शस्त्रास्त्र विज्ञान आणि निर्मितीमध्ये अमेरिकेला तोडीस तोड टक्कर देणार्या देशांमध्ये सोव्हिएत रशिया आणि नंतर रशियाचे नाव वर्षानुवर्षे घेतले जाते. कलश्निकॉव्ह बंदुका असोत किंवा मिग आणि सुखोईसारखी लढाऊ विमाने असोत, सोव्हिएत आणि सध्याच्या रशियाने स्वतंत्र मानदंड निश्चितच निर्माण केले.
क्षेपणास्त्र निर्मितीमध्येही रशियाचे नाव आजही वरचे आहे. अशा क्षेपणास्त्र मालिकेतील एका विध्वंसक क्षेपणास्त्राच्या- ब्रह्मोसच्या- निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेले अभियंता अलेक्झांडर लिओनॉव यांचे नुकतेच निधन झाले. ब्रह्मोस क्षेपणास्त्र रशिया आणि भारत यांच्यातर्फे संयुक्तरीत्या बनवले जाते. ब्रह्मपुत्रा आणि मोस्कावा या दोन महत्त्वाच्या नावांवरून ‘ब्रह्मोस’ हे नाव दिले गेले. तेव्हा लिओनॉव यांचे योगदान भारताच्या दृष्टीने अत्यंत कळीचे ठरते.
कारण स्वनातीत संचार (सुपरसॉनिक क्रूझ) प्रकारातील ब्रह्मोससारखे क्षेपणास्त्र फार देशांकडे नाही. आणि अलीकडे भारत वगळल्यास कोणत्याच देशाने त्याचा कारवाईत वापर केलेला नाही. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये त्याचा वापर करून पाकिस्तानला जेरीस आणले. बह्मोससमोर आम्हाला कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनाही त्या वेळी द्यावी लागली होती. किंबहुना, ब्रह्मोसचा मारा तीव्र झाल्यानंतरच पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी बोलणी सुरू केली होती. ब्रह्मोस ज्या मूळ क्षेपणास्त्राच्या आराखड्यावर संरचित झाले, ते ऑनिक्स क्षेपणास्त्र लिओनॉव यांच्याच नेतृत्वाखाली विकसित झाले होते.
लिओनॉव हे क्षेपणास्त्र आणि अग्निबाण निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या एनपीओ माशिनोस्त्रोयेनिया या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ही कंपनी ब्रह्मोस एरोस्पेस कंपनीतील एक भागीदार आहे. लिओनॉव यांचा जन्म १९५२ मध्ये मॉस्कोत झाला. मॉस्को इ्स्टिटट्यूट ऑफ एव्हिएशनमध्ये पदवी घेतल्यानंतर ते १९७५ मध्ये एनपीओ माशिनोस्त्रोयेनिया कंपनीत रुजू झाले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रशियाने अलीकडे त्सिरकॉन हे अत्यधिस्वनी (हायपरसॉनिक) क्षेपणास्त्र तैनात केले. युक्रेन युद्धात या क्षेपणास्त्राचा वापर रशियाने नुकताच केला. लिओनॉव यांनी ऑनिक्स, त्सिरकॉन आणि ब्रह्मोस या तिन्ही क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.
ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वेग वाढवला जाऊन सुधारित ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशियाच्या वतीने संयुक्तपणे विकसित केले जात आहे. स्वनातीत क्षेपणास्त्रांकडून जग आता अत्यधिस्वनी क्षेपणास्त्रांच्या युगात प्रवेशत आहे. रशिया-युक्रेन संघर्ष किंवा इराण-अमेरिका/ इस्रायल संघर्षात अशा क्षेपणास्त्रांचे महत्त्व अधोरेखित झाले. चीन आणि पाकिस्तान या शत्रुराष्ट्रांचा दुहेरी धोका लक्षात घेता भारतानेही अशा क्षेपणास्त्रांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे.
स्वतंत्र भारताला सामरिकदृष्ट्या सुसज्ज बनवण्यात रशियाकडून मिळालेल्या सामग्रीचा आणि तंत्रज्ञानाचा मोठा वाटा होता. त्या सामरिक संबंधांमध्ये लिओनॉवसारखे संशोधक महत्त्वाचा दुवा ठरले. रशियाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमातही लिओनॉव यांचा सक्रिय सहभाग होता. युक्रेनच्या युद्धभूमीवर रशियाला मिळणारे यश संमिश्र स्वरूपाचे असले तरी अजूनही लिओनॉव यांनी विकसित केलेल्या क्षेपणास्त्र प्रणाली युक्रेन किंवा इतरत्र अभेद्य ठरत आहेत. हे यश सोव्हिएतकालीन लष्करी अभियांत्रिकी व्यवस्थेचेही आहे. लिओनॉव कदाचित त्या शृंखलेतील अखेरचा दुवा होते.
