scorecardresearch

अन्वयार्थ: चीनचा लाडका शत्रू : अमेरिका!

अमेरिका आणि चीन या वास्तव जगतातील दोन महासत्तांमध्ये सुरू असलेला संघर्ष नजीकच्या काळात कमी होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.

Chin Gang
चीनचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री चिन गांग

अमेरिका आणि चीन या वास्तव जगतातील दोन महासत्तांमध्ये सुरू असलेला संघर्ष नजीकच्या काळात कमी होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. चीनचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री चिन गांग यांनी पहिल्याच माध्यम परिषदेमध्ये मंगळवारी त्यांच्या वक्तव्यातील बहुतांश भाग अमेरिकेवर टीका करण्यात व्यतीत केला. तत्पूर्वी सोमवारी चीनच्या ‘पीपल्स पार्लमेंट’ला संबोधित करताना चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांनीही ‘युक्रेन युद्धामागील अदृश्य हात’ असे शब्द वापरत अमेरिकेलाच लक्ष्य केले होते. स्वत:च्या भूराजकीय आकांक्षांना चुचकारण्यासाठी अमेरिकेने आधुनिक इतिहासात अनेकदा ‘दृश्य वा अदृश्य’ हात वापरून लष्करी कारवाया भल्या-बुऱ्या मार्गानी घडवून आणलेल्या आहेत. हा इतिहास ते नाकारू शकत नाहीत. या इतिहासाचे दाखले अमेरिकेवर टीका करताना कोणी, किती आणि कसे द्यावेत यावर त्यामुळेच अमेरिकेचे नियंत्रण असू शकत नाही. परंतु युक्रेन युद्धाच्या बाबतीत अमेरिका खलराष्ट्र नाही हे जगातील किमान शंभर देश तरी नक्कीच मान्य करतील! हे खलराष्ट्र रशिया आहे आणि या युद्धखोरीमागील खलनायक व्लादिमीर पुतिनच आहेत हे नि:संशय. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात रशियन फौजा, रणगाडे आणि क्षेपणास्त्रे विविध दिशांनी युक्रेनवर आदळली. पण त्याच्याही कितीतरी आधीपासून चीन आणि अमेरिकेदरम्यान तीव्र मतभेदांना सुरुवात झाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमदानीत अमेरिका-चीन यांच्यादरम्यान व्यापारी तूट अमेरिकेसाठी मोठय़ा प्रमाणात व्यस्त आणि डोईजड ठरू लागली, तेव्हा ट्रम्प यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली.

त्यामागे रोकडय़ा अर्थज्ञानापेक्षा उघडावागडा राजकीय स्वार्थ होता. कारण अध्यक्षीय निवडणूक समीप येऊ लागली होती. पुढे करोनाचा उद्भव चीनमधून झाल्यामुळे आणि त्या ‘चिनी विषाणू’मुळे अमेरिकेत मोठय़ा प्रमाणात मनुष्यहानी व अपरिमित वित्तहानी झाल्यामुळे राजकीय आणि राजनैतिक वर्तुळांतून चीनविरोधाला – किमान चीन हा ‘मित्र नसल्या’च्या भावनेला – धार चढली. युक्रेन युद्ध आणि बलून प्रकरणामुळे ती सतत वाढतच गेली.
युक्रेन युद्धामुळे अमेरिका-रशिया संबंधही ताणले गेल्यामुळे चीनला रशियाशी दोस्ती घनिष्ठ करण्याची संधी आणि अवकाश मिळाला. गतवर्षी चिनी नेतृत्वाची युद्धाविषयीची भाषा थोडी वेगळी होती. युक्रेन आणि रशिया यांनी चर्चेतून मार्ग काढावा, अशी भूमिका त्यावेळी चीनने घेतली होती. त्यात आता आमूलाग्र बदल झालेला दिसतो. परराष्ट्रमंत्री चीन गांग यांच्या परराष्ट्रमंत्री रशियाचा उल्लेख सातत्याने नवीन दोस्त म्हणून केला गेला. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांकडून चीनची मुस्कटदाबी होत असताना रशियाबरोबर मैत्री स्थैर्य आणि बलाचे प्रतीक ठरेल, असे गांग म्हणाले.

परंतु चीनच्या बाबतीत लक्षात घेण्याजोगा बदल म्हणजे रशियामैत्रीचे नवे पर्व नसून, अमेरिकेवर होत असलेल्या टीकेची तीव्रता हा आहे. गेल्या काही महिन्यांत अध्यक्ष जिनिपग यांच्यासह चीनच्या सर्व सरकारी स्तरांवरून अमेरिकेवर थेट टीका सुरू झालेली दिसते. बलून प्रकरण हा या बिघडलेल्या संबंधांचा केवळ एक पैलू आहे. टिकटॉकसारख्या अमेरिकेत लोकप्रिय झालेल्या चिनी उपयोजनावर जो बायडेन प्रशासनाने बंदी घातली. तर बलून फोडून पाडण्याच्या त्या प्रशासनाच्या कृतीची गंभीर दखल चीनने घेतलेली आहे. चीनची बाजू विश्वमानसाला ठासून सांगण्यासाठी त्या देशाने राजनैतिक मोहिमांसाठीच्या खर्चात १२ टक्क्यांनी वाढ केली. ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्प मोहिमेला यंदा दहा वर्षे पूर्ण होतील. त्यांतील अनेक प्रकल्पांच्या मुद्दल आणि व्याजाच्या परतफेडीला चीनने स्थगिती दिली आहे. यामागे पाश्चिमात्य माध्यमांच्या टीकात्मक प्रचाराला उत्तर देणे हाही हेतू आहे. समाजमाध्यमे, बहुराष्ट्रीय संघटनांच्या परिषदा अशा व्यासपीठांवर अमेरिकेवर पद्धतशीर प्रतिहल्ला करण्यासाठी चीनने कंबर कसली आहे. भविष्यात या दोन देशांमध्ये आणखी एका मुद्दय़ावर संघर्षांची ठिणगी पडू शकते. युक्रेन युद्धासाठी रशियाला चीनने सामग्री स्वरूपात मदत पुरवण्याची शक्यता, हा तो मुद्दा. म्हणजे खऱ्या अर्थानी महासत्ता राहिलेल्या या दोन देशांमध्ये संघर्षिबदूंची संख्या कमी न होता वाढतानाच दिसत आहे. करोना आणि युक्रेन युद्ध यांतून अद्यापही पुरेशा सावरू न शकलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ही परिस्थिती म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच. चीन आणि रशिया यांना एकमेकांची साथ महत्त्वाची वाटू लागली असूनच, यातूनच चीनला अमेरिकेशी शत्रुत्व पत्करणे सोयीचे वाटू लागले आहे. वास्तविक हा अवसानघातकीपणा ठरू शकतो. कारण व्यापारउदिमाच्या बाबतीत चीन रशियापेक्षा कैक पटींनी अधिक पश्चिम युरोप आणि अमेरिकेशी संलग्न आहे. हे भान चिनी नेतृत्वाला असूनही ते रशियाशी मैत्री वाढवण्यास उत्सुक आहे ही बाब जगासाठी फार आश्वासक ठरत नाही.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 03:21 IST
ताज्या बातम्या