अजिंक्य रहाणेने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत एका संस्मरणीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला. ६ जून १९८८ रोजी संगमनेर तालुक्यातील अश्वी खुर्द येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रहाणेचा क्रिकेट प्रवास सातव्या वर्षी डोंबिवलीतील एका प्रशिक्षण शिबिरात सुरू झाला.  पुढे सराव किंवा सामने खेळण्यासाठी क्रिकेट साहित्याने भरलेली मोठी बॅग घेऊन डोंबिवलीहून रेल्वेने तासनतास प्रवास करून चर्चगेट, दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठावे लागे.  मुंबईच्या समृद्ध क्रिकेट संस्कृतीत तांत्रिकदृष्ट्या सक्षम फलंदाज म्हणून तो घडला. त्याच्यासाठी माजी कसोटीपटू प्रवीण अमरे यांचेही मार्गदर्शन मोलाचे ठरले.

शालेय, क्लब आणि रणजी क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले व पुढे कसोटी संघाचा विश्वासार्ह आधारस्तंभ ठरला. तंत्रशुद्ध फलंदाजी, संयम आणि वेगवान गोलंदाजांविरुद्ध आत्मविश्वासाने खेळण्याची क्षमता, ही रहाणेच्या फलंदाजीची प्रमुख वैशिष्ट्ये. परदेशातील खेळपट्ट्यांवरील त्याची कामगिरी विशेष उठून दिसली. २०१४ मध्ये लॉर्ड्सवरील शतक, तसेच मेलबर्न, वेलिंग्टन आणि जोहान्सबर्ग येथील संस्मरणीय खेळींमुळे त्याने कसोटी फलंदाज म्हणून लौकिक मिळवला. मायदेशातही त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका कसोटीच्या दोन्ही डावांत शतक झळकावण्याची दुर्मीळ किमया साधली. त्याच्या कारकीर्दीतील सर्वोच्च बिंदू २०२०-२१ चा ऑस्ट्रेलिया दौरा ठरला. ॲडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या सामन्याच्या दुसर्‍या डावात भारतीय संघ अवघ्या ३६ धावांत गारद झाला. त्यानंतर तत्कालीन कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर गेल्याने नेतृत्वाची जबाबदारी रहाणेकडे सोपवण्यात आली.

मेलबर्न येथे झालेल्या दुसर्‍या कसोटीत त्याने अविस्मरणीय शतक झळकावत भारताला विजय मिळवून दिला. दुखापतींमुळे अनेक प्रमुख खेळाडू संघाबाहेर होत असतानाही युवा आणि नवख्या खेळाडूंना एकत्र बांधून त्याने ब्रिस्बेन येथे भारताला मालिका विजय मिळवून दिला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत संस्मरणीय परदेश दौर्‍यांपैकी हा एक मानला जातो. याच मालिकेदरम्यान प्रेक्षकांतील काहींनी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टिप्पणी केल्यानंतर, त्या व्यक्तींना मैदानाबाहेर काढल्याशिवाय आम्ही पुढे सामना खेळणार नाही, अशी ठाम भूमिका घेणारा रहाणेही सर्वांनी पाहिला. कारकीर्दीदरम्यान त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. फलंदाजीतील सातत्य कमी झाल्याने त्याला संघाबाहेरही व्हावे लागले. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मेहनत घेत राहिला. कर्णधार म्हणून त्याने मुंबईला रणजी करंडकही (२०२३-२४) जिंकून दिला. आकडेवारीच्या निकषावर, ८५ कसोटी सामन्यांतील ५०७७ धावा, १२ शतके आणि ३८.५६ ची सरासरी त्याच्या प्रतिभेला पूर्ण न्याय देत नाही. क्रिकेटमध्ये आकड्यांना मोठे महत्त्व असले, तरी काही खेळाडू धावांपेक्षा त्यांनी घडवलेल्या क्षणांसाठी, संकटसमयी दाखवलेल्या धैर्यासाठी ओळखले जातात. अजिंक्य रहाणे त्यापैकीच. झुंजार फलंदाज, कुशल कर्णधार, ‘स्लीप’मधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि एक सुसंस्कृत, संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून तो भारतीय क्रिकेटप्रेमींच्या कायम स्मरणात राहील.