– डॉ. मिलिंद ए. आवाड

अण्णा भाऊ साठे यांचे नाव घेतले की सर्वप्रथम आठवतात ते पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्य. ही ओळख योग्य असली तरी ती अपुरी आहे. कारण अण्णा भाऊ साठे हे केवळ लोककलावंत नव्हते; तर ते भारतीय समाजरचनेतील श्रम, जात, सत्ता आणि सांस्कृतिक वर्चस्व यांचे चिकित्सक विश्लेषण करणारे महत्त्वाचे साहित्यिक आणि विचारवंत होते. त्यांच्या साहित्याचे मूल्यमापन केवळ कलात्मकतेच्या निकषांवर न करता, त्यांनी उपस्थित केलेल्या सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात करणे अधिक आवश्यक आहे. अण्णा भाऊंचे साहित्य केवळ लोककलावंताच्या अभिव्यक्तीपुरते मर्यादित नाही तर ते भारतीय समाजव्यवस्थेच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेचे सखोल विश्लेषण करणारे परिवर्तनवादी साहित्य आहे. अण्णा भाऊंच्या लेखनाचे खरे महत्त्व हे त्यांनी उपेक्षितांच्या अनुभवाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणले, यात आहे.

मुख्य प्रवाहातील साहित्य अनेकदा स्वत:ला सार्वत्रिक आणि निरपेक्ष मानत आले आहे. परंतु कोणताही मुख्यप्रवाह हा सत्तेपासून स्वतंत्र नसतो. साहित्य, प्रकाशन संस्था, विद्यापीठांचे अभ्यासक्रम, पुरस्कार, साहित्य संमेलने, प्रसारमाध्यमे आणि समीक्षा यांद्वारे कोणते साहित्य ‘मुख्य’ आणि कोणते साहित्य ‘परिघावरील’ ठरेल, हे ठरविले जाते. त्यामुळे सत्तेला प्रश्न विचारणार्‍या साहित्याला अनेकदा उपेक्षा, मौन किंवा मर्यादित मान्यता मिळते. अण्णा भाऊ साठे यांच्याबाबतही हेच घडले. त्यांच्या जयंतीचे सरकारी कार्यक्रम झाले, स्मारके उभी राहिली, निवडक साहित्य प्रकाशित झाले; परंतु त्यांच्या संपूर्ण वैचारिक प्रकल्पाला सार्वजनिक चर्चेत अपेक्षित स्थान मिळाले नाही. त्यांना ‘लोकशाहीर’ म्हणून गौरविण्यात आले, पण ‘सामाजिक तत्त्वचिंतक’ म्हणून स्वीकारले गेले नाही. ही निवडक मान्यता हीच मुख्य प्रवाहातील सांस्कृतिक राजकारणाची पद्धत आहे. ती व्यक्तीचा गौरव करते; पण तिच्या विचारांची धार बोथट करते.

मुख्य प्रवाहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो पर्यायी विचारांना पूर्णपणे नाकारत नाही; परंतु त्यांना निष्प्रभ करून स्वीकारतो. परिवर्तनवादी साहित्याचा निवडक गौरव केला जातो, परंतु त्यातील विद्रोही आशय बाजूला ठेवला जातो आणि त्याला सांस्कृतिक स्मृतीचा भाग म्हणून सादर केले जाते. अण्णा भाऊंच्या साहित्याचा उत्सव साजरा झाला; पण त्यांच्या विचारांचा सार्वजनिक धोरणांशी संवाद फारसा घडला नाही. त्यामुळे त्यांचे पुनर्मूल्यांकन करताना त्यांच्या साहित्याच्या सामाजिक आशयाला केंद्रस्थानी आणणे आवश्यक आहे.

साहित्य ही केवळ कलात्मक निर्मिती नसून समाजाच्या मूल्यव्यवस्थेला आकार देणारी प्रक्रिया आहे. कोणतेही साहित्य सामाजिक आणि राजकीय संदर्भांपासून अलिप्त नसते. मुख्य प्रवाहातील साहित्य अनेकदा विद्यमान व्यवस्थेच्या मूल्यांना वैधता देते; तर परिवर्तनवादी साहित्य त्या व्यवस्थेच्या मर्यादा आणि अंतर्विरोध उघड करते. अण्णा भाऊंच्या लेखनाची हीच वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आहे. त्यांच्या कथा, कादंबर्‍या, पोवाडे आणि लोकनाट्यांमध्ये समाजाच्या परिघावर जगणारी माणसे प्रथमच केंद्रस्थानी येतात. त्यांच्या व्यक्तिरेखा संघर्ष करतात, प्रश्न विचारतात आणि मानवी प्रतिष्ठेचा आग्रह धरतात. त्यामुळे त्यांचे साहित्य भूतदयेचे नव्हे, तर स्वाभिमानाचे साहित्य ठरते.

भारतीय समाजव्यवस्थेचा विचार केला तर श्रम करणारे आणि श्रमावर नियंत्रण ठेवणारे असे दोन व्यापक सामाजिक स्तर इतिहासभर दिसून येतात. जातिव्यवस्थेने उत्पादनशील श्रमाला सामाजिक कनिष्ठत्व बहाल केले, तर ज्ञान, धर्म आणि सांस्कृतिक अधिकार विशिष्ट सामाजिक घटकांच्या हातात केंद्रित राहिले. त्यामुळे दारिद्र्य, अस्पृश्यता, सामाजिक बहिष्कार किंवा सांस्कृतिक दुय्यमत्व या केवळ सामाजिक समस्या नव्हेत; तर त्या सत्तासंबंधांच्या ऐतिहासिक रचना आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू हाच आहे. जातिव्यवस्था ही केवळ सामाजिक किंवा सांस्कृतिक विभागणी नसून श्रमिकांना कायमस्वरूपी अधीन ठेवणारी सांस्कृतिक आणि राजकीय यंत्रणा आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची सुरुवात याच वास्तवापासून होते. त्यांच्या लेखनात श्रम हा केवळ अर्थकारणाचा विषय नाही; तर तो मानवी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. म्हणूनच त्यांचे सर्वाधिक प्रसिद्ध विधान आहे ‘ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे.’

अण्णा भाऊंनी १९५८ रोजी मुंबईत झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक व अध्यक्ष या नात्याने स्पष्टपणे सांगितले होते, ‘जे आयुष्य मी जगतो, पाहतो आणि अनुभवतो त्याबद्दलच मी लिहितो.’ त्यामुळे त्यांच्या कथांतील पात्रे साहित्यिक कल्पना नसून भारतीय समाजाच्या उपेक्षित इतिहासाची जिवंत साक्ष आहेत. त्यांच्या कथेतील बरबाद्या, भोमक्या, निळू मांग, गिरणी कामगार किंवा मुंबईच्या झोपडपट्ट्यांतील स्थलांतरित माणूस ही केवळ पात्रे नाहीत; तर भारतीय आधुनिकतेच्या अपूर्णतेची साक्ष देणारे सामाजिक दस्तावेज आहेत. त्यांच्या व्यक्तिरेखा कल्पित नसून जीवनाच्या प्रत्यक्ष अनुभवातून घडलेल्या आहेत. अण्णा भाऊंच्या साहित्याचा केंद्रबिंदू दया, याचना नाही, तर प्रतिकार आहे. त्यांच्या व्यक्तिरेखा दु:ख भोगतात; पण त्या केवळ करुणेचे प्रतीक नाहीत. त्या अन्यायाचा प्रतिकार करतात. त्यामुळे त्यांच्या साहित्यामध्ये विद्रोह हा नकारात्मक भाव नसून स्वाभिमानाची अभिव्यक्ती आहे. शोषणाचे चित्रण करताना ते भावनिक उद्रेक करत नाहीत; त्यामागील सामाजिक संरचना उघड करतात. याच कारणामुळे त्यांचे साहित्य आजही तितकेच समकालीन वाटते.

आज अण्णा भाऊंच्या साहित्याच्या स्वीकाराकडे पाहिले, तर एक मनोरंजक विरोधाभास दिसतो. त्यांच्या जयंती, स्मृतिदिन किंवा निवडक साहित्यकृतींचा गौरव केला जातो; मात्र त्यांच्या संपूर्ण वैचारिक वारशाचे आकलन करण्याचे प्रयत्न तुलनेने कमी दिसतात. ही स्थिती परिवर्तनवादी साहित्याच्या व बर्‍याच लेखक साहित्यिकांच्या बाबतीतही दिसून येते. आज भारतात आर्थिक विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत आहेत. महामार्ग, औद्योगिक कॉरिडॉर, स्मार्ट शहरे, डिजिटल अर्थव्यवस्था आणि जागतिक गुंतवणूक यांची भाषा सार्वजनिक चर्चेत प्रमुख झाली आहे. परंतु या विकासाच्या पायावर उभा असलेला श्रमिक आजही असुरक्षित आहे. असंघटित कामगार, स्थलांतरित मजूर, कंत्राटी रोजगार, शेतीमजूर आणि शहरांच्या उपनगरांत राहणारे लाखो लोक विकासाच्या कथानकाबाहेरच राहतात. उत्पादनाची साधने बदलली; तंत्रज्ञान बदलले; पण श्रमाची सामाजिक प्रतिष्ठा मात्र फारशी बदलली नाही. अण्णा भाऊंचे साहित्य या विसंगतीकडे आजही नेमकेपणाने लक्ष वेधते. अण्णा भाऊंच्या पुनर्वाचनाची गरज आज अधिक तीव्र आहे. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणे सोपे आहे; पण त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सामोरे जाणे कठीण आहे. श्रमाला प्रतिष्ठा देणारी अर्थव्यवस्था, जातमुक्त समाजरचना, सांस्कृतिक लोकशाही आणि ज्ञानावर सर्वांचा समान अधिकार ही त्यांची स्वप्ने अजूनही अपूर्ण आहेत.

अण्णा भाऊंच्या लेखनात श्रम, दारिद्र्य, स्थलांतर, उपेक्षा आणि मानवी सन्मान यांचे प्रश्न परस्परांशी जोडलेले आहेत. म्हणूनच त्यांचे साहित्य भारतीय समाजाच्या परिवर्तनाची व्यापक संकल्पना मांडते. त्यांच्या साहित्यात जात, वर्ग आणि लिंग यांचे नाते अत्यंत सूक्ष्मपणे व्यक्त झालेले दिसते. अण्णा भाऊ साठे हे केवळ एका समाजाचे लेखक नव्हते; तर ते भारतीय लोकशाहीतील अपूर्ण समतेचे लेखक होते. त्यांनी साहित्याला संघर्षाची भाषा दिली, श्रमिकांच्या जगण्याला सौंदर्यदृष्टी दिली, उपेक्षितांच्या अनुभवाला इतिहासाचे स्थान दिले. म्हणूनच त्यांचे साहित्य भूतकाळातील दस्तऐवज नाही; ते वर्तमानाचा आरसा आणि भविष्याचा प्रश्न आहे.

जागतिकीकरण, नवउदारमतवाद आणि तांत्रिक बदलांच्या काळात आर्थिक विषमता कमी झालेली नाही; उलट तिची रूपे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. असंघटित श्रम, स्थलांतरित कामगार, असुरक्षित रोजगार आणि वाढती सामाजिक विषमता या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य नव्याने वाचण्याची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. त्यांच्या लेखनातील सामाजिक संवेदनशीलता आणि परिवर्तनाची आकांक्षा आजही तितकीच समकालीन आहे. विशेष म्हणजे त्यांनी ग्रामीण आणि शहरी या दोन्ही वास्तवांचे चित्रण केले. त्यांच्या पोवाड्यांमध्ये गिरणी कामगारांचा संघर्ष आहे; लोकनाट्यांमध्ये निवडणूक राजकारणाचा उपहास आहे; कथांमध्ये जातीय अपमान आहे; तर कादंबर्‍यांमध्ये स्वातंत्र्य, सन्मान आणि सामाजिक परिवर्तनाची आकांक्षा आहे. म्हणूनच त्यांचे साहित्य एका विशिष्ट प्रकारात बंदिस्त करता येत नाही. ते लोकसाहित्य आहे, वर्गसाहित्य आहे, दलितसाहित्य आहे, कामगारसाहित्य आहे; पण त्याचबरोबर ते आधुनिक भारतीय समाजाचे व्यापक राजकीय व सांस्कृतिक विश्लेषणही आहे.

अण्णा भाऊ साठे यांचे केवळ लोकशाहीर म्हणून स्मरण करणे म्हणजे त्यांच्या साहित्यदृष्टीची व्याप्ती मर्यादित करणे होय. त्यांना भारतीय परिवर्तनवादी विचारपरंपरेतील महत्त्वाचे साहित्यचिंतक म्हणून स्थान देणे, त्यांच्या साहित्याचे नव्याने मूल्यमापन करणे आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमांपासून सार्वजनिक चर्चांपर्यंत त्यांना योग्य स्थान मिळवून देणे ही आजच्या साहित्यविश्वासमोरील महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण अण्णा भाऊ यांचे साहित्य केवळ एका समाजघटकाचा इतिहास सांगत नाही; ते भारतीय लोकशाहीला अधिक समताधिष्ठित आणि मानवी बनविणार्‍या मूल्यांची सातत्याने आठवण करून देते.

(लेखक हे सहयोगी प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (नवी दिल्ली))

milindawwad1@gmail.com