अमेरिकी सेनेटमध्ये शेवटच्या जागेसाठी झालेल्या फेरनिवडणुकीमध्ये जॉर्जिया राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे राफाएल वॉरनॉक हे विजयी ठरले. भारतातील सध्याच्या निवडणूक कोलाहलात या विजयाचे महत्त्व विरून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा परामर्श घेणे आवश्यक ठरते. सर्वप्रथम आकडय़ांविषयी. जॉर्जियातील सेनेटच्या एका जागेसाठी झालेल्या या फेरनिवडणुकीपूर्वी सेनेटमध्ये रिपब्लिकनांचे ४९ आणि डेमोक्रॅट्सचे ५० असे पक्षीय बलाबल होते. तांत्रिकदृष्टय़ा जॉर्जियाची जागा डेमोक्रॅट्सनी गमावली असती, तरी दोन्ही पक्षांचे समसमान ५० संख्याबळ झाले असते. अशा वेळी सेनेटच्या पीठासीन अधिकारी आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे मत कोंडी फोडण्यासाठी (टायब्रेकर) निर्णायक ठरले असते. मध्यावधी निवडणूकपूर्व सेनेटमध्ये ही स्थिती होती. परंतु वॉरनॉक यांच्या विजयामुळे सेनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला ५१-४९ असे साधे तरी महत्त्वपूर्ण बहुमत प्राप्त झाले. आधीच्या वेळी समसमान सदस्यसंख्येमुळे महत्त्वाच्या समित्यांची अध्यक्षपदे रिपब्लिकनांबरोबर वाटून घ्यावी लागत होती. यातून निर्णयप्रक्रियेत अनेक अडथळे उभे राहायचे. अमेरिकी काँग्रेसमध्ये प्रतिनिधिगृह आणि सेनेट अशी दोन सभागृहे असली, तरी सेनेटचे अधिकार अधिक व्यापक आणि निर्णायक असतात. अध्यक्षांनी केलेल्या सर्व महत्त्वाच्या नियुक्त्यांना सेनेटची मंजुरी मिळणे अनिवार्य असते. सर्वोच्च न्यायालयात एखाद्या न्यायाधीशाचे पद रिक्त झाल्यास नवीन नियुक्तीसाठी सेनेटमधील बहुमत निर्णायक ठरते. अनेक प्रकरणांच्या चौकशा सुरू करताना, दर वेळी रिपब्लिकनांचा अभिप्राय किंवा संमती घेण्याची गरज आता फारशी राहणार नाही. उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना वॉशिंग्टनबाहेर पडण्याची थोडी उसंत यानिमित्ताने मिळेल. सेनेटमधील कोंडी फोडण्यासाठी त्यांचे मत अनन्यसाधारण होते आणि तब्बल २६ वेळा त्यांना सभागृहात उपस्थित राहून डेमोक्रॅट्सच्या बहुमतासाठी स्वत:चे मत वापरावे लागले. परंतु वॉरनॉक यांच्या विजयाचे महत्त्व निव्वळ सेनेट संख्याबळापलीकडे व्यापक आणि खोल आहे. जॉर्जिया या दक्षिणकेडील राज्यात सलग दुसऱ्यांदा सेनेट निवडणुकीत डेमोक्रॅट्सना मतदान केले. अमेरिकेच्या दक्षिणकेडील हे राज्य वर्षांनुवर्षे रिपब्लिकनांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. पण २०२०मधील अध्यक्षीय निवडणुकीत या राज्याने बायडेन यांना कौल दिला. २०२४मधील अध्यक्षीय निवडणुकीच्या दृष्टीने हे राज्य मोक्याचे ठरू शकते. ट्रम्प यांनी या राज्यात हर्शल वॉकर या उमेदवाराच्या पाठीशी मोठी ताकद उभी केली होती. वॉकर यांच्या पराभवामुळे ट्रम्प यांनी पाठिंबा दिलेला आणखी एक उमेदवार पराभूत झाला आहे. ट्रम्प यांनी पाठिंबा दिलेले उमेदवार अ‍ॅरिझोना, पेनसिल्वेनिया आणि जॉर्जिया येथील सेनेट निवडणुकीत; तर अ‍ॅरिझोना, विस्कॉन्सिन, मिशिगन आणि पेनसिल्वेनिया येथील गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. ट्रम्प यांचे रिपब्लिकन पक्षातील महत्त्व कमी करणारी ही निवडणूक ठरली. त्याचबरोबर, बायडेन यांनी या निवडणुकीत सादर केलेल्या संयमी परंतु निर्धारपूर्वक नेतृत्वाकडे दुर्लक्ष करता येत नाही. वक्तृत्वशैलीचा ठळक अभाव आणि वाढते वय या मर्यादांवर मात करून, पूर्ण ताकदीनिशी त्यांनी ट्रम्प आणि ट्रम्पवादाचा सामना केला. हे करत असताना अमेरिकी मूल्यांशी – लोकशाही, धर्मनिरपेक्षता, वंशनिरपेक्षता, समान संधी – कधीही प्रतारणा करता येऊ शकत नाही, हे मतदारांच्या मनात यशस्वीरीत्या ठसवले. परिपक्व आणि सर्वसमावेशक बायडेन नीतीचे महत्त्व या मध्यावधी निवडणुकीत पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anvyartha biden in the us senate democratic of the party raphael warnock victorious ysh
First published on: 09-12-2022 at 00:02 IST