scorecardresearch

अन्वयार्थ: आता काळजी सुरू..

‘मुखपट्टीचा वापर पुन्हा सुरू करा’ ही भारतीय वैद्यक संघटनेने (इंडियन मेडिकल असोसिएशन- आयएमए) आठवडय़ाभरापूर्वी केलेली सूचना देशात कुणी गांभीर्याने घेतलेली नसल्याचे आपण साऱ्यांनीच आपापल्या परिसरात पाहिले आहे.

corona
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

‘मुखपट्टीचा वापर पुन्हा सुरू करा’ ही भारतीय वैद्यक संघटनेने (इंडियन मेडिकल असोसिएशन- आयएमए) आठवडय़ाभरापूर्वी केलेली सूचना देशात कुणी गांभीर्याने घेतलेली नसल्याचे आपण साऱ्यांनीच आपापल्या परिसरात पाहिले आहे. या सूचनेचे आणि त्यामागच्या काळजीचे कारण ठरलेला ‘एच-थ्री एन-टू’ हा फ्लूचा म्हणजे एन्फ्लुएन्झाचा विषाणू देशभरात वेगाने पसरला आणि हरयाणा तसेच कर्नाटकात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू याच विषाणूच्या तापामुळे झाल्याचेही शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या सूचनेचे गांभीर्य तर वाढतेच, पण यापुढली पावले उचलण्यास सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत का, हा प्रश्नही अधिक तीव्र होतो. आशादायक बाब म्हणजे, ‘एच-थ्री एन-टू’ने दोन बळी घेतल्याच्या बातमीपाठोपाठ केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने या विषाणूच्या प्रसारावर अहोरात्र लक्ष ठेवण्यासाठी एक पथक स्थापन केल्याचेही जाहीर झाले. याआधी या विषाणूच्या प्रसाराची माहितीच नव्हती असे नाही. आकडे मिळत होते, ते वाढत असल्याचेही दिसत होते. बहुतेक जण काही काळाने या आजारातून बरे होत असल्यामुळे ‘घबराटीचे कारण नाही’ असा दिलासाही काही तज्ज्ञ देत होते. परंतु फेब्रुवारीच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवडय़ापासून अनेक शहरांमध्ये दिवसाच्या तापमानात वाढ होऊ लागली, रात्र आणि दिवसाच्या तापमानातील फरक वाढू लागला, या शहरांतील प्रदूषण बेबंदच असल्यामुळे लवकर बरा न होणारा खोकला, त्यासह येणारा ताप अशा तक्रारी वाढू लागल्या. ‘एच-थ्री एन-टू’चा पहिला इशारा वैद्यक संघटनेने दिला, तो या पार्श्वभूमीवर. मात्र तेव्हा वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी, ‘कोविड-१९’मुळे ज्या रुग्णांवर दीर्घकाळ त्रास देणारे परिणाम झाले, त्या रुग्णांतच या नव्या तक्रारी वाढल्या आहेत का, अशीही शंका व्यक्त केली. वैद्यकशास्त्रात अशी शंका रास्तच, पण तिचा म्हणावा तसा पाठपुरावा व्यवस्थात्मक पातळीवरून झाला नसल्याने रुग्णांची घालमेल वाढली आणि घबराटही चोरपावलांनी दबा धरून बसली.

वास्तविक खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी तक्रार करणाऱ्या रुग्णांपैकी ‘एच-थ्री एन-टू’चे रुग्ण तुलनेने कमी होते. जानेवारीत ३,९७,८१४ जणांनी श्वसनास त्रास देणारा खोकला आणि तापाची कणकण अशी तक्रार केल्याची नोंद झाली होती, पण ‘एच-थ्री एन-टू’चे रुग्ण त्या महिन्यात १२४५ होते. अन्य रुणांपैकी गंभीर श्वसनरोग मानल्या जाणाऱ्या ‘सारी’ (सीव्हिअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस)चे रुग्ण त्या महिन्यात ७,४०१ होते. फेब्रुवारीत खोकल्याने ४,३६,५२३ जणांना बेजार केले, त्यापैकी ‘सारी’चे रुग्ण ६९१९, तर ‘एच-थ्री एन-टू’ची लागण झालेले १३०७ होते. मार्च महिन्याच्या पहिल्या नऊ दिवसांत हा आकडा वेगाने वाढला. एकंदर रुग्ण १,३३,४१२, तर ‘एच-थ्री एन-टू’ चे आणखी ४८६ रुग्ण, अशी नोंद झाली.  थोडक्यात, तापमानातील बदल स्थिरावले तरीही तक्रारी थांबत नाहीत आणि विषाणू-प्रसाराचा संबंध प्रदूषण किंवा तापमानातील चढउतारांशी जोडता येत नाही, हे ९ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनंतरच स्पष्ट झालेले आहे.

‘मोठेच संकट हवे?’ (४ मार्च) या संपादकीयातून ‘लोकसत्ता’ने या अरिष्टाची दखल घेतली होती. खोकला- तापाचे वाढते रुग्ण, आजाराचा वाढता कालावधी आणि ‘एच-थ्री एन-टू’चा वैद्यक संघटनेने त्या वेळी नुकताच दिलेला इशारा, यांचा उल्लेख त्यात होता. अर्थात, ‘एच-थ्री एन-टू’ हा विषाणू गेली काही वर्षे मानवाला माहीत असला तरी, त्याचे आताचे स्वरूप अधिक निराळे आहे, ते प्रतिजैविकांना (अँटिबायोटिक्स) दाद न देणारे दिसते आहे, हा तज्ज्ञांचा होरा खरा ठरतो आहे. त्यामुळे काळजी अधिक वाढते. प्रतिजैविकांचा वापर टाळा, असे डॉक्टरच सांगू लागले आहेत. त्यामुळे मुखपट्टी वापरण्यासारखी काळजी घेण्याची जबाबदारी आता नागरिकांवरही येते. मात्र नागरिकांनी काळजी घेणे, हा व्यवस्थात्मक उपाययोजनांचा पर्याय ठरू शकत नाही. विषाणूजन्य आजाराच्या प्रसारावर लक्ष ठेवणे, विशेषत: वयोवृद्ध रुग्णांना त्यापासून असलेला धोका स्पष्ट करणे, विशिष्ट भागांमध्ये हा विषाणू पसरतो आहे का, असल्यास कशामुळे याकडे लक्ष ठेवणे आणि तो किती पसरेल याची विदा-आधारित भाकिते मांडून संभाव्य उपाययोजनांची आखणी करणे ही सारी कामे मार्गदर्शक यंत्रणेची आहेत. घबराट न पसरवता, इंटरनेटऐवजी डॉक्टरांचाच सल्ला घेण्याचे पथ्य अशा वेळी नागरिकांनी पाळले तरी नेमकी आकडेवारी केंद्रीय पथकाकडे पोहोचू शकेल. ही काळजी उशिरा सुरू झाली असली, तरी स्वागतार्ह आहे.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 02:28 IST
ताज्या बातम्या