चांद्र मास आणि सौर वर्ष याच संकल्पनेवर आधारित दोन पद्धतीच्या कालगणना आहेत हे पाहिलं आपण — पौर्णिमान्त (विक्रम संवत्सर आणि प्रामुख्याने उत्तर भारतात प्रचलित) आणि आमान्त (शालिवाहन शक आणि प्रामुख्याने दक्षिण भारतात प्रचलित).

बाकी चर्चेपूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला पाहिजे. जूलियन किंवा ग्रेगरियन कालगणनांची नावं तत्कालीन सत्ताधीशांवर आधारित आहेत. पण सुदैवाने हे ‘काळाचे गणित’ प्रत्यक्षात सोडवणाऱ्या तज्ज्ञांची नावंही आपल्याला माहीत आहेत. त्या अत्यंत प्रगल्भ अशा शालिवाहन शक आणि विक्रम संवत यांचे पंचांगकर्ते नेमके कोण हे मात्र आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. असो.

एक लक्षात घेतलं पाहिजे. चांद्र मास आणि सौर वर्ष अशा कालगणनांमधे महिन्याची सुरुवात कुठून करायची हे संकेताने ठरतं. अमावास्या समाप्ती ही त्या महिन्याची समाप्ती असं म्हणता येतं, पौर्णिमा समाप्ती ही त्या महिन्याची समाप्ती असंही म्हणता येतं. आणि यात काही चूक किंवा आक्षेपार्ह नाही.

आणि तरीही पौर्णिमान्त आणि आमान्त या दोन पद्धतींमधली आमान्त पद्धत अधिक तर्कसुसंगत आहे असं म्हणता येतं. का ते आज पाहू. पण त्यासाठी थोडं, गरजेपुरतं पूर्वसूत्र.

१९ मार्च २०२६ या दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदा असेल — शालिवाहन शकानुसार आणि विक्रम संवतानुसारदेखील. दोन्ही कालगणनांचं नवं वर्ष त्याच दिवशी सुरू होईल — शालिवाहन शक १९४८ आणि विक्रम संवत २०८३.

३ मार्च २०२६ या दिवशी फाल्गुन पौर्णिमा (होळी) असेल — शालिवाहन शकानुसार आणि विक्रम संवतानुसारदेखील. म्हणजे फाल्गुन पौर्णिमा आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा या दोन दिवसांबाबत दोन्ही कालगणनांमध्ये पूर्ण एकमत आहे. आणि हे अपेक्षितच आहे. कारण दोन्ही कालगणनांमध्ये शुक्ल पक्षाबाबत एकवाक्यता असते.

पण, आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे, फाल्गुन पौर्णिमेनंतर विक्रम संवतानुसार फाल्गुन महिना संपला. आणि चैत्र महिना सुरू झाला. महिना चैत्र पण संवत्सर मात्र २०८२! कारण नवं वर्ष सुरू व्हायला अजून १५ दिवस जायचे आहेत!

तेव्हा, ३ मार्च ते १९ मार्च या कालावधीत विक्रम संवतात महिना असेल चैत्र, पक्ष असेल कृष्ण आणि २०८२वं संवत्सर चालू असेल. त्यानंतर चैत्र शुक्ल प्रतिपदा येईल आणि विक्रम संवत २०८३ सुरू होईल. म्हणजे चैत्र महिन्याचा कृष्ण पक्ष आदल्या संवत्सरात आणि शुक्ल पक्ष पुढल्या संवत्सरात असा प्रकार!

शालिवाहन शकात आणि पर्यायाने कोणत्याही आमान्त कालगणनेत हा प्रकार संभवत नाही. कारण ३ मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेनंतर या कालगणनांमध्ये फाल्गुन कृष्ण पक्ष चालू होईल. आणि १९ मार्च रोजी फाल्गुन महिनाही संपेल आणि शक संवत्सर १९४७ देखील.

सर्वसाधारण संकेत असा आहे की काळाचं मोठं एकक संपतं त्याच क्षणी त्या एककाचे छोटे भाग असलेली काळाची एककही संपावीत. उदाहरणार्थ, ग्रेगरियन कालगणनेत ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ते वर्ष संपतं, डिसेंबर महिना संपतो आणि ३१ तारीखही संपते. किंवा शालिवाहन शक १९४७ संपेल त्याच क्षणी फाल्गुन महिनाही संपेल, फाल्गुन कृष्ण पक्षही संपेल आणि फाल्गुन अमावास्याही संपेल.

पण पौर्णिमान्त कालगणनेनुसार मात्र महिना अर्धा संपलेला असतानाच चक्क नवं वर्ष सुरू होतं! हे तितकं तर्कसुसंगत वाटत नाही. सोबतची आकृती पाहा म्हणजे मुद्दा नेमका लक्षात येईल.

दुसरं असं की पौर्णिमेच्या आदला दिवस, पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या नंतरचा दिवस यांतला फरक नुसत्या डोळ्याला कळणं अवघड. चंद्र साधारण पूर्णच दिसतो. तो सूर्यास्ताच्या आसपास पूर्व क्षितिजावर उगवतो आणि सूर्योदयाच्या आसपास पश्चिम क्षितिजावर मावळतो.

पण अमावास्येचं तसं नाही. अमावास्या या बाबतीत जादूई आहे. अमावास्येच्या आदल्या दिवशी सूर्योदयापूर्वी काही काळ पूर्व क्षितिजावर चंद्र उगवलेला दिसतो. मग सूर्योदय होतो. चंद्र दिसेनासा होतो. हेच अमावास्येनंतर मात्र सूर्यास्तानंतर काही काळाने पश्चिम क्षितिजावर चंद्रास्त होतो. अवघ्या एका दिवसात जादू झाल्यासारखं चंद्र दिसण्याची वेळ आणि स्थान दोन्ही पूर्णपणे बदलतं — अगदी शब्दश: १८०त्तून! कालपरवापर्यंत सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर दिसणारा चंद्र त्याच नाजूक कोरीसह पण सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर दिसू लागतो. ‘सूर्योदया’च्या जागी ‘सूर्यास्त’ आला, ‘सूर्योदयापूर्वी’च्या जागी ‘सूर्यास्तानंतर’ आलं आणि ‘पूर्व क्षितिजा’च्या जागी ‘पश्चिम क्षितिज’ आलं! नुसत्या डोळ्यांना कोणत्याही साधनाशिवाय हा बदल सहज टिपता येतो.

वर्ष समाप्तीबरोबरच महिन्याची, पक्षाची आणि तिथीची समाप्ती साधणाऱ्या, नुसत्या डोळ्यांना जाणवू शकेल अशा वेळी महिन्याची समाप्ती करणाऱ्या आणि नव्या, वर्धिष्णु चंद्राबरोबर नवा महिना सुरू करणाऱ्या आमान्त कालगणना या नववर्षाचा पहिलाच महिना दुभंगणाऱ्या आणि घटत्या चंद्राबरोबर नवा महिना चालू करणाऱ्या पौर्णिमान्त कालगणनांपेक्षा अधिक तर्कसुसंगत वाटतात.