लेंटीना नावाची एक सुखवस्तू कुटुंबातली महिला. पिवळ्या धम्मक फुलांचे घोस असलेलं बहाव्याचं झाड तिला अतोनात आवडतं. घरी हे झाड लावण्याची इच्छा पूर्ण होत नाही. आपण मरू तेव्हा असं फुलांनी डवरलेलं झाड आपल्या कबरीवर सावली धरणारं असेल. सगळी सुखं आयुष्यात आहेत पण ही एक इच्छा तेवढी शिल्लक राहिली आहे.
घरच्यांना तर हा निव्वळ बावळटपणा वाटू लागतो. ज्या दिवशी पतीचं निधन होतं, त्या दिवशी ती दफनभूमीत जाते. भविष्यात आपली कबर इथेच कुठेतरी असेल असा विचार करत ती जागा न्याहाळू लागते. नोंदी असलेले ग्रॅनाइट आणि संगमरवरी दगड सगळीकडे जमिनीत रुतून उभे. दुसऱ्या दिवसापासून दफनभूमीत जागेचा तिचा शोध सुरू होतो. जिथं झाड लावायचं आहे असा कोपरा ती शोधू लागते. आपल्या कबरीवर नावनिशाणीचा दगडही नको, फक्त बहाव्याचं झाड हवं. त्याची तयारी आधीपासूनच करायला हवी. घरच्यांना यातलं काहीही कळू न देता तिचं हे काम चाललेलं असतं. एक म्हातारा ड्रायव्हर फक्त या कामात तिला मदत करतो.
एका रोपवाटिकेतून बहाव्याचं झाड आणलं जातं. लेंटीना यांना आवडलेल्या जागेवर ते लावलं जातं. ते हळूहळू वाढायलाही लागतं. आयुष्यातले काही क्षणच उरलेले असतात. लेंटिना यांचं चालणं फिरणं बंद होतं. त्या कृश होत जातात आणि एक दिवस ते बहाव्याचं पिवळ्या धम्मक फुलांच्या घोसांनी बहरून आलेलं झाड सळसळू लागतं. ते झाड पाहून आल्यानंतर लेंटीना ही बाई अंथरुणाला खिळते. सकाळ झाली तरी उठतच नाही… काही इच्छा अशा असतात की त्या मृत्यूनंतरच पुऱ्या होणाऱ्या असतात. तेमसुला आओ या लेखिकेच्या ‘लॅबर्नम फॉर माय हेड’ या संग्रहातील ही कथा आहे.
आधीच्या अविभाजित आसामचे चित्रण करणाऱ्या बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांच्यासारख्या लेखकांच्या कादंबऱ्या जाणकार वाचकांना माहीत असतात; पण आसामसह अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, नागालँड, सिक्कीम या ‘पूर्वोत्तर’ (ईशान्य) भारतातलं जीवन सांगणाऱ्या लेखनाची फारशी चर्चा होत नाही. मुख्य धारेपासून हे विश्व वेगळं, परिघावरचं राहतं. साहित्यात या भागातल्या लेखनाचा जणू एक वेगळा कोपरा आहे. सततची अशांतता, धुमसता विद्रोह, हिंसा असं वर्तमान तिथं कित्येक दशकांपासून आहे.
ज्वालामुखीसारखं खदखदत असणं हेच ज्या भूमीचं अभिन्न अंग आहे; त्या भूमीत काही विधायकता पाहायला मिळणं तसं दुर्मीळच. तिथल्या अनेक भाषांमधून हे ‘पूर्वोत्तरी’ साहित्य उमटतं. त्यात इंग्रजी लेखनही बरंच आहे. तेमसुला आओ ते ममंग दइ अशी अनेक नावं त्यासाठी सांगता येतील. तेमसुला या इंग्रजीतून कथा आणि कविता लिहिणाऱ्या प्रमुख लेखिका. ज्या कथेचा सुरुवातीला उल्लेख केला ती ज्या संग्रहात आहे त्याला साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं आहे. तसा अवघा सव्वाशे पानांचा, केवळ आठ कथा असलेला हा संग्रह. तेमसुला यांच्या कथा आजच्या असल्या तरी त्यांना कालचे संदर्भ आहेत आणि या गोष्टींमधून उद्याची चाहूलही लागते. तीन वर्षांपूर्वी, वयाच्या ८० व्या वर्षी त्या निवर्तल्या. त्यांच्या कथांचे फ्रेंच, जर्मन भाषेत अनुवाद झालेले आहेत. ‘दीज हिल्स कॉल्ड होम’ हा त्यांचा आणखी एक कथासंग्रह.
तेमसुला यांचा जन्म आसामातल्या जोऱ्हाटचा. आई-वडिलांचं छत्र डोक्यावरून लवकर गेलं. अगदी कोवळ्या वयात जबाबदारी येऊन पडली. लहान भावंडांना सांभाळणं, त्यांचं शिक्षण पुरं करणं अशा अनेक अपेक्षा त्यांनी निभावल्या. एवढं भंगलेलं बालपण वाट्याला येऊनही त्यांनी स्वत: शिक्षणाची वाट सोडली नाही.
उच्चशिक्षित होऊन पुढे दीर्घकाळ इंग्रजीच्या अध्यापनाचं काम देशातल्या विविध मान्यताप्राप्त संस्थांमध्ये केलं. फुलब्राइट फेलोशिपमुळे अमेरिकेचा प्रवास त्यांनी केला. त्या अनुभवांचा उपयोग भारतात परतल्यानंतर एका नव्या दृष्टिकोनातून झाला. आपल्या नागा या समाजातल्या कथा संकलित करण्याचं काम त्यांनी केलं. तब्बल बारा वर्षे नागालँडच्या ग्रामीण भागात हिंडून, फिरून नागा संस्कृती आणि नागांच्या मौखिक कथनपरंपरेचा दस्तावेज त्यांनी संकलित केला. त्यातूनच ‘आओ नागा ओरल ट्रॅडिशन’ हे संकलन आकाराला आलं. नागा समाजाचा तो एक संदर्भमूल्य असणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो.
कधी कधी लेखनातून दबलेला, दडपलेला हुंकारच बाहेर पडत असतो. तेमसुला आओ यांच्या एका कथासंग्रहातल्या सुरुवातीच्या काही ओळी वाचल्या म्हणजे त्यातून हे स्पष्ट होईल. ‘प्रत्येकाच्या अंतर्मनात गोष्टी नांदत असतात. त्यातल्या काही कथन केल्या जातात आणि बऱ्याचशा ओठांवरच अडून असतात. व्यक्तिगत अनुभवांना कल्पनेच्या पंखावर घेत जगभर पसरत जाणाऱ्या गोष्टी… त्यात काही अगदीच प्रार्थनेसारख्या आणि काही अशासुद्धा की ज्यात कल्पनाविलासापेक्षा कबुलीजबाबच अधिक असतो. तशा तर गोष्टी प्रत्येकाच्याच मनात दडून असतात पण त्यातल्या काहीच बाहेर येतात, जशा यापुढच्या पानावर काही गोष्टी आल्या आहेत.’
तेमसुला यांच्या कथांचे हिंदी अनुवादही झाले आहेत. ‘गावबुढा और कहानीवाली बुढिया’ या शीर्षकाचा एक कथासंग्रह आहे. प्रामुख्याने ‘आओ’ या आदिवासी जमातीचे जीवन चित्रण त्यांच्या कथांतून येतं. अर्थात या भागाला केवळ ‘ईशान्य भारत’ असं एकाच साच्यात बसवणंही बरोबर नाही. खुद्द तेमसुला यांनाही हे सरसकटीकरण मान्य नव्हतं. या भागातही आपापली सांस्कृतिक वैशिष्ट्ये जतन करणारे अनेक समूह आहेत. त्यांच्या बोली आहेत. समग्र भारतीयता समजून घेण्यासाठी हे लेखन महत्त्वाचं आहे. कथा आणि कवितेशिवाय त्यांचं आत्मपर आठवणींचंही एक पुस्तक महत्त्वाचं मानलं जातं.
‘माझ्या कथांमधून मी लोकांच्या जीवनाकडे पुन्हा मागे वळून पाहण्याचा प्रयत्न करते. ज्यांची दु:खं उजागर न होता दडपली गेली आहेत किंवा समाजाकडून स्वीकारलीच गेली नाहीत. समाजात काही लोक असे असतात की त्यांना वाटतं असं काही आम्ही भोगलेलंच नाही. या सगळ्यांशी आमचं काय देणंघेणं? या गोष्टींशी तुमचा संबंधच नाही असं तुम्हाला वाटतं म्हणजे तुमच्यात एक निष्ठुरता दडलेली आहे.
मानवताविरोधी अत्याचार तुम्ही तोपर्यंत उघड्या डोळ्यांनी पाहाल किंवा सहन कराल जोपर्यंत तुमच्या गळ्यापर्यंत फास आवळला गेलेला नाही. आम्हा नागा लोकांचं सहजीवन हे शेजाऱ्याशी मिळून, मिसळून राहण्याला, निसर्गाशी जुळवून घेण्याला प्राधान्य देतं. जेव्हा नागा आपली ही जीवनदृष्टी वास्तव जीवनात साकारतील आणि नव्या भविष्याचा आलेख लिहू लागतील तेव्हाच असं म्हणता येईल की मागच्या काही दशकांच्या उलथापालथीच्या स्मृती नव्या ढंगात आपली भूमिका पार पाडताना यशस्वी झाल्या आहेत.’
या लेखिकेचे पाच कवितासंग्रह आहेत. प्रत्येकच इंग्रजी कवितासंग्रहाच्या शीर्षकात ‘साँग’ असा शब्द आलेला आहे. त्यातून त्यांच्या कवितेला गीतात्मकतेचं असलेलं आकर्षण लक्षात येतं. त्याचबरोबर गीतांचं मौखिक परंपरेतून जिवंत राहणंही त्यांना महत्त्वाचं वाटत असावं. ‘साँग्स दॅट टेल’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. ‘तट पर प्रतीक्षा’ या नावाने त्यांच्या कवितांचा हिंदी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे.
तेमसुला यांची गीतं आणि कथाही मौखिक परंपरा महत्त्वाची मानतात. लेखन म्हणजे आठवणींचा गोफ असतो हे खरं आहे पण आठवणींचा मामलाही वाटतो तेवढा सरळ नाही. कोणत्या आठवणी मनात जोजवायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या हे व्यक्ती म्हणून तरी आपल्या हाती कुठे उरतं? काही आठवणी कितीही विसरू म्हटलं तरी कायमचा पिच्छा पुरवत राहतात. कधी कधी एखादी छोटी गोष्ट मोठ्यातल्या मोठ्या स्मृतींची शृंखला मनात चालू करते. हे सांगताना त्यांनी एक उदाहरण दिलं आहे, ‘माझ्या आईला उन्हात वाळवलेल्या माशांचं कालवण आवडायचं. तिच्या मृत्यूनंतर एवढ्या एका गोष्टीनंही अनेक वर्षं तिच्या आठवणी माझ्या मनात फेर धरतात.
तिच्यानंतर आमच्या कुटुंबात या कालवणाच्या गैरहजेरीनं आईच्या मृत्यूचं दु:ख वारंवार सलत राहिलं आहे. आपल्या आयुष्यात असंख्य अशा अदृश्य चाळण्या असतात. आठवणीतलं बरं काय, वाईट काय यांची निवड या चाळण्याच करत असतात,’ असं सांगणाऱ्या या लेखिकेच्या कथालेखनातून हिंसाचाराचा, दहशतीचा सामना करणाऱ्या निश्चयी स्त्रिया सातत्याने येत राहतात. हिंसा आणि संघर्षाच्या भळभळत्या जखमा उरी वागवणाऱ्या प्रदेशाचं अंत:करण समजून घ्यायचं असेल तर तेमसुला यांचं लेखन नक्कीच वाट दाखवतं.
लेखक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहेत
aasaramlomte@gmail.com
