scorecardresearch

अन्वयार्थ : अतिथि देवो भव..?

गोव्यात आलेल्या एका डच तरुणीवर. योगाभ्यासासाठी गोव्यात आलेली ही डच तरुणी रात्री एका तंबूत झोपलेली असताना तेथील रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

rape
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

जगात सगळीकडे आपली भारतीय संस्कृती किती महान याचा डांगोरा पिटायचा आणि ती पाहायला येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसमोर त्याच संस्कृतीची लक्तरे फेडून त्यांनाच अपमानित आणि लज्जित करायचे हा आपला खाक्या कधी बदलणार आहे? यावेळी ही वेळ आली ती गोव्यात आलेल्या एका डच तरुणीवर. योगाभ्यासासाठी गोव्यात आलेली ही डच तरुणी रात्री एका तंबूत झोपलेली असताना तेथील रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर आणि तिचा आरडाओरडा ऐकून तिच्या मदतीसाठी आलेल्या एका तरुणावर चाकूहल्ला- देखील झाला. त्यात ते दोघेही जखमी झाले आहेत. तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असले तरी या प्रकरणात देश म्हणून जायची ती आपली अब्रू गेलेलीच आहे. कारण हे असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. नुकत्याच झालेल्या होळीच्या सणाला दिल्लीमध्ये एका २२ वर्षीय जपानी तरुणीच्या अंगचटीला येऊन एका टोळक्याने तिला रंग फासला. तिच्या डोक्यावर अंडे फोडले. या सगळय़ा प्रकाराची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्या तरुणांना ताब्यात घेण्यात आले. सहा-आठ महिने आधी म्हणजे २०२२ च्या जून महिन्यात एका ब्रिटिश महिलेवर गोव्यात तिच्या जोडीदारासमोरच बलात्कार करण्यात आला. त्या प्रकरणातही आरोपीला नंतर अटक करण्यात आली. याशिवाय परदेशी प्रवाशांना लुटण्याची प्रकरणेदेखील कमी नाहीत.  

एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण ‘अतिथि देवो भव’ हा उदात्त विचार मांडत असलो तरी प्रत्यक्षामधली परिस्थिती मात्र तशी नाही, हेच या उदाहरणांवरून दिसून येते. भारतामधले सांस्कृतिक वैविध्य, जैवविविधता, तुलनेत असलेली स्वस्ताई, वारसा वास्तू हे सगळे पाहण्या- अनुभवण्यासाठी परदेशी पर्यटकांचा भारताकडे ओढा असतो. आपली आणि इतर अनेक विकसित देशांमधली जगण्याची, विचार करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे तेथील अनेक तरुणी भाऊ, वडील, नवरा, मुलगा अशा तथाकथित रक्षणकर्त्यांचे संरक्षक कवच न घेता एकटीनेच जग पाहायला बाहेर पडतात. स्वत:चीच सोबत त्यांच्यासाठी पुरेशी असते.

पण आपल्याकडे गोरी कातडी, त्यात बाई आणि त्यातही ती एकटी हे सगळे म्हणजे जणू नुसतीच ‘सुसंधी’ नाही तर ‘सुवर्णसंधी’. एक-दोन दिवसांसाठी गोव्यात आलेल्या संबंधित डच तरुणीचे वास्तव्य एका साध्या तंबूमध्ये होते. अशा पद्धतीने बरोबर कुणी नसताना एखादी स्त्री राहते म्हणजे ती आपल्याला सहज उपलब्धच आहे, असा विचार केला जाणे ही गोष्टच भयंकर आणि किळसवाणी आहे. समोरच्या व्यक्तीला रंग लावणे म्हणजे स्पर्श करणे तर सोडाच, तिचे छायाचित्र काढण्याआधी- देखील तिची परवानगी घेणे आवश्यक असते, हे कुणाच्या गावीही नसते, कारण व्यक्तीचे स्वातंत्र्य ही गोष्ट आपल्याकडे सगळय़ाच बाबतीत गृहीतच धरून टाकली जाते. इथली भाषा न येणाऱ्या, इथे कसलेच लागेबांधे नसलेल्या, मोकळेपणाने वावरणाऱ्या परदेशी पाहुण्यांना विशेषत: परदेशी स्त्रियांना त्यामुळे इथे आल्यावर ज्या बीभत्स प्रकारांना सामोरे जावे लागते ते संतापजनक आहे. एरवी भारतीय स्त्रियांनाही समाजात वावरताना जे अनुभव येतात, ते पाहता खरे तर ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ वगैरे थोतांड सांगणे आपण बंद करून टाकले पाहिजे. स्त्रीकडे मालकीहक्काच्या, संपत्तीच्या भावनेतून बघण्याची, स्त्रिया म्हणजे केवळ उपभोगाचे साधन आणि त्यात त्यांची संमती अपेक्षितच नाही हा पुरुषी दृष्टिकोन बदलण्याचे काम अगदी शालेय जीवनापासून करायला घेतले गेले पाहिजे.

इथल्या समाजावर, इथल्या व्यवस्थेवर, यंत्रणेवर विश्वास ठेवून देश बघायला, फिरायला आलेल्या परदेशी प्रवाशांवर लैंगिक अत्याचार, त्यांची आर्थिक लुबाडणूक या गोष्टी फक्त देशाची बदनामी करणाऱ्या नाहीत, तर माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. मुळात देशाची कोणत्याही पातळीवर बदनामी होता कामा नये, हासुद्धा आपल्या देशप्रेमाचा, देशभक्तीचाच एक भाग आहे. पण आजकाल आपली देशभक्ती वेगळय़ाच मार्गावर भरकटते. असे प्रकार सातत्याने घडतात तेव्हा त्यामागचे एक ठळक कारण म्हणजे कायदा सुव्यवस्थेशी संबंधित यंत्रणांचा अजिबात नसलेला धाक. या यंत्रणा आपले काही करू शकत नाहीत, याची खात्री असते, तेव्हाच गुन्हेगारी प्रवृत्ती मोकाट सुटतात. इथली जनता त्याचा अनुभव रोज घेत असतेच, पण परदेशी पर्यटकांसाठी तरी यंत्रणांना आपला धाक निर्माण करावाच लागेल. अन्यथा ‘जी-२०’ परिषदेच्या अध्यक्षपदाच्या काळात आपण त्या पाहुण्यांसमोर सगळे गोडगोड चित्र उभे करणार आणि पर्यटनस्थळी एकेकटे फिरणारे परदेशी पर्यटक मात्र गुन्हेगारी वृत्तींना बळी पडणार, हे काही बरे नाही.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या