भूतकाळात सातत्याने नको त्या युद्धांमध्ये स्वत:चे सैन्य आणि सामग्री पाठवून हात पोळलेल्या अमेरिकेच्या धोरणात्मक पुनर्विलोकनाचा फटका युक्रेनला बसत आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच आपल्या देशाची सीमा ओलांडून परदेशी जाऊन आले. हा परदेश म्हणजे अमेरिका असणे हे बरेचसे स्वाभाविक. युक्रेनवर नृशंस हल्ला करणाऱ्या रशियाच्या विरोधात सर्वाधिक प्रखर आघाडी वैचारिक व्यासपीठावर उघडण्याचे श्रेय उत्तर अटलांटिक सहकार्य संघटना अर्थात ‘नाटो’ला द्यावे लागेल. अमेरिका हा ‘नाटो’चा अधिपती देश. या नात्याने युक्रेनला मदत करणे हे अमेरिकेचे दायित्वही ठरते. कारण युक्रेनला नाटोच्या कळपात खेचण्याच्या प्रयत्नांत त्यावर हे संकट गुदरले, या रशियन दाव्याचा सडेतोड प्रतिवाद अमेरिकेला करता आलेला नाही. व्लादिमीर पुतिन यांनी हीच सबब पुढे करून आपली राक्षसी महत्त्वाकांक्षा मूर्तरूपात उतरवण्याचा डाव साधला. त्यांच्या हल्ल्याला युक्रेनने केलेल्या चिवट प्रतिकारामुळे हल्ला फसल्याची उपरती पुतिन यांना झाली असेलही. परंतु सध्याच्या पेचाबद्दल नाटो विस्तारवादाला जबाबदार ठरवणाऱ्यांमध्ये मातबर विश्लेषकही येतात. विशेषत:, युक्रेन नाटोमध्ये समाविष्ट होण्याच्या आधीच्या त्रिशंकू अवस्थेतच रशियाने डाव साधला तर काय, हा विचारच अमेरिका आणि तिच्या सहकाऱ्यांकडून झाला नव्हता. या व्यूहात्मक ढिसाळपणाची जबर किंमत आज युक्रेन आणि बाह्यजगतालाही मोजावी लागत आहे. रूढार्थाने युक्रेन नाटोचा सदस्य नसल्यामुळे, त्याच्या मदतीला जाण्याचे घटनात्मक दायित्व नाटोच्या सदस्य देशांवर नाही. तरीही आज खारकीव्ह किंवा खेरसन येथून रशियन फौजांना हुसकावून लावून युक्रेन धैर्याने लढत आहे, याचे श्रेय झेलेन्स्कींचे खंबीर नेतृत्व, युक्रेनच्या फौजांचे शौर्य आणि रशियन फौजांच्या कालबा युद्धसिद्धतेला द्यावे लागते. या सगळय़ा पार्श्वभूमीवर २२ डिसेंबर रोजी, म्हणजे रशियन हल्ला सुरू झाल्यानंतर साधारण दहा महिन्यांनी झेलेन्स्की अमेरिकेत दाखल झाले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी भेटीदरम्यान आणि नंतर अमेरिकी काँग्रेसमध्ये केलेल्या भाषणात आभारप्रदर्शनाबरोबरच एक मुद्दा झेलेन्स्की यांनी विशेषत्वाने अधोरेखित केला. ‘अमेरिकेने आजवर केलेली आणि सध्या देऊ केलेली मदत ही धर्मादाय मदत नसून, जागतिक सुरक्षा आणि लोकशाही मूल्यांमध्ये केलेली गुंतवणूक आहे,’ हे झेलेन्स्की बजावतात. अमेरिकी काँग्रेसमध्ये युक्रेनचा झेंडा फडकावत झेलेन्स्की यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. या प्रतीकात्मकतेपलीकडे जाऊन युक्रेनला मदत करणे अमेरिकेसाठी क्रमप्राप्त आहे. आजवर जवळपास ५४ हजार कोटी डॉलरची मदत अमेरिकेने शस्त्रास्त्रे आणि इतर सामग्रीच्या स्वरूपात पाठवलेली आहे. नुकताच १८० कोटी डॉलरच्या ताज्या मदतीचा प्रस्ताव मंजूर झाला, ज्यात पेट्रियट क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीचाही समावेश आहे. झेलेन्स्कींच्या अमेरिका भेटीनंतर काही तासांनी पुतिन यांनी युद्ध थांबवण्याचे  सूतोवाच केले आहे. ‘थांबवणार’ म्हणजे ते नक्की काय करणार, याविषयी सध्या काहीही तर्क निघू शकतात. पण झेलेन्स्की यांना पुढील वर्षी हे युद्ध अमेरिकेच्या मदतीने निर्णायक वळणावर जाऊ शकते, असे वाटते. जो बायडेन यांच्या कारकीर्दीच्या दृष्टीने हा अत्यंत कळीचा कालखंड ठरू शकतो. फार थोडय़ा अमेरिकी अध्यक्षांनी संघर्ष आणि युद्धांना यशस्वी पूर्णविराम दिल्याचे इतिहास सांगतो. तो बदलण्याची संधी बायडेन यांना आहे.

Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी
us clear stand on gaza ceasefire
गाझातील शस्त्रविरामासाठी अमेरिकेची स्पष्ट भूमिका; नकाराधिकाराचा वापर टाळल्याने यूएनएससीमध्ये ठराव मंजूर, नेतान्याहूंचा अमेरिका दौरा रद्द
illegal annexation of crimea marathi news, russia crimea marathi news, russian pilot project marathi news
विश्लेषण : दहा वर्षांपूर्वी रशियाने विनाप्रतिकार घेतला क्रायमियाचा घास! ‘पायलट प्रोजेक्ट’ने कशी झाली युक्रेन आक्रमणाची सुरुवात?