‘भारतीय समाजशास्त्रज्ञ’ कसा असावा, याचा वस्तुपाठ अनेक पुस्तकांतून मागे ठेवून आंद्रे बेटे (आडनावाचे फ्रेंच स्पेलिंग Beteille) ३ फेब्रुवारीस निवर्तले. कोलकात्यात जन्मलेल्या आणि उच्च शिक्षणाच्या काळापासून दिल्लीतच कारकीर्द केलेल्या प्रा. बेटे यांना भारतातील जातींच्या अभ्यासाचा नवा दृष्टिकोन देणारे समाजशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या आधीचे प्रा. एम. एन. श्रीनिवास यांनी ‘संस्कृतायझेशन’चा सिद्धान्त मांडून तथाकथित ‘खालच्या’ जाती कथित ‘वरच्या’ जातींसारख्या होऊ पाहताहेत, असे निरीक्षण नोंदवले होते आणि ते स्वातंत्र्योत्तर काळात (नेहरू युगात) सर्वमान्यही होते. मात्र तसेच नेहमी होते असे नाही, हे प्रा. बेटे यांनी सिद्ध केले. त्यासाठी जातीसह वर्णाची तीव्र जाणीव ‘आदि द्रविडार’ चळवळीतून झालेल्या तमिळनाडूतील तंजावूर जिल्ह्यात एका खेड्याच्या परिसराचा सखोल सामाजिक अभ्यास प्रा. बेटे यांनी केला. जात/वर्ण यांच्यासह आर्थिक वर्गाची जाणीवही रुजते आहे- ही जाणीव सामूहिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही पातळ्यांवर आहे, ब्राह्मणांसह सर्वच जातिसमूहांत उपजाती, पोटभेद सर्रास मानले जात आहेत आणि त्यामुळे सामूहिक जातजाणिवेपेक्षा वैयक्तिक जातजाणीव अधिक प्रबळ होऊ शकते, अशी त्यांची निरीक्षणे होती. द्रविड संस्कृती हीच ‘मूळची’ असे मानणार्या चळवळीने कथित ‘खालच्या’ जातींना द्रविड अस्मितेचे भान देतानाच राजकीय संघटनाची वाट करून दिली, त्यामुळे समूह म्हणून त्यांची राजकीय ताकद वाढत असल्याचा प्रा. बेटे यांचा निष्कर्ष तर आजदेखील खरा ठरतो आहे.
त्यांच्या आधीचे अभ्यासक जातीला प्रमाण मानत; ‘अभ्यासघटक अमुक जातीचा, म्हणून…’ अशी त्यांची मांडणी असे. तिला आव्हान देणार्या प्रा. बेटे यांनी ‘अभ्यासघटक अमुक जातीचा, तरीही…’ काय आहे, हे अभ्यासले आणि जगापुढे मांडले. यातून काही वेळा प्रा. बेटे यांची मते टोकाची ठरली, काही वेळा त्यांच्या मतांमध्ये अंतर्विरोध दिसून आला- ही अशी मते त्यांनी अभ्यासाचे निष्कर्ष म्हणून नव्हे, तर वेळोवेळी वर्तमानपत्रांत लेखन करताना अथवा प्रसंगोपात्त सार्वजनिक स्थळी मांडली होती. अशापैकी टोकाच्या मताचे नमुने म्हणजे जातगणनेला त्यांनी केलेला विरोध आणि त्याहीआधी १९९० मध्ये ‘मंडल’चा वाद पेटला असताना ‘गुणवत्ते’ची त्यांनी केलेली भलामण; तर अंतर्विरोधाचा मासला मिळाला तो उच्च शिक्षणाची संधी नाकारली गेलेल्या समूहांना वा समाजघटकांना आज ती संधी मिळत असली तरी ती पुरेशी दिली जावी, अशा अर्थाचे त्यांचे मत- जे आजघडीला ‘(सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेले) यूजीसीचे नवे नियम योग्यच होते’ इथपर्यंत ताणता येते.
असे झाले, कारण प्रा. बेटे हे अभ्यासक म्हणूनच वावरले. लोकांपर्यंत पोहोचलेली त्यांची मते वाचून/ ऐकून लोकांनी त्या-त्या वेळी त्यांना ‘उच्चवर्णीयधार्जिणे’ किंवा ‘बहुजनांचे दुश्मन’ ठरवलेही असेल; पण तो लोकांचा असमंजसपणा होता- बहुजनही बदलत आहेत, बदलू शकतात, याची अभ्यासातून आलेली खात्री प्रा. बेटे देत होते. त्यांच्या अभ्यासूपणाला २००५ मध्ये ‘पद्मभूषण’ किताबाचे कोंदण मिळाले, अन्यही मानसन्मान मिळाले. पण विषमता ‘नैसर्गिक’ असू शकत नाही, ती सामाजिकच असते, हा समाजशास्त्रीय दृष्टिकोन जपणे ही यापुढेही प्रा. बेटे यांना आदरांजली ठरेल.

