विकास परसराम मेश्रा
कधी शिकलेले काय डोक्यात राहील आणि कुठवर घेऊन जाईल, सांगता येत नाही. ॲन कार्सन यांना नुकताच साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला. या ॲन शाळेत असताना त्यांचे लॅटिन भाषेचे एक शिक्षक होते. त्यांनी ॲनची प्राचीन ग्रीस, तिथली भाषा, साहित्य, वैभवाशी ओळख करून दिली. ‘त्या’ जगाच्या सांस्कृतिक, साहित्यिक वैभवाची भुरळ तिला पडली. काळाच्या ओघात शाळा मागे पडली, पण त्या जगाविषयीचं कुतूहल काही सरलं नाही. आज त्या कुतूहलाचीच परिणती असलेल्या त्यांच्या साहित्याने त्यांना नोबेलपर्यंत पोहोचवलं.

त्यांच्या लेखनाचा एक विशेष धागा म्हणजे शब्दांच्या व्युत्पत्तीविषयीचे आकर्षण. शब्दांची व्युत्पत्ती हाच आपल्या सर्व कामाचा प्रारंभबिंदू असल्याचे त्यांनी स्वत: सांगितले आहे. एखादा शब्द कुठून आला, त्याने काळाच्या प्रवासात कोणते अर्थ पांघरले आणि कोणते गमावले, याचा शोध घेताना त्यांच्या कविता आकार घेतात. त्यामुळे त्यांच्या ओळींमध्ये प्राचीन ग्रीकपासून आजच्या बोलीभाषेपर्यंतचा प्रवास एकाच श्वासात घडतो. भाषा ही केवळ विचार मांडण्याचे साधन नसून तो एक जिवंत पुरातत्त्वीय थर आहे, असा त्यांचा दृष्टिकोन असल्याचे दिसते.

त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९८६ मध्ये आलेले ‘इरॉस द बिटरस्वीट’ हे पुस्तक. १९८५ मध्ये त्यांनी सॅफो या प्राचीन ग्रीक कवयित्रीवर प्रबंध लिहिला होता आणि तोच या पुस्तकाचा आधार ठरला. प्रेम हे एकाच वेळी गोड आणि कडू का असते, याचा शोध घेताना त्यांनी इच्छा, अभाव आणि अंतराचे तत्त्वज्ञान उलगडून दाखवले. १९९८ मध्ये त्यांनी ‘ऑटोबायोग्राफी ऑफ रेड’ हे पद्य-कादंबरी स्वरूपातील पुस्तक लिहिले. एका ग्रीक पुराणकथेवर आधारलेले हे पुस्तक त्यांच्या सर्वाधिक ओळखल्या जाणार्‍या कृतींपैकी एक आहे. पुराणातील राक्षस गेरिऑन आणि त्याचा मित्र हेरॅक्लीस यांची कथा त्यांनी आधुनिक काळात आणून ठेवली. तिथे एक लाजरा, मुलगा कॅमेरा हातात घेऊन स्वत:चे अस्तित्व शोधत असतो. प्राचीन मिथक आणि आजच्या किशोरवयीन तरुणाची घालमेल एकत्र आणण्याचे हे धाडस भारावून टाकणारे ठरले.

त्यांच्या ‘द ब्युटी ऑफ द हजबंड’ या पुस्तकाला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. विवाहाचे हळूहळू कोसळत जाणे हा त्याचा विषय आहे, आणि तो कवितेतून सांगितलेल्या दीर्घ कथनाच्या रूपात मांडला आहे. या पुस्तकासाठी त्यांना टी. एस. एलियट पुरस्कार मिळाला आणि हा सन्मान मिळवणार्‍या त्या पहिल्या महिला ठरल्या. प्रेम, विश्वासघात आणि सौंदर्य यांच्यातील गुंतागुंत इतक्या थेट आणि वेदनादायक रीतीने क्वचितच मांडली गेली असेल. पतीचे सौंदर्य हेच पत्नीसाठी शाप कसे ठरते, याचे चित्रण वाचकाला अस्वस्थ करते आणि विचारातही पाडते.

या निवडीचे स्वागत करण्याचे आणखी एक कारण आहे. अलीकडच्या काळात नोबेलने अनेकदा कादंबरीकारांना प्राधान्य दिले होते. कवितेकडे वळणे हा वाचकांसाठी सुखद बदल ठरतो.
vikasmeshram04@gmail.com

गीतांजली श्री यांच्या पुस्तकाला नामांकन

‘टुम्ब ऑफ सँड’ या पुस्तकासाठी बुकर पारितोषिकाने गौरवण्यात आलेल्या साहित्यिक गीतांजली श्री आणि अनुवादक डेझी रॉकवेल या जोडगोळीच्या एका पुस्तकाला आता ‘वॉरविक प्राइज फॉर विमेन इन ट्रान्स्लेशन’च्या लघुयादीत स्थान मिळाले आहे. ‘अवर सिटी दॅट इयर’ असे या पुस्तकाचे नाव असून गीतांजली श्री यांची ही मूळ कादंबरी ‘हमारा शहर उस बरस’ या नावाने १९९८मध्ये प्रकाशित झाली होती. या पारितोषिकाची अंतिम यादी २६ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार असून १६ नोव्हेंबर रोजी लंडनमध्ये होणार्‍या एका समारंभात विजेत्यांची नावे घोषित करण्यात येतील. पुरस्काराचे हे १० वे वर्ष आहे. दीर्घ-यादीत १३ पुस्तकांचा समावेश आहे. अनुवादित साहित्यातील लिंग-विषयक असमतोल दूर करण्यासाठी आणि विशेषत: ब्रिटिश व आयरिश वाचकांपर्यंत आंतरराष्ट्रीय लेखिकांचे साहित्य पोहोचवून त्यांचे साहित्य क्षेत्रातील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी वॉर्विक विद्यापीठाने २०१७ मध्ये या पुरस्काराची सुरुवात केली होती. यंदा या स्पर्धेसाठी ३७ भाषांमधील एकूण १६४ प्रवेशिका प्राप्त झाल्या. या दीर्घ-यादीत १२ भाषांतून इंग्रजीत अनुवाद झालेल्या साहित्याचा समावेश असून, यात कथा-कादंबरी, कविता, लघुकथा या प्रकारांतील पुस्तकांचा समावेश आहे.