मोरोक्को आणि लिबिया या उत्तर आफ्रिकी अरब देशांमध्ये गेल्या काही दिवसांत आलेल्या नैसर्गिक आपत्तींनी घडवलेले थैमान अभूतपूर्व आहे. दोन्ही आपत्तींमध्ये मृतांचा आकडा पहिल्या दोन दिवसांतच वाढलेला दिसून आला. यातून जशी आपत्तींची तीव्रता दिसते, तितकाच आपत्ती प्रतिसाद आणि निवारणाचा अभावही प्रतिबिंबित होतो. मोरोक्को आणि लिबिया या देशांमध्ये सध्या वेगवेगळय़ा प्रकारच्या राजवटी आहेत. मोरोक्कोमध्ये तुलनेने स्थिर परंतु सुस्तावलेली घटनात्मक राजेशाही आहे. तर लिबिया हा अधिक अस्थिर आणि दुभंगलेला आहे. याच्या पश्चिम आणि पूर्व भागावर वेगवेगळय़ा राजवटींची सत्ता आहे. पण दोन्ही राजवटींमध्ये लोकशाहीचा लवलेश नाही. त्यामुळे कर्नल मुहाम्मर गडाफी यांच्या २०११मधील उच्चाटन व हत्येनंतर या देशात केंद्रीभूत सरकार नावाची व्यवस्थाच अस्तित्वात नाही. मोरोक्कोतील भूकंपाची रिश्टर तीव्रता ६.८ इतकी होती.
लिबियात जवळपास १०० सेंटिमीटर पाऊस एका दिवसात कोसळला. जगात इतरत्र यापेक्षा अधिक तीव्रतेचे भूकंप आणि अधिक पाऊस उद्भवत असतात. परंतु नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याच्या पद्धतीमध्ये आजही प्रगत आणि अर्धप्रगत किंवा आर्थिक मागास देशांच्या बाबतीत तफावत दिसून येतेच. भूकंपवगळता इतर नैसर्गिक उत्पात म्हणजे उदा. अतिवृष्टी, उष्णलहरी, वणवे यांच्या भाकितांविषयीचे तंत्रज्ञान प्रगत देशांमध्ये अत्याधुनिक बनल्यामुळे तेथे जीवित व वित्तहानी तुलनेने कमी होते. या देशांमध्ये प्रतिसाद आणि निवारण यंत्रणाही सुसज्ज असते. या तुलनेत बहुतेक आशियाई आणि आफ्रिकी देशांमध्ये या आघाडय़ांवर प्रचंड उदासीनता आणि निष्काळजीपणा दिसून येतो. त्यामुळे अपरिमित जीवित व वित्तहानी होते. मोरोक्को आणि लिबिया या दोन्ही देशांना या आघातांतून सावरण्यासाठी बराच अवधी लागेल.
मोरोक्कोत झालेला भूकंप गेल्या जवळपास १०० वर्षांतला त्या देशातील सर्वाधिक शक्तिशाली आणि विनाशकारी ठरला. या भूकंपाचे केंद्र मराकश या मोठय़ा शहराच्या नैर्ऋत्येला अटलास पर्वताच्या खाली होते. या भागात भूकंपांचे लहान-मोठे धक्के बसत असल्याचे २००७ मध्ये आढळून आले होते. त्यामुळे भूकंप अचानक आला, तरी अकल्पित नव्हता. पर्वतीय ग्रामीण भागाला मोठा धक्का बसला. अशा ठिकाणी शहरांप्रमाणे घरांची रचना पुरेशी भूकंपरोधक नसते. त्यामुळे साध्या संरचनेची दगड-विटांची घरे पत्त्यांसारखी कोसळली आणि विखुरली. भूगर्भातील या प्रलयकारी हालचालीनंतर तिकडे लिबियाच्या पूर्व भागात आकाश कोसळले. तो प्रकोप ‘डॅनियल’ वादळामुळे घडून आला. डेर्ना या बंदर शहरामध्ये दोन धरणांचे पाणी घुसले. हे शहर एका खोऱ्याच्या टोकाला वसले आहे. धरण परिसरात डॅनियल वादळाने खोऱ्याच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या धरण क्षेत्रात अभूतपूर्व पाऊस ‘ओतला’. तो जलभार सोसण्याची क्षमताच नसलेली जुनाट धरणे फुटली आणि ते पाणी डेर्ना शहरात पसरले. या शहराची लोकसंख्या जवळपास १ लाख असून, मृतांचा अधिकृत आकडा ५३०० रविवार उजाडेपर्यंत असला, तरी दहा हजारांहून अधिक बेपत्ता आहेत. ते जिवंत असण्याची आशा संपुष्टात आली आहे. मोरोक्कोमध्ये मृतांचा आकडा तीन हजारांवर पोहोचला असला, तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक जणांनी जीव गमावला असण्याची शक्यता आहे.
संकटातून उभे राहण्यासाठी यांना प्राधान्याने पाश्चिमात्य देश आणि संस्थांवर अवलंबून राहावे लागेल. पण यासाठी मदत स्वीकारण्याची यंत्रणा असावी लागेल. मोरोक्कोने आतापर्यंत केवळ संयुक्त अरब अमिराती, कतार, ब्रिटन आणि स्पेनकडून मदत स्वीकारली. फ्रान्सकडून सरकारी व स्वयंसेवी संस्थात्मक मदत त्यांनी नाकारली आणि याबद्दल कोणतेही कारण दिले नाही. मोरोक्कोचे राजेही सुरुवातीला भूकंपस्थळी फिरकले नव्हते. तेथील पर्वतीय भागांमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांवर ‘सरकार अस्तित्वात आहे का’, असा संतप्त सवाल यंत्रणेला विचारण्याची वेळ आली. मोरोक्कोचे लष्कर सध्या मदत व पुनर्वसन कार्यात गुंतलेले असले, तरी ते पुरेसे परिणामकारक ठरलेले नाही. लिबियामध्ये तर वेगळीच कहाणी. परदेशी मदतपथकांना लिबियात येण्यासाठी कधी व्हिसा मंजूर होतो तर कधी नाही. कारण दोन भिन्न राजवटी तेथे कार्यरत आहेत. मोरोक्को हा पर्यटन आणि औद्योगिकीकरणामुळे आर्थिकदृष्टय़ा बऱ्यापैकी स्थिरावलेला देश. लिबिया हा अस्थिर व दुभंगलेला असला, तरी तेल उत्पादक आणि निर्यातदार असल्यामुळे काही प्रमाणात निधी या देशाकडेही उपलब्ध आहे. परंतु तीन दिवसांच्या अंतराने आलेल्या नैसर्गिक आपत्तींनी या दोन्ही देशांचे कंबरडे मोडले आहे. कारण शिस्त आणि व्यवस्था हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक त्यांच्यात अभावानेच मौजूद आहेत. ‘अस्मानी’ संकटात ‘सुल्तानी’ अनास्थेमुळे नागरिकांच्या हालात भरच पडली.