गती हीच ज्याची वृत्ती आहे, अशा आघाडीच्या कृत्रिम प्रज्ञा (एआय) कंपनीच्या प्रमुखाने परवा या क्षेत्रातील कंपन्यांना आवाहन केले, की एआय प्रारूपांच्या विकसनाचा वेग जरा कमी करा! ‘अँथ्रोपिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दारिओ अमोदेई यांचे हे विधान. ‘ओपनएआय’चे संस्थापक सॅम अल्टमन आणि ‘एक्सएआय’चे इलॉन मस्क यांनीही ‘मम’ म्हणत या इशारावजा विधानाला पाठिंबा दर्शविला. अमोदेई यांनी त्यांच्या कंपनीच्या ब्लॉगवर ३८०० शब्दांचा भला मोठा निबंध लिहिला. ‘(एआय प्रारूप विकसनाच्या) आघाडीवर, आपला चालीचा वेग जरा नियंत्रित करायला हवा’ असा त्याचा मथळा. अमोदेई असे म्हटले, त्याला पार्श्वभूमी आहे, ती गेल्या तीन-चार दिवसांत ‘एआय’ने केलेल्या नको त्या प्रतापांची. ती जाणून घेतली, तर अमोदेई असे का म्हणताहेत, ते लक्षात येईल.

‘अँथ्रोपिक’ने गेल्या बुधवारी सांगितले की, त्यांच्या ‘एआय एजंट’ने जानेवारी महिन्यातच एक संगणक प्रणाली ‘हॅक’ केली होती, ज्याची कबुली आता द्यायला हवी. जुलै महिन्यात ‘अँथ्रोपिक’ने अशाच अन्य तीन प्रसंगांची कबुली दिली होती. म्हणजे हा चौथा. हे प्रताप कंपनीच्या ‘क्लॉड’ या प्रारूपाच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांचे आहेत. या एआय एजंट अर्थात मध्यस्थांनी नेमके काय केले, हे सोप्या शब्दांत सांगायचे, तर ज्या कंपन्यांच्या संगणक प्रणालीतील सायबर सुरक्षेसह अन्य काही कामांच्या चाचण्या त्यांना करायला सांगितल्या, त्या केल्यावर त्यांच्या पुढच्या आवृत्त्यांनी या प्रणालीत स्वत:हून नाक खुपसून कुरापती काढल्या. हे एआय मध्यस्थ म्हणजे काही मानव नव्हेत. पण, ते चालविणारे तर मानव, म्हणजे कंपनीचे कर्मचारी आहेत. त्यांना या एआय मध्यस्थांवर नियंत्रण ठेवता न आल्याने हे घडले, हे गंभीर.

याचा अर्थ असा, की ही एआय प्रारूपे, प्रणाली किंवा साधने स्वत:च स्वत:चे ‘वंशज’ तयार करू लागली आहेत. संगणकीय वा गणिती भाषेत ज्याला पुनरावर्ती स्व-सुधारणा, म्हणजे मागील उत्तरावर तेच सूत्र वापरून स्वत:च त्या उत्तरात सुधारणा करणे, असे म्हणतात, तसे. अमोदेई यांनी अधोरेखित केलेला हा पहिला धोका. त्यांनी अधोरेखित केलेल्या दुसर्‍या धोक्यामध्ये ओपनएआय कंपनीच्या एका प्रयोगात अनियंत्रित झालेल्या एआय मध्यस्थांमुळे घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख येतो.

त्याचे झाले असे, की ‘ओपनएआय’चे काही संशोधक एआय मध्यस्थांवर प्रयोग करत होते. या मध्यस्थांना इंटरनेट वापराशिवाय काही कृती पूर्ण करायला सांगितले गेले. ते केले, की ‘बक्षिसी’ वगैरेही असते! काहींना त्यांचे उद्दिष्ट जमले नाही. त्यांनी मग उडाणटप्पूपणा करायला सुरुवात केली. त्यात त्यांना यंत्रणेत अशी एक फट सापडली, की त्याद्वारे एका एआय मध्यस्थाने चक्क एक संदेशफलक बनवला आणि त्यावर इतर उडाणटप्पू मध्यस्थांशी संवाद साधून झुंड तयार केली. या झुंडीने जर्मन भाषेतील एका विकी संकेतस्थळाचे चक्क अपहरण केले. नंतर ‘हगिंग फेस’ हा कृत्रिम प्रज्ञेमध्ये काम करणार्‍यांना त्यांचे प्रयोग करून पाहण्यासाठीचा मध्यवर्ती, सहयोगी मंचही या झुंडीला बळी पडला. म्हणून हा प्रसंग ओळखला गेला ‘हगिंग फेस इन्सिडन्ट’.

या प्रसंगातून अधोरेखित झालेला धोका म्हणजे एआय मध्यस्थांवर कंपन्यांचे राहात नसलेले नियंत्रण. त्याचीच भीती असल्याचे सांगून इव्हान ह्युबिंगर या ‘अँथ्रोपिक’मधील संशोधकाने नोकरी सोडली. येत्या दशकभरात ‘एआय’कडून मानववंश नष्ट होण्याची शक्यता १० टक्क्यांहून अधिक आहे, असे त्याचे म्हणणे. ‘एआय’आधारित यंत्रमानवांनी खेळांमध्ये केलेली कामगिरी, चित्र काढण्यापासून शस्त्रक्रिया करण्यापर्यंत केलेली प्रगती पाहिली, तर हे अगदीच अशक्य नाही. म्हणूनच अमोदेईंचे म्हणणे, ‘एआय प्रारूप विकसनाची गती कमी करा.’ एआय विकसन आणि सुरक्षिततेचे निकष कंपन्या पाळतात की नाही, यासाठी बाह्य तपासनीस असावेत, लोकशाही राष्ट्रांनी नियमनाधारित नियंत्रण राखावे आणि चीनसारख्या दांडगाई करणार्‍या देशांनी इतर कंपन्यांनी कमी केलेल्या वेगाचा गैरफायदा घेऊन पुढे जाऊ नये म्हणून अमेरिकेसह इतर देशांनी अशा देशांशी समन्वय साधावा, अशी अमोदेईंची यावरील उपाय त्रिसूत्री. ती जवळपास आदर्श व्यवस्था निर्माण करा, असे सांगणारी. तसे होणे कितपत शक्य? नैसर्गिक प्रज्ञेपुढे सध्या आव्हान या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे आहे.