scorecardresearch

Premium

अन्वयार्थ : साखरेची हातातोंडाशी गाठ!

गेली काही वर्षे जगाच्या बाजारपेठेत भारताचे नाव दोन वस्तूंसाठी घेतले जात आहे.

sugar

गेली काही वर्षे जगाच्या बाजारपेठेत भारताचे नाव दोन वस्तूंसाठी घेतले जात आहे. भारतात तयार होणारी साखर आणि तांदूळ आज जगाच्या बाजारपेठेत सर्वमान्य होत असतानाच, निसर्गाच्या प्रकोपामुळे यंदा भारतीय साखर जागतिक बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर दिसण्याची शक्यता मावळू लागली आहे. मागील वर्षांपेक्षा यंदा भारतातील साखरेच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. ती येण्याचे कारण जुलैपासून दिवाळीपर्यंत देशाच्या विविध भागांत सतत पाऊस पडला. महाराष्ट्रात तर अतिवृष्टीचा फटका बसला. उसाचे क्षेत्र जलमय झाले. वाफसाच न आल्यामुळे उसाच्या मुळय़ा कुजून गेल्या. अपेक्षित वाढ झाली नाही आणि गोडीही भरली नाही. त्यामुळे देशात आणि राज्यात मागील वर्षांइतकेच उसाचे क्षेत्र असूनही उत्पादनात मोठी तूट येताना दिसत आहे.

भारतात यंदा साखरेचे उत्पादन सुमारे ३३० लाख टन एवढे होईल, अशी अपेक्षा आहे. त्यातील २७५ लाख टन साखर देशांतर्गत वापरासाठी लागेल. याचा अर्थ केवळ ५५ लाख टन साखर जागतिक बाजारासाठी हाती राहील. त्यातही यापूर्वीच झालेल्या करारानुसार ६१ लाख टन साखर निर्यात करावीच लागणार आहे. म्हणजे सहा लाख टनांचा घाटाच होईल. त्यासाठी मागील वर्षीच्या साठय़ातील साखर वापरावी लागेल. त्यामुळे साखरेच्या संचित साठय़ातही घट होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी भारताने ६५ लाख टन साखरेचा साठा केला होता. तो सुमारे तीन महिन्यांसाठी पुरेसा असतो. यंदा हा साठा ५५ लाख टनांपर्यंत राहील.

gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
justin trudea canada india conflict
Video: “जस्टिन ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”, अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितलं कारण; म्हणे, “हे म्हणजे मुंगीनं…”!

इंधनावरील खर्च कमी होण्यासाठी इथेनॉल मिसळण्याच्या सरकारच्या योजनेलाही त्याचा फटका बसणार आहे. भारताने २०२५ पर्यंत २५ टक्के इथेनॉल मिसळण्याचे धोरण आखले, तरी अद्याप त्या प्रमाणात ते तयार होत नाही. ब्राझीलसारख्या साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या देशाने इथेनॉल निर्मितीवर भर देत इंधनात ३० टक्के मिश्रण करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे त्या देशातून जागतिक बाजारपेठेत साखरेचा पुरवठा कमी प्रमाणात राहील. दुसऱ्या बाजूला भारताने यंदा इथेनॉल निर्मितीसाठी ४५ लाख टन साखरेचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यातही आता घट होऊन ते ३५ लाख टनांपर्यंतच राहील, असा अंदाज आहे. 

जागतिक बाजारात साखरेचे दर तेजीत आहेत. आखाती देशांना प्रति क्विंटल ५५० ते ५६० डॉलरने साखर पोहोच करावी लागत आहे. दरातील तेजीमुळे ६१ लाख टन साखर निर्यातीचे करार पूर्ण झाले आहेत. आता देशातच साखरेचा काहीसा तुटवडा निर्माण होणार असल्यामुळे यापुढे निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता नाही. जागतिक साखरेच्या उत्पादनात ब्राझील, भारत, पाकिस्तान आणि थायलंड हे जगाला साखर पुरविणारे देश आहेत. त्यापैकी यापुढे भारत साखर निर्यात करू शकणार नाही. पाकिस्तानमधील पुरामुळे तेथील साखर उद्योग साखर निर्यात करण्याच्या स्थितीत नाही. ब्राझीलमध्ये यापूर्वी इथेनॉल इंधनाला आयात करातून सूट दिली जात होती. मात्र, देशी उद्योगाला संरक्षण देण्यासाठी इथेनॉल इंधनावर यंदा १८ टक्के आयात कर लागू केला आहे. त्यामुळे ब्राझीलमधील इथेनॉल निर्मिती वाढू शकते.

ब्राझीलचा साखर हंगाम एप्रिल महिन्यात सुरू होईल. जगाच्या दृष्टीने समाधानाची बाब ही की ब्राझीलचे उसाचे आणि साखरेचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी ५३८.९८ दशलक्ष टन उसाचे उत्पादन झाले होते, यंदा ते ५६० ते ५९५ दशलक्ष टनांवर जाण्याची शक्यता आहे तर साखर उत्पादन मागील वर्षी ३३.२९ दशलक्ष टन होते, ते यंदा ३६ ते ३७ दशलक्ष टनांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगाला आणि भारतालाही पुरेल इतकी साखर निर्मिती होईल. पण, अतिरिक्त साखर उत्पादन होणार नसल्यामुळे देशासह जागतिक बाजारात साखरेचे दर या वर्षांत तेजीतच राहतील असे दिसते. अर्थात असे असले, तरी त्याचा थेट फायदा भारताला मिळण्याची शक्यता कमी होत आहे.  देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचा पुरवठा नियमित राहील, एवढी साखर निर्मिती होईल, हे खरे. मात्र नगदी पीक म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेशातील शेतकरी उसाला प्राधान्य देतात. नैसर्गिक आपत्तीमुळे उसाच्या लागवडीखालील क्षेत्र तेवढेच राहूनही उत्पादनात मात्र घट होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-02-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×