scorecardresearch

अन्वयार्थ : प्रेम कुणावरही करावे!

गर्भपाताला कायद्याने विरोध करणाऱ्या अमेरिकेने समलैंगिक विवाहांना नुकतीच कायदेशीर मान्यता देणे, याचे कोडे अमेरिकी नागरिक कसे सोडवणार आहेत, ते त्यांचे त्यांनाच माहीत.

अन्वयार्थ : प्रेम कुणावरही करावे!

गर्भपाताला कायद्याने विरोध करणाऱ्या अमेरिकेने समलैंगिक विवाहांना नुकतीच कायदेशीर मान्यता देणे, याचे कोडे अमेरिकी नागरिक कसे सोडवणार आहेत, ते त्यांचे त्यांनाच माहीत. भूमिका म्हणून या दोन्ही मुद्दय़ांची सांगड कशी घालायची, हा खरेतर प्रश्नच आहे. कारण पुरोगामी विचार, आधुनिकता, समता, स्वातंत्र्य या तळ्यात मळ्यात राहणाऱ्या किंवा सोयीसवडीने येणाऱ्या गोष्टी नाहीत.  एकीची कास धरली की दुसरी तिचाच अपरिहार्य भाग म्हणून पुढे येत राहते. आणि तिचा स्वीकार करतच पुढे जावे लागते. त्यामुळे एका मुद्दय़ावर प्रतिगामी आणि दुसऱ्या मुद्दय़ावर पुरोगामी असणे हे एरवी खरे तर वैचारिक गोंधळाचे लक्षण. पण अशा कसरती करण्याची जगभर सगळीकडे सगळ्यांनाच सवय झाली असावी. त्यामुळेच ५० वर्षांपूर्वी अमेरिकी स्त्रीला गर्भधारणेचे स्वातंत्र्य देणाऱ्या अमेरिकेने नंतर घूमजाव केले आणि आता  समलैंगिकांच्या विवाहामधले अडथळे काढून टाकून त्यांना मान्यता दिली आहे. अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये गेली काही वर्षे न्यायालयाच्या पातळीवरून या मुद्दय़ावर वेगवेगळे निर्णय घेतले गेले होते. आता ‘रिस्पेक्ट ऑफ मॅरेज अ‍ॅक्ट’ हे विधेयक मंजूर झाल्यामुळे लग्न करून एकत्र राहू शकणाऱ्या समलैंगिक जोडप्यांचा मार्ग प्रशस्त झाला आहे. त्याबरोबरच आता जगभर इतरही अनेक देशांमध्ये या मागणीचा जोर वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. सध्या ३३ देशांमध्ये समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता आहे. नेदरलॅण्ड हा समलैंगिक विवाहांना मान्यता देणारा जगामधला पहिला देश. तिथे २००१ पासून त्यासंबंधीचा कायदा अस्तित्वात आला आहे.

समलैंगिकांच्या मागण्यांचा रेटा जगात सगळीकडेच वाढताना दिसत असला, त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी अजूनही म्हणायला हवी तितकी निकोप नाही, हे वास्तव आहे. नातेसंबंधच नाही तर आपल्या जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे बहुतेकजण एका ठरावीक, चौकटीबद्ध दृष्टिकोनातून पहातात. समाजव्यवस्था नीट सुरू रहावी यासाठी परंपरेने ही चौकट घालून दिलेली असते. ती अबाधित राहणे ही गोष्ट व्यवस्थेसाठी सोयीची असली तरी प्रत्यक्षात ज्याच्यासाठी हे सगळे चालते, त्या माणसाचे जगणे तसे नसते. मानवी मन, त्याच्या प्रेरणा, आकांक्षा, भावभावना या सगळ्याच गोष्टी प्रत्येक वेळी ठाकून ठोकून चौकटबद्ध होतीलच असे नाही. वंशसातत्यासाठी स्त्रीपुरूषांचे सहजीवन ही निसर्गाची गरज असली तरी प्रत्येक व्यक्तीची सहजीवनाची तसेच  मानसिक- भावनिक गरज वेगळी असू शकते. मुख्य म्हणजे ती तशी असण्यातही निसर्गाचाच भाग असतो. त्यामुळे कुणी कुणावर प्रेम करायचे आणि कुणावर नाही, ते लिंगसापेक्ष असावे की नसावे, हे ना राज्यसंस्थेने ठरवावे, ना आणखी कोणत्या व्यवस्थेने. आपले सहजीवन कोणाबरोबर असावे, हे ठरवायचा अधिकार त्या त्या व्यक्तीला असणे हा खरा आधुनिक विचार.  ज्या समाजाला तो अजूनही स्वीकारता येत नाही, त्या समाजात कित्येक लोकांना आजही कुचंबणा सहन करत जगावे लागते आहे.

करियर, पैसा, मानमरातब, यश या माणसाच्या आयुष्यामधल्या पुढच्या पायऱ्या. जिवाचा जीवलग भेटणे आणि त्याच्याबरोबर प्रेमाची देवाणघेवाण ही पहिली पायरी. ती गाठण्यासाठी कुणाचीही दमछाक होणे, कोंडी होणे वाईटच. प्रेम कुणीही करावे, कुणावरही करावे, याचे भान सगळ्या जगाला येईल तो सुदिन!

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या