समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि लोकसभेतील खासदार अखिलेश यादव जुन्या संसद भवनातील काँग्रेसच्या कार्यालयामध्ये काँग्रेस नेत्यांशी हास्यविनोद करताना दिसले. सोनिया गांधींचा वाढदिवस होता, केक कापून तो साजरा झाला. अखिलेश आणि डिम्पल यादव हेदेखील या उत्साहात सामील झाले होते. हे थोडं आश्चर्यकारकच म्हटलं पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये २०२७ मध्ये विधानसभेची निवडणूक आहे. तिथं सप-काँग्रेस एकत्र लढणार की नाही, हे अखिलेश यादव यांच्यावर अवलंबून आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा झालेला फियास्को पाहिल्यानंतर अखिलेश यांनी काँग्रेसपासून थोडं दूर राहण्याचं ठरवल्याचं सांगितलं जातं. निवडणुकीला वेळ आहे पण, राज्यात राजकारण काय करायचं हे अखिलेश ठरवणार. सोनिया गांधींचा वाढदिवस साजरा करायला अखिलेश आल्यामुळं काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये ‘सप’ला सोडायचं नाही असा संदेश गेला. गेल्या विधानसभेत काँग्रेसची युती करून ‘सप’ला काही मिळालं नाही. बिहारमध्ये यावेळी तेच झालं. निकाल लागल्यावर तेजस्वी यादव यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं होतं. त्यातून अखिलेश यादव यांनी शहाणपण घेतल्याचंही बोललं गेलं. आणि तरीही अखिलेश यांनी काँग्रेसच्या कार्यालयात येऊन सोनिया गांधींचा वाढदिवस साजरा केला. त्यावरून एक गोष्ट मात्र पुन्हा पुन्हा पाहायला मिळते ती म्हणजे सोनिया गांधी अजूनही विरोधी पक्षांमधील दुवा आहेत. काँग्रेस पक्षाचा मान राखला जावो वा नाही पण, विरोधी पक्षांचे नेते सोनिया गांधींचा आदर करतात!… राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचं भाषण जोरदार झालं. खरगेंचं काय करायचं असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडला होता. खरगेंनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्यावर काही मिनिटं सत्ताधाऱ्यांनाच नव्हे, सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनाही नेमकं काय होतंय हे कळत नव्हतं. अखेर नड्डा अस्वस्थ होऊन उठले आणि खरगेंना विरोध करू लागले तेव्हा राधाकृष्णन यांच्या लक्षात आलं की, विरोधकांना अडवलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेलं ‘कार्य’ ते विसरून गेले होते. नड्डांमुळे ते त्यांच्या लक्षात आलं असावं. मग, नेहमीचे माइक बंदचे प्रकार झाले. मध्येच खरगेंचा माइक सुरू झाला. संपूर्ण वेळ सोनिया गांधी बसून होत्या. त्यांनी खरगेंना इशारा केला की, माइक सुरू झाला आहे, तुम्ही बोलत राहा. सत्ताधाऱ्यांनी कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका… खरगेंनीही बोलायला सुरुवात केली. खरगेंच्या बोलण्याला वैतागून अमित शहा उठून निघून गेले. शहा निघून जात असताना सोनियांसह काँग्रेसवाले त्यांना खरगेंचं भाषण ऐकून तरी जा, असं हातवारे करून सांगत होते. हे सगळं नाट्य झाल्यावर संसदेच्या आवारात मकरद्वारासमोर टीव्हीवाल्या पत्रकारांनी सोनिया गांधींना वाढदिवशी काय संदेश देणार, असं विचारलं तर त्यांनी, ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या आणि त्या संसदेच्या पक्ष कार्यालयात निघून गेल्या. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यालयात गेले. त्यांच्याबरोबर अखिलेश यादवही पोहोचले. ‘सप’ नेत्यांच्या उपस्थितीमुळे एकप्रकारे ‘इंडिया’च्या वतीने सोनिया गांधींचा वाढदिवस साजरा झाला असंही म्हणता येईल.
पाळंमुळं अजून घट्ट
देशभरात पंतप्रधान कार्यालयाइतकं शक्तिशाली ठिकाण नाही. तिथला सगळा कारभार अत्यंत शांतपणे चाललेला असतो. त्यामुळं तिथं टाचणी पडली तरी आवाज येतो. असा आवाज आठ-दहा दिवस येत होता, आता बंद झाला. मोदींच्या मंत्रिमंडळातील बदलाची चर्चा होत नसेल इतकी चर्चा पंतप्रधान कार्यालयातील बदलांवरून होते हेही त्यानिमित्ताने लक्षात आलं. या कार्यालयात मोदींचे एक ओएसडी आहेत त्यांचं नाव हिरेन जोशी. गेल्या अकरा वर्षांत या जोशींना फारसं कोणी पाहिलेलं नाही. ते सार्वजनिक व्यासपीठावर येत नाहीत. जाहीरपणे चर्चा करत नाहीत. ते अदृश्य राहून काम करतात. पण, त्यांची नजर सगळ्यांवर असते. मोदींचे अमित शहा उजवे हात असतील तर जोशी डावे. मोदींच्या मंत्र्यांचा दबदबा नाही तेवढा जोशींचा आहे. त्यांच्या परवानगीशिवाय मोदींना भेटता येणं मुश्कील असतं असं म्हणतात. दिल्लीतील माध्यमांच्या वर्तुळात असं म्हणतात की, हे जोशी नोएडातील माध्यमांचे खरे ‘मायबाप’ आहेत. मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचा, राजकीय चर्चांचा अजेंडा हे जोशी दररोज निश्चित करतात असं मानलं जातं. मोदी-भाजपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या माध्यमांचे, त्यांच्या पत्रकारांचे ते कर्तेधर्ते आहेत, असं म्हणतात. कदाचित ते खरंही असेल. कारण, या जोशींची पंतप्रधान कार्यालयातून रवानगी झाली अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती आणि एकच गदारोळ झाला. असं झालंच कसं? मोदींनी आपल्या सर्वात विश्वासू व्यक्तीला जाऊ कसं दिलं? असं काय झालं की खुद्द जोशींनाही जावं लागलं? दिल्लीत माध्यमांच्या वर्तुळात चार-पाच दिवस हीच चर्चा. कोणी यूट्यूब चॅनलवर अर्धा तासांचे कार्यक्रम केले. वरिष्ठ पत्रकारांनी त्यांच्या पुस्तकातील हिरेन जोशींवरील उतारा वाचून दाखवला. चर्चा इतकी की, जणू देशाच्या पंतप्रधानांनीच राजीनामा दिला असावा! पण, जोशी अजून आहेत तिथंच आहेत. त्यांना मोदींनी हटवलेलं नाही. कोणावर किती आरोप झाले असोत पण, मोदी विश्वासू माणसाला दूर करत नाहीत. जोशींना ते निदान चर्चेत असताना तरी बाजूला करण्याची शक्यता नाही. जोशींचा एककलमी कार्यक्रम म्हणजे मोदींची प्रतिमा बनवणं, त्या प्रतिमेला अधिकाधिक लकाकी आणणं. हे काम अत्यंत निष्ठेनं ते करतात. त्यांना पत्रकारितेशी काही देणंघेणं नाही. मोदी आणि त्यांचा अजेंडा राबवणं हे आपलं कर्तव्य आहे असं जोशी मानतात. दररोज न थकता तेच काम ते करतात. भाजपमधील लोक म्हणतात की, ही पाळंमुळं खूप घट्ट आहेत, झाड असं उन्मळून पडणार नाही. ते खरंही असेल पण, या निमित्तानं पंतप्रधान कार्यालय वा सत्तेच्या दरबारातील कुठल्या तरी कोपऱ्यातून नाराजीचे हलकेसे का होईना सूर बाहेर येऊ लागले आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
थोडं सरकून घ्या
आधी कळलं होतं की, लोकसभेत राहुल गांधी निवडणूक सुधारणांवरील चर्चेची सुरुवात करणार. पण, त्याच वेळी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वंदे मातरमवर बोलणार होते. त्यामुळं राहुल गांधींचं भाषण थोडं पुढं गेलं असावं. त्याच दिवशी दुपारी चारच्या सुमारास ते सुरू झालं. त्यावेळी अमित शहाही लोकसभेत आले होते. सभागृहाचं सगळं लक्ष राहुल गांधींकडं वळालं होतं. पहिल्या बाकावरून ते बोलत होते, मागं काँग्रेसच्या खासदारांची घाई सुरू होती. राहुल गांधींच्या आसन रांगेत त्यांना सगळ्यांना बसायचं होतं. त्यामागं दोन उद्दिष्टं होती, एक. राहुल गांधींना काँग्रेसच्या सदस्यांचा पाठिंबा लोकांना दिसला असता. दोन. ते स्वत: कॅमेऱ्यामध्ये येणार असल्यानं राहुल गांधींच्या भाषणावेळी आम्ही होतो असं दिसलं असतं. त्यासाठी जागा शोधण्याचा आटापिटा सुरू होता. जिथं मोकळी जागा मिळेल तिथं काँग्रेसचे खासदार स्वत:ला सामावून घेत होते. ज्या बाकड्यावर जागा मोकळी होती तिथल्या खासदाराला थोडं सरकून घ्या, असं सांगणं चाललं होतं. आपापल्या सहकाऱ्यांना ये-ये इथं जागा आहे वगैरे सगळं सुरू होतं. राहुल गांधींचं भाषण अजून सुरू व्हायचं होतं, ही सगळी लगबगच सुरू होती. तेवढ्यात कोणी तरी आणलेल्या बॉक्समधून छोट्या गोळीच्या आकारातील मिठाई फिरवली जात होती. शेवटच्या बाकावरून अगदी पुढेपर्यंत पोहोचली होती. असा सगळा साग्रसंगीत कार्यक्रम सुरू असताना अचानक सत्ताधारी बाकांवरून एक सदस्य उठून पुढे येऊन बसले. त्यांना नेमकं काय झालं होतं माहीत नाही. पण, ते हात जोडून उभे राहात होते. त्यांना लोकसभाध्यक्षांनी समजावून सांगितलं. दुर्लक्ष केलं. शहांनी त्यांना बसायला सांगितलं तरी त्यांचं हात जोडणं काही संपेना. राहुल गांधींच्या भाषणाच्या मध्ये मध्ये ते हात जोडून काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या शेजारी दोन सदस्य येऊन बसले. मग मात्र ते उठले नाहीत. राहुल गांधींच्या भाषणादरम्यान इतकं सारं नाट्य घडलं. सत्ताधाऱ्यांनी आरडाओरडा केला तो वेगळाच.
आघाडी व्हायची नाय
राज्यात जिल्हा परिषदा, महापालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अजून झालेल्या नाहीत. स्थानिक स्तरावर युत्या-आघाड्या होतील. मुद्दा महापालिकांच्या निवडणुकीत, तेही मुंबईमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही? शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की, काँग्रेस आमच्याबरोबर येणार. काँग्रेसच्या नेतृत्वाने प्रदेश नेत्यांना ठणकावलेलं आहे. आता या नेत्यांचं विरोधात बोलणं थांबलेलं आहे. हे खरं आहे. प्रदेश काँग्रेसचे नेते जाहीरपणे विरोध करताना दिसत नाहीत. मध्ये काही नेत्यांनी दोन ठाकरे एकत्र येण्यावरून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ते एकत्र आले तर आम्ही त्यांच्याबरोबर आघाडी करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलेला होता. पण, हे काँग्रेसचे नेते दिल्लीत आल्यावर खासगी गप्पांमध्ये मात्र आम्ही आघाडी करणार नाही, याच मुद्द्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतं. संसदेमध्ये आलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते सांगत होते की, आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू शकत नाही. तसं होणार नाही. काँग्रेसचे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं होतं की, महापालिकेमध्ये आम्ही एकत्र लढू असं वाटत नाही. लोकसभेलादेखील भिवंडी, सांगली, वर्धा अशा काही जागा आमच्या होत्या. ऐनवेळी त्या आमच्या हातून गेल्या. प्रत्येक वेळी काँग्रेसचं नुकसान होतंय. महापालिका निवडणुकीत आम्ही एकत्र लढलो तर पुन्हा नुकसान होईल. त्यापेक्षा स्वतंत्र लढलं पाहिजे. या नेत्याचं काँग्रेसमध्ये वजन मोठं आहे, ते जर आघाडीविरोधात असतील तर महापालिकेत कदाचित काँग्रेस ‘एकलो चलो रे’चा नारा देण्याची शक्यता जास्त दिसते.
