सौरभ सद्योजात
आधुनिक पर्यावरणवादी चळवळीचं अधिष्ठान ज्या ग्रंथाने घालून दिलं, त्या ‘सायलेंट स्प्रगिं’ने पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपाची आठवण करून देणारा पहिला गजर वाजवला. विशेषत: औद्योगिक क्रांतीनंतरच्या मानवी जमातीच्या स्वभावाचं आणि त्याकारणे घडतबिघडत गेलेल्या वर्तमानाचं ते सूतोवाच होतं. कीटकनाशकांचा अन्नसाखळीतील शिरकाव ते एक्यूआयचे महाचिंताजनक आकडे अशी पर्यावरण र्हासाची आपली भयावह वाटचाल आहे. सपाटीकरण आणि सुलभीकरणाच्या मगरमिठीत अडकलेली माणसं, वाढत्या गरजा आणि त्यातून निर्माण होणारी राक्षसी अमर्यादा अधोरेखित करणारी सशक्त कथानकं ही काळाची मूलभूत गरज झाली आहे. आणि विशेषत: एकविसाव्या शतकाच्या परिप्रेक्ष्यात, अमिताव घोष यांचं विविधांगी लेखन आणि कादंबर्यांचं त्या संदर्भातील योगदान हे निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. ‘घोस्ट आय’ ही त्यांची नुकतीच प्रसिद्ध झालेली कादंबरी – पर्यावरणाचे प्रश्न, अस्तित्वासाठीचे संघर्ष आणि अतींद्रिय, अतर्क्य घटितांना एकाच धाग्यात ओवण्याचा एक विलक्षण धाडसी प्रयोग आहे.
‘घोस्ट आय’ ही कथावस्तू दोन समांतर प्रवाहांत विभागलेली आहे. एक उपकथा १९६९ साली, तत्कालीन कलकत्ता आणि सुंदरबनच्या इलाख्यात घडते. पूर्णपणे शाकाहारी असणार्या, धनाढ्य मारवाडी कुटुंबातील तीन वर्षांची चिमुरडी अचानकपणे मासे खाण्याची तीव्र इच्छा व्यक्त करते आणि या अनाकलनीय मागणीची पाळंमुळं खणत जाता, तिचा पुनर्जन्म झाल्याचं लक्षात येतं. तिच्या पूर्वायुष्याचा शोध, त्यामागची मानसशास्त्रीय मीमांसा आणि अतींद्रिय व अतर्क्य घटनांची विस्तीर्ण वर्णनं यात वाचावयास मिळतात. याला समांतर चालणारी दुसरी उपकथा ही कोविडच्या भीषण कालखंडात, न्यूयॉर्क शहरात स्थिरावल्याची दिसून येते. दिनू दत्त या पात्राच्या दृष्टिकोनातून आजघडीचा अस्वस्थ भवताल आपल्या अनुभवास येतो.
वाचक एका वेळी कलकत्त्यात तर दुसर्या क्षणाला ब्रूकलिनमध्ये असतो. दोनही शहरांचे सूर निश्चितच वेगळे आहेत. शहरं, काळ आणि घटनांचा हा लपंडाव मजेशीर आणि आकर्षक असून हे प्रवाह शेवटी एकत्र येतात आणि त्यातील प्रभावी आंतरसंबंध पाहून, ही कादंबरी अनेक लहान-मोठ्या कथाप्रवाहांनी बांधलेल्या त्रिभुज प्रदेशासारखी वाटू लागते. परंतु काही भागांत वर्णनात्मक लेखनाचा सोस झाल्याने कथा संथगतीने पावलं टाकते आहे, असं वाटण्याचा संभवही आहे. तोच दुसर्या बाजूस, कादंबरीचा शेवट हा टोकाच्या वेगात उरकला गेल्याचं स्पष्ट आकळून येतं.
मूळ कथानकाच्या उदरात लहान सहान आणि अतार्किक कथांचे देखणे भोवरेही आहेत. पण ती गुंतागुंत रमवणारी आहे. अमिताव घोष यांनी सुंदरबनचा त्रिभुज केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही तिसरी कादंबरी असून, ‘हंग्री टाइड’ आणि ‘गन आयलंड’ या तिच्या पूर्वसुरी होत. अर्थात दिनू दत्त, टिपू, पिया ही पात्रं, मनसा देवीच्या लोककथा, बंगालमधील हवामानाचा गंध, खाद्य आणि ‘स्व’चा अविश्रांत चालणारा शोध हे या त्रयीतले महत्त्वाचे सामाईक घटक आहेत. त्यातही ‘घोस्ट आय’ विशेष का, असं एखाद्या बंगाल्यास विचारलं तर तो म्हणेल- मासे!
अकस्मातपणे मासे मागणार्या मुलीच्या पूर्वजन्माचा माग घेण्यासाठी, निरनिराळ्या माशांचे पदार्थ बनवले जातात. ते मासे, त्यांची शास्त्रीय नावे, बनवण्याच्या पद्धती आणि त्यांना ओळखण्याचे ठोकताळे यांबद्दल इतके विस्तृत तपशील येतात की या ग्रंथाचं दुसरं नामकरण ‘मत्स्य पुराण’ केलं तरी ते वावगं वाटू नये. घोष यांनी बंगाली खाने, स्थळानुरूप त्यात होणारे बदल आणि संपुष्टात आलेल्या माशांच्या प्रजाती यातून सपाटीकरणाचा धोका अधोरेखित केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील माओवादी चळवळ, अस्वस्थ व अशांत कलकत्ता, आदिवासींवर झालेले अत्याचार, कामगारांचे संप आणि स्थानिक परंपरा यांतून बंगालचं विस्तीर्ण चित्र उभं राहतं. दुसर्या बाजूस न्यू यॉर्क शहर, तिथली टाळेबंदी, चायना टाऊनमधली माशांची खरेदी असे तुरळक तपशीलही सहज येतात. पात्रांची, स्थलांतराची व प्रवासाची पार्श्वभूमी आणि त्यांच्या भेटीगाठींचे प्रसंग यांची वर्णनं खिळवून ठेवणारी आहेत. ज्या त्या परिसंस्थांमध्ये राहणार्या नागरिकांनी पर्यावरण रक्षणाची चळवळ हाती घेणं किती जरुरीचं, हे नाशिकमधल्या तपोवन प्रकरणात दिसून आलं आहे.
घोष यांच्या कथेतली पात्रंही प्रत्यक्ष जमिनीवर उतरून, आदिवासी जनभावनेचा सदुपयोग करत चळवळ उभी करतात. मोनालिसाच्या तैलचित्रावर सूप फेकल्याने मिळणार्या दोनदिवसीय गोंधळाचे केंद्रबिंदू होण्यात त्यांना रस नाही. कादंबरीच्या विस्तारात येणारे- घोष यांचे ऐतिहासिक, भूराजकीय, मानसशास्त्रीय, भौगोलिक, विज्ञानाचे आणि धार्मिक घटकांचे आकलन स्तिमित करणारे आहे. तो अर्थातच त्यांच्या अनेक दशकांच्या अभ्यासातून, अनुभवातून निर्माण झालेला व्यासंग आहे. आणि ‘घोस्ट आय’ ही अशाच निरनिराळ्या मण्यांनी ओवलेली माळ आहे, जिचे सूर पर्यावरणीय प्रश्नांची उजळणी करवतात.
‘घोस्ट आय’ ही मूलत: पर्यावरण, मानवी जीवनाचे प्रश्न आणि अलौकिक घटनांचे संदर्भ हाताळत असली तरी तिचं मूळ अधिष्ठान काही वेगळंच आहे. यातल्या घटनांना विविधांगी विषयांचे अनेक पदर आहेत. सतत डोकावणारे अनेक सूक्ष्म तपशील आहेत. नेमका एकच एक विषय कुठला, असं विचारलं तर – ‘पर्यावरण’ असं उत्तर वरकरणी योग्य आहेदेखील. परंतु ही कादंबरी तल्लखपणे लावलेल्या तीव्र मध्यमासारखी आहे. आणि हलकेच उंचावलेला हा सूर माणसांच्या वाट्याला आलेल्या अनिश्चित दु:खाचा व त्या वावटळीतून बाहेर येण्यासाठीच्या अविरत धडपडीचा संकेत देतो.
घोष यांच्या कादंबर्यांतील माणसं भूतकाळातल्या जखमांशी, प्रश्नांशी झगडतात, उत्तराच्या शोधात पावलं थकेस्तोवर चालतात. परंतु अखेर परतून येतात. स्वत:ला नव्यानं उभं करतात. नव्या सत्यासह नवा जन्म घेतात. असं नव्यानं उगवून येणं आणि परतणं, मग ते निसर्गाच्या मूळ तत्त्वांकडे असो की स्वत:कडे, ते होत राहणं हे खचितच एक मोलाचं तत्त्वज्ञान आहे. ‘घोस्ट आय’ ते प्रकर्षानं अधोरेखित करू पाहते. तुकोबा याच तत्त्वाचं वर्णन करताना सांगून गेले –
मीचि मज व्यालों। पोटा आपुलिया आलों।। घोषही याहून वेगळं काय सांगत आहेत?
घोस्ट आय
लेखक – अमिताव घोष
प्रकाशक – हार्पर कॉलिन्स
किंमत : ७९९ रु.;
पृष्ठे : ३३०
iamsaurabh09@gmail.com
