प्राथमिक शाळेत जाण्यापूर्वीच शिक्षणाला सुरुवात करणाऱ्या बालवाडीपासून ते स्पर्धा परीक्षांपर्यंतच्या शिक्षणाच्या सर्व पायऱ्यांवर खासगी उद्योगांची पकड हळूहळू घट्ट होत चालली आहे. प्रत्यक्ष अभ्यासक्रमाच्या शुल्कापेक्षा अधिक पैसे भरून खासगी शिकवण्या लावण्याची पालकांची हौस पुरी करण्यासाठी आता वित्तसंस्थांनीही सहज कर्जाचे गाजर दाखवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दशकांतील शिक्षणाच्या खासगीकरणामुळे प्रत्येक पातळीवरील स्पर्धा कमालीची वाढली आहे. त्यामध्ये टिकण्यासाठी खासगी शिकवणी वर्गाकडून विविध प्रकारची आमिषे दाखवली जातात. ‘शंभर टक्के यशाची खात्री’ देणाऱ्या या शिकवणी वर्गाच्या जाहिरातींना भुलून विद्यार्थी आणि पालक तिथे प्रवेश घेतात. तेथील प्रवेश शुल्क इतके जास्त असते की, एवढे पैसे गोळा करणेही कित्येक वेळा पालकांना शक्य नसते. अशा वेळी वित्त संस्थांचा त्यामध्ये प्रवेश होतो. अशा कर्ज देणाऱ्या संस्थांना पुढे करून हे शिकवणी वर्ग आपली धन करत असतात. या भूलथापांना बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. साधी चौकशी करायला येणाऱ्या पालकांकडे ‘सावज’ म्हणून पाहणारे हे वर्ग पालकांची अक्षरश: नाडवणूक करत असतात. मात्र कोणत्याही नियमांद्वारे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येऊ शकत नाही. शिक्षण हा आता व्यवसाय झाला आहे, हे जेवढे गंभीर, त्याहूनही खासगी शिकवणी वर्गातील आर्थिक उलाढाल अधिक गंभीर. अभ्यासक्रम शिकवणाऱ्या अधिकृत शाळा, महाविद्यालयांमध्ये वर्गातील उपस्थिती यथातथाच असते. त्यासाठीचे शुल्क खासगी शिकवण्यांच्या मानाने कितीतरी अधिक असते. वातानुकूलित वर्ग, व्यक्तिगत लक्ष, उत्तम शिक्षणाची आणि उत्तीर्ण होण्याची हमी यासारख्या जाहिरातबाजीला बहुतेक जण बळी पडतात आणि या वर्गाचे शुल्क परवडत नसले, तरीही कर्ज काढून आपल्या पाल्यांच्या भविष्याची चिंता वाहणाऱ्या पालकांना त्यामुळे केवळ कर्जाच्या विळख्यात अडकावे लागते. शिकवणी वर्गाचे शुल्क परवडत नाही अशी तक्रार करताच, कर्ज मिळवून देण्याचा पर्याय पुढे ठेवला जातो आणि कोणत्याही परिस्थितीत आलेला विद्यार्थी हातचा सुटणार नाही, अशी व्यूहरचना करणाऱ्या शिकवणी वर्गामुळे खरेच किती जणांचे भले झाले, याचाही शोध घ्यायला हवा. कोटा हे शहर गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षांच्या शिकवणी वर्गाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. त्यातील आर्थिक उलाढाल इतकी वाढली आहे की, तेथील शिकवणी वर्गाच्या टोलेजंग इमारती पाहून कुणीही दिपून जावे. लातूरसारख्या शहरात शिकवणी वर्गाचे पेव इतके वाढले आहे की, शिकवणी वर्गाच्या चालकांमधील स्पर्धा अनेकांच्या जिवावर बेतू लागली आहे. काही लाख रुपयांचा गलेलठ्ठ पगार देऊ शकणाऱ्या शिकवणी वर्गाची उलाढाल काही कोटींमध्ये होत असल्याचे सांगण्यात येते. समाजमाध्यमे आणि अन्य सगळय़ा माध्यमांतून जाहिरातींवर प्रचंड पैसे खर्च करणाऱ्या या वर्गाच्या संचालकांसाठी प्रत्येक विद्यार्थी गिऱ्हाईक असतो. काहीही करून त्याला प्रवेश घेण्यास भाग पाडायचे आणि आपले खिसे भरायचे, हा व्यवहार शिकवणी वर्गाच्या बाजारपेठेत सुरू असतो. त्यांच्याबरोबरीने वित्त संस्थांचीही उलाढाल वाढत जाते आणि नंतरच्या काळात कर्जाची परतफेड करता करता दमछाक होणाऱ्या पालकांपुढे अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहतो. शिकवणी वर्ग आणि वित्तसंस्थांची ही हातमिळवणी अनेक प्रकरणांत पालकांच्या काळजीत भर घालणारी असते. त्यामुळे या विषयाकडे सरकारी पातळीवरून गंभीरपणे पाहण्याची गरज आहे.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी