संगीत रंगभूमीच्या काळालाच मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ मानणारे खुशाल मानोत, पण कमलाकर नाडकर्णीनी पाहिलेला काळ हा विजया मेहता, सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी, अरिवद गोखले, जयदेव हट्टंगडी, अशोक जी. परांजपे, दिलीप कोल्हटकर अशा अनेकांचा काळ होता. ‘स्वतंत्र सामाजिक नाटक’ म्हणवणारी नाटके ‘दिवाणखान्या’तून बाहेर पडल्यानंतरचा हा काळ! अशोक सराफ यांचा अभिनय एकांकिका स्पर्धापासून पाहणारे आणि अभिनेत्यांच्या वा दिग्दर्शकांच्या मोठय़ा नावांचे दडपण अजिबात न बाळगता नाटकाबद्दल जे म्हणावे लागेल तेच लिहिणारे कमलाकर नाडकर्णी हे या काळाचे साक्षीदार. ‘रंगायन’पासून वेगळी होऊन ‘आविष्कार’ सुरू झाली, नाटय़निर्मात्यांनी दौऱ्यांसाठी खास बसगाडय़ा बाळगल्या, ‘राज्य नाटय़ स्पर्धे’तून चांगल्या संहिता आणि चांगले दिग्दर्शक महाराष्ट्राला मिळू लागले आणि एकांकिका, बालनाटय़ या नाटय़प्रकारांतूनही त्याकाळी महाराष्ट्राचा ‘ब्रॉडवे’ मानल्या जाणाऱ्या शिवाजी मंदिपर्यंत जाणाऱ्या वाटा खुल्या झाल्या, तो हा नाडकर्णी यांनी पाहिलेला, जगलेला काळ. ते नाटय़समीक्षा या प्रकाराशीच प्रामाणिक राहिले. आधी मासिकांतून, मग ‘लोकसत्ता’मधून आणि पुढे ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून. ‘लोकसत्ता’मध्ये चित्रपट-परीक्षणांचे शुक्लकाष्ठ त्यांच्यामागे लागले नव्हते, ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये लागले! पण मग, गांभीर्याने नाटकाबद्दल लिहायचे आणि व्यावसायिक हिंदी चित्रपटांमध्ये खिल्ली उडवण्यासारखे काय आहे, हे नेमके हुडकून हलकेफुलके लिहीत सुटायचे, असा मध्यममार्गही नाडकर्णीनी स्वीकारला. नेमका हा नव्वदीच्या दशकाचा काळ कुणी बासू चटर्जी, हृषिकेश मुखर्जी नसतानाचा आणि रामगोपाल वर्मा, अनुराग कश्यप अद्याप येणार असतानाचा. त्या पोकळीमधल्या बॉलीवुडी बथ्थडपणाचे भाष्यकार म्हणून प्रेक्षकांनीही नाडकर्णीना स्वीकारले. चित्रपटविषयक लिखाणातल्या नाडकर्णीच्या शैलीचा चाहतावर्गच नव्हे तर शिष्यवर्गही तयार झाला. नाडकर्णी ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून पंधरा-वीस दिवसांची रजा घेऊन राज्य नाटय़स्पर्धेचे परीक्षक म्हणून दूरच्या जिल्ह्यांत जात, त्या वेळी चित्रपट परीक्षणे लिहिण्याची संधी मिळालेल्या काही तत्कालीन नवोदित पत्रकारांनीही मग नाडकर्णीच्या शैलीत लिहिले. वास्तविक याची गरज नव्हती. नाडकर्णी नाटकाकडे एक माध्यम म्हणून समग्रपणे पाहात, तसे चित्रपटांकडे पाहात नव्हते. तरीही अर्थात नाटय़कलेतली त्यांची समज या परीक्षणांमध्येही दिसे. ‘रंगीला’मधली नायिका कितीही तोकडे कपडे घालून नाचली तरी निरागस चिमुरडय़ा मुलीसारखीच वाटते हे त्यांचे निरीक्षण पात्रयोजनेची अचूक जाण दाखवणारे होते . ‘मादाम बोव्हारी’ या फ्रेंच कादंबरीवरून बेतलेल्या ‘माया मेमसाब’सारख्या चित्रपटातील नायिका सौंदर्यमूर्तीच हवी अशी या चित्रपटाच्या कथानकाची गरज असल्याचे म्हणणेही रंगभूमीवरल्या अनुभवातून आलेले होते.
नाडकर्णी यांनी नाटके लहानपणापासून पाहिली, पुढे बालनाटय़ात अभिनयही केला पण तेव्हाही ते दिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य आदी बाजू ‘पाहात’ होते- निरीक्षण आणि मनन करत होते. याला प्रत्यक्ष अभ्यासाची जोड मात्र नाडकर्णीनी प्रयत्नपूर्वक दिली. वाचन तर केलेच, पण नाटक पाहायचे, त्यावर मते व्यक्त करायची, ती काही जाणकारांच्या मतांशी ताडून पाहाताना ‘त्यांचे मत तसे का असेल’ याचा विचार करायचा, ही नाटकासारख्या जिवंत- निव्वळ ग्रथित होऊच न शकणाऱ्या- क्षेत्राचा समीक्षक म्हणून अभ्यास करण्याची पद्धत. ती पाळणाऱ्या नाडकर्णीना नाटय़कलेत आजवर काय काय झालेले आहे, याची पक्की माहिती होती- ती अनेकदा सहजपणे ते लिहूनही जात- पण त्याहीपेक्षा, ‘आज काय हवे आहे’, याची जाण त्यांना आलेली होती. त्यामुळेच धो-धो चालणाऱ्या पण ‘किस्सेबाज’ (हा शब्द अनंत भावे यांचा) अशा करमणूकप्रधान नाटकांबद्दल त्यांनी हात राखूनच लिहिले. नाटकाच्या नावात ‘लव्ह’च्या जागी बदामाची खूण वापरणाऱ्या ‘डॅडी आय लव्ह यू’ यासारख्या नाटकाबद्दल लिहिताना तर त्यांनी बॉलीवूडबद्दल लिहितानाची सारी खिल्ली-अस्त्रे वापरली. ‘महानाटय़’ म्हणून स्टेडियमसारख्या जागी सादर होणाऱ्या ‘जाणता राजा’चे नाडकर्णीकृत समीक्षण ‘द ग्रेट बाबासाहेब पुरंदरे सर्कस’ या शीर्षकाचे होते, त्यावरून त्याही काळात- त्या काळच्या साधनांनिशी ‘ट्रोलिंग’ झालेच.. पण या सादरीकरणात चमत्कृती, विस्मयजनकता, भव्यता हे सारे काही असले तरी ‘नाटय़’ नाही, या म्हणण्यावर नाडकर्णी ठाम राहिले. पण ‘पोहा चालला महादेवा’सारख्या राज्य नाटय़ स्पर्धेतल्या नाटकाचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते.
केवळ शरीर थकल्यामुळेच नाडकर्णीचा लिहिता हात थांबला. आता ते स्मृतिरूपानेच उरले. त्यांची विखुरलेली परीक्षणे अभ्यासकांना एकत्र उपलब्ध झाल्यास त्यांचा स्वतंत्र बाणा आणि सामाजिक भान यांवर अधिक प्रकाश पडेल. अशा अभ्यासांची आज महाराष्ट्राला गरज आहे. नाडकर्णी यांना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.