महाराष्ट्राच्या भूमीत येऊन ‘महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे बहुभाषिक राज्य आहे’ आणि ‘हिंदी हा सर्व भारतीय भाषांना जोडणारा ‘मध्यमणी’ आहे,’ असे शोध लावणार्‍या केंद्रीय गृहमंत्र्यांना आणि व्यासपीठावर गप्प बसून मान डोलावणार्‍या महाराष्ट्राच्या नेत्यांना ठणकावून विचारावेसे वाटते की हा महाराष्ट्राचा सन्मान आहे की मराठीच्या अस्मितेवर मारलेला दरोडा? गेल्या वर्षी पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा घाट घातला गेला. यंदा मावशीच्या नावाने आईचा गळा घोटण्याचा प्रकार उघडपणे सुरू केला आहे. मावशीचा आदर आम्ही नक्कीच करू, पण मावशीला घरात आणून आईलाच स्वयंपाकघराबाहेर काढायचा हा डाव महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे. सर्व भारतीय भाषा समान आहेत, तर मग हिंदीच ‘मध्यमणी’ का? त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली बँका, रेल्वे, पोस्ट आणि केंद्र सरकारच्या सर्वच संस्थांमधून मराठीला हद्दपार केले गेले आहे. हे त्रिभाषा सूत्र फक्त महाराष्ट्रातच का? उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यात तिसरी भाषा कोणती शिकवली जाते? – आबासाहेब पाटील, पुणे

हिंदीचा दुस्वास नको

‘महाराष्ट्र मोठे बहुभाषिक राज्य : राजभाषा संमेलनात अमित शहा यांचे प्रतिपादन’ हे वृत्त वाचले. केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांचे म्हणणे संयुक्तिक आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याला मातृभाषा, राजभाषा (हिंदी) व ज्ञानभाषा (इंग्रजी) अशा किमान तीन भाषा चांगल्या प्रकारे लिहिता,वाचता, बोलता याव्यात अशी अपेक्षा राष्ट्रीय ज्ञान आयोगाने २००५ मध्ये व्यक्त केली होती, तीही योग्यच. राष्ट्रीय ऐक्यात हिंदी मोठी भूमिका बजावू शकते, त्यामुळे हिंदीला विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही. दक्षिणेकडील हिंदीविरोध हा प्रामुख्याने मतपेढीच्या राजकारणामुळे आहे. मराठीचा आग्रह जरूर धरावा मात्र त्यासाठी हिंदीचा दुस्वास नको! – डॉ. विकास इनामदार, पुणे</strong>

दक्षिणेत हेच बोलाल?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी मुंबईत हिंदी भाषिक संमेेलनाला आले, तेथे त्यांनी महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे असे वादग्रस्त विधान केले! असेच विधान ते दक्षिणेकडील राज्यांमध्ये जाऊन करू शकतील का? मराठी माणूस सोशिक, संयमी व सर्वांना सामावून घेणारा आहे याचा अर्थ त्याला आपल्या भाषिक व प्रांतीय अस्मितेची काहीच चाड नाही असे कोणी समजून घेऊ नये. संयुक्त महाराष्ट्राचा लढा बघून तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही माघार घेतली होती. – प्रवीण नारकर, ठाणे</strong>

…तोवर आत्मघातकी ठरेल!

‘मिळतिल भूपाल अमित…’ हा अग्रलेख (१४ सप्टेंबर) वाचला. चीन आणि भारत यांच्यातील व्यापार- तफावत जवळपास १० लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. चीनने आपल्यावर गलवानचा संघर्ष लादल्यानंतरही आपल्या बाजारातील चिनी वस्तूंची आवक वाढत राहिली. तरीसुद्धा ‘ब्रिक्स’ परिषदेत आपण म्हणतो की एकमेकांच्या सीमा एकमेकांच्या व्यापारासाठी सताड उघडा? खरे तर जोपर्यंत चीनच्या बाजारपेठेत स्थान मिळवण्याइतपत आपली कारखानदारी तगडी होत नाही तोपर्यंत व्यापारावरील नियंत्रणे उठवणे हे आपल्यासाठी आत्मघातकी ठरेल. – प्रभाकर दगाजी वारुळे, मालेगाव (जि. नाशिक)

काँग्रेस भाजपच्या गळास लागते!

‘जम्मू-काश्मिरात काँग्रेसच्या भूमिकेचा भाजपलाच फायदा!’ हा अन्वयार्थ (१४ सप्टेंबर) वाचला. ‘वंदे मातरम’ सारख्या भावनिक मुद्द्यांवर वाद घालून त्यावर आपली भाकरी भाजून घेणे नेहमीच भाजपसाठी फायद्याचे व काँग्रेससाठी अपायकारक ठरले आहे. अशा मुद्द्यांवर भाजप बाजी मारून जाते व काँग्रेस त्यांच्या गळाला लागते. या वादांमुळे मूळ मुद्दे बाजूला राहतात व राजकीय खेळींमुळे लोकांचे लक्ष विचलित होते. यातून राजकीय ध्रुवीकरण घडवून आणण्याची भाजपला सुवर्णसंधी मिळते. जम्मू-काश्मीरसारख्या आधीच वादाच्या भोवर्‍यात असलेल्या राज्यात हा वाद अधिकच फोफावतो आणि भाजपचा डाव पुन्हा यशस्वी होतो. – सरिता पोटे, अहिल्यानगर
loksatta@expressindia.com