन वाढ नसावी. एआयने मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमांची जागा घेतली, तर ते सामाजिक असंतोषाचे कारण ठरू शकते. या अंगाने नागेश्वरन यांच्या भूमिकेची मौलिकता खरे तर पटावी. भारताकडे जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आणि पर्यायाने विपुल विदा (डेटा) आहे, जे एआयसाठी इंधन ठरते. यातून एआयच्या अग्रभागी असलेली महाशक्ती बनण्याची धमक भारत राखतो, हे खरेच. परंतु ही वाटचाल जनकेंद्रित आणि वरून खाली झिरपत जाणारी नव्हे तर तळागाळातील विकासातून (बॉटम-अप) पद्धतीने व्हायला हवी, असे ते नमूद करतात. कंपनीचा व्यवसाय दसपटीने वाढला आणि कर्मचारी संख्या १० पटीने कमी झाली, अशी एआय परिणामकारकता आपण स्वीकारणार काय? त्या उलट एआयचा वापर विकसित देशांप्रमाणे खर्च-कपातीसाठी न करता, उत्पादन व उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला करता येईल. शेती उत्पन्नात वाढ आणि ग्रामीण भागात नवीन सेवा आधारित रोजगारवाढीच्या दृष्टीने एआयच्या वापराचे उपक्रम त्यासाठी प्रोत्साहित करावे लागतील.

पण स्वप्न आणि साध्य यातील तफावत दाखवणारा आरसाच नागेश्वरन यांनी सरकारपुढे धरला आहे. काहीशा विलंबानेच म्हणा, परंतु दोन वर्षांपूर्वी सरकारने हाती घेतलेले ‘इंडिया एआय मिशन’ याचे उदाहरण ठरेल. आधीच उशीर झाला असताना, या मिशनच्या उद्दिष्टाप्रत कामातील गतिमंदता वेदनादायीच. पैसेच खर्च न झाल्याने यंदा त्यावरील अर्थसंकल्पीय तरतूदही निम्म्यावर आली. जागतिक दर्जाचे २०० हून अधिक एआय स्टार्टअप, आरोग्य, शेती आणि शिक्षण क्षेत्रातील १०० गंभीर समस्यांवर एआय-समर्थ उपायांचा शोध, २० लाखांहून अधिक तरुणांना एआय तंत्रज्ञानाचे आधुनिक शिक्षण वगैरे मिशनची उद्दिष्टे अद्याप कैक योजने दूरच आहेत. एआय तंत्रज्ञानाचा कणा आणि एआय प्रज्ञावंत घडवण्यासाठी आवश्यक शक्ती म्हणजे स्वत:चे ‘कॉम्प्युटर इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम)’ यांच्या विकासातही आपल्या हाती अजून काही लागू शकलेले नाही. धडाकेबाज धाडस नको, वेगाच्या मागे धावणारा पैशापासरी ध्यास नको, पण सध्या दिसून येणारी मंद गतीही नको. शक्य तितक्या लवकर हे घडून यावे असाही नागेश्वरन यांचा स्वाभाविक आग्रह आहे.

एआय विश्वगुरू ही महत्त्वाकांक्षा गैर नाही. मात्र वाटचाल जनकेंद्रित भूमिकेतून आणि विकसनशील जगाचा नायक या अर्थाने असायला हवी. नागेश्वरन सांगतात त्याप्रमाणे-पूर्वापार जडलेले सांस्कृतिक-सामाजिक दोष-अवगुण न झटकता, उद्दिष्टानुसार कामाला जुंपलेल्या यंत्रणा व पायाभूत व्यवस्थेचा अभाव, राजकीय इच्छाशक्तीविना आपण एआयचे केवळ वापरकर्ते बनू, निर्माते नव्हे. वाट चुकली तर, हाती असलेली संधीही जखम देणार्‍या वेदनेत बदलताना दिसेल.