scorecardresearch

अन्वयार्थ: हिंसेचे उदात्तीकरण काँग्रेस रोखू शकेल?

काँग्रेसच्या नेत्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही, सत्ता नसेल तर ते अस्वस्थ होतात आणि बेभान होऊन वादग्रस्त विधाने करू लागतात.

अन्वयार्थ: हिंसेचे उदात्तीकरण काँग्रेस रोखू शकेल?
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

काँग्रेसच्या नेत्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही, सत्ता नसेल तर ते अस्वस्थ होतात आणि बेभान होऊन वादग्रस्त विधाने करू लागतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात काँग्रेसचे माजी मंत्री राजा पटेरिया यांनी काढलेले उद्गार हे याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. ‘मोदी संसदीय निवडणूक व्यवस्था नष्ट करतील. मोदी या देशात धर्म, जात, भाषेच्या आधारावर दुफळी माजवतील. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाचे जगणे धोक्यात आले आहे. संविधान वाचवायचे असेल तर, मोदींची हत्या केली पाहिजे’, असे अत्यंत आक्षेपार्ह विधान पटेरिया यांनी केले. त्यांच्या प्रक्षोभक भाषणाचे कोणीही समर्थन करणार नाही. त्यामुळे त्यांच्या अटकेची मध्य प्रदेश सरकारने केलेली कारवाई उचित म्हटली पाहिजे. केंद्रात सत्ता स्थापन झाल्यापासून गेल्या आठ वर्षांमध्ये भाजपने राज्या-राज्यांमध्ये काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली. उत्तर प्रदेशसारख्या सर्वात मोठय़ा राज्यावर कधीकाळी वर्चस्व गाजवणाऱ्या काँग्रेसचे तिथे आता जेमतेम दोन आमदार आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, आसाम, कर्नाटक अशा अनेक राज्यांमध्ये भाजपने सत्तेवरची पकड घट्ट केली असताना काँग्रेसची संघटना दिवसागणिक अधिकाधिक कमकुवत होऊ लागली आहे. वैफल्यग्रस्त झालेल्या ज्योतिरादित्य शिंदेंसारख्या नेत्यांनी भाजपमध्ये जाऊन सत्ता मिळवली. पण ज्यांना भाजपमध्ये जाण्याची संधी मिळाली नाही, ते मोदी-शहांवर तोंडसुख घेऊन आपली खदखद बाहेर काढत आहेत. पण, त्यातून काँग्रेसमधील नेत्यांची वैचारिक दिवाळखोरी चव्हाटय़ावर आली आहे. ‘मोदींची हत्या नव्हे तर, मोदींना निवडणुकीत हरवले पाहिजे, असे मला म्हणायचे होते, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला’, असा न पटणारा युक्तिवाद करून पटेरिया यांनी स्वत:ला आणखी उघडे पाडले आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळे जण गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन राजकारण करत असल्याचा दावा करत असतात. अहिंसेवर विश्वास असल्याचे सांगतात. सध्या काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेतून समाजाला जोडण्याचा संदेश देत आहेत, त्याच वेळी त्यांच्या पक्षातील पटेरियांसारखे नेते हिंसेचे जाहीरपणे समर्थन कसे करू शकतात, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेच्या हिंसक विचारांच्या उद्दात्तीकरणाचा काँग्रेसने प्रखर विरोध केला आहे. मध्य प्रदेशमधील भोपाळ येथील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी गोडसेंच्या विचारांचे समर्थन केले होते, त्या विरोधात काँग्रेसने संसदेतही आवाज उठवला होता. त्याच मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री मोदींच्या हत्येसाठी कार्यकर्त्यांनी तयार राहिले पाहिजे, असे आवाहन करत आहेत. पटेरिया यांचे विधान ऐकल्यावर काँग्रेसमध्येही ‘गोडसे प्रवृत्ती’चा छुपा संचार झाला असावा, असा दाट संशय निर्माण होऊ शकतो. गांधींजींशी आणि त्यांच्या विचारांशी सक्षम लढा देता न आल्यामुळे गोडसेने गांधीजींची हत्या केली होती. व्यक्तीचा खात्मा करून हित साधण्याच्या वृत्तीतील हे साम्य पटेरिया यांच्या विधानामध्येही प्रकर्षांने दिसते. बाबरी मशीद आणि राम मंदिराचे श्रेय भाजपला कशासाठी द्यायचे, आपणच राजकीय फायदा करून घेतला पाहिजे, असे मत मांडणारे कार्यकर्तेही काँग्रेसमध्ये सापडतात. त्यांच्या आणि पटेरियांच्या प्रवृत्तीमध्ये फरक नसतो. काँग्रेसने पटेरियांना ठणकावले असून त्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. पटेरियांना पक्षातून निलंबित केले जाऊ शकते पण, लोकशाही मूल्यांवर विश्वास असणाऱ्या राजकीय पक्षामधील नेते हिंसेचे उदात्तीकरण करण्याचे धाडस करूच कसे शकतात? हे काँग्रेसच्या केवळ संघटनात्मक नव्हे तर वैचारिक दुबळेपणाचे द्योतक म्हणावे लागेल.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-12-2022 at 01:08 IST

संबंधित बातम्या