युनिकॉर्न… काल्पनिक जगातला एकशिंगी पांढरा अश्व. युरोपीय साहित्यातून अवतरलेल्या या युनिकॉर्नकडे अद्भुतता आणि पावित्र्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. सिंधू संस्कृतीतील काही शिक्क्यांवरही हा एकशिंगी घोडा दिसतो. पण भारतीय लहान मुलांच्या गोष्टींमध्ये तो पाश्चात्त्य दंतकथांद्वारेच अवतरला. अर्थात वर्तमानातल्या ‘युनिकॉर्न’ची खरी महती मात्र कॉर्पोरेट जगतातली. इथं ‘युनिकॉर्न’ हे किमान एक अब्ज डॉलर (साधारण ८९०० कोटी रुपये) इतकं मूल्य असलेल्या ‘स्टार्टअप’ कंपनीला देण्यात येणारं बिरुद. कोऱ्या करकरीत कल्पनेतून उभ्या राहिलेल्या कोवळ्या कंपन्या जेव्हा गुंतवणूकदारांच्या उत्साही गुंतवणुकीनेच कोट्यवधींचा आर्थिक डोलारा उभ्या करतात तेव्हा त्यांना ‘युनिकॉर्न’ म्हटलं जातं. भारतात गेल्या दशकभरात ‘स्टार्टअप’ची मोठी लाट आली असून त्या लाटेवर स्वार होऊन अनेक कंपन्या ‘युनिकॉर्न’ बनल्या. त्यातल्या अनेक पुढे झेपावत राहिल्या. पण काही ‘युनिकॉर्न’ची किमया कागदीच ठरली. गुंतवणूकदारांनी बसवलेली शिंगं आणि प्रसिद्धीने लाभलेले पंख गळून पडल्यानंतर या कंपन्यांचं ‘मिथक’ समोर आलं. अशाच एका मिथकाची कहाणी म्हणजे ‘अॅन अनफ्लॅटरिंग स्टोरी अबाऊट ओला’ज् भाविश अगरवाल’ .

दिल्लीच्या ‘जेएनयू’मध्ये पीएचडीचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कार्यकर्ता तसेच संशोधक शौर्य मजुमदार आणि ज्येष्ठ पत्रकार परंजय गुहा ठाकुरता या दोघांचं हे पुस्तक. शोधपत्रकारिता, संशोधन, अभ्यास आणि विश्लेषण या आधारे मांडलेली ही मोठी वृत्तमालिकाच. भविष्यातील भारताचा ‘इलॉन मस्क’ म्हणून संबोधल्या जात असलेल्या भाविश अगरवाल या तरुण उद्याोजकाच्या ‘ओला’ या साम्राज्याचा पट मांडणारी. अगरवाल यांनी अवघ्या पंचविशीत ‘उबर’ला टक्कर देणारी ओला ही अॅपआधारित कॅब सेवा भारतभर पसरवली. तिनं ‘युनिकॉर्न’चं बिरुद मिळवल्यानंतर पुढच्या १५ वर्षांत अगरवाल यांनी ओला इलेक्ट्रिक आणि ओला कृत्रिम या आणखी दोन युनिकॉर्न कंपन्या उभारल्या. ‘टाइम’च्या प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या यादीत २०१८ मध्ये स्थान मिळवणाऱ्या अगरवाल यांची कारकीर्द एखाद्या नवउद्यामीला आदर्शवत वाटावी अशीच. पण या यशोगाथेच्या मुलाम्याखाली असलेले अपेक्षाभंग, अधोगती, अविश्वास, अपहेतू आणि अनिश्चिततेचे असंख्य पदर ‘अॅन अनफ्लॅटरिंग स्टोरी…’ उलगडून दाखवतं. स्टार्टअपच्या वलयांकित विश्वाच्या झगमगाटालाच विकास मानणाऱ्या व्यवस्थेच्या अव्यवस्थेचं दर्शनही हे पुस्तक घडवतं. नवोन्मेषातून शिखरावर जाण्याची महत्त्वाकांक्षा प्रत्येक उद्याोजकात असायलाच हवी. मात्र ती झटपट पूर्ण करण्यासाठी धोक्याच्या चोरवाटा अवलंबणाऱ्या भाविश अगरवाल यांच्या आततायीपणाचीच ही गोष्ट.

अॅपवरील एका क्लिकसरशी दारात ड्रायव्हरसकट कार उभी करणाऱ्या ‘ओला कॅब्स’नं आरामदायक जीवनशैलीला नवं परिमाण दिलं. त्याच वेळी अर्धशिक्षित, अर्धकुशल लोकसंख्येपैकी एका मोठ्या वर्गाला स्वयंरोजगाराचं नवं स्वप्नही दाखवलं. ‘ओला’बद्दल आपल्याला माहीत असतं ते इतकंच. दिल्लीत २०११ मध्ये ‘ओला कॅब्स’ (आता ‘ओला कन्झ्युमर’) सुरू झाली त्याच्या वर्षभर आधी अमेरिकेत ‘उबर’च्या कॅब सेवेनं जम बसवायला सुरुवात केली होती. दोन्ही कंपन्यांचं व्यवसाय प्रारूप सारखंच. गाजावाजा मोठा पण नफ्याचं गणित कच्चंच. केवळ गुंतवणूकदाराच्या अंतर्मनातील आशावादावर तगलेल्या. स्वत:ला ‘शार्क’, ‘एंजल’ समजून अशा उगवत्या कंपन्यांमध्ये पाण्यासारखा पैसा ओतणाऱ्या या गुंतवणूकदारांना भविष्यातल्या भरघोस फळाची अपेक्षा असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षाही किती तरी पट परतावा देण्याची क्षमता असलेल्या या गुंतवणुकीकडे कल वाढत चालला आहे. ‘ओला’च्या बाबतीत हेच घडलं. गुंतवणूकदारांच्या बळावर ‘ओला कॅब्स’ अल्पावधीत युनिकॉर्न बनली. हजारो चालकांना कमाईबरोबर कारमालकीची स्वप्नं कंपनीनं दाखवली. कॅब चालवून त्याच कमाईतून गाडीचे हप्ते भरायचे आणि उरलेली रक्कम उदरनिर्वाहासाठी म्हणून घरी न्यायची, या योजनेतून हजारो चालकांनी १२-१२ तास ‘ओला’ चालवली. अवघ्या नऊ वर्षांत भारतातील २५० शहरांत १५ लाख चालक ‘ओला’वाले झाले. एकीकडे अॅपसाठी मिळणारे कमिशन, चालकांकडून हप्त्यापोटी मिळणारी रक्कम आणि गुंतवणूकदारांची गंगाजळी यामुळे २०२१ मध्ये ओलाची उलाढाल ७.३ अब्ज डॉलरवर पोहोचली. पण तिथूनच कंपनीच्या अधोगतीला सुरुवात झाली. कारमालकीची स्वप्नं पाहणाऱ्या कारचालकांना आपण हप्ते भरले ते कारचे भाडे होते, हे उमजले आणि त्यांचा या कंपनीवरील विश्वासच उडाला. चालकांना मोबदला देण्यात होणारा विलंब, ग्राहकांना मनमानी शुल्क आकारणी अशा तक्रारींमुळे ‘ओला’ची लोकप्रियता घटू लागली. तोपर्यंत उबर, रॅपिडोसारख्या अन्य अॅपआधारित सेवांनी भारतात जम बसवला होता. त्यामुळे भारतात वर्चस्व गाजवणारी ओला कॅब सेवा तिसऱ्या क्रमांकावर ढकलली गेली. हे सगळं कसं घडत गेलं, याचा क्रमवार तपशील या पुस्तकातून वाचायला मिळतो.

‘ओला’च्या यश आणि अपयशाचा हिशोब मांडणारी नऊ प्रकरणं या पुस्तकात आहेत. त्यातली जवळपास अडीच ते तीन प्रकरणं ‘ओला इलेक्ट्रिक’वर खर्ची घालण्यात आली आहे. त्याला सबळ कारण आहे. ‘टेस्ला इज फॉर वेस्ट, ओला इज फॉर रेस्ट’ या विधानासह अगरवाल यांनी ओला स्कूटर भारतात आणली. तमिळनाडूमध्ये शेकडो एकर जमीन मिळवून ‘ओला फ्युचर फॅक्ट्री’ काढण्यात आली. त्याच्या शेजारीच विद्याुत वाहनांच्या बॅटरी तयार करण्यासाठी स्वतंत्र गिगाफॅक्ट्री उभारण्यात आली. फक्त दोन वर्षांत ओलाच्या एस वन आणि एस वन प्रोच्या सहा लाख ई-स्कूटर रस्त्यांवरून धावू लागल्या. कंपनीची भरारी इतकी की त्याच वर्षी कंपनीने शेअर बाजारात प्रवेश केला. ‘ओला’च्या या ‘राइड’वर भाळून करोडो किरकोळ गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावला. पण हे सगळं चित्र अल्पावधीतच कसं फसवं ठरलं, याचा लेखाजोखा पुस्तकातून डोळ्यांसमोर उभा राहतो.

‘ओला इलेक्ट्रिक’ हे अविचारी अभियांत्रिकी, व्यावसायिक आततायीपणा यांचं उदाहरण. नेदरलँड्समधील एका स्टार्टअपने तयार केलेल्या ‘अॅपस्कूटर’चे मालकी हक्क मिळवून ती ओला स्कूटर म्हणून रस्त्यावर आणली गेली. तेही कोणत्याही प्रकारची रस्ता चाचणी न करताच. कार्यशाळेतील प्रायोगिक मॉडेललाच व्यावसायिक रूप देण्याची घाई करण्यामागे स्पर्धेत अव्वल ठरण्याचा हव्यास कसा होता, हे या प्रकरणांतून समोर येतं. त्यामागे सरकारी सवलती लाटण्याचा शुद्ध हेतूही दिसून येतो. विद्याुत वाहनांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ उचलण्यासाठी कोणत्याही तांत्रिक तपासणीशिवाय ‘ओला स्कूटर’ची निर्मिती सुरू करण्यात आली. याचा परिणाम झाला असा की, या स्कूटर रस्त्यात अचानक बंद पडणं, बॅटरी पेट घेणं असे प्रकार घडू लागले. याबाबतच्या तक्रारींचा पाऊस पडू लागला. त्या तक्रारी हाताळण्यात कंपनीने दाखवलेल्या बेफिकिरीचं वर्णनही या पुस्तकात आढळतं.

अगरवाल यांची तिसरी युनिकॉर्न कंपनी ‘ओला कृत्रिम’. आर्टिफिशियल इंटिलिजन्सवर आधारित ‘लँग्वेज लर्निंग मॉडेल’ तंत्रज्ञान जगतात क्रांती घडवत आहे. अगरवाल यांच्या तीक्ष्ण नजरेनं हे हेरून २०२३ मध्ये ‘ओला कृत्रिम’ सुरू केली. ‘चॅटजीपीटी’ , ‘डीपसीक’ या ‘एलएलएम’ प्रारूपांसाठी हाच देशी पर्याय असा आभास त्या वेळी निर्माण करण्यात आला. परंतु हे तंत्रज्ञानही कसं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रायोगिक प्रारूपावरून उचललं गेलं आणि त्यात कशा त्रुटी आढळल्या, याचा इथला तपशील रंजक आहे.

अगरवाल यांच्या तिन्ही युनिकॉर्नची आजची स्थिती डळमळीत बनली आहे. अॅपआधारित कॅबचा व्यवसाय झपाट्यानं खाली घसरू लागला असून सरकारी नियमनाची झळ त्याला बसतेय. तीन वर्षांत ओला कन्झ्युमरचा व्यवसाय २८ टक्क्यांनी कमी झाल्याचं आकडेवारी सांगते. ओला इलेक्ट्रिकच्या स्कूटरची विक्री ४५ टक्क्यांनी घसरली असून गुंतवणूकदारांनीही हात आखडता घेतला आहे. त्यात स्कूटरबाबतच्या दैनंदिन तक्रारींची संख्या ८० हजारांवर गेल्याचं सांगण्यात येतं. या पार्श्वभूमीवर सेबीनंही कंपनीची चौकशी सुरू केली आहे. ‘ओला कृत्रिम’ अजूनही व्यावसायिक रूप घेऊ न शकल्यानं तिथंही गुंतवणूकदारांत चलबिचल सुरू आहे. हा सगळा गती-अधोगतीचा प्रवास ‘अॅन अनफ्लॅटरिंग स्टोरी अबाऊट ओलाज भाविश अगरवाल’मधून सप्रमाण उभा राहतो.

वर म्हटल्याप्रमाणे, हे पुस्तक ‘ओला’बद्दलची वृत्तमालिकाच आहे. या कंपनीविषयी प्रेम, उत्सुकता किंवा राग असलेल्यांना कदाचित त्यामुळे त्यात रस वाटू शकेल. मग इतरांनी ते का वाचावं? तर हे पुस्तक ‘ओला’च्या उदाहरणातून आपल्यासमोर जे गंभीर चित्र उभं करू पाहतं, ते पाहण्यासाठी. स्टार्टअप ते युनिकॉर्न असा प्रवास झपाट्याने करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढत आहे. यातल्या अनेक कंपन्या आपल्या गुणवत्तेनं उभ्या राहिल्या. पण उथळ आत्मविश्वास आणि चटकदार कल्पनांतील स्वप्नरंजनाच्या भरवशावरही काही कंपन्या पुढं झेपावतात. त्यांना मेहनत, सचोटी आणि दूरदृष्टी मिळाली नाही तर हा डोलारा जितक्या वेगाने उभा राहतो, त्याहीपेक्षा अधिक वेगाने कोसळूही शकतो. असे अपघात टाळायचे असतील तर ‘ओला’सारखी उदाहरणं डोळ्यांसमोर असायलाच हवीत.

‘अॅन अनफ्लॅटरिंग स्टोरी अबाऊट ओलाज् भाविश अगरवाल’

लेखक : शौर्य मजुमदार,

परंजय गुहा ठाकुरता

प्रकाशक : ‘परंजय’

पृष्ठे :१४८ ; किंमत : ३९५ रुपये

बुकनेट : कथालेखकाचे चरित्र…

डेनिस जॉन्सन या दिवंगत लेखकाच्या कादंबरिकेवर आधारलेला चित्रपट ‘ट्रेन ड्रीम्स’ यंदा ऑस्करच्या स्पर्धेत धडकण्याच्या शक्यता सिनेवर्तुळात जोरदार आहेत. तीनच आठवड्यापूर्वी ‘फ्लेग्रण्ट : सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह जेश्चर्स’ या नावाने जॉन्सनचे चरित्र प्रकाशित झाले. हा लेखक त्याच्या ‘‘जिजस’ सन’ या १९९२ साली आलेल्या कथामालिकेच्या एका पुस्तकाने अमेरिकी कथाजगतातील महत्त्वाचे नाव बनला. न्यू यॉर्करमध्ये मृत्युपूर्वीपर्यंत छापली गेलेली त्याची प्रत्येक कथा सर्वार्थाने गाजली. ‘‘जिजस’ सन’वर चित्रपटदेखील बनला. व्यसन-लेखन-कफल्लकता- पुन्हा लेखन आदी आवर्तनांतून पुढे सरकणारे त्याचे चरित्र भारतात मिळेल तेव्हा वाचाच. तूर्त या चरित्राच्या निमित्ताने त्याच्या एकूण लेखनावरचा दीर्घ निबंध. त्याशिवाय त्याच्या वर उल्लेखलेल्या संग्रहात असलेली आणि न्यू यॉर्करने १९८८ साली छापलेली संपूर्ण कथा इथून वाचता येईल.

https:// tinyurl. com/3 ktktnzc

https:// tinyurl. com/5285 kvnk

नायपॉलच्या बेटावरचा साहित्यिक…

कॅरेबियन बेटावर मजुरीसाठी गेलेल्या भारतीयांच्या एका पिढीने स्वातंत्र्यपूर्व काळात तिथे वसाहती बनविल्या. त्यांच्या दुसऱ्या इंग्रजी शिकलेल्या पिढीमधून काही लेखक घडले. त्यातील आपणा भारतीयांना माहिती फक्त व्ही. एस. नॉयपॉल आणि त्यांच्या कादंबऱ्या. फार तर त्यावर झालेले चित्रपट. हॅरॉल्ड सॉनी लडू या त्रिनिदादमधील दारिद्र्योत्सव समुदायात राहिलेल्या लेखकाच्या सत्तरच्या दशकातील कादंबऱ्यांकडे आता नव्याने पाहिले जात आहे. ताज्या ‘द न्यू यॉर्कर रिव्ह्यू ऑफ बुक्स’च्या ताज्या अंकात लडू यांच्या लिखाणाचा परामर्ष आलाय. ‘यस्टर्डेज’ ही ( लेखकाच्या हत्येपश्चात १९७४) साली आलेली कादंबरी गेल्या वर्षी अनेकविध कारणांनी नव्याने प्रकाशित करण्यात आली. ख्रिास्ती मिशनऱ्यांप्रमाणे कॅनडात हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार करायला निघालेल्या तरुणाची गमतीशीर गोष्ट आणि त्रिनिदादमधील असंख्य गरीब हिंदी लोकांचे जगणे ‘यस्टर्डेज’मध्ये आहे. नायपॉल यांच्या इतर जगासाठी चमचमीत केलेल्या लिखाणाहून अधिक धारदार असलेल्या या लेखकाचा उभारीच्या काळातच अंत झाला. त्याच्यावर या दोन वर्षांत खूप चर्चा घडवून आणण्यात आली. कॅनडात त्याच्या नावाने एक कथापुरस्कारही दिला जातो. तूर्त त्याच्या अल्पायुषी लेखनकारकीर्दीवरचा तपशील. त्यासह इंडो-कॅरेबियन सांस्कृतिक केंद्राचा परिसंवाद.

https:// tinyurl. com/ bd2 xxwsj

https:// tinyurl. com/ ywcb672 m

कोविडकथा शांता गोखलेंची…

‘होमबाऊंड’ या दोन मित्रांच्या कोविडदास्तानीचा चित्रपट पाहून थक्क झाला असाल, तर लेखिका-अनुवादिका शांता गोखले यांच्या ‘द वे होम’ या संग्रहातील ही कथा भारावून जाण्यास नवे कारण ठरेल. संग्रहातील ‘द भिकबाळी’ या कोविडकाळावरील कथेतला हा ‘द स्क्रोल’ने प्रकाशित केलेला हा अल्पांश या दुव्यावर.

https://tinyurl.com/y79 f3 c7 t