कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे लोकांना आपले पोटापाण्याचे व्यवसाय गमावावे लागतील, ही भीती एका वेगळ्याच रूपात प्रत्यक्षात आलेली नुकतीच दिसली. पुस्तकाचे परीक्षण करण्यासाठी एआयचा वापर केल्यामुळे ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये मुक्त पत्रकार असलेल्या एका समीक्षकाला आपले काम गमावावे लागले आहे. ॲलेक्स प्रेस्टन असे या समीक्षकाचे नाव असून ऑगस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका परीक्षणावरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रेस्टन यांनी केलेले आणि ऑगस्टमध्ये प्रसिद्ध झालेले परीक्षण आणि त्याच पुस्तकाचे ‘द गार्डियन’मध्ये प्रसिद्ध झालेले परीक्षण यात कमालीचे साम्य असल्याच्या तक्रारी वाचकांनी ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. प्रीस्टन यांनी परीक्षण लिहिण्यासाठी एआय टूलचा वापर केल्याचे चौकशीत मान्य केले. या टूलने ‘द गार्डियन’मधील लेखाचा भाग घेतल्याचे आपल्या लक्षात आले नाही, अशी कबुली त्यांनी दिली.
संपादकीय विभागातील कर्मचारी पत्रकार असोत किंवा मुक्त पत्रकार- त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून राहणे आणि अन्य लेखकांच्या लेखनाचा श्रेय न देता समावेश करणे, ही ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या सचोटीचे आणि पत्रकारितेच्या मूलभूत मानकांचे गंभीर उल्लंघन करणारी बाब आहे, असे ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या प्रवक्त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. प्रेस्टन यांनी २०२१ ते २०२६ या कालावधीत ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये सहा परीक्षणे लिहिली होती.
या वादात सापडलेल्या परीक्षणाचा शेवट त्यांनी ‘सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, विरोधाभासांनी भरलेल्या, घायाळ, युद्धग्रस्त, विभागलेल्या, दिशाहीन आणि चमत्कारिक अवस्थेतील देशासाठी गायलेले हे एक प्रेमगीत आहे. एक अशी इटली, जिथे जीवन म्हणजे एक वेशभूषा आणि कलेचा प्रयोग आहे, जिथे ओसाड जमिनीवर सर्कस उभी राहते.’ अशा शब्दांत केला आहे. या शेवटाचे ‘गार्डियन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या परीक्षणातील उल्लेखांशी साधर्म्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर विविध माध्यमांना प्रतिक्रिया देताना प्रेस्टन यांनी म्हटले की, याआधी आपण कधीही लेखनासाठी एआयचा वापर केलेला नाही. झालेली चूक लक्षात येताच आपण ताबडतोब ‘द न्यू यॉर्क टाइम्स’शी संपर्क साधून पूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि माफी मागितली. प्रेस्टन हे सहा पुस्तकांचे लेखक आहेत.
‘अ स्ट्रेंजर इन कोर्फु’ हे त्यांचे ताजे पुस्तक गेल्या महिन्यात ‘पेगासस बुक्स’द्वारे प्रकाशित झाले असून त्याचे वितरण ‘सायमन अँड शुस्टर’ने केले आहे. त्यांनी ‘फायनान्शियल टाइम्स’, ‘द इकॉनॉमिस्ट’ आणि ‘द गार्डियन’ यांसारख्या माध्यमांमध्येही लेखन केले आहे. ते ‘मॅन ग्रुप’ या गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीमध्ये सल्लागार विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, त्यांनी या कंपनीच्या संकेतस्थळासाठी ‘द एआय बबल : हिडन रिस्क्स अँड अपॉच्र्युनिटीज’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता.
