हरीश स. वानखेडे
आधुनिक मराठी साहित्याचा प्रवास हा प्रामुख्याने जातविरोधी सुधारणा, राष्ट्रवादी प्रेरणा आणि समाजवादी चळवळींच्या सांस्कृतिक प्रवाहांतून घडला आहे. या समृद्ध वाङ्मयीन परंपरेत ज्यांना ‘अण्णाभाऊ साठे’ म्हणून आदराने साद घातली गेली, त्या तुकाराम भाऊराव साठे यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दलित मातंग समाजात जन्मलेले आणि दारिद्र्याच्या भयंकर वास्तवातून तावून सुलाखून वर आलेले अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्याचे एक आद्यप्रणेते ठरले. लोकनाट्याच्या परंपरेला नवी दिशा देत त्यांनी सर्वसामान्य कामगार आणि उपेक्षितांच्या नवीन जाणिवांना वाणी दिली. लोकप्रिय कलावंतांच्या राजकीय अस्मितेला नवी उंची मिळवून दिली.
दिग्दर्शक मिलिंद चंपनेरकर यांचा ‘फूटप्रिन्ट्स ऑफ अण्णाभाऊ साठेज लोकनाट्य’ हा ९० मिनिटांचा माहितीपट नुकताच प्रदर्शित झाला. त्यात अण्णाभाऊ आणि त्यांच्या सहकार्यांनी लोककला (विशेषत: तमाशा आणि लोककथा) कशी आमूलाग्र बदलली, याचा सविस्तर आढावा घेतला आहे. अभिजात साहित्य आणि उपेक्षितांच्या तोंडी परंपरा यांमधील दरी कशी मिटवली, याचे दर्शन हा माहितीपट घडवतो. मुख्य प्रवाहातल्या साहित्याच्या आणि सांस्कृतिक संस्थांच्या संकुचितपणावर हा माहितीपट प्रकाश टाकतो, मात्र तोही प्रामुख्याने त्यांच्या लोकपरंपरेपुरताच मर्यादित राहतो; मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या पटकथालेखन आणि कथालेखनाच्या योगदानाकडे मात्र यात दुर्लक्ष झाले आहे.
लोकप्रिय चित्रपटसृष्टीने सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये आकारात आणण्यात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु या शक्तिशाली माध्यमाचा वापर नेहमीच प्रस्थापित उच्चभ्रू वर्गाने स्वत:चे सांस्कृतिक आणि वर्गीय हितसंबंध जपण्यासाठी केला. या एकछत्री अमलाला दलित-बहुजन साहित्याने अत्यंत प्रभावीपणे आव्हान दिले आणि आपल्या कथांसाठी एक स्वाभिमानी अवकाश निर्माण केला; तरीही सांस्कृतिक उद्योगात हे विश्व आजही उपेक्षितच राहिले आहे. अण्णा भाऊ साठे यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास या अनुभवापेक्षा वेगळा नाही. ते मराठी साहित्यातील एक अजस्र व्यक्तिमत्त्व आणि वैचारिक आयकॉन असूनही, लोकप्रिय चित्रपट संस्कृतीत त्यांच्या सहभागाकडे कायम जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आणि त्यांना विस्मृतीच्या अंधारात ढकलले गेले.
जात-वर्गाचे अनोखे समीकरण
अण्णाभाऊंचे वाङ्मयीन कार्य अफाट आहे. त्यात पस्तीसहून अधिक कादंबर्या, अनेक कथासंग्रह, नाटके, प्रवासवर्णने, चित्रपटांच्या पटकथा आणि सहकार्यांचे लेख यांचा समावेश आहे. त्यांचे साहित्य केवळ उपेक्षितांच्या दु:खाचे दस्तऐवजीकरण करत नाही, तर मानवी मूल्ये, सामाजिक अनुभव आणि वैयक्तिक आकांक्षांना साहित्याच्या केंद्रस्थानी आणून मराठी साहित्याच्या सौंदर्यशास्त्राची पुनर्रचना करते. अण्णाभाऊंच्या साहित्याचा खरा अन्वय लावायचा असेल, तर मार्क्सवादी वर्गप्रश्न आणि आंबेडकरी जातविरोधी विचारसरणीचा त्यांचा अनोखा ताळमेळ समजून घ्यावा लागेल.
ग्रामीण गरिबांना केवळ दयेचे पात्र मानणार्या किंवा दारिद्र्याचे अवडंबर माजवणार्या त्याकाळच्या सरंजामशाही साहित्यापेक्षा अण्णाभाऊंचे लेखन वेगळे होते. त्यांनी गाव आणि शहर हे संघर्षाचे आखाडे म्हणून पाहिले, जिथे जातिभेद आणि वर्गभेद एकत्र नांदत होते. उच्चभ्रू वर्गाकडून ज्या तमाशाला कायम ‘असंस्कृत’ किंवा ‘हलक्या दर्जाचे’ म्हणून हिणवले गेले, त्याच तमाशाला अण्णाभाऊंनी आपल्या कलाप्रकाराचे माध्यम बनवले. त्यांनी तमाशाचा सांस्कृतिक दर्जा बदलून त्याला तीव्र राजकीय शिक्षणाचे आणि प्रतिरोधाचे हत्यार बनवले.
श्रमिक वर्गात प्रचंड लोकप्रिय असूनही, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सत्ताकेंद्रांनी अण्णाभाऊंकडे सतत दुर्लक्ष केले. मुंबईतील कामगार वर्गात ते लोककलेचे सक्रिय सादरीकरण करत होते आणि डाव्या-समाजवादी राजकीय चळवळींशी घट्ट जोडलेले होते. मुंबईत आकारास आलेले हिंदी आणि मराठी चित्रपटविश्वसुद्धा त्याकाळच्या डाव्या-समाजवादी चळवळींनी प्रभावित झाले होते. साहजिकच, डाव्या चळवळींशी असलेल्या संपर्कामुळेच अण्णाभाऊ चित्रपटसृष्टीत दाखल झाले.
मुंबईच्या चित्रपटसृष्टीत अण्णाभाऊ
मराठी चित्रपटसृष्टीशी अण्णाभाऊंचा संबंध हा त्यांच्या बौद्धिक प्रवासातील एक रंजक अध्याय आहे. १९६१ ते १९७४ या काळात अण्णाभाऊंच्या कादंबर्या व कथांवर आधारित सात मराठी चित्रपट प्रदर्शित झाले (उदाहरणार्थ ‘वरणेचा वाघ’, ‘फकिरा’, ‘वैजयंता’ आणि ‘आवडती’). दुर्दैवाने आज त्यातील मोजकेच चित्रपट उपलब्ध आहेत. त्यांच्या साहित्याप्रमाणेच या चित्रपटांमुळे मराठी चित्रपटाला एक नवी भाषा, नवे सौंदर्यशास्त्र आणि उपेक्षित वर्गाच्या जगण्याभोवती फिरणारी कथाशैली लाभली; विशेषत: तमाशा कलाकार, सामाजिक बंडखोर आणि स्थलांतरित कामगारांचे जीवन यातून समोर आले.
व्यावसायिक लाभासाठी असणार्या तकलादू आणि सुटकेच्या मनोरंजनाला नाकारत दलित साहित्याने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. गिरणी कामगार, विमुक्त भटक्या जमाती, शरीर विक्रय करणार्या महिला, लोककलाकार आणि ग्रामीण गरीब यांच्या जगण्याला अण्णाभाऊंनी साहित्यात केंद्रस्थानी ठेवले. समांतर चित्रपट चळवळीने (श्याम बेनेगल आणि गोविंद निहलानी यांच्यासारखे दिग्दर्शक) काही प्रमाणात अशीच भूमिका घेतली, तरी ती दलित वैचारिक विश्वापासून आणि सांस्कृतिक कलाकारांपासून कायम दूर राहिली.
दुहेरी उपेक्षा
उच्चभ्रू आणि शैक्षणिक संस्थांच्या वर्चस्वाखाली असलेल्या मुख्य प्रवाहातील मराठी साहित्याने अण्णाभाऊंकडे हयातभर आणि मृत्यूनंतरही दुर्लक्ष केले. औपचारिक शिक्षण नसणे, बोलीभाषेचा वापर करणे आणि त्यांचा तडजोड न करणारा मार्क्सवादी-आंबेडकरी बाणा- या सर्व गोष्टी मध्यमवर्गीय, सोज्वळतावादी समीक्षकांना खुपत होत्या. त्यामुळे त्यांच्या साहित्याला ‘गंभीर’ साहित्याच्या वर्तुळाबाहेर ठेवले गेले आणि त्याला केवळ राजकीय प्रचाराचे साहित्य म्हणून हिणवले गेले.
दुसरीकडे, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतही अण्णाभाऊंना याच प्रकारच्या दुर्लक्षाचा सामना करावा लागला. विशेषत: १९६० आणि १९७० च्या दशकात मुंबईची हिंदी चित्रपटसृष्टी भरभराटीस आली. डाव्या-उदारमतवादी विचारवंतांच्या प्रभावाखाली या काळात सामाजिक जाणिवांचे चित्रपट आले. राज कपूर, बलराज साहनी, चेतन आनंद, बिमल रॉय यांसारख्या दिग्गजांमुळे या सुवर्णकाळात गरीब कामगार वर्गाचा नायक मध्यवर्ती भूमिकेत आला.
विशेष म्हणजे, अण्णाभाऊ हे या डाव्या सांस्कृतिक प्रवाहाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होते. ते ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’ (इप्टा) चे संस्थापक सदस्य होते आणि १९४९ मध्ये त्याचे राष्ट्रीय अध्यक्षही झाले होते. गीतकार शैलेंद्र यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. तरीही विरोधाभास असा की, मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटसृष्टी अण्णाभाऊंच्या साहित्यापासून दूरच राहिली. शोषित वर्ग आणि त्यांची जातिव्यवस्था यांमधील परस्परसंबंध दाखवणार्या कथांना हिंदी चित्रपटसृष्टीने क्वचितच थारा दिला.
दलित साहित्याने अण्णाभाऊंना आदराने आपला पायाभूत पुरुष मानले, पण मुख्य प्रवाहातल्या चित्रपट उद्योगाने त्यांच्याकडे पाठ फिरवली. चित्रपटसृष्टीने नेहमीच शहरी, उच्चशिक्षित उच्चभ्रूंना प्राधान्य दिले; अण्णाभाऊंचे अवाढव्य आणि लोककलाधिष्ठित विश्व त्यांना समजलेच नाही. कारण अण्णाभाऊंच्या साहित्यात वर्गीय शोषणाबरोबरच अस्पृश्यतेचे दु:सह वास्तवही तितक्याच ताकदीने मांडलेले होते, जे पचवणे मुख्य प्रवाहातील दिग्दर्शकांना कठीण गेले.
आजच्या काळात महत्त्व काय?
आजच्या काळात नागराज मंजुळे, पा. रंजित, नीरज घायवान, शैलेश नरवाडे यांसारख्या सक्षम दिग्दर्शकांमुळे ‘दलित सिनेमा’ या नवीन प्रवाहाचा उदय होत आहे. परंतु हा प्रवाह येण्याआधी कित्येक दशके अण्णाभाऊंचे साहित्य आणि त्यावर आधारित मराठी चित्रपट या वाटेवर चालले होते. लोकप्रिय दृश्यकला ही सामाजिक जाणिवेचे आणि राजकीय परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनू शकते, हे अण्णाभाऊंच्या साहित्याने कैक वर्षांपूर्वीच अधोरेखित केले होते.
शोषितांना आणि उपेक्षितांना केवळ कमकुवत किंवा दयापात्र म्हणून न दाखवता त्यांना वैचारिक खोली आणि विद्रोहाची धार देणारे अण्णाभाऊ हे पहिले शिल्पकार आहेत. आज जेव्हा आपण जात आणि वर्गाच्या प्रश्नांवर गंभीरतेने विचार करतो, तेव्हा अण्णाभाऊंचे विचार आपल्याला दिशा दाखवणारी मशाल ठरतात. मुख्य प्रवाहातील हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीने या महान दलित सांस्कृतिक ‘आयकॉन’ला हवे ते मानाचे स्थान दिले नसले, तरी आजच्या तरुण पिढीचे दिग्दर्शक त्यांच्याच पद्धतींचा आणि तत्त्वज्ञानाचा पुनर्शोध घेत आहेत. जात, लिंगभाव आणि वर्ग यांच्यातील गुंतागुंतीचे धागेदोरे ते अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर मांडत आहेत. त्यामुळे अण्णाभाऊंचे विचार आता केवळ साहित्यापुरते सीमित राहिलेले नसून, त्यातून आता शोषित समाजाच्या आत्मसन्मानाची आणि नव्या, समतावादी सिनेमाची नवी पहाट उजाडण्याची चिन्हे आहेत.
