वा सदामामा वा! भ्रष्टाचार व्हायलाच हवा पण त्याची टक्केवारी थोडी कमी व्हायला हवी हे बोलण्याचे धैर्य भरसभेत दाखवल्याबद्दल तुमचे त्रिवार अभिनंदन! या कृतीमुळे तुम्ही अंबरनाथचे नाव सार्‍या देशात ‘रोशन’ केले. एरवी कोण कुठले उपनगराध्यक्ष असा प्रश्न कुणीही अगदी सहजपणे विचारला असता. कोण हे सदाशिव पाटील असेही म्हटले असते. आता तुम्हाला सारा देश ओळखेल. सोबतीला तुमचे टोपणनाव आहेच. तेव्हा आता उगीच ताकाला जाऊन भांडे लपवायचे नाही. असेच सत्य व परखड भाष्य करत राहायचे. राजकारणात सक्रिय असलेले सारेच नेते भ्रष्टाचाराला थारा नाही असे कायम म्हणतात. प्रत्यक्षात तेच त्यात लिप्त असतात. हा दांभिकपणाचा बुरखा तुम्ही टराटरा फाडलात. पुराणकाळापासून मामांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहेच. कंस असो वा शकुनी. आता तुमचाच क्रमांक. राजकीय इतिहासात तुमचे हे वाक्य सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवले जाईल.

अलीकडे तुमच्या क्षेत्राला ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाण्याची सवय जडलेली. केलेला विकास लवकरच भकास दिसला तरी चालेल पण आधी खिसे मजबूत भरायला हवेत असाच ध्यास. यामुळे सामान्यांच्या नजरेतही हा भ्रष्टाचार येऊ लागला. लोक जाहीरपणे लक्तरे वेशीवर टांगू लागले. राजकारण्यांची बदनामी होऊ लागली. यामुळे तुमच्यासारखा गावपातळीवरचा नेता व्यथित होऊन हे वाक्य उच्चारत असेल तर ही घटना मोठीच मानायला हवी. ‘अरे, खा पण जरा कमी खा ना’ हे सांगायला खूप मोठे मन लागते मामा. ते तुमच्याजवळ असल्याचे या वक्तव्यातून सिद्ध झाले. ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणा कधी नव्हे एवढ्या आत्यंतिक कर्तव्यक्षम झाल्या असताना तुम्ही हे धाडस दाखवल्याबद्दल तुम्हाला त्रिवार सलाम! ‘ना खाऊँगा ना खाने दुँगा’ हा देशाचा नारा असताना तुम्ही माफक प्रमाणात खाण्याचे समर्थन केले. भलेही तुम्ही आधी अजितदादा मग शिंदेसेना असा प्रवास एका झटक्यात केला असला तरी! सत्तेच्या वर्तुळात राहून असे सल्ले देणे भल्याभल्यांना जमत नाही. तुम्ही मात्र पुढाकार घेतला हे कौतुकास्पदच! मुळात भ्रष्टाचार ही कीड राहिलीच नाही आता. रोपटे झालेय ते. मनीप्लांटसारखे. त्यामुळे समूळ उखडून फेकून देण्याच्या गोष्टीच सध्या गैरलागू. हे वास्तव स्वीकारायलाच तयार नाहीत सध्याचे ‘बनेल’ राजकारणी. तुम्ही त्यांना वास्तवाच्या जवळ नेले. मामा, ही नवी पायवाट आहे राजकारणातली. वापरून वापरून त्याचा रस्ता करायचा असेल तर माफक प्रमाणातला भ्रष्टाचार कायदेशीर करा अशी मागणी तातडीने करा व त्यासाठी अंबरनाथमधूनच ‘गगनगामी’ घोषणा करत एखादे आंदोलन उभे करा. सामान्य लोक नक्की तुमच्या पाठीशी उभे राहतील.

तुकारामांचा एक अभंग आहे. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’. तो गात तुमच्यासारख्या सत्यवचनी नेत्याला लोक नक्की डोक्यावर घेतील. ते भ्रष्टाचाराचे सोडा, आजकाल राजकारणी खरे बोलतच नाहीत. लोकांनाही खोटे ऐकण्याची सवय झालेली. या वातावरणात तुम्ही खरे बोलायचे धैर्य दाखवले मामा. या खर्‍याच्या प्रसारासाठी संपूर्ण आयुष्य झोकून द्या आता. एक ना एक दिवस पक्ष नक्कीच कदर करेल तुमची आणि खरे बोलल्यावर ‘मी तसे बोललोच नव्हतो’ असे स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत तर अजिबात पडू नका. तेव्हा मामा ‘आगे बढो’ आम्ही तुमच्यासोबत आहोतच!