अँटवर्प १९२० च्या स्पर्धेत ऑलिम्पिकचा ध्वज प्रथम फडकवला गेला. ऑलिम्पिक शपथही त्यावेळी सर्वप्रथम उच्चारली गेली. त्यापुढच्या पॅरिस ऑलिम्पिकला ध्वज आणि बोधवाक्य मिळाले. ऑलिम्पिक ज्योत, संचलन हे सगळे त्यानंतर टप्प्याटप्प्याने समाविष्ट होत गेले.
खास ऑलिम्पिकची म्हणून जी प्रतीके ओळखली जातात, त्यांचा उगम अँटवर्प १९२० ऑलिम्पिकपासून होऊ लागला होता. त्या स्पर्धेत ऑलिम्पिकचा ध्वज प्रथम फडकवला गेला. ऑलिम्पिक शपथही त्यावेळी सर्वप्रथम उच्चारली गेली. मग पॅरिस १९२४ ऑलिम्पिकमध्ये ‘कीटीऊस (अधिक वेगवान), आल्टिऊस (अधिक उंच), फोर्टिऊस (अधिक शक्तिमान)’ हे बोधवाक्य जगासमोर पहिल्यांदा सादर झाले. म्हणजे ऑलिम्पिकला ध्वज मिळाला, ऑलिम्पिकला बोधवाक्य मिळाले. ॲमस्टरडॅमला १९२८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकने आणखी एका सुपरिचित प्रतीकाचे प्रथम ‘प्रज्वलन’ झाले.. ऑलिम्पिक ज्योत! ऑलिम्पिक ज्योत स्पर्धेच्या सुरुवातीस काही महिने आधीपासूनच जगभर फिरवली जाते. त्या यात्रेचा उगम ग्रीसमध्ये होतो. यानिमित्ताने आणखी एका संकेताचा जन्म ॲमस्टरडॅममध्ये झाला. उद्घाटन सोहळ्यामध्ये खेळाडूंच्या सांघिक संचलनाची प्रथा तेव्हापासून सुरू झाली. या प्रथेचा नियम असतो. ग्रीसचा संघ उद्घाटन स्थळी प्रथम दाखल होतो. संचलनाचा समारोप यजमान संघाच्या आगमनाने होतो. संकेत आणि प्रथा ही ऑलिम्पिकची स्वतंत्र ओळख आहे. आधुनिक ऑलिम्पिक असे नामकरण झाले असले, तरी काही जुन्या आणि नवीन परंपरा, प्रथांचा स्वीकार झाला आणि त्यांतील बहुतेक आजही टिकून आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा तो काळ युरोपात आणि त्यामुळे पाऊणेक जगात अस्थैर्याचा, अनिश्चिततेचा, अस्वस्थतेचा होता. पारंपरिक युरोपिय सत्तांमध्ये संघर्षाच्या ठिणग्या ठिकठिकाणी उठत होत्या. त्याचबरोबर, या सत्तांकडून वर्षानुवर्षे पिळवणूक होत असलेल्या वसाहतींमध्येही असंतोष आणि स्वातंत्र्य/स्वायत्ततेचे हुंकार उमटत होते. ऑलिम्पिकच्या मैदानांवर याचे पडसाद उमटणे अतिशय स्वाभाविक होते. पण हे पडसाद नकारात्मक कमी आणि आश्वासक, सकारात्मक अधिक होते. एखादे वेळी रणभूमीवर नाही, तरी क्रीडांगणावर एखाद्या बलाढ्य सत्तेविरुद्ध जिंकण्याची संधी मिळू लागली होती. यातून या वसाहतींकडे पाहण्याचा सार्वत्रिक दृष्टिकोनही काही प्रमाणात बदलू लागत होता. ऑलिम्पिक स्पर्धा या प्राधान्याने ‘युरोसेंट्रिक’ असल्याचा आरोप तेव्हा मोठ्या प्रमाणात झाला, थोड्या फार प्रमाणात तो आजही होत असतो. सुरुवातीच्या काळात अमेरिका, काही प्रमाणात ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हे देश सहभागी झाले, पण त्यांचाही पिंड आणि तोंडवळा युरोपियनच. जपान हा ऑलिम्पिकमध्ये खेळलेला पहिला आशियाई देश. मात्र आशियाई असला तरी तो मूळचा आक्रमक वसाहतवादीच. जपाननंतर ज्या आशियाई देशात ऑलिम्पिक संघटना पहिल्यांदा स्थापन झाली तो देश म्हणजे भारत! किंबहुना, ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला पहिला आशियाई वसाहती देश भारतच. या देशात १९२०च्या दशकाच्या सुरुवातीपासून ऑलिम्पिक खेळांसाठी संघटनाबांधणी आणि उत्सुकता जुळून येत होती. त्याची परिणती १९२७ मध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या स्थापनेत झाली. या ‘वसाहती’ने ॲमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये जी कमाल केली, त्याची दखल घ्यावीच लागते.
ॲमस्टरडॅम १९२८
नेदरलँड्स हा मध्ययुगीन काळापासून विज्ञान, व्यापार, विस्तार या त्रिसूत्रीच्या निकषांवर अत्यंत प्रगत मानला जायचा. काही शतके हा देश युरोपची सांस्कृतिक राजधानीही म्हणवला जायचा. ब्रिटिश आणि फ्रेंचांप्रमाणे डच वसाहतीही पृथ्वीच्या ‘या टोकापासून त्या टोकापर्यंत’ आढळतात. ऑलिम्पिक भरवण्याची यांचीही महत्त्वाकांक्षा होतीच. नेदरलँड्स ऑलिम्पिक समितीने १९२० आणि १९२४साठी यजमानपदाची उमेदवारी सादर केली. पण युद्धोत्तर सहानुभूतीमुळे १९२०चे ऑलिम्पिक अँटवर्पला बहाल झाले. पिअर दा कुबर्तांच्या पुढाकारामुळे १९२४ मधील ऑलिम्पिक पॅरिसला मिळाले. पण त्याच बैठकीत ॲमस्टरडॅममध्ये १९२८ मधील स्पर्धा होईल हे निश्चित झाले. त्या वेळी ॲमस्टरडॅमसमोर अमेरिकेतील लॉस एंजलिसचे आव्हान होते. पण लॉस एंजलिसला पुढे १९३२ मधील ऑलिम्पिक यजमानपदाची संधी मिळाली. पिअर द कुबर्ता हे ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदावरून १९२५ मध्ये निवृत्त झाले. त्यामुळे बेल्जियमचे हेन्री द बेले-लातूर हे उमराव आयओसीच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले. ते जाहीरपणे ज्यूविरोधी होते आणि महिलांनी कोणत्याही खेळात भाग घेऊ नये या मताचे होते. त्यांच्या नाकावर टिच्चून ॲमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये महिला तर खेळल्याच, पण त्या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच जिम्नॅस्टिक्स आणि ॲथलेटिक्स या क्रीडाप्रकारांमध्ये महिलांचा समावेश करण्यात आला!
सरंजामी आडमुठेपणाचा आणखी एक आविष्कार मुख्य स्पर्धेच्या वेळीच पाहायला मिळाला. सहसा ऑलिम्पिक स्पर्धांचे उद्घाटन यजमान देशाच्या राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत होते. याला अपवाद दोन स्पर्धा – सेंट लुईस १९०४ आणि ॲमस्टरडॅम १९२८. नेदरलँड्सच्या राणी विल्हेमिना ऑलिम्पिक उद्घाटनास उपस्थित नव्हत्या. उद्घाटन त्यांचे यजमान प्रिन्स हेन्ड्रिक यांच्या हस्ते झाले. विल्हेमिना नॉर्वेत सुट्टीवर होत्या. त्यांना वेळ काढून येता आले असते. पण ऑलिम्पिक चळवळ ‘पेगनिझम’चा (तत्कालीन संकल्पनेनुसार, जुनाट कर्मकांडआधारित बहुदेवत्ववाद) पुरस्कार करते, जे आधुनिक ख्रिश्चन मूल्यांच्या विपरीत आहे अशी राणीसाहेबांची धारणा होती. पण नंतर समारोपाच्या वेळी त्यांना उपस्थित राहावे लागलेच. ही स्पर्धा निर्धारित १६ दिवसांमध्ये (२८ जुलै ते १२ ऑगस्ट) आटोपण्यात आली. पुढे बहुतेक स्पर्धा इतकेच दिवस चालतील असे ठरवले गेले. संपूर्ण स्पर्धा खासगी देणग्यांच्या आधारावर भरवली गेली. या स्पर्धेपासूनच समर ऑलिम्पिक आणि विंटर ऑलिम्पिक अशा दोन स्वतंत्र नामावलींचाही जन्म झाला. पॅरिसमध्ये १९२४ पासून हिवाळी स्पर्धांना सुरुवात झाली होती. त्यातून नेमके ऑलिम्पिक कोणते असा गोंधळ उडण्याची शक्यता होती. ती टाळण्यासाठी उन्हाळी म्हणजे समर ऑलिम्पिक आणि हिवाळी अर्थात विंटर ऑलिम्पिक असा फरक करण्यात आला. पण ऑलिम्पिक म्हणजे समर ऑलिम्पिक ही ओळख रूढ आहे.
या स्पर्धेत ४६ देशांच्या २८८३ खेळाडूंनी भाग घेतला, ज्यात २७७ महिलांचा समावेश होता. अमेरिकेने त्या काळापासूनच क्रीडाक्षेत्रातील महासत्तापदाच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली होती. अमेरिकेने सर्वाधिक २२ सुवर्णपदकांसह सर्वाधिक ५६ पदके जिंकली. त्यांच्यापाठोपाठ क्रमांक लागला जर्मनीचा. पहिल्या महायुद्धातील प्रधान युद्धखोर म्हणून जर्मनीला १९२० आणि १९२४ मधील स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. पण त्यांनी १९२८मध्ये चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेतील एका मजेशीर प्रसंगाचे वर्णन स्पर्धेची चिरंतन आठवण म्हणून केले जाते. रोईंग प्रकारात ऑस्ट्रेलियन स्पर्धक हेन्री पिअर्सने उपान्त्यपूर्व फेरीत त्याची नौका थांबवली आणि एका बदकाच्या कुटुंबाला प्रवाह ओलांडू दिला. पुढे त्याने ती फेरी आणि स्पर्धाही जिंकून सुवर्णपदक जिंकले! आपण भारतीयांसाठी यापेक्षा अधिक ठसठशीत प्रसंग चिरंतन स्मृती म्हणून जोपासण्यायोग्य आहे.
सुवर्णयुगाचा प्रारंभ
ॲमस्टरडॅममध्ये भारतीय संघ प्रथमच हॉकी या खेळात सहभागी झाला. भारत यापूर्वी १९२० ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. अर्थातच स्वतंत्र देश म्हणून नव्हे, तर ब्रिटिश इंडिया म्हणून. ब्रिटिशांमुळे भारतात क्रिकेट रुळले, तसेच विशेषत: उत्तर भारतात हॉकीदेखील स्थानिकांमध्ये लोकप्रिय आणि अनुकरणीय बनले. ऑलिम्पिकमध्ये १९०८ आणि १९२० मध्ये हॉकी खेळाचा समावेश होता. भारत १९२० मध्ये ऑलिम्पिकमध्ये खेळला, पण हॉकीत सहभागी झाला नव्हता. ती संधी मिळाली १९२८ मध्ये. ऑलिम्पिकसाठी भारतीय आणि अँग्लो इंडियन असा संमिश्र संघ मुंबईहून रवाना झाला, त्यावेळी त्यांना निरोप द्यायला तीन व्यक्ती उपस्थित होत्या! हा संघ इंग्लंडमार्गे नेदरलँड्सला रवाना झाला. त्या विरामकालात भारत आणि इंग्लंड यांच्यात सराव सामना खेळवला गेला. त्यात भारताने ४-० अशी बाजी मारली. इंग्लंडने १९०८ आणि १९२० मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्या पराभवानंतर त्यांनी ॲमस्टरडॅमला हॉकी संघ पाठवलाच नाही! मुख्य स्पर्धेत भारतीय संघाला कोणाकडूनही फारसा प्रतिकारच झाला नाही. त्या संघाचा मेरुमणी होते ध्यानचंद. हॉकीऐवजी टेनिस किंवा टेबल टेनिसमध्ये शोभून दिसेल अशा स्कोअरनी भारतीय संघ जिंकत गेला. कधी ६-०, कधी ९-०, कधी ५-०. अंतिम सामन्यात यजमान नेदरलँड्सविरुद्ध सामना किंचित चुरशीचा झाला. तरी स्कोअर ३-०. स्टेडियममध्ये आणि स्टेडियमबाहेर उपस्थित ५० हजार प्रेक्षक धक्काचकित आणि कौतुकमुग्ध झाले. एका सुवर्णगाथेची ती सुरुवात होती. पुढील सलग सहा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये दिसून येणार होती.
त्या सुवर्णक्षणाचे कवित्व आणखीही होते. एखाद्या आशियाई संघाने ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले ते पहिलेवहिले सुवर्णपदक ठरले!
