क्रिमिया या रशियाव्याप्त युक्रेनी प्रांताच्या सागरी क्षेत्रात, विशेषत: सेवास्टोपोल बंदर परिसरात युक्रेनने अलीकडच्या काळात तिखट हल्ले आरंभले आहेत. सध्याच्या घडीला युक्रेनचे पाच प्रांत पूर्णत: वा बहुतांशत: रशियाच्या ताब्यात आहेत : क्रिमिया, डॉनेत्स्क, लुहान्स्क, खेरसन, झापोरिझ्झिया. यांपैकी क्रिमिया प्रांतावर रशियाने २०१४ मध्येच लुटुपुटीच्या सार्वमताच्या आधारे अंमल लादला. लुहान्स्क आणि डॉनेत्स्क प्रांतांच्या काही भागांचा ताबा रशियाधार्जिण्या बंडखोरांनी त्यानंतरच्या काळात घेतला. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी याच दोन प्रांतांना रशियाशी जोडून घेण्याच्या प्रधान उद्दिष्टापायी रशियाने युक्रेनवर अनेक आघाडय़ांवरून हल्ला केला. पण क्रिमियाच्या वेळी दाखवलेली उदासीनता या वेळी मात्र युक्रेनने दाखवली नाही आणि रशियाला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या नेतृत्वामुळेच कीएव्ह हे राजधानीचे शहर, तसेच आणखी काही महत्त्वाची शहरे रशियाच्या हातात पडली नाहीत.
यात महत्त्वाचा भाग म्हणजे युक्रेनचा प्रतिकार जिवंत राहिला. या प्रतिकाराला प्रतिहल्ल्यामध्ये परिवर्तित करण्याची झेलेन्स्की यांची महत्त्वाकांक्षा आहे. तिला आतापर्यंत मर्यादित यशच मिळू शकले. रशियाच्या जोखडातून क्रिमियासह युक्रेन मुक्त करण्याची ही योजना दीर्घ काळ सुरू राहील अशीच चिन्हे आहेत. परंतु असे असतानाही युक्रेनचे प्रतिहल्ले थांबलेले नाहीत आणि रशियाच्या काळय़ा समुद्रातील आरमाराच्या मुख्यालयावरील – सेवास्टोपोल – २३ सप्टेंबर रोजीचा हल्ला युक्रेनची प्रहारक्षमता तसेच हिमतीचा निदर्शक आहे. या हल्ल्यामध्ये रशियन नौदलाचे अनेक अधिकारी आणि काळय़ा समुद्रातील रशियन आरमारप्रमुखाचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. आरमारप्रमुखाच्या मृत्यूविषयी दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. मात्र अशा प्रकारे रशियाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील तळावर हल्ला करून युक्रेनने इरादे दाखवून दिले आहेत.
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anvyartha in the maritime zone of the russian occupied ukrainian province of crimea attacks started ysh